অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गुहिलोत घराणे

गुहिलोत घराणे

गुहिलोत घराणे

राजपुतान्यातील एक राजपूत घराणे. गुहिलोत (गुहिलपुत्र) हा वंश मेदपात (मेवाड) प्रदेशात राज्य करीत होता. राजस्थानातील सर्व राजपूत वंशांमध्ये त्याला त्या वंशातील अनेक राजांच्या शौर्याने, कर्तबगारीने, धर्माभिमानाने आणि दुर्दम्य स्वातंत्र्यप्रीतीने मानाचे स्थान मिळवून दिले होते. राजस्थानातील परंपरेप्रमाणे या घराण्याचा मूळ पुरुष ⇨ बाप्पा रावळ मानण्यात येतो. या वंशाचा सर्वांत प्राचीन कोरीव लेख पूर्वीच्या उदयपूर संस्थानात अनंतपूर येथे सापडलेला विक्रम संवत १०३४ (इ. स. ९७७) चा आहे. त्यात वीस पिढ्यांचा उल्लेख आहे. त्यावरून या घराण्याचा मूळ पुरुष गुहदत्त हा ब्राह्मण असून आनंदपूर (गुजरातेतील वडनगर) येथून राजस्थानात आला होता. त्याचा काळ सु. सहाव्या शतकाचा उत्तरार्ध असावा. बाप्पा हे त्याच्या एखाद्या वंशजाचे दुसरे नाव असावे. राजपूत परंपरेत बाप्पाला एकमुखाने मिळालेली प्रतिष्ठा त्याने एखादे अलौकिक महत्त्वाचे कार्य (धर्मध्वंसी अरबांचा पाडाव करण्यासारखे) केल्यामुळे त्याला प्राप्त झाली असावी. सिंध जिंकल्यावर अरबांनी ७२५ च्या सुमारास राजस्थानात घुसून चितोडच्या मौर्य राजाला ठार केले. त्या प्रसंगी प्रतीहार नागभट्टाप्रमाणे एका गुहिलवंशी राजाने त्यांच्या सत्ताप्रसाराला यशस्वी प्रतिकार केलेला असावा. हा राजा कोण, याविषयी विद्वानांत मतभेद आहेत. कोणी तो कालभोज, तर कोणी त्याचा पुत्र खुम्माण हा असावा, असे म्हणतात. त्याचे बाप्पा (किंवा बप्प) हे उपनाम कोरीव लेखांत येत नसल्यामुळे या बाबतीत निश्चित निर्णय करणे कठीण आहे.

गुहिलोतांची आरंभीची राजधानी नागहृद (उदयपूर संस्थानातील नागदा) ही होती. नंतर त्यांनी दहाव्या शतकात ती आघात (आहाड) येथे नेली. बाप्पाने मौर्यांच्या पतनानंतर चित्रकूटचा (चितोड) किल्ला काबीज केला असावा.

गुहिलोत हे आरंभी प्रतीहारांचे सामंत होते. त्यांनी आपल्या सम्राटांना त्यांच्या स्वाऱ्यांत साहाय्य करून विजय मिळवून दिले होते;पण दहाव्या शतकाच्या आरंभी राष्ट्रकूट नृपती तिसरा इंद्र याने प्रतीहार महीपालाचा पराभव करून कनौज उद्‌ध्वस्त केले. त्यानंतर इतर सामंतांप्रमाणे गुहिलोतांनीही आपले स्वातंत्र्य पुकारले. दहाव्या शतकाच्या द्वितीयार्धात होऊन गेलेल्या भर्तृपट्टाने महाराजाधिराज पदवी धारण केली. त्याचा पुत्र अल्लट याने तर प्रतीहार सम्राट देवपाल याला जिंकून ठार केले. नंतर अल्लटाचा पणतू शक्तिकुमार याच्या कारकीर्दीत परमार नृपती वाक्पति मुंज याने आघात राजधानीवर आक्रमण करून ती उद्ध्वस्त केली. तथापि शक्तिकुमाराने आपले राज्य पुन्हा मिळवून दहाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत राज्य केले.

बाराव्या शतकात सामंतसिंहाचे राज्य नाड्‌डूलच्या कीर्तिपालाने जिंकून घेतले. तेव्हा त्याने वागद (डुंगरपूर) येथे नवीन राज्य स्थापले. पण त्याचा धाकटा भाऊ कुमारसिंह याने कीर्तिपालाला हाकून देऊन पुन्हा आहाड येथे आपली सत्ता प्रस्थापित केली. त्याच्या शाखेला महारावळ आणि दुसरीला महाराणा शाखा, अशी नावे पडली. ही दुसरी शाखा शिसोदिया राजपूत म्हणून विख्यात झाली होती. छत्रपती शिवाजी राजांचा या शाखेशी संबंध जोडतात.

अलाउद्दीनने १३०२ मध्ये मेवाडवर स्वारी करून चितोडला वेढा दिला. त्या वेळी चितोड येथे रत्नसिंह राज्य करीत होता. त्याची राणी पद्मिनी आपल्या असामान्य लावण्याने विख्यात झाली होती. तिच्या अभिलाषेने अलाउद्दीनने हा वेढा घातला, असे मुसलमानी व हिंदी ग्रंथांत म्हटले आहे; पण काहींना पद्मिनीची कथा असंभाव्य वाटते. रत्नसिंहाने काही काळ किल्ला मोठ्या शौर्याने लढवून नंतर शरणागती पतकरली. पण शिसोदिया शाखेच्या लक्ष्मणसिंहाने शौर्याची पराकाष्ठा करून लढाई चालूच ठेवली. शेवटी तीत तो व त्याचे सातही पुत्र धारातीर्थी पडले. पद्मिनी आणि किल्ल्यातील इतर राजपूत स्त्रियांनी जोहार केला. नंतर अलाउद्दीनने किल्ल्यावर आपल्या मुलाची नेमणूक केली.

चितोड पडल्यावरही गुहिलोतांनी युद्ध चालूच ठेवले. तेव्हा अलाउद्दीनला चितोड किल्ला चाहमान मालदेवाच्या स्वाधीन करून आपल्या मुलाला परत बोलावणे भाग पडले. अवघ्या पंचवीस वर्षांच्या आत महाराणा हम्मीरने चितोड पुन्हा काबीज करून तेथे आपला ध्वज फडकाविला.

या वंशातील यानंतरचा श्रेष्ठ राजा ⇨महाराणा कुम्भ हा होय. याने माळवा आणि गुजरात येथील मुसलमानांशी सतत युद्ध करून आपले स्वातंत्र्य टिकविले. हा जसा शूर तसा विद्वान, कलाभिज्ञ आणि उदार होता. याने बांधलेला अभेद्य कुंभळगढ आणि चितोड किल्ल्यातील मोठा कीर्तिस्तंभ यांनी त्याची कीर्ती अजरामर केली आहे.

यानंतरचा उल्लेखनीय राणा म्हणजे ⇨संग्रामसिंह किंवा संग हा होय. १५०९ पासून याने माळवा, दिल्ली आणि गुजरात येथील सुलतानांशी सतत झगडून आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले. त्याने कधीही शत्रूपुढे शरणागती पत्करली नाही. सर्व राजपूत राजांचे संगठन करून उदयोन्मुख मोगल सम्राट बाबर याच्या प्रचंड सेनेशी त्याने सिक्रीजवळ खानुवा येथे सामना दिला. जगातल्या क्रांतिकारक लढायांत हिची गणना होते.

यानंतर राजपूत इतिहासातील संस्मरणीय घटना अकबराची १५६७ ची चितोडवर स्वारी होय. पुढे राणा संगाचा पुत्र ⇨ उदयसिंह मेवाडच्या गादीवर होता; पण तो भ्याडपणाने १५६७ च्या अकबराच्या स्वारीच्या वेळी चितोड सोडून निघून गेला. तथापि जयमल आणि पत्ता या दोन राजपूत वीरांनी नेतृत्व पतकरून किल्ला लढविला, प्राणपणाने शत्रूशी युद्ध केले; पण अखेर सर्वच धारातीर्थी पडले. मग राजपूत रमणींनी आपल्या चारित्र्याच्या रक्षणार्थ जोहार केला.

चितोडच्या पराभवानंतर उदयसिंहाने उदयपूर स्थापून तेथे काही काळ राज्य केले. काही राजपुतांनी अकबराचे स्वामित्व पतकरले व आपल्या मुली देऊन त्याच्याशी शरीरसंबंध केला. पण उदयसिंहाचा मानी आणि शूर पुत्र प्रतापसिंह याने त्याच्यापुढे मान लवविली नाही. अकबराने मानसिंह आणि आसफखान यांच्याबरोबर मोठी सेना देऊन त्याच्यावर पाठविले. ⇨हळदीघाटाच्या घनघोर लढाईत प्रतापसिंहाचा पराजय झाला, तरी तो तीतून निसटला आणि राजस्थानच्या दऱ्याखोऱ्यांतून त्याने मोगलांशी गनिमी काव्याच्या पद्धतीने झगडा चालू ठेवला. अकबर स्वतः त्यावर चालून गेला; पण त्याला प्रतापला न जिंकताच परत फिरावे लागले. त्याची पाठ वळताच प्रतापसिंहाने आपले गेलेले किल्ले एकामागून एक परत मिळविले.

जहांगीरच्या कारकीर्दीत मेवाडवर मोगलांनी अनेकवार आक्रमणे केली; ती राणा ⇨ अमरसिंहाने परतवून लावली. शेवटी जहांगीरचा मुलगा खुर्रम ऊर्फ शाहजहान याने प्रचंड सेनेसह स्वारी केली. त्याच्यापुढे अमरसिंहाच्या अल्पसेनेचा निभाव न लागून त्याला अखेरीस तह करावा लागला आणि मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारावे लागले. तथापि त्याची मोगलांच्या दरबारात हजर न राहण्याची अट मान्य करण्यात आली.

औरंगजेबाच्या कारकीर्दीत मेवाडच्या पुन्हा मोगल साम्राज्याशी झगडा झाला. औरंगजेबाने हिंदूंवर कर लादला, त्यामुळे मेवाडचा राणा राजसिंह याला संताप आला. त्याच वेळी जोधपूरचा अल्पवयस्क अजितसिंह यास पित्याचे राज्य मिळविण्याकरिता मुसलमान होण्याचा औरंगजेबाने आग्रह धरला. तेव्हा जोधपूरच्या शूर, राजनिष्ठ आणि धर्मनिष्ठ दुर्गादास मंत्र्याने मोगलांशी लढा देण्याचे ठरविले. राजसिंह त्याला मिळाला. औरंगजेबाने हा राजपुतांचा उठाव मोडून काढण्याकरिता स्वतः अजमीरला येऊन तळ दिला. राजपुतांनी दग्धभूनीतीचा अवलंब करून मोगल सैन्याला हैराण केले. शेवटी औरंगजेबाचा मुलगा अकबर राजपुतांना मिळून त्याच्या साहाय्याने आपल्या पित्याची गादी बळकावण्याचा प्रयत्न करून लागला. औरंगजेबाने कूटनीतीने त्याचे बंड मोडून काढले, तरी राजपुतांशी झालेल्या या दीर्घकालीन झगड्यात मोगल सैन्याची अपरिमित हानी झाली. तेव्हा राजसिंहानंतर त्याचा पुत्र जयसिंह याच्याशी मोगल सम्राटाने तह केला आणि आपले सैन्य मेवाडातून काढून घेतले.

यानंतर मेवाडच्या अवनीतीला आरंभ झाला. औरंगजेबानंतर दिल्लीच्या मोगल बादशाहांची सत्ता दुर्बल होत गेली. मराठ्यांनी बादशाहाकडून मेवाडच्या मुलखांत चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मिळविला. राजस्थान मोगल साम्राज्यात मोडते, असे मोगल बादशाह म्हणत असल्याकारणाने पहिल्या बाजीरावाने चौथाईसरदेशमुखी वसुलीकरिता मेवाडवर स्वारी केली. या स्वारीत राजपुतांना आपल्या हिंदुपदपादशाहीच्या योजनेत सामील करून घ्यावे, असाही त्याचा उद्देश होता; पण मेवाडचा राणा जगत्‌सिंह याने त्याला साथ दिली नाही.

पुढे तर राजपूत-मराठ्यांचे संबंध जास्तच बिघडले. होळकर व शिंदे यांना बाजीरावाच्या धोरणाचे महत्त्व न समजल्याने त्यांनी राजस्थानवर वरचेवर स्वाऱ्या करून जबर खंडण्या लादल्या आणि पुष्कळ पैसा जमा केला. नंतर शिंदे व होळकर एक झाले आणि त्यांनी इंग्रजांशी सामना देण्याचे ठरविले. या निमित्ताने राजस्थानात गोंधळ माजला. शेतकरी, सरदार, महाराणा सर्वच त्रस्त झाले. शेवटचा स्वतंत्र राणा भीभसिंह याच्या काळी पेशवे, शिंदे, होळकर इत्यादिकांचा पराजय इंग्रजांनी केलेला पाहिल्यावर त्यांच्यापुढे आपलीही धडगत लागणार नाही, याची जाणीव होऊन त्या राण्याने इंग्रजांचे आधिपत्य स्वीकारण्याचे ठरविले आणि आपला वकील इंग्रजांकडे पाठविला. इंग्रजांचे शिष्टमंडळ मेवाडमध्ये आले; तेव्हा मेवाडच्या जनतेने त्यांचे स्वागत केले. १६ जानेवारी १८१८ रोजी राण्याने इंग्रजांशी संरक्षणाचा आणि चिरंतन मैत्रीचा करार केला; पण पारतंत्र्याची बेडी आपल्या पायात अडकवून घेतली.

गुहिलोतांची आणखीही काही घराणी राजस्थानात राज्य करीत होती. सामंतसिंह याने डूंगरपूर-बांसवाड्याचे घराणे सु. ११७७ मध्ये स्थापले. तसेच लूनी नदीच्या काठीही यांची एक शाखा राज्य करीत होती.

संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. Struggle for Empire, Bombay, 1957.

२. गहलोत, जगदीशसिंह, राजपूताने का इतिहास, दो भाग, जोधपूर, १९३७, ६०.

३. देशपांडे, ह. वा. राजपूत राज्याचा उदय व ऱ्हास, पुणे, १९३८.

 

मिराशी, वा. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate