অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गोंडसत्ता

गोंडसत्ता

मध्य प्रदेशातील गढा-मंडला, देवगढ, खंडाल आणि महाराष्ट्रातील चंद्रपूर (चांदा) येथे गोंड राज्ये होऊन गेली. या प्रदेशाला गोंडवन असेही संबोधीत.

गढा-मंडला

याचा उदय चौदाव्या शतकात झाला.

या घराण्यात अठरा महत्त्वाचे पुरूष होऊन गेले. त्यांपैकी दुसरा पुरूष संग्रामशाह (१४८०-१५३०) याने चौरागढचा किल्ला बांधला. याची सून राणी दुर्गावती हिने आपला पती दलपतशाह याच्या पश्चात राज्य सांभाळले. १५६४ मध्ये अकबराचा सरदार आसफखान याने दुर्गावतीच्या राज्यावर स्वारी केली. दुर्गावती धैर्याने लढली. पण बलाढ्य मोगली सैन्यापुढे तिचा निभाव लागला नाही. तेव्हा पराजित झाल्यावर अब्रूरक्षणार्थ तिने आत्महत्या केली. तिची समाधी व तिने बांधलेला राणीताल गढाजवळ आहेत. बाळाजी बाजीरावाने १७४२ मध्ये या घराण्यातील बारावा पुरुष महाराजशाह याचा पराभव करून गढा-मंडला हे भाग घेतले. १८५७ मध्ये या घराण्यातील पुरुषांनी व रामगढच्या राणीने इंग्रजांविरुद्ध बंडे केली. त्यांबद्दल शंकरशाह व त्याचा मुलगा रघुनाथशाह यांस तोफेच्या तोंडी देण्यात आले. तेव्हा राणीने आत्महत्या केली.

देवगढ

या घराण्यात आठ कर्तृत्ववान पुरुष झाले. मूळ पुरुष जातबा व तिसरा पुरुष बख्तबुलंद हा असून त्याने राज्य वाढविले व नागपूर शहर वसविले. औरंगजेबाचे साहाय्य मिळविण्यासाठी हा सशर्त मुसलमान झाला; पण विवाह मात्र त्याने गोंड मुलींशीच केले. पहिल्या रघुजी भोसल्याने १७४८ मध्ये चौथ्याची बायको रतनकुंवर व तिचा मुलगा बुर्हानशाह यांनी मुसलमानांस साह्य केले म्हणून यांचा बहुतेक प्रदेश आपल्या प्रदेशात सामील केला.

खंडाल

खंडाल्याच्या नरसिंहरायाचे राज्य माळव्याच्या हूशंगशाहने १४३३ मध्ये नष्ट केले.

चंद्रपूर

चंद्रपूरचे गोंड राज्य सर्वांत अधिक भरभराटीस आले. या घराण्यात कर्तबगार असे पंधरा पुरुष होऊन गेले. याचे मूळ स्थान वर्ध्याच्या पश्चिमेचे शिरपूर हे होय. त्यांचा मूळ पुरुष भीमबल्लाळसिंह (१२५०) हा होय. सातवा पुरुष खांडक्या बल्लाळा (१४३७-६२) याने चंद्रपूर बसविले. पंधरावा पुरुष नीळकंठशाह याच्या वेळी १७५१ मध्ये रघुजीने चंद्रपूर खालसा केले. स्थापत्यकलेचे काही चांगले नमूने येथे आढळतात.

 

संदर्भ : 1. Wills, C. V. The Raj-Gond Maharajas of the Satapura Hills, London, 1923.

२. काळे, या. मा. नागपूर प्रांताचा इतिहास, नागपूर, १९३४.

आपटे, भा. कृ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate