অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ग्रीकांश संस्कृति

ग्रीकांश संस्कृति

(हेलेनिस्टिक सिव्हिलायझेशन). अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याच्या अंकित साम्राज्याचे विभाजन झाले,परंतु त्यातील समाजावर ग्रीक संस्कृतीची छाप पडली. त्यांतील प्राचीन संस्कृतींच्या व ग्रीक संस्कृतींच्या मिश्रणातून एक नवीन संस्कृती उदयाला आली. तिला ग्रीकांश संस्कृती ही संज्ञा देण्यात येते. या काळात ॲलेक्झांड्रिया या शहराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले, त्यामुळे या संस्कृतीला ॲलेक्झांड्रियन युग असेही संबोधितात. अलेक्झांडरचा मृत्यू इ. स. पू. ३२३ मध्ये झाला. खुद्द ग्रीक भूमी आणि इतर ग्रीक साम्राज्य यांवर रोमन सम्राटांची सत्ता इ. स. पू. ३१ मध्ये प्रस्थापित झाली.

या दोन घटनांमधील जवळजवळ तीन शतकांच्या काळाला ग्रीकांश युग असे नाव देतात. अलेक्झांडरने साम्राज्य स्थापनेच्या प्रेरणेने जगातील अनेक प्रदेशांवर आक्रमणे केली, तेथील राजसत्ता नष्ट केल्या आणि ग्रीकसत्ता दृढ करण्यासाठी ग्रीकांच्या वसाहती स्थापन केल्या. या विस्तीर्ण प्रदेशात–ग्रीस, ईजिप्त, पॅलेस्टाइन, तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान व पूर्वीचा वायव्य सरहद्द प्रांत आणि बलुचिस्तान यांचा समावेश होता. प्रत्येक ठिकाणी त्याने ग्रीक प्रांताधिप नेमला, तरी सबंध शासनाला त्यास संघटित स्वरूप देता आले नाही. या संमिश्र संस्कृतींमध्ये त्या त्या देशांची वेगवेगळी संस्कृती ओळखता येण्याइतपत पृथक् असली, तरी सर्वांमध्ये ग्रीक संस्कृतीचा प्रभाव कमीअधिक प्रमाणात पडलेला दिसतो.

राजकीय इतिहास

अलेक्झांडरच्या मृत्यूच्या वेळी त्याला कोणीही प्रत्यक्ष वारस नव्हता किंवा आपल्यानंतर गादीवर कोणी बसावे,याचीही त्याने व्यवस्था केली नव्हती. यामुळे या अफाट राज्याची व्यवस्था करण्याचे काम स्वाभाविकपणेच जे चारपाच प्रमुख सेनानी होते, त्यांवर येऊन पडली. निदान आरंभी तरी या अफाट राज्याची वाटणी करण्याचे धाडस कोणी दाखविले नाही. अलेक्झांडरचा सावत्र भाऊ ॲरिडीअस आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या रॉक्सेना राणीला झालेला पुत्र चौथा अलेक्झांडर या दोघांचे संयुक्त राज्य स्थापन करण्यात आले. त्याच वेळी साम्राज्याची सहा मोठ्या प्रांतांत विभागणी करून त्यांवर प्रांताधिप नेमले. या चढाओढीत जे जास्त बलदंड होते, त्यांना जास्त समृद्ध प्रांत मिळाले. यूरोपीय ग्रीसवर दोन आणि ईजिप्त, तुर्कस्तान, इराण अफगाणिस्तान यांवर प्रत्येकी एक, असे सहा मुख्य प्रांताधिप नेमण्यात आले.

अलेक्झांडरचे सहकारी असलेले अँटिपाटर, पर्डिकस,पिथॉन, क्रॅटरस हे ज्येष्ठ सेनानी होते, तोपर्यंत ही व्यवस्था कशीबशी टिकली. पण त्यांच्या मृत्यूनंतर लगेच यादवीला आरंभ झाला. मध्यवर्ती सत्ता केवळ नाममात्रच होती. व्यापारी मार्ग, बंदरे, परस्परांचा प्रदेश इ. विषयक निव्वळ सत्तास्पर्धेतून प्रथम चढाओढ व मग प्रत्यक्ष संघर्ष उद्‌भवला. इ. स. पू. ३o१ मध्ये झालेले इस्पसचे युद्ध ही या सत्तासंघर्षातील पहिला पायरी होय. एका मध्यवर्ती सत्तेचे सेवक असल्याचा बुरखा फेकून देऊन आशियातील प्रबळ प्रांताधिप अँटिगोनस (एकाक्ष) व त्याचे प्रतिस्पर्धी लायसिमाकस व सील्यूकस यांच्या युद्धात अँटिगोनसचा पराभव होऊन त्याचे साम्राज्य विजेत्यांनी वाटून घेतले.

ईजिप्तच्या टॉलेमीनेसुद्धा फारसे काही न करता सिरिया घेतला. केवळ वीसच वर्षांनी या युद्धातील विजेत्यांचे बिनसले आणि लायसिमाकस कामास आला. सील्यूकसचा थोड्याच दिवसांत खून झाला, तरी त्याचा मुलगा अँटायओकस हा अलेक्झांडरने कमाविलेल्या पश्चिम आशियाई,साम्राज्याचा एकमेव अधिपती झाला. याचाच अर्थ असा की, पूर्वी सहा प्रांत होते, त्याऐवजी आता तीनच उरले.

गॉल आक्रमकांचा पराभव करून ग्रीसला वाचविणारा तारक अँटायओकस याच्या घराण्याची सत्ता ग्रीसवर प्रस्थापित झाली, तर टॉलेमींची ईजिप्तवर आणि सिल्युसिडी घराण्याची पश्चिम आशियावर स्थापन झाली. सिरिया व पॅलेस्टाइन यांमधून जाणारे व्यापारी मार्ग व तेथील बंदरे यांच्या वर्चस्वासाठी थोड्याच अवधीत टॉलेमी राजे व सिल्युसिडी घराणे यांचा संघर्ष सुरू झाला. इ. स. पू. २७५ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा शेवट इ. स. पू. २१९ मध्ये रॅफियाच्या युद्धामुळे झाला. आरंभापासूनच ईजिप्तची बाजू लष्करी दृष्ट्या वरचढ असली, तरी या लढाईइतका निर्णायक विजय तोपर्यंत टॉलेमींना मिळाला नव्हता. सिरिया आणि पॅलेस्टाइन यांवर टॉलेमींची सत्ता स्थापन झाली.

या संघर्षाचे प्रत्यक्ष परिणाम मात्र या दोन्ही सत्तांचा ऱ्हास होण्याकडेच झाले. सिल्युसिडी घराण्याला, मध्य आशियातून खाली सरकणाऱ्या बॅक्ट्रियन, पार्थियन, कुशाण या टोळ्यांना तोंड द्यावे लागले व जवळजवळ प्रत्येक वेळी ते अयशस्वी ठरले. सिल्युसिडी राज्याची उत्तर व पूर्व सीमा संकोच पावू लागली. टॉलेमींना आता ग्रीक प्रशासक अथवा सैनिक मिळेनात; त्यामुळे स्थानिक लोकांवरच त्यांना अवलंबून रहावे लागले. तेच पुढे डोईजड झाले आणि टॉलेमींच्या राजसत्तेला हलके हलके फेअरोंच्या सत्तेचे रूप प्राप्त झाले. इ. स. पू. २oo च्या सुमारास ग्रीकांश राजकारणात रोमन सत्ता येऊन पोहोचली. कार्थेजच्या पाडावामुळे भूमध्य समुद्राच्या पश्चिम भागावर रोमची सत्ता प्रस्थापित झाली. लगोलग रोमने आपले लक्ष ग्रीस आणि ग्रीकांश साम्राज्य, म्हणजे पूर्व-भूमध्य सागराकडे वळविले.

मॅसिडॉनचा पाचवा फिलिप याने प्यूनिक युद्धात कार्थेजची बाजू घेतल्याने या आक्रमणाला सुरुवात झाली. इ. स. पू. २१५ ते १६७ या दरम्यान तीन युद्धे होऊन मॅसिडॉन रोमच्या ताब्यात आले. इतर ग्रीक संस्थांनांचाही क्रमाक्रमाने अस्त झाला. इ. स. पू. ६४ मध्ये मिथ्रिडेटीक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या युद्ध-मालिकेचा शेवट होऊन सबंध पश्चिम आशिया रोमन साम्राज्यात समाविष्ट झाला. म्हणजे सिल्युसिडी सत्ता नष्ट झाली. तिसरी ग्रीकांश सत्ता म्हणजे टॉलेमींची. ऑक्टियमच्या इ. स. पू. ३१ च्या युद्धात टॉलेमी राणी क्लीओपात्रा आणि तिचा रोमन दास अँटोनी यांचा पूर्ण मोड करून ऑक्टेव्हिअन याने ईजिप्तवर रोमन सत्ता स्थापन केली. अशा प्रकारे अलेक्झांडरच्या या प्रचंड साम्राज्याचा वारसा घालविणारी ग्रीकांश राजसत्ता संपुष्टात आली.

वर उल्लेखिल्याप्रमाणे अलेक्झांडरने व त्याच्यानंतर येणाऱ्या निरनिराळ्या ग्रीक राज्यकर्त्यांनी जित प्रदेशांत ठिकठिकाणी ग्रीक वसाहती स्थापन केल्या. ॲलेक्झांड्रिया नावाचीच अनेक नगरे उत्पन्न झाली. फक्त ती ज्या नदीवर वा डोंगरावर असतील त्यांची नावे त्यांस जोडण्यात आली. या सगळ्या नगरांत नाईलच्या मुखावरील ॲलेक्झांड्रिया ही नगरी प्रसिद्ध पावली. येथे व्यापाराला उपयुक्त बंदर होते, तसेच ती टॉलेमींची राजधानी असल्याने सांस्कृतिक दृष्ट्याही तेथे जास्त प्रगती झाली. ग्रीक राजे व नगरशासन यांनी आरंभापासून खुद्द ग्रीसमधून तंत्रज्ञ, कलाकार वगैरे मंडळी येथे आयात करण्याचे धोरण ठेवले होते. त्यामुळे तेथील संस्कृतीचे ग्रीक वळण शेवटपर्यंत कायम राहिले. भारतासारख्या अत्यंत दूरवरच्या देशात ग्रीक किंवा रोमन सांस्कृतिक प्रवाह आले, ते त्यांच्या शुद्ध स्वरूपात नसून ग्रीकांश अवतारातच होते आणि ते जेवढ्या प्रमाणात वायव्य सरहद्द भागातून आले, तेवढ्याच प्रमाणात ॲलेक्झांड्रियासारख्या बंदरांतून आले.

अर्थव्यवस्था

सामान्यपणे या सर्व प्रदेशाची अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून होती. आयात केलेल्या ग्रीक सैनिकांना व नागरिकांना पडिक जमीन शेतीसाठी देण्याचा उपक्रम सर्वत्र झाला. परंतु शेतीपेक्षा अधिक लाभदायक असे जे व्यापार व उत्पादन व्यवसाय, हे थोड्याच काळात जास्त महत्त्वाचे ठरले. विशेषतः पश्चिम आशियावर राज्य करणाऱ्या सिल्युसिडी सम्राटांना व्यापार हे मोठेच वरदान ठरले.

इराणी सम्राटांच्या काळात तयार झालेले, भूमध्य समुद्राच्या काठापासून निघून हिंदुस्थान व मध्य आशिया येथपर्यंत जाणारे मार्ग या राजांच्या ताब्यात होते. त्यामुळे आशिया आणि यूरोप यांच्यामधील भूमार्गाने होणारा सर्व व्यापार यांच्या ताब्यात आला. दुसरीकडे जलमार्गाने यूरोप व आफ्रिका आणि काही प्रमाणात आशियालाही जोडणारा दुवा म्हणून ॲलेक्झांड्रिया हे बंदर भरभराटीस आले. धान्य, कापडचोपड, मसाल्याचे काही जिन्नस, काही खनिजे ईजिप्त आणि आशिया येथून निर्यात होत; तर निरनिराळ्या तऱ्हेची भांडीकुंडी, हत्यारे-पात्यारे, काच सामान हे पदार्थ आयात होत. व्यापाराबरोबर धार्मिक, तात्त्विक वा कलाविषयक कल्पनांची देवघेव होत असे. त्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी लागणारा आर्थिक पाया, या व्यापार उत्पादनांतूनच उत्पन्न झाला.

धर्म

ईजिप्तमध्ये केवळ शतकानुशतके चालत आलेला प्राचीन धर्म अस्तित्वात होता; एवढेच नव्हे तर धर्मगुरूंची व धर्मसंघटनांची या समाजावर पकड होती. टॉलेमींच्या आधी काही शतके या देशावर पुराहितांचीच सत्ता होती. टॉलेमी राजे स्वतः जरी ग्रीक देवदेवतांचे उपासक होते, तरी ते ज्या भूमीला दत्तक गेले होते, तिचा धर्म त्यांना स्वीकारावा लागला. आरंभी ग्रीक देवतांची नावे बदलून त्यांना ईजिप्शियन पुराणात बसवून पूजाअर्चा चाले. परंतु कालांतराने टॉलेमींना सेरापिससारख्या देवतांची उपासना पतकरून सबंध ईजिप्शियन धर्म पतकरावा लागला आणि आपली सत्ता स्थिर करावी लागली. देवळांमध्ये व भिंतीवर त्यांच्या मूर्तीही कोरण्यात येऊ लागल्या.

सिल्युसिडी सम्राटांच्या मुलूखात अशी एकधर्मी प्रजा नव्हती. साम्राज्याच्या मध्यभागी म्हणजे सध्याच्या इराणात जरथुश्त्र धर्म मुख्यत्वे प्रचलित होता. इतरत्र निरनिराळे प्राचीन धर्मच आचरणात होते. त्यामुळे सिल्युसिडी राजांना तद्देशीय धर्माशी एकरूप होण्याची टॉलेमींसारखी गरज भासली नाही आणि प्रजा व राजे दोघांचेही धार्मिक आचार-विचार ग्रीकपूर्व काळातले व ग्रीकच राहिले. फक्त जेथे जेथे ग्रीक वस्त्या तयार झाल्या, तेथे ग्रीक धर्मकल्पनांचा प्रसार झाला. खुद्द ग्रीस आणि थ्रेस या भागांत पूर्वीचाच धर्म चालू राहिला. सबंध ग्रीकांश प्रदेशावर एक असा कोणताच धर्म प्रस्थापित झाला नाही किंवा ग्रीक धर्माचीही प्रस्थापना होऊ शकली नाही.

कला

वास्तुकला, मूर्तिकला व चित्रकला या प्रत्येक क्षेत्रात ग्रीकांश संस्कृतीला खुद्द ग्रीसबरोबरच ईजिप्त व बॅबिलन यांचा वारसा लाभला होता. काही विशिष्ट नमुने सोडले, तर ग्रीकांश कलेचे नमुने जे आज दिसतात, त्यात ग्रीक कला व कल्पना यांचेच प्राबल्य आढळते. हे अर्थात स्वाभाविकच होते. कारण राजसत्ता ग्रीक असल्याने ग्रीक कलावंतांना राजाश्रय मिळाला. या सबंध प्रदेशातील कलाकृतींचे परिशीलन करणाऱ्या तज्ञांच्या मताचे शासक व लोक असे दोन भाग पाडता येतात; पहिल्यात ग्रीक तर दुसऱ्यात तत्रस्थ कल्पनांचा जोर दिसतो.

नवीन राज्ये निर्माण झाल्यावर नव्या राजधान्या झाल्या. या सर्व एकाच नमुन्याच्या बांधलेल्या दिसतात. चौकोनी व लंबचौकोनी नगरांभोवती उंच तट, काटकोनात एकमेकाला छेदणारे काहीसे अरुंद रस्ते सर्वत्र होते. एक-दोन मुख्य रस्ते मात्र जास्त रुंद होते. या रस्त्यांमुळे शहराचे जे अनेक भाग पडत, त्यांतील एकात राजप्रासाद, दुसऱ्यात सचिवनिवास आणि उरलेल्यात व्यवसायाप्रमाणे लोकसंख्येची वाटणी असे. नळांनी व पाटांनी पाणी शहरात आणलेले असले, तरी ते प्रत्येक घरी जात नसे. सार्वजनिक हौद, स्नानगृहे यांचा वापर सर्रास होत असे. याशिवाय समाजजीवनाची विद्यालये-व्यायामगृहे, प्रेक्षागृहे ही ग्रीक अंगे सर्वत्र दृष्टोत्पत्तीस येतात.

मूर्तिकामात नावीन्य दिसते. केवळ देवदेवता वा देवस्वरूप झालेल्या राजेराण्यांचे पुतळे किंवा शिल्पे याऐवजी आता ग्रीक शैलीची आणि नवनव्या विषयांवरील शिल्पे निर्माण झाली. यांत भाजीवाले, खेळणारी मुले किंवा मद्यपी स्त्रिया असे प्रकार आढळतात. चित्रकलेचे प्रत्यक्ष नमुने फारसे उपलब्ध नाहीत. तथापि रोमन चित्रकला ही ग्रीकांश कलेची वारस मानली, तर काही गोष्टी निश्चितपणे सांगता येतात. चित्रविषय पौराणिक असून निसर्गचित्रण केवळ त्याच्या अनुषंगाने आवश्यक तेवढेच सापडते. व्यक्तिचित्रण क्वचितच दिसते. इतर सर्व कलांप्रमाणे याही शाखेवरील ग्रीक प्रभाव स्पष्ट दिसतो.

साहित्य

काव्य, नाट्य यांसारखे वाङ्‌मयप्रकार मुख्यतः ग्रीक नागरिकांसाठीच लिहिले असल्याने – निदान तेवढेच आजमितीस उपलब्ध असल्याने–त्यांवर ग्रीक साहित्य संप्रदाय आणि कथानके यांची दाट छाया आहे. ग्रीकांश असा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार वेगळा दाखविणे शक्य नाही. परंतु इतिहासलेखनाच्या क्षेत्रात ग्रीकांश संस्कृतीच्या काळात स्वतंत्र प्रगती दिसते. प्राचीन इतिहासाविषयी जिज्ञासा होतीच, पण त्याबरोबर समकालीन राजकीय घडामोडींचा सविस्तर व सांगोपांग अभ्यास या रचनाकारांनी केला. अलेक्झांडरबरोबर आलेले टॉलेमी, कलिस्थिनीझ, आरिस्टोब्लूलस अशी अनेक नावे सांगता येण्यासारखी असली, तर प्रत्यक्षात इतिहासकल्पना जाणणारे व त्यांचा विस्तार करणारे विशेष प्रसिद्ध रचनाकार एक दोनच आढळतात. एक कार्डियाचा हायरॉनिमस.

याने इ. स. पू. ३२३ ते २६६ या कालखंडाचा राजकीय व लष्करी इतिहास लिहिला. तो सध्या उपलब्ध नाही. दुसरा व अधिक महत्त्वाचा इतिहासकार म्हणजे पोलिबियस होय. तिसऱ्या मॅसिडोनियन युद्धात कैदी होऊन तो रोमला आला. तेथे आपल्या बुद्धिमत्तेने त्याने सिपिओसारख्या शासकाची मर्जी संपादन केली व रोमची चाळीस खंडात्मक बखर तयार केली. त्याची अनेक मते अग्राह्य असली, तरी त्याची अभ्यासपद्धती विचारार्ह आहे. शक्य ते सर्व संदर्भग्रंथ प्रत्यक्ष पाहून, महत्त्वाच्या स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन व तेथे माहिती गोळा करून त्याने बखरीचे हे चाळीस खंड तयार केले. त्यामुळे त्याची माहिती अधिक विश्वसनीय वाटते. याशिवाय चरित्रकार प्लूटार्क याचा अवश्य उल्लेख केला पाहिजे. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटपर्यंत त्याच्या चरित्रांची लोकमानसावर विलक्षण पकड होती.

इतिहासज्ञ व इतर अभ्यासक यांना उपयोगी ठरणारी व ग्रीकांश संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येण्यासारखी संस्था म्हणजे या काळातील ग्रंथालये होत. त्यांपैकी एक ग्रंथालय झ्यूसच्या मंदिरात होते, तर दुसरे वस्तुसंग्रहालयात होते. टॉलेमी, अँटिगोनस यांसारख्या राजांनी आपापल्या राजधान्यांत प्रचंड ग्रंथालये स्थापन केली. यांत टॉलेमींची ॲलेक्झांड्रियातील ग्रंथशाला सर्वांत मोठी होती. तीत सर्व जगामधून जमा केलेल्या सु. ४,oo,ooo ग्रंथ गुंडाळ्या (ग्रंथ) होत्या. त्यांची लेखक व विषय या क्रमाने सूचीही तयार केली होती. ग्रंथालयाला जोडून एक विद्यापीठ (अकादमी) स्थापन करण्यात आले होते. तेथे ॲरिस्टार्कस, यूक्लिड, हीरॉफिलस वगैरे विद्वानांना राजाश्रयाने अभ्यासासाठी ठेवून घेतले होते. ग्रंथालयांची मूळ कल्पना त्यांनी बॅबिलोनियाकडून घेतली होती.

बॅबिलोनियाकडून घेतलेली दुसरी गोष्ट म्हणजे ज्योतिषशास्त्र आणि गणित यांचे ज्ञान. एराटॉस्थीनीझ याने ज्योतिषशास्त्रात केलेली प्रगती किंवा आर्किमिडीज अगर यूक्लिडची गणितातील प्रगती ही ईजिप्शियन व बॅबिलोनियन ज्ञान व कल्पना यांमुळे शक्य झाली. ॲरिस्टॉटल व सॉक्रेटीस यांच्या विचारपठडीत तयार झालेल्या विचारपद्धती आणि तत्त्वज्ञान या नव्या काळात अपुऱ्या वाटावयास लागल्या. त्याऐवजी ज्या नव्या मतप्रणाली उत्पन्न झाल्या, त्यांत उपेक्षावादी (सिनिक), स्टोइकमत व भोगवादी (एपिक्यूरियन) प्रणाली या तीन महत्त्वाच्या होत.

सर्वांनी मानवी जीवनातील सुखदुःखे, मानवी मनाच्या शक्ती आणि मानव व ईश्वर यांचे परस्पर संबंध, जीवितातील सुखदुःखांचे स्वरूप, सत्-असत् यांचा विचार, इंद्रियजन्य सुखाची क्षणभंगुरता या सगळ्यांचा ऊहापोह केला. पूर्वीच्या ग्रीक तत्त्वज्ञानात न आढळणाऱ्या गोष्टी ग्रीकांश तत्त्वज्ञानात कशा आल्या याचा शोध केला, तर भारतातील बौद्ध तत्त्वज्ञानापर्यंत आपण जाऊन पोहोचतो.

प्राचीन संस्कृतींच्या परंपरा असलेल्या समाजांवर राज्य करण्याची जबाबदारी ग्रीकांश शासकांवर येऊन पडली. ती त्यांनी तीन शतके यथा शक्‍ति पार पाडली. याच वेळी बहुरंगी व अष्टपैलू ग्रीकांश संस्कृतीही निर्माण झाली.

 

संदर्भ : 1. Durant, Will, The Life of Greece, New York, 1962.

2. Rostovisev, M. I. Social and Economic History of the Hellenistic World, Oxford, 1938.

3. Tarn, W. W. Greeks in Bactria and India, Cambridge, 1951.

माटे, म. श्री.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate