অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चंद्रगुप्त मौर्य

चंद्रगुप्त मौर्य

चंद्रगुप्त मौर्य

(इ. स. पू. ? —  इ. स. पू. ३००). मौर्य वंशाचा संस्थापक व पहिला राजा. चंद्रगुप्ताच्या पूर्वायुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. याच्या जन्माबद्दल अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. मौर्य वंशाबद्दल पौराणिक, बौद्ध आणि ग्रीक आधारग्रंथांतून भिन्न मते आढळतात. पुराणाव्यतिरिक्त काही ब्राह्मणी ग्रंथकारांच्या मते मौर्य हे नाव मुरेचा मुलगा यावरून आले असावे. मुरा ही शेवटच्या धननंद राजाची दासी होती; परंतु पुराणात मुरेचा उल्लेख नाही. ग्रीक ग्रंथकार चंद्रगुप्त हलक्या कुळात जन्मला एवढेच म्हणतात, तर बौद्ध ग्रंथकार तो उत्तर प्रदेशातील पिप्पलिवन येथील मोरिय नावाच्या क्षत्रिय कुळात जन्मला, अशी माहिती देतात. मोरियवरून मौर्य हे नाव रूढ झाले असावे, असाही एक तर्क करतात. दंतकथेनुसार चंद्रगुप्ताचे बालपण तक्षशिलेत गेले.

एक धाडसी आणि कार्यकुशल संघटक व सेनापती म्हणून त्याची ख्याती होती. त्याने अलेक्झांडरची भेट घेऊन त्यास नंदराजाविरुद्ध मदत करण्याची विनंती केली; पण अलेक्झांडरने त्याच्या उद्धट वर्तनामुळे त्याला ठार मारण्याची धमकी दिली; तेंव्हा तो पळून गेला. पुढे त्याची व तक्षशिलेतील कौटिल्य नावाच्या विद्वान ब्राह्मणाची गाठ पडली. त्याच्या मदतीने त्याने लोभी, पाखंडी आणि अप्रिय असलेल्या नंदवंशी धननंद या राजाचा पाडाव करून आपली सत्ता प्रस्थापित केली. नंदांच्या साम्राज्याच्या मानाने त्याच्या राज्याचा विस्तार पाहिला असता, त्याने केलेली क्रांती फारच यशस्वी ठरली असे म्हणावे लागेल.

इ. स. पू. ३२४ मध्ये सत्ता हाती येताच चंद्रगुप्ताने केलेली पहिली गोष्ट म्हणजे ग्रीक शिबंदीची कत्तल. यामुळे सिंधू नदीच्या खोऱ्यातील प्रदेश म्हणजे पंजाब व सिंध या प्रांतांची परकी जोखडापासून मुक्तता झाली आणि त्याबरोबरच भारतातील ग्रीक सत्ता संपुष्टात आली. पुढे चंद्रगुप्ताने गुजरात व काठेवाड हे प्रदेश जिंकून आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले. हे पहिल्या रुद्रदामनच्या गिरनार शिलालेखांवरून स्पष्ट होते. इ. स. पू. ३०३ च्या सुमारास अलेक्झांडरचा तथाकथित वारस सेल्युकस निकेटर याने भारतावर आक्रमण केले.

अलेक्झांडरच्या वेळची स्थिती या वेळी पालटली होती. कारण या वेळी भारतात नंदराजाव्यतिरिक्त उरलेली राज्ये लहान लहान होती; पण आता जवळजवळ अखिल भारत चंद्रगुप्ताच्या एकछत्री अंमलाखाली आला होता. त्यामुळे सेल्युकसला आपला जम बसविणे कठीण गेले. त्याने भारतात पुन्हा ग्रीकांची सत्ता स्थापण्याचा प्रयत्न केला, पण चंद्रगुप्त सावध होता. त्या दोघांत झालेल्या लढाईसंबंधी फारशी माहिती ज्ञात नाही. परंतु सेल्युकसने काही प्रदेश देऊन तह करून शांतता प्रस्थापित केली. तहाच्या अटी चंद्रगुप्तास अनुकूल अशाच होत्या. चंद्रगुप्ताने ५०० हत्ती दिले आणि त्याबदली एरिया, अरकोशिया, पॅरोपनिसदै व गेड्रोशिया हे चार प्रांत मिळविले. एवढेच नव्हे, तर सेल्युकसने आपली मुलगी चंद्रगुप्ताला दिली. या तहानंतर सेल्युकसने मीगॅस्थिनीझ यास आपला वकील म्हणून चंद्रगुप्ताच्या दरबारात ठेवले.

सेल्युकसवरील विजय ही चंद्रगुप्ताच्या राजकीय जीवनातील अखेरची घटना असावी. यानंतर त्याने फारशा लढाया वा आक्रमणे केलेली दिसत नाहीत. जैनांच्या पारंपरिक कथांनुसार असे दिसते, की उत्तर भारतात दुष्काळ पडल्यामुळे भद्रबाहू हा आपल्या १२,००० अनुयायांसह दक्षिण भारतात गेला आणि कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे वसाहत करून राहिला. चंद्रगुप्त त्याच्या अनुयायांपैकी एक असल्यामुळे तोही भद्रबाहूसमवेत दक्षिणेत गेला आणि त्यानंतर तिकडेच बारा वर्षांनी मरण पावला, बारा या आकड्यामुळे या कथेविषयी संशय निर्माण होतो; पण या जैनकथा आधारभूत धरतात. अद्यापि तेथील टेकडीला चंद्रगिरी म्हणतात आणि त्याने बांधलेल्या जैन बस्तीला चंद्रगुप्तबस्ती या नावाने संबोधितात. काही स्थानिक लेखांतून चंद्रगुप्त व भद्रबाहू यांचे उल्लेखही आढळतात.

चंद्रगुप्ताचा अंमल भारतातील फार मोठ्या प्रदेशावर होता. प्लुटार्कच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या ताब्यात जवळजवळ अखिल भारत होता आणि सहा लाख फौज होती. याशिवाय आठ हजार रथ, नऊ हजार हत्ती आणि तीस हजार घोडेस्वार होते.

शोकाच्या वेळी कलिंगाव्यतिरिक्त बहुतेक भारत मौर्य साम्राज्यात होता, असे त्याच्या शिलालेखांवरून दिसते. बिंदुसाराने प्रदेश जिंकल्याचा उल्लेख नाही, त्यावरून अशोकाचे साम्राज्य हे सर्व चंद्रगुप्ताचेच कार्य होते, हे निश्चित. थोडक्यात चंद्रगुप्ताचे राज्य हिमालयापासून दक्षिणेस म्हैसूरपर्यंत आणि माळव्यापासून अरबी समुद्रापर्यंत पसरले होते. सेल्युकस बरोबरच्या तहामुळे हेरात, कंदाहार, अफगाणिस्तानचा काही भाग व बलुचिस्तान हे सिंधू नदीच्या पलीकडचे भाग त्याच्या साम्राज्यात समाविष्ट झाले होते. या विस्तृत राज्याच्या कारभारासाठी त्याने प्रदेशांची प्रांतांत विभागणी केली होती. त्यांवर तो राज्यपाल नेमी. त्यांपैकी बहुतेक राजपुत्र असत.

पाटलिपुत्र या राजधानीची व्यवस्था तीस जणांच्या एका मंडळामार्फत चाले. याशिवाय सर्व राज्यकारभार भिन्न अधिकाऱ्यांमार्फत होई. यासंबंधीची माहिती मुख्यत्वे मीगॅस्थिनीझजचा वृत्तांत व अर्थशास्त्र या ग्रंथामधून मिळले. सत्ता केंद्रशासित होती आणि राजा हाच सर्वसत्ताधारी होता. पाच खेड्यांवर एक अधिकारी असे, त्यास गोप म्हणत. त्याच्यावर रज्जुक नावाचा अधिकारी असे समाहर्तृ नावाचा खासगी कारभारी असे. त्याच्याकडे गृहमंत्र्याचे व फडणीसाचे काम असे. याशिवाय गुप्तहेर खाते होते.

राज्याचे उत्पन्न मुख्यतः जमिनीवरील कर, आयात-निर्यात कर, रस्तेपट्टी व बेवारशी मालमत्ता यांतून जमे. खर्चाच्या बाबी मुख्यतः लष्कर, राजदरबार, रस्ते व कालवे ह्या होत्या. लष्कराचे हत्तीदळ, घोडदळ आणि पायदळ असे तीन प्रमुख विभाग होते. सैन्याची देखरेख भिन्न भिन्न अधिकाऱ्यांमार्फत होई. सैनिकांतही असामीदार व पगारदार असे दोन विभाग असत.

चंद्रगुप्त हा एक पराक्रमी, मुत्सद्दी व परोपकारी राजा होता. त्याने अखिल भारत आपल्या अंमलाखाली आणला व मौर्य वंशाची स्थापना केली. ते राज्य पुढे जवळजवळ शंभर वर्षे टिकून होते.


पहा : मौर्यकाल.

संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The Age of Imperial Unity, Bombay, 1960.

2. Mookerji, R. K. Chandragupta Maurya and His Times, Varanasi, 1960.

केनी, ली. भा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate