অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चालुक्य घराणे

चालुक्य घराणे

दक्षिणेत विशेषतः कर्नाटक व महाराष्ट्र यांत पाचव्या शतकात उदयास आलेला एक प्रसिद्ध वंश. या वंशाची एक शाखा अधिक प्रसिद्ध पावली. ती म्हणजे बादामीचे चालुक्य व त्यांचे वंशज कल्याणीचे चालुक्य, याशिवाय त्यांच्या इतर लहान शाखा गुजरात, तेलंगण व इतरत्र पसरल्या होत्या.

कोरीव लेखांत या घराण्याचे नाव चालिकी, साल्की, चलिक्य, चालुक्य, चलुकिक इ. विविध प्रकारांनी आढळते. हे घराणे मूळचे कर्नाटकातील; पण दहाव्या शतकापासून दक्षिणेतील कल्याणीच्या राजवंशाने स्वतःस सोमवंशी कल्पून उत्तरेतील सुप्रसिद्ध पौराणिक सोमवंशाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला.

उलट बादामी चालुक्यांची एक शाखा वेमुलवाड्याचे चालुक्य स्वतःस सूर्यवंशी म्हणवीत. या घराण्याचा मूळ पुरुष उदयन व त्यानंतरचे अठ्ठावन राजे अयोध्येस राज्य करीत होते, त्यातील शेवटचा विजयादित्य दक्षिणेत आला. त्याने त्रिलोचननामक पल्लव राजाचा पराजय केला. त्याच्या मृत्यूनंतर झालेल्या त्याच्या विष्णुवर्धननामक पुत्राने चालुक्य पर्वतावर भगवती, नंदा गौरी, कार्तिकेय, नारायण, सप्तमातृका या देवतांची आराधना केली आणि कदंब, गंग इ. राजवंशांना जिंकून आपले राज्य स्थापिले इ. काल्पनिक कथा उत्तरकालीन लेखात दिली आहे. या राजवंशाच्या चालुक्य नावाची उपपत्ती तो ब्रह्मदेवाच्या किंवा हारिति–पंचशिख ऋषीच्या चुलुकातून (ओंजळीतील पाण्यापासून) निर्माण झाला, असे सांगून लावली आहे.

बादामीचे चालुक्य

बादामीचे चालुक्य घराचे प्राचीन भारतीय इतिहासात सुप्रसिद्ध आहे. एके काळी यांची सत्ता दख्खनच्या बहुतेक भागावर पसरली होती. यांनी बांधलेल्या अनेक देवालयांत एका विशिष्ट स्थापत्य पद्धतीचा उपयोग केला असल्यामुळे ती चालुक्य स्थापत्य पद्धती म्हणून प्रसिद्ध झाली आहे. त्यांच्या काळी संस्कृत व कन्नड भाषांत अनेक उत्तम प्रकरणे, काव्ये रचली गेल्यामुळे त्यायोगेही यांचे नाव भारतीय वाङ्‌मयात सुविख्यात झाले आहे. हे स्वतःस मानव्य गोत्री, हारितीचे वंशज, सप्तमातांनी किंवा सप्तलोकमातांनी वाढविलेले, स्वामी महासेनाची भक्ती करणारे भगवान नारायणाकडून वराहलांछन मिळविलेले व पौंडरिक, अश्वमेध, बहुसुवर्ण, वाजपेय इ. यज्ञ केलेले असे म्हणजे क्षत्रिय म्हणवीत.

या राजवंशाच्या इतिहासाची साधने मात्र थोडी आहेत. त्यात कोरीव लेख मुख्य आहेत. यावरच त्यांचा इतिहास प्रामुख्याने आधारित आहे. थोडी माहिती यूआन च्वांग या चिनी यात्रेकरुच्या प्रवासवर्णनावरुन आणि चरित्रावरुन मिळते. इराणचा राजा द्वितीय खुसरौ याचा या वंशातील ⇨दुसरा पुलकेशी राजाशी पत्रव्यवहार व राजदूतांची देवघेव झाली होती, त्याविषयीचा एक उल्लेख एका फार्सी बखरीत आढळतो. अजिंठ्यातील एका चित्राकडे तो दूत व पुलकेशी यांच्या भेटीबाबत बोट दाखविले जाते; पण ते अचूक नाही अशी आज समजूत आहे.

सामान्यतः यांची नाणी अद्यापि सापडली नाहीत. केवळ अलीकडे यांनी गुजरातेत स्थापलेल्या घराण्यातील जयाश्रय राजाचे नाणे सापडले आहे. त्यावरुन बादामीच्या मुख्य घराण्याची नाणी पुढेमागे सापडतील, अशी आशा उत्पन्न झाली आहे. संस्कृत व कन्नड भाषांत तत्काली रचलेली बहुतेक प्रकरणे, काव्ये आता कोरीव लेखांतील व इतर उल्लेखांवरुन ज्ञात झाली आहेत; पण कन्नड ग्रंथ आज उपलब्ध नाहीत. 

कोरीव लेखांत या घराण्यांचा मूळ पुरुष म्हणून जयसिंहाचा उल्लेख येतो, पण तो व त्याचा पुत्र रणराग यांच्याविषयी काही माहिती मिळत नाही. रणरागाचा पुत्र प्रथम पुलकेशी याचा ५४३-४४ चा लेख बादामीच्या किल्ल्यात सापडला आहे. त्याने वातापिपूर (बादामी) येथे आपली राजधानी स्थापिली. चालुक्य राजवंशाचा हा पहिला बलाढ्य राजा होय. याने अश्वमेघ, अग्निष्टोम, वाजपेय, बहुसुवर्ण, पौंडरिक यासारखे श्रौत याग केले होते व हिरण्यगर्भनामक महादान दिले होते. 

प्रथम पुलकेशीला प्रथम कीर्तिवर्मा व मंगलेश असे दोन पुत्र होते. पैकी कीर्तिवर्म्याने गादीवर आल्यावर कर्नाटकातील कदंब, कोकणातील मौर्य व मध्य प्रदेश-ओरीसातील नल राजांवर विजय मिळवून आपली साम्राज्यसत्ता पसरविली. हा निधन पावला तेव्हा त्याचा पुत्र द्वितीय पुलकेशी हा अल्पवशी असल्यामुळे ह्याचा धाकटा भाऊ मंगलेश हा ५९७-९८ मध्ये गादीवर आला.

उत्तर भारतात स्वारी करुन गंगातीरी आपला धर्मस्तंभ उभारण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. म्हणून त्याने आपल्या राज्याच्या उत्तरेस महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या कलचुरी नृपती बुद्ध (बुद्धरस) या राजावर स्वारी करुन त्याचा पराजय केला. पण इतक्यात रेवतीद्वीप (वेंगुर्ल्याजवळचे रेडी बेट) येथे राज्य करणाऱ्या स्वामिराजनामक मांडलिकाने बंड केल्यामुळे त्याला त्याचे पारिपत्य करण्याकरिता तातडीने जावे लागले. त्यामुळे त्याचा उत्तर भारताती संकल्पित दिग्विजय घडून आला नाही. 

मंगलेशाने आपल्या मागून आपल्या पुत्रास गादी मिळावी, अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. राज्याचा खरा वारस द्वितीय पुलकेशी याला ते सहन न होऊन त्याने देशत्याग केला आणि इतर नृपतींचे साहाय्य मिळवून मंगलेशावर स्वारी केली. या कलहात मंगलेशाचा पराजय होऊन तो मारला गेला आणि द्वितीय पुलकेशी ६१०-११ च्या सुमारास गादीवर आला. द्वितीय पुलकेशी हा या घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा होय. त्याने लाट (दक्षिण गुजरात), मालव व उत्तर गुजरातचे गुर्जर यांना आपले मांडलिक बनविले.

उत्तर भारतातील हर्षाच्या आक्रमणास पायबंद घातला. उत्तर आणि दक्षिण भारताच्या या दोन बलाढ्य नृपतींचे नर्मदातीरी घनघोर युद्ध होऊन त्यात गजसैन्याचा नाश झाल्यामुळे हर्षाचा पराभव झाला. याचे वर्णन ऐहोळे शिलालेखात ‘युधि पतितगजेन्द्रानीकबीभत्सभूतो भयविगलितहर्षो येनचाकारि हर्षः ।’ अशा शब्दांत केले आहे. यानंतर पुलकेशीने परमेश्वर ही पदवी धारण केली. 

यानंतर ऐहोळे शिलालेखात पुलकेशीच्या नव्याण्णव हजार गावे (गव्यूति लांबरुंद) असलेल्या तीन महाराष्ट्रांवर सत्ता स्थापन केल्याचा उल्लेख आहे. अशा रीतीने नर्मदा नदी ही त्याच्या राज्याची उत्तर सीमा झाली.

यानंतर दक्षिण कोसल व कलिंग यांच्या राजांनी त्याचे स्वामित्व कबूल केले. पुढे त्याने पिष्टपुराच्या (पीठापुरम्‌च्या) राजाचा पाडाव केला. नंतर पुलकेशीने कुनाल तलावाजवळ वेंगीच्या विष्णुकुंडिन्‌ वंशी राजाचा घनघोर युद्धात पराजय करुन कांची (सध्या कांजीवरम्‌) या पल्लव राजधानीला वेढा घातला, पण त्याला ते नगर काबीज करता आले नसावे. 

पुलकेशीने इराणचा राजा द्वितीय खुसरौ (खुस्रव) यास नजराणा व हत्ती पाठवून त्याच्याशी ६२५ च्या सुमारास राजनैतिक संबंध प्रस्थापित केले, अशी समजूत आहे. उत्तरेस नर्मदेपर्यंत त्याचे राज्य पसरल्यामुळे त्याने नासिक येथे आपली दुसरी राजधानी केली असावी. ६४१-४२ मध्ये चिनी यात्रेकरून यूआन च्वांग त्याच्या दरबारी आला. तेव्हा त्याचा मुक्काम नासिकला असावा; कारण यूआन च्वांग त्याला महाराष्ट्राचा अधिपती म्हणतो. 

पुलकेशीच्या कांचीनगरीवरील आक्रमणाने उत्पन्न झालेले चालुक्य पल्लवांचे वैर कित्येक पिढ्या चालले आणि त्यात या दोन्ही राजवंशांचे अपरिमित नुकसान झाले. ६४२ मध्ये पल्लव नृपती नरसिंहवर्मा याने चालुक्य राज्यावर आक्रमण करुन वातापिपूर काबीज केली. तेथील युद्धात पुलकेशी ठार झाला असावा. नरसिंहवर्म्याने नंतर वातापिकोंड (वातापि घेणारा) ही पदवी धारण करुन चालुक्यांचे राज्य तात्पुरते खालसा केले.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate