অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चावडा घराणे

चावडा घराणे

चावडा घराणे

या घराण्याचे नाव कोरीव लेखांत चाप वा चापोत्कट असे येते. वसिष्ठांच्या अग्निकुंडातून जे वीर पुरुष निघाले त्यांमध्ये या वंशाचा मूळ पुरुष होता असे पृथ्वीराजरासोत म्हटले आहे. यांची आरंभीची राजधानी भिल्लमाल (राजपुतान्यातील भिनमाळ) ही होती. या वंशातील पहिला ज्ञात पुरुष वर्मलात हा होय. सुप्रसिद्ध संस्कृत कवी माघ याचा आजा सुप्रभदेव वर्मलाताचा सर्वाधिकारी होता. यानंतर व्याघ्रमुख गादीवर आला. त्याच्या काळी ब्रह्मगुप्ताने ६२८ मध्ये आपला ब्रह्मस्फुटसिद्धांत हा ग्रंथ लिहिला.

अरबांनी ७११ मध्ये सिंध काबीज केल्यावर सभोवारची इतर राज्ये आक्रमण्यास सुरुवात केली. ७३९ मध्ये नवसारी (गुजरात) वर त्यांनी स्वारी करेपर्यंत त्यांनी जिंकलेल्या राजांची यादी त्या वर्षाच्या नवसारी ताम्रपटात दिली आहे. तीत चापांचे नाव आहे. तेव्हा त्यापूर्वी चापांचे राजपुतान्यातील राज्य नष्ट झालेले दिसते. नंतर भिल्लमाल (भिनमाळ) प्रतीहारांच्या ताब्यात गेले.

नंतर चापांच्या दोन शाखा झाल्या. एक काठेवाडात वर्धमानपूर (वढवाण) येथून आणि दुसरी उत्तर गुजरातमध्ये अणहिलपाटक येथून राज्य करू लागल्या. वर्धमानशाखेचा पहिला ज्ञात राजा विक्रमार्क नवव्या शतकाच्या आरंभी राज्य करीत होता. त्याला प्रतीहारवंशी दुसऱ्या नागभट्टाच्या स्वारीचा प्रतिकार करावा लागला.

या वंशाच्या राजांना पश्चिम काठेवाडातील सैंधव राजांशीही युद्धे करावी लागत. विक्रमार्काचा पुत्र अडुक हा विख्यात झाला. त्याच्यामुळे वर्धमानजवळच्या प्रदेशाला अडुपाक देश असे नाव मिळाले.९१४ मध्ये वर्धमान येथे धरणीवराहनामक राजा प्रतीहार महीपालाचा सामंत म्हणून राज्य करीत होता. पुढे चालुक्य मल्लराजाने त्याच्यावर स्वारी करून त्याचे राज्य खालसा केले.

अणहिलपाटक येथील शाखा वनराज याने ७४५ मध्ये स्थापली. त्याच्यानंतर योगराज, रत्नादित्य, क्षेमराज, अक्कडदेव, भूयडदेव ऊर्फ सामंतसिंह यांनी राज्य केले. पण त्यांच्याविषयी विशेष माहिती नाही. सामंत सिंहराजाच्या बहिणीशी कनौजच्या राजिनामक राजपुत्राने विवाह केला. त्याचा पुत्र मूलराज याने आपल्या मामाकरिता काही विजय मिळविले. पण नंतर त्याला पदच्युत करून गादी बळकाविली, असे गुजरातमधील प्रबंधलेखक सांगतात. त्यात किती तथ्य आहे हे सांगता येत नाही. तथापि चालुक्य मूलराजाने९१४–४२ मध्ये चापांचा उच्छेद करून त्यांचे राज्य बळकाविले, असे कोरीव लेखांच्या पुराव्यावरून सिद्ध होते.

 

संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. Struggle for Empire, Bombay, 1957.

मिराशी, वा. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate