অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चेतसिंग

चेतसिंग

चेतसिंग

(सु. १७४८ ? – १८१०). वाराणसीचा राजा. प्रथम तो आयोध्येच्या नबाबाचा मांडलिक होता; पण पुढे त्याने ईस्ट इंडिया कंपनीचे मांडलिकत्व पतकरले.

सध्या काशीजवळ रामनगर येथे राहणाऱ्या व पूर्वी त्याच संस्थानचे अधिपती असलेल्या विभूतिनारायणसिंह यांच्या घराण्याचा मूळ पुरुष मनसाराम; त्याचा मुलगा बळवंतसिंग आणि त्याचा अनौरस मुलगा चेतसिंग. बळवंतसिंगाच्या मृत्यूनंतर १७७० मध्ये चेतसिंग वाराणसीच्या गादीवर आला. १७७५ मध्ये वाराणसीची सत्ता इंग्रजांकडे गेल्यावर त्यांचा खजिना रिता झाल्यामुळे प्रथम १७७८ मध्ये गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जने चेतसिंगाकडून मांडलिक म्हणून २२१/२ लाख रुपयांची खंडणी मागितली व यात पुढे वाढ होणार नाही असे अभिवचन दिले.

नंतर १७७९ व १७८० या दोन सालांत आणखी पाच लाख रु. जास्त मागितले. शिवाय हेस्टिंग्जने २,००० शिपायांची मदतही मागितली. पुढे ती संख्या एक हजारांपर्यंत खाली आणली; पण ती चेतसिंग देईना. म्हणून १७८१ च्या ऑगस्टमध्ये वॉरन हेस्टिंग्ज स्वतः वाराणसीला आला आणि त्याने ५० लाख रुपयांची मागणी चेतसिंगाकडे केली. चेतसिंग ती देण्याची टाळाटाळ करू लागला. तेव्हा हेस्टिंग्जने चेतसिंगाला नजरकैदेत ठेवले; पण चेतसिंगाने त्याच्या पाहाऱ्यांवर असलेल्या लोकांस निपटून काढले व कैदेतून तो निसटला आणि ग्वाल्हेरला गेला. लढाईसाठी त्याने सैन्याची जमवाजमव केली.

हेस्टिंग्जलाच नजरकैदेत पडण्याची वेळ आली. तथापि यापूर्वीच हेस्टिंग्जने आपल्या सैन्यातील निरनिराळ्या अधिकाऱ्यांना पत्रे पाठवून सहायास बोलाविले होते; त्यांच्या साह्याने तो निसटला. त्याचा परिणाम म्हणून हेस्टिंग्जने चेतसिंगास पदच्युत करून त्याचे संस्थान बळवंतसिंगाच्या मुलीचा मुलगा महीपनारायणसिंह याजकडे चाळीस लाख रु. खंडणी देण्याच्या अटीवर सोपविले. ब्रिटिश पंतप्रधान पिट यास खात्री झाली, की चेतसिंगाच्या बाबतीत हेस्टिंग्जचे वर्तन क्रूरपणाचे व अन्यायी होते; म्हणून त्याने हेस्टिंग्जच्या महाभियोगास मान्यता दिली. चेतसिंगाच्या नंतरच्या जीवनासंबंधी फारशी माहिती उपलब्ध नाही.

 

खरे, ग. ह.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate