অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जयसिंग, सवाई

जयसिंग, सवाई (? १६६९–२१ सप्टेंबर १७४३)

जयपूरचा एक कर्तबगार व विद्याप्रेमी राजा. हा अंबेरच्या विष्णुसिंह कच्छवाहाचा मुलगा. १७०० मध्ये गादीवर येताच पूर्वापार चालत आलेले मोगलांबरोबरचे मैत्रीचे संबंध त्याने दृढ केले. बहादूरशाह व नंतरचा मुहम्मदशाह यांच्याशी त्याचे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे १७२०–१७२२ व १७३२ मध्ये त्यास माळव्याचा सुभेदार म्हणून नेमण्यात आले. त्याने उदेपूर व जोधपूर संस्थानांची मैत्री संपादिली. तसेच १७३४ मध्ये माळवा मोगल बादशाहाकडून मराठ्यांना अधिकृतपणे मिळवून देण्यात यांचेच प्रयत्न विशेष कारणीभूत होते.

प्रजेच्या सुखासाठी जयसिंगाने धर्मशाळा, रस्ते, विहिरी बांधल्या; बादशाहाकडून जिझिया कर रद्द करविला; जाटांचा बंदोबस्त केला आणि नवीन कायदे तयार केले. १७२८ मध्ये जयपूर ही राजधानी वसवून त्या शहराची त्याने नवीन रचना केली.

जयसिंग संस्कृत, गणित, ज्योतिष, इतिहास वगैरे विषयांचा ज्ञाता होता. काशीच्या रत्नाकरभट्ट महाशब्दे याने लिहिलेला जयसिंहकल्पद्रुम, जगन्नाथ पंडिताचे सिद्धांत सम्राट व रेखागणित हे दोन ग्रंथ आणि जयपूर येथे वसविलेली स्वतंत्र ब्रह्मपुरी जयसिंगाने विद्वानांना दिलेल्या आश्रयाचे व प्रोत्साहनाचे फळ होय. जयसिंगाने जयपूर, दिल्ली, बनारस व उज्जयिनी या ठिकाणी वेधशाळा बांधून ग्रहांचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी जयप्रकाश, सम्राटयंत्र, भित्तियंत्र, वृत्तषष्ठांश ही उपकरणे तयार केली. त्यांवर ७–८ वर्षे विद्वान ज्योतिष्यांकडून वेध घेऊन सिद्धांत सम्राट हा संस्कृत व झिज-इ-मुहम्मद हा फार्सी असे दोन ग्रंथ लिहविले (१७२८).ग्रहांची सूची व त्यांच्या गतीसंबंधी माहिती मिळविण्यासाठी त्याने बनविलेली गोलाकार व अर्धगोल ताशीव संगमरवराची उपकरणे अद्यापही प्रेक्षणीय आहेत. महाराष्ट्रीय ब्राह्मणांविषयी त्यास विशेष आस्था होती; मात्र उदेपूरच्या राजघराण्यातील मुलीशी स्वतःचे लग्न जुळविण्यासाठी त्याने त्या घराण्यातील मुलीला मुलगा झाल्यास त्यास जयपूरची गादी मिळेल, असा ठराव केला. तसा मुलगा झाल्यावर त्यास ठार करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पुढे तो ठराव त्याच्या मुलांत कडाक्याचे भांडण लावण्यास कारणीभूत झाला.


खरे, ग. ह.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate