অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जहांगीर

जहांगीर

जहांगीर

(३० ऑगस्ट १५६९–२८ ऑक्टोबर १६२७). अकबराचा मुलगा व चौथा मोगल सम्राट. त्याचे पहिले नाव सलीम. युवराज असताना त्याने आपल्या बापाविरुद्ध बंड केले. तसेच त्याने आपल्या बापाचा विद्वान मित्र अबुल फज्लचा खून करविला; पण नंतर दोघांत समझोता झाला. अकबराच्या मृत्यूनतर २४ ऑक्टोबर १६०५ रोजी तो अबुल-मुजफ्फर नूरुद्दीन मुहम्मद जहांगीर बादशाह गाझी या नावाने गादीवर बसला. त्याने १२ कलमी जाहीरनामा काढून काही कर कमी केले व लोकांना सुरक्षित आणि चांगल्या जीवनाचे आश्वासन दिले. त्याच्यात बापाचा उदारपणा व सहिष्णुता मर्यादित स्वरूपात होती. त्याने पूर्वापार चालत आलेली कार्यपद्धती चालू ठेवली.

सुरुवातीस त्याने आपला वडील मुलगा खुसरौ (खुस्रव) याचे बंड मोडून काढले व त्यास साह्य करणारा शीख गुरू अर्जुनसिंग यास छळ करून ठार मारले. १६११ साली त्याने शेर अफगनला ठार करून त्याची सौंदर्यसंपन्न स्त्री नूरजहान हिच्याशी विवाह केला. त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर फार झाला.

त्याने बंगालमधील बंडखोर अफगाणांना (१६१२) व मेवाडचा राणा अमरसिंह (१६१४) यांना शरण आणले. त्याच साली अहमदनगर व १६१६ मध्ये कांग्‌डाचा अजिंक्य किल्ला ही ठिकाणे जिंकली. मात्र कंदाहार १६२२ मध्ये त्यास गमवावे लागले. याच सुमारास राजपुत्र खुर्रमने केलेले बंड महाबतखानाच्या साहाय्याने त्याने मोडून काढले, पण १६२४ मधील भातवडीच्या लढाईत मलिकंबरने मोगल व विजापुरकर यांच्या संयुक्त सैन्याचा पराभव केला. पुढे महाबतखानाने स्वतःच बंड करून जहांगीरला कैद केले. नूरजहानने धैर्याने व युक्तीने हे बंड मोडून जहांगीरला सोडविले.

तो अतिरेकी, मद्यपी व सुखासीन असला, तरी कलाप्रेमी व काहीसा न्यायप्रिय होता. गाऱ्हाण्यांची दाद लवकर लागावी, म्हणून त्याने न्यायशृंखला ठेवली होती, अशी दंतकथा आहे. सृष्टिसौंदर्य व शिकार यांची त्याला आवड होती. त्याने साहित्य व कला यांना उत्तेजन दिले. त्याने लिहिलेले अपुरे आत्मचरित्र तारीख-इ-सलीमशाही वा तुझुक-इ-जहांगीरी या नावाने प्रसिद्ध आहे. सुरतेत इंग्रजांकरिता व्यापारी वखारीची परवानगी मिळविणाऱ्या सर टॉमस रो यानेही जहांगीरविषयी काही माहिती लिहून ठेवली आहे.

 

संदर्भ : Sharma, S. R. Mughal Empire in India, Agra, 1966.

खोडवे, अच्युत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate