অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टिपू सुलतान

टिपू सुलतान

टिपू सुलतान

(२० नोव्हेंबर १७५०–४ मे १७९९). म्हैसूरचा एक प्रसिद्ध व पराक्रमी राजा. त्याचे पूर्ण नाव शाह बहाद्दूर फत्ते अल्लीखान असे होते. टिपू याचा अर्थ कन्नडमध्ये वाघ असा होतो. त्याच्या एकूण स्वभावगुणांवरून हे नाव त्यास मिळाले असावे. हैदर अलीचा हा थोरला मुलगा. कर्नाटकातील देवणहळ्ळी (बंगलोर) या गावी जन्मला. त्याच्या बालपणाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. तथापि त्याने मौलवींकडून पारंपरिक शिक्षण आणि गाझीखान या अधिकाऱ्याच्या हाताखाली लष्करी शिक्षण घेतले होते.

पहिली काही वर्षे तो हैदरबरोबर लढाईत भाग घेत असे. एवढेच नव्हे, तर स्वतंत्र रीत्याही त्याने लढाया केल्या होत्या. म्हैसूरच्या गादीवर येण्यापूर्वी १७७१ मध्ये त्याने मराठ्यांच्या सैन्याबरोबर मुकाबला दिला होता, तर १७८१ मध्ये सेनापती कर्नल बेली आणि कर्नल ब्रॅथवेट असे दोघेजण टिपूवर चालून आले असता; उभयतांचा पराभव करून त्याने दोघांनाही पकडले व काही फौज कैद केली. १७८२ मध्ये हैदरच्या मृत्यूनंतर टिपू म्हैसूरच्या गादीवर आला.

टिपूचे फ्रेंचांशी प्रथमपासून सख्य होते. यामुळे इंग्रज सेनापती एअर कूट हा टिपूवर चालून आला असता फ्रेंच सेनापती बुसी याने टिपूला मदत केली. सालबाईच्या तहाप्रमाणे इंग्रजांचा जो मुलूख हैदर अलीने जिंकला होता, तो परत करावा असे ठरले होते. पण टिपूस ही अट मान्य नव्हती. म्हणून इंग्रजांनी टिपूचा बीदनूर प्रांत घेतला. तेव्हा त्याने जनरल मॅथ्यूझला पकडले. त्यामुळे इंग्रजांना मंगलोरचा शांतता तह करावा लागला (१७८४). त्यानुसार एकमेकांचा घेतलेल्या प्रदेश परत करावा, असे ठरले. याच साली टिपूने नरगुंद व कित्तूर या संस्थानांवर सैन्य पाठवून लूट केली व तेथील किल्ले हस्तगत केले. टिपूचे धोरण नेहमी आक्रमक होते; परंतु लढाई अंगाशी येत, असे दिसताच तो तह करी. पण पुढे तो तह कधीच पाळीत नसे.

टिपूच्या या वाढत्या सत्तेस पायबंद घालण्याकरिता नाना फडणीसाने निजामची यादगीर येथे भेट घेतला आणि दोघांनी टिपूवर स्वारी करण्याचे ठरले. त्याप्रमाणे उभयतांनी टिपूवर स्वारी करून अनेक ठाणी काबीज केली. सावनेर येथे मोठी लढाई झाली. पण ती निर्णायक झाली नाही. तेव्हा नाना फडणीसाने मॅलेट यास भेटून इंग्रजांची मदत घेण्याचे ठरविले. त्या वेळी टिपूने मराठ्यांबरोबर १७८७ मध्ये तह केला. त्यानुसार ४८ लक्ष रु. खंडणी ठरली व गजेंद्रगड, बादामी, नरगुंद व कित्तूर येथील किल्ले मराठ्यांस परत द्यावेत, अदवानी संस्थान निजामास द्यावे आणि सावनेरकरांचा मुलूख त्यांचा त्यांना परत करावा. पुढे मराठ्यांच्या सैन्याने कर्नाटकातून माघार घेताच त्याने कित्तूरचा किल्ला पुन्हा हस्तगत केला आणि मराठ्यांशी

कायमचे वैर निर्माण केले. निजामाने टिपूशी मैत्री करण्याचे प्रयत्न केले; ते असफल ठरले. तेव्हा कॉर्नवॉलिसने मराठे व निजाम यांना टिपूविरुद्ध एकत्र आणण्यास ही संधी चांगली आहे, हे हेरून त्यांच्याशी स्नेह वाढविला. शिवाय टिपूच्या या धोरणामुळे शेजारच्या राजवटी त्यावर विश्वास ठेवीत नसत

शा परिस्थितीत टिपूने त्रावणकोरवर हल्ला केला तो फसला. पण दरम्यान कॉर्नवॉलिसने मराठे व निजाम यांच्याशी मैत्रीचा तह करून टिपूवर स्वारी करण्याचे ठरविले. १७९० मध्ये प्रत्यक्ष मोहिमेस सुरुवात झाली. टिपूने आपल्या कणखर नेतृत्वाखाली प्रतिकार केला. पण या तिघांच्या सैन्यापुढे त्यास अखेर शरणागती पतकरावी लागली. त्याने २३ फ्रेब्रुवारी १७९२ रोजी श्रीरंगपटण येथे तह केला. त्यानुसार निम्मा प्रदेश व तीन कोट रु. नुकसानभरपाई व ती फिटेपर्यंत दोन मुलगे इंग्रजांकडे ओलिस ठेवणे त्यास भाग पडले. या अपमानास्पद

टिपू सुलतानतहामुळे तो पुढे अधिकच बेफिकीर व आक्रमक झाला आणि इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी तो इतरांच्या मदतीची शोधाशोध करू लागला. या संदर्भात त्याने इराण, तुर्कस्तान तसेच नेपोलियन यांच्यांशी संधान बांधून आपली बाजू बळकट करण्याचाही प्रयत्न सुरू केला. एवढेच नव्हे, तर त्याने काही फ्रेंच पलटणी नोकरीस ठेवल्या. या सर्व कारवायांसंबंधी लॉर्ड वेलस्ली याने त्यास जाब विचारला आणि तैनाती फौज स्वीकारण्यासंबंधी विचारणा केली; तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून वेलस्लीने निजामाशी तह केला, मराठ्यांनाही त्याला यात सहभागी करून घ्यावयाचे होते. पण पेशव्यांचे धोरण अनिश्चित होते.

१७९९ च्या सुरुवातीस इंग्रजांनी युद्ध पुकारले व टिपूची वेलस्लीने कुर्ग, मळवळ्ळी वगैरे काही ठाणी काबीज केली. पुढे श्रीरंगपटणास वेढा घातला. तिथे टिपून शिकस्तीचा पराक्रम केला. अखेर तो गोळी लागून मरण पावला. नंतर इंग्रजांनी भयंकर लुटमार केली. टिपूचे एक कोटी सहा लक्ष रुपायांच्या उत्पन्नाचे राज्य घेतले व काही भाग निजामाला दिला व काही भाग मुळाच्या चामराज वोडेयर यांच्या वंशजास दिला. टिपूच्या मुलांना व नातेवाईकांना २४,००० होनांचा मुलूख लावून दिला. पुढे वेल्लोरच्या बंडात टिपूच्या मुलाचा हात आहे, या सबबीवर इंग्रजांनी टिपूची जहागीर खालसा केली. अशा रीतीने टिपूचे राज्य इंग्रजांनी पुढे पूर्णतः गिळंकृत केले.

टिपूच्या खासगी जीवनासंबंधी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याला दोन बायका होत्या. त्यांपैकी पहिली नवायेत मुस्लिम घराण्यातील असून हैदरने निवडली होती व दुसरी रुकय्या बानू स्वतः टिपूने निवडली होती. यांपासून त्यांस अनेक मुले झाली. त्यांत १२ मुलगे होते. यांपैकी दोन मुलगे त्याने इंग्रजांकडे ओलिस ठेवले होते. काही इंग्रज लेखकांच्या मते टिपू हा अत्यंत धर्मवेडा, क्रूर, लोभी, अविश्वासू व चंचल होता; परंतु टिपूचा एकूण कारभार, राज्यव्यवस्था व धडाडी पाहिली असता, हे आरोप सबळ पुराव्यांवर आधारित आहेत असे म्हणता येत नाही. तथापि काही दुर्गुण व सेनापतींची फितूरी यांमुळे त्याच्या सुसंघटित सैन्याचा अखेर पराभव झाला, ही वस्तुस्थिती आहे.

राज्यकारभारात त्याने चोख व्यवस्था ठेवून प्रांतांची नावे बदलली. स्वतःची नवीन मापे, वजने व नाणी पाडली. एवढेच नव्हे, तर स्वतःची कालगणना सुरू करून तीमधील वर्षे व महिने यांस नवी नावे दिली. त्याचप्रमाणे मुलकी व लष्करी खात्यांत अनेक सुधारणा केल्या. त्याला कलाकौशल्याचा व वाङ्‌मयाचा छंद होता. फार्सी, मराठी, उर्दू व कन्नड या भाषा अवगत होत्या. त्याची मराठी पत्रे उपलब्ध आहेत. त्याने जमविलेला संग्रह लंडन, मद्रास व कलकत्ता या ठिकाणी आहे. त्यात दहाव्या शतकापासून त्या वेळेपर्यंतच्या अनेक कलाकुसरींच्या वस्तू, हस्तलिखित ग्रंथ, कुराणाची भाषांतरे, मोगल कालीन इतिवृत्ते, तवारिखा इ. साहित्य आहे. टिपूनेफर्मान बनाम अलीराजा व फतह-उल्-मुजाहिदैनत या नावांचे ग्रंथ लिहिले, असे म्हणतात. तो खुतबापठणाच्या बाबतीत दक्ष असे. त्याने आपल्या नावे खुतबापठण करण्याची प्रथा सुरू केली होती.


संदर्भ : 1. Ahmad, Fazl, Sultan Tippu, Lahore, 1958.

2. Forrest, Denys, Tiger of Mysore, Bangalore, 1970.

3. Hasan, Mohibbul, History of Tipu Sultan, Calcutta, 1951.

देशपांडे, सु. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate