অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डच सत्ता, भारतातील

डच सत्ता, भारतातील

डच सत्ता, भारतातील

डच लोक व्यापारासाठी भारतात आले. आपल्या जहाजातून लिस्बनला येणारा हिंदुस्थानातील माल ते यूरोप खंडात नेत असत. १५८८ नंतर लोक भारतात येण्याचा मार्ग शोधू लागले. १५७९ ते १५९६ पर्यंत लीनस्कोटेन, कार्नीलियस, हौटमन, वगैरेंच्या मार्गदर्शनाखाली ते भारतात आले. १६०१ पर्यंत डच लोकांनी अनेक सफरी केल्यानंतर १६०२ मध्ये युनायटेड डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. या कंपनीवर डच पार्लमेंटची देखरेख असे. डच सरकारने या कंपनीला पूर्वेकडील व्यापाराचा पूर्ण मक्ता दिला होता. कंपनीचे हिशेब तपासण्याचे काम डच सरकारकडे असे.

पुढे अल्पावधीतच या कंपनीने मोठे भांडवल जमविले. १६०५ मध्ये डच लोकांनी मच्छलीपट्टण येथे पहिली वखार घातली. यानंतर त्यांनी सुरत, चिनसुरा, कासिमबझार, पाटण, नेगापटम्, कोचीन इ. ठिकाणी वखारी घातल्या. वेंगुर्ल्यास वखार घालून १५६७ मध्ये त्यांनी एक किल्लाही बांधला. या वखारींचा आणि डच सरकारचा नेहमी पत्रव्यवहार होई. हा पत्रव्यवहार (डाग रजिस्टर) ऐतिहासिक साधने म्हणून महत्त्वाचा आहे. भारत आणि अतिपूर्वेकडे व्यापारी वाहतूक डच लोकांनी सुरू केली. ते नीळ, अफू, तांदूळ, इ. मालाची भारतातून निर्यात करीत. १६७४ मध्ये डच लोकांनी फ्रेंचांचा पराभव करून त्यांना मच्छलीपट्टण येथून हाकलून दिले. व्यापाराच्या उद्देशानेच डच भारतात आले होते. त्यांना राज्यस्थापनेची हाव नव्हती; त्यांचा तसा उद्देशही नव्हता. व्यापारात मिळणाऱ्या पैशावर ते संतुष्ट होते.

यूरोपात डच व फ्रेंच यांत लढाया झाल्या, की त्याचा परिणाम साहजिकच भारतातील डच व फ्रेंच हालचालींवर होत असे. १६७४ मध्ये फ्रेंच लोक गोवळकोंड्याच्या सुलातानाविरुद्ध लढत असताना डच लोकांनी त्याला साहाय्य दिले. फ्रेंच व मराठ्यांचे संबंध मैत्रीचे होते. फ्रेंचांविरुद्ध कारस्थाने करून डच लोकांनी मराठ्यांना आपल्या बाजूला वळवून घेण्याचा प्रयत्न केला. डचांना व्यापारी सवलती मिळविण्यासाठी त्यांचा वकील हर्बर्ट डी यागर आपला सहाय्यक क्ले मेंट यासह शिवाजी महाराज कर्नाटकच्या मोहिमेवर असताना त्यांस १६७७ मध्ये भेटला होता. त्याने काही सवलती मिळविल्या. पाँडिचेरी ताब्यात घेण्यासाठी त्यांना सतत प्रयत्न करावे लागले. १६९३ साली त्यांनी मराठ्यांकडून ती विकत घेतली. १६९९ मध्ये त्यांनी ती फ्रेंचांना परत दिली. डच व इंग्रज यांचे संबंध १६१८ पासून बिघडले. १७५९ पर्यंत त्यांचे संबंध तसेच राहिले. १६७२–७४ मध्ये डच लोकांनी सुरत ते मुंबईपर्यंत चालणाऱ्या इंग्रजांच्या व्यापारास अडथळा केला.

१६९८ मध्ये चीनसुरा येथील डच अधिकाऱ्यानी अजीमुश्शा याच्याकडून इंग्रजांना मिळणाऱ्या व्यापारी सवलतींप्रमाणे सवलती मागितल्या. १७५९ पर्यंत डच व इंग्रज यांच्यात व्यापारी स्पर्धा चालू होती. बंगालमध्ये इंग्रजांची झालेली भरभराट डच लोकांना बघवेना, म्हणून त्यांनी इंग्रजांविरुद्ध असलेल्या नबाबाला १७५९ मध्ये साहाय्य केले. यानंतर डच आणि इंग्रज यांच्यात झालेल्या लढाईत डच लोकांचा पराभव झाला. या हालाचालींपलीकडे डच लोकांनी भारतातील एतद्देशीयांच्या कारभारात कधीच ढवळाढवळ केली नाही. इंग्रज व फ्रेच यांची सत्ता भारतात प्रबळ होताच, डच लोकांची शक्ती कमी झाली. त्यांनी कालमानाप्रमाणे आपली व्यापारपद्धती बदलली नाही. त्यामुळे एके काळी त्याच्य हातात असलेली व्यापारी सत्ता नाहीशी झाली. भारतातील सनदी नोकरांची मालिका, त्यांचे निवृत्तीवेतन इ. गोष्टी डच लोकांच्या राज्यव्यवस्थेतून आलेल्या आहेत.

 

गोखले, कमल

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate