অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दाभाडे घराणे

दाभाडे घराणे

दाभाडे घराणे

महाराष्ट्रातील अठराव्या शतकातील एक प्रसिद्ध मराठा घराणे. मराठी अंमलात या घराण्यातील पुरूषांनी पराक्रम दाखवून सन्माननीय पदे मिळविली. या घराण्याचा मूळ पुरूष बजाजी हा पुण्याजवळील तळेगावचा पाटील. याचा मुलगा येसाजी हा शिवाजी महाराजांचा हुजऱ्या म्हणून काम करीत असे. शिवाजीनंतर संभाजीने त्यास रायगडावर ठेविले. पुढे संभाजीच्या वधानंतर हा राजारामाबरोबर जिंजीस गेला. त्याच्या सोबत त्याची दोन मुले खंडोजी आणि शिवाजी ही होती. पैकी खंडोजी हा पुढे सेनापती म्हणून प्रसिद्धीस आला. त्याची जिंजी येथील एकनिष्ठ सेवा लक्षात घेऊन राजारामाने त्याला दाभाडे गाव इनाम दिले. जिंजीहून परत येताना राजारामाचा कबिला ह्याने महत्प्रयत्नाने पन्हाळ्यास पोहोचविला. या कामगिरीबद्दल राजारामाने त्यास सेनाखासखेल ही पदवी आणि काही गावे इनाम दिली.

राजारामानंतर शाहू मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर खंडेराव शाहूस मिळाला. १७१६ मध्ये शाहूने खंडेरावास सेनापतिपद देऊन चाकण आणि पारनेर येथे दोन मोठ्या जहागिऱ्या दिल्या. खंडेरावाने बाळाजी विश्वनाथास सहाय्य केले. उत्तर सरहद्दीवर राहून खानदेश, वऱ्हाड व गुजरात या तीनही प्रांतावर नजर ठेवावयास त्यास नेमले होते.

खंडेरावाच्या मृत्युनंतर शाहूने त्रिंबकरावास सेनापतिपद दिले;  परंतु बाजीरावाच्या काळात (त्रिंबकराव) दाभाडे हे नेमून दिलेल्या कामगिरीपासून थोडे निराळेपणाने वागू लागले. त्याचे आणि बाजीरावाचे फारसे सूत जमले नाही. त्रिंबकरावाचा निजामास जाऊन मिळण्याचा विचार होता. तेव्हा बाजीरावास त्रिंबकरावाशी लढाई करणे भाग पडले त्यात त्रिंबकराव मारला गेला. ही डभईची लढाई म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे.

त्रिंबकरावाच्या मृत्युनंतर उमाबाई दाभाडेला फार दु:ख झाले. तेव्हा शाहू १७३१ मध्ये बाजीरावासह उमाबाईला भेटण्यासाठी तळेगावास गेला आणि उमाबाईची समजूत काढून त्रिंबकरावाचा भाऊ यशवंतराव यास त्याने सेनापतिपदाची वस्त्रे दिली. तसेच पिलाजी गायकवाडास दाभाड्यांचा कारभारी म्हणून नेमण्यात आले.

माबाई, ताराबाई, आणि दमाजी गायकवाड यांनी पेशव्यांच्या विरूद्ध उठाव केला. तेव्हा १६ मे १७५१ रोजी पेशव्यांनी दाभाड्यांची सर्व मंडळी पुण्यात होळकरांच्या वाड्यात नजरकैदैत ठेविली; परंतु उमाबाईने पेशव्यांशी समझोता घडवून आणला व ते प्रकरण संपले.

शवंतरावाचे लग्न १२ मे १७५२ या दिवशी शितोळे देशमुखांच्या मुलीशी झाले. त्या वेळी दाभाड्यांचे आणि पेशव्यांचे सलोख्याचे संबंध दिसून आले. नोव्हेंबर १७५३ मध्ये उमाबाई कालवश झाली आणि पुढे १७५४ मध्ये यशवंतराव मरण पावला. यशवंतराव हा व्यसनाधीन असल्यामुळे गायकवाडास राज्यकारभारात पुढे येण्यास वाव मिळाला. यशवंतरावाची मुलगा दुसरा त्रिंबकराव यास सेनापतिपद देण्यात आले;  परंतु आता या पदाचे फारसे महत्त्व उरले नव्हते. १७६६ मध्ये वेरूळ मुक्कामी त्रिंबकराव मरण पावला.

दाभाड्यांचा आणि पेशव्यांचा मुख्य झगडा होता तो गुजरात प्रांताच्या मोकाशासंबंधी. गुजरातेत सेनापती दाभाड्याची स्थापना झाली, तेव्हा शाहूने गुजरात प्रांताची निम्मी मोकासबाब चिमणाजी बल्लाळ याजकडे व निम्मी त्रिंबकराव दाभाडे याजकडे पाठवावी, असा ठराव करून दिला; परंतु पुढे सेनापतीनी तो पाळला नाही. गुजरातवरील निम्मा हक्क पेशव्यांनी कधीही सोडला नाही. त्यामुळे कलह निर्माण होऊन त्यात दाभाड्यांना अपयश आले. त्रिंबकराव दाभाड्यांनंतर फारसा कर्तबगार पुरूषही त्या घराण्यात निपजला नाही. अशा तऱ्हेने दुसऱ्या त्रिंबकरावाच्या मृत्युनंतर हे घराणे पेशवाईत अथवा मराठ्यांच्या इतिहासात पुन्हा उर्जितावस्थेस आले नाही.


कुलकर्णी, गो. त्र्यं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate