অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पटवर्धन, परशुराम भाऊ

पटवर्धन, परशुराम भाऊ

पटवर्धन, परशुराम भाऊ

(? १७४०-१७ सप्टेंबर १७९९). उत्तर पेशवाईतील एक मातबर सरदार. उत्तर पेशवाईत ज्या प्रसिद्धि व्यक्ती होऊन गेल्या, त्यांत नाना फडणीस, महादजी शिंदे, हरिपंत फडके यांच्या बरोबरीने परशुरामभाऊ हाही होता. पानिपतच्या अपयशानंतर मराठे पुन्हा प्रबळ झाले. त्यास मुख्यतः वरील व्यक्ती कारणीभूत झाल्या. परशुरामभाऊंचे वडील रामचंद्र हरी हे पेशव्यांचे एक सरदार होते. ते परशुरामभाऊ तेरा वर्षांचा असतानाच वारले. पुढे आई व चुलता यांनी त्यांचे संगोपन व शिक्षण केले. वयाच्या सतराव्या वर्षी श्रीरंगपटणच्या मोहिमेत भाऊ हाती तलवार घेऊन उतरला, तो थेट साठाव्या वर्षी मृत्यूने त्याच्यावर झडप घालीपर्यंत कार्यमग्न होता. सिंधखेडच्या लढाईत निजामाविरूद्ध, रट्टेहळ्ळीच्या लढाईत हैदरविरुद्ध आणि पहिल्या इंग्रज-मराठे युद्धात इंग्रजांचा सेनापती गॉइर्ड याला बोरघाटापासून पनवेलच्या खाडीपर्यंत चेपत नेण्यात त्याची कामगिरी ठळकपणे दिसून येते, टिपूने नरगुंदकरांवर चढाई केली, तेव्हा भाऊने स्वरराक्रमाने त्याची खोड मोडली. धारवाडचा किल्ला हस्तगत करून त्यावर पेशव्यांचे निशाण जढवण्याचा पराक्रम त्याने केला. श्रीरंगपटणच्या लढाईनंतर भाऊच्या आयुष्यातील मोठी मोहीम म्हणजे निजामाविरुद्ध झालेली खर्ड्यांची लढाई (१७९४). या लढाईतील यशाचा मोठा वाटा पटवर्धनांचा आहे.

मुत्सद्दी म्हणून भाऊला फारसे यश आले नाही. राघोबादादा व करवीरकर यांच्या विरुद्ध त्याला नेहमीच तोंड द्यावे लागले, त्याचा परिणाम म्हणजे दुसरा बाजीराव गादीवर आल्यानंतर त्याने भाऊचा छळ करून त्यास कैदेत टाकले आणि सुटकेसाठी १५ लक्ष रुपये दंड आकारला. तरीही भाऊने आपली स्वामिनिष्ठा सोडली नाही. शेवटी करवीरकरांशी झालेल्या लढाईत निर्घृणपणे भाऊचा वध करण्यात आला.


संदर्भ : सहस्रबुद्धे, स. अ. सरदार परशुरामभाऊ पटवर्धन, मुंबई, १९४७.

कुलकर्णी, गो. त्र्यं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate