অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पवार घराणे

पवार घराणे

पवार घराणे

पेशवाईतील एक प्रसिद्ध मराठा घराणे. शिंदे व होळकर यांबरोबर पवारांनी उत्तरेत मराठी राज्याचा विस्तार केला. या घराण्याचा मूळ पुरुष कृष्णाजी शिवकालात होता. त्याचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील सुपे. छत्रपती शिवाजींच्या सैन्यात तो एका तुकडीचा प्रमुख म्हणून काम करीत होता. शिवाजी—अफजलखान लढाईत त्याने भाग घेतला होता. त्याचे मुलगे बुबाजी व केरोजी. मुसलमानपूर्वकालीन धारच्या प्रसिद्ध परमार घराण्याचे आपण वंशज आहेत, अशी पवारांची भावना होती. त्यामुळे माळव्यामध्ये धारच्या आजूबाजूचा प्रदेश आपल्या ताब्यात आला तर बरे, म्हणून त्यांनी प्रयत्न केले. काही पवार मंडळी माळव्यामध्ये स्वारी—शिकारीस गेल्याचे समजते. बाळाजी विश्वनाथ दिल्लीस गेला, तेव्हा केरोजी पवारही त्याजबरोबर होता .केरोजीच्या पुढील वारसांविषयी माहिती ज्ञात नाही; पण बुबाजीस मात्र काळूजी व संभाजी असे दोन मुलगे होते. त्यांविषयी विशेष माहिती उपलब्ध नाही; परंतु काळूजीचे मुलगे तुकोजी व जिवाजी आणि संभाजीचे मुलगे उदाजी तुकोजी व रावांचा मुलगा यशवंतराव यांचे अनेक निर्देश पेशवेकालीन कागद पत्रांत आढळतात. हे चारही चुलतभाऊ सामान्यतः पेशव्यांच्या बाजूने लढले; पण कधी पेशव्यांच्या विरुद्ध बाजूनेही लढायांमध्ये भाग घेतलेले दिसतात.

१७२० ते १७२९ या नऊ वर्षांच्या कालखंडात या चार भावांनी अनेक वेळा माळव्यावर स्वाऱ्‍या केल्या होत्या आणि त्यांत त्यांनी काही प्रमाणात यशही मिळविले होते, तथापि चिमाजी अप्पा हा शिंदे, होळकर व पवार यांना घेऊन १७२८ च्या शेवटी माळव्यात गेला आणि तेथील मोगल सुभेदार गिरधर बहादुर व त्याचा नातलग दया बहादुर या दोघांनाही त्याने अमझेर येथे झालेल्या घनघोर लढाईत ठार केले आणि माळवा प्रांतावर आधिपत्य मिळविले. नंतर छत्रपती, शिंदे, होळकर आणि पवार यांत माळवा वाटूनही टाकला. गुजरातेत डभई येथे झालेल्या लढाईच्या वेळी (१ एप्रिल १७३१) उदाजी, आनंदराव व मळोजी पवार हे बाजीराव पेशव्याविरूद्ध त्र्यंबकराच दाभाड्याच्या बाजूने लढले. तीत उदाजी पवार याचा पाडाव झाला व आनंदराव पवार पळून गेला; पण पुढे त्याचे पेशव्याशी सख्य झाले. उदाजी पवाराने त्यानंतर फाराशी कर्तबगारी दाखविलेली दिसत नाही. आनंदराव सर्पदंशाने मरण पावला (१७३६). त्याचा सरंजाम मुलगा यशवंतराव याजकडे आला.

बाजीरावाच्या दिल्लीवरील स्वारीत तुकोजी, जिवाजी व यशवंतराव यांनी त्याजकडे सोपविलेली कामे उत्तम रीतीने पार पाडली. वसईच्या रणसंग्रामातही त्यांनी भाग घेतला होता. १७५२ मध्ये दिल्लीच्या बादशाहाशी मराठ्यांचा जो प्रसिद्ध अहदनामा (काररनामा) झाला, तो पेशव्यांतर्फे पाळला जाईल याची हमी शिंदे, होळकर व पवार या तिघांनी घेतली होती.

यशवंतराव पानिपतच्या तिसऱ्‍या लढाईत मराठ्यांच्या बाजूने लढताना कामी आला (१७६१). हे सर्व चालू असताना धार व त्याच्या आसपासचा सर्व प्रदेश आनंदरावास मिळाला आणि देवास व त्याच्या आसपासचा प्रदेश तुकोजी व जिवाजी या दोघांना मिळाला. तुकोजी हा देवासच्या थोरल्या पातीचा संस्थापक असून जिवाजी धाकट्या पातीचा संस्थापक बनला. देवासच्या थोरल्या पातीचे वारस विक्रमसिंह हे दत्तकनात्याने कोल्हापूर संस्थानचे अधिपती झाले (१९४७). इंग्रजी अंमलाच्या आरंभीच्या काळात पवारांनी हिंदू संस्कृतीच्या जीर्णेद्धाराचा आपल्या संस्थानांत प्रयत्न केल्याचे एका प्रकटनावरून कळते.

 

पहा : धार संस्थान.

संदर्भः १. ओक, शि. का., लेले, का. कृ. धार संस्थानचा इतिहास,

.भाग, धार. १९३४. २. गुजर, मा. वि. पषार विश्वासराष घरण्याचा इतिहास व ऐतिहासिक कागद-संग्रह, पुणे, १९६०.

३, गुजर, मा. वि. संपा. संस्थान देवास धोरली पाती पवार घराण्याच्या इतिहासाची साधने, पुणे, १९४०.

खरे, ग. ह.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate