অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पवित्र रोमन साम्राज्य

पवित्र रोमन साम्राज्य

पवित्र रोमन साम्राज्य

विभिन्न प्रदेशांवर राज्य करणाऱ्‍या जर्मन राजांच्या साम्राज्याला ही संज्ञा सर्वसाधारणपणे आठव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत लावीत. वस्तूतः सेक्रम रोमॅनस इम्पेरियम ही पवित्र रोमन साम्राज्यसदृश संज्ञा १२५४ नंतरच प्रचारात आली. तत्पूर्वा रोमन एम्पायर व होली एम्पायर या संज्ञा अनुक्रमे १०३४ व ११५७ मध्ये प्रचारात आल्या. मात्र रोमन एम्परर हा शब्द जुना असून तो ९८३ मध्ये वापरात होता पण दुसऱ्‍या ऑटोच्या वारसांनी तो वापरला नाही. शार्लमेनने प्रथम रोमन सम्राट ही उपाधी ८०० मध्ये गादीवर येताच धारण केली. या विविध उपाधींच्या गुंतीगुंतीत साम्राज्याचा प्राचीन इतिहास सामावलेला आहे.

प्राचीन काळी यूरोपचा बराच भूप्रदेश रोमन साम्राज्यात समाविष्ट होता. रोमनांनी ख्रिस्ती धर्म अंगीकारल्यानंतर पोप ही ख्रिस्ती जगाची आध्यात्मिक श्रेष्ठ व्यक्ती ठरली, तर रोमन सम्राट हा शासकीय श्रेष्ठ सत्ताधारी झाला. रोमचे साम्राज्य ४७६ मध्ये संपुष्टात आले; पण तत्पूर्वी कॉन्स्टँटिनोपलची बिझँटिअम सत्ता किंवा पूर्व रोमन साम्राज्य अस्तित्वात आले. त्याला पश्चिम व मध्य यूरोपात रोमन साम्राज्याची प्रतिष्ठा लाभली नाही. त्यामुळे यूरोपच्या राजकीय जीवनात एक पोकळी निर्माण झाली.

म्राट शार्लमेन सत्तेवर येताच काहीशा विस्तृत प्रदेशाचे साम्राज्य स्थापण्याचा प्रयत्न झाला आणि ही पोकळी अंशतः भरून निघाली. पोप तिसऱ्‍या लीओने रोमच्या सेंट पीटर चर्चमध्ये शार्लमेनच्या मस्तकी सम्राटाचा मुकुट ठेवला (८००) आणि रोमन सम्राट असा त्याचा जयघोष झाला. म्हणून या दिवशी पवित्र रोमन साम्राज्याचा जन्म झाला असे मानतात; पण रोमन साम्राज्य व पवित्रही विशेषणे अनुक्रमे सम्राट ऑटोने व फ्रीड्रिख बार्बारॉसाने अनुक्रमे ९६२ व ११५२ मध्ये प्रचारात आणली. रोमन साम्राज्याच्या स्थापनेनंतर ११५४७३ हा एकोणीस वर्षांचा अभिषिक्त सम्राट नसल्याचा काळ सोडता, या साम्राज्यात विभिन्न घराण्यातील एकूण बावन्न व्यक्तींनी सम्राटपद भूषविले. शार्लमेनच्या निधनानंतर लवकरच त्याचे साम्राज्य मोडकळीस आले व सम्राट नामधारी बनला. सम्राटाची निवडणूक होऊ लागली आणि मतदार मांडलिक सत्ताधीश शिरजोर बनले.

कालांतराने सॅक्सनीच्या ड्यूकच्या वंशातील पहिला हेन्री व पहिला ऑटो यांनी, विशोषतः ऑटोच्या साम्राज्याची प्रतिष्ठा वाढविली. म्हणून ९६२ मधील ऑटोच्या अभिषेकापासून या साम्रांज्याची स्थापना झाली, असेही मानतात. या वेळेपासूनच पोप आणि सम्राट यांत परस्परांच्या हक्कांब्रद्दल वादंग माजले, ते मिटले नाहीत. कालांतराने सम्राटपद ऑस्ट्रियाच्या हॅप्सबर्ग घराण्याकडे वंशपरंपरागत गेले. यापूर्वीच सम्राटाची औपचारिक निवडणूक करण्याची प्रथा पडली होती. सम्राट चौथ्या चार्ल्सच्या आज्ञापत्राने मतदारांची संख्या सात व पुढे नऊ ठरविण्यात आली. कित्येक वर्षे सम्राटपद हॅप्सबर्ग घराण्यात राहिले.

ल्यूथरच्या धर्मसुधारणेच्या चळवळीमुळे जर्मनीत कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट यांच्यात युद्ध भडकले, ते तीस वर्षे चालले. युद्धानंतर १६४८ च्या वेस्टफेलियाच्या तहाने सम्राटाची सत्ता नाममात्र राहिली. पुढे ल्युनेव्हीलच्या तहाने नेपोलियन बोनापार्टने सम्राटची सत्ता नष्ट केली आणि ऱ्‍हा संधाची स्थापना करताच शेवटचा सम्राट दुसरा फ्रान्सिस याने सम्राटपदाचा त्याग केला. यूरोपच्या इतिहासातील या नाममात्र साम्राज्याचा १८०६ मध्ये अंत झाला.

 

संदर्भ : Brcyce, James, The Holy Roman Empire, London, 1968.

ओक, द. इ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate