অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पांड्य घराणे

पांड्य घराणे

पांड्य घराणे दक्षिण हिंदुस्थानातील एक प्राचीन घराणे. यांचा व त्यांच्या प्रदेशाचा प्रथम उल्लेख अशोकाच्या लेखात येतो. दक्षिणेत चोल, चेर व पांड्य हे प्रदेश अशोकाच्या साम्राज्याच्या बाहेर होते. अशोकाने त्या प्रदेशांत मनुष्यांच्या तसेच पशूंच्या चिकित्सेची व्यवस्था केली होती आणि त्याकरिता औषधी वनस्पती लावण्याची काळजी घेतली होती. कालिदासाने रघुवंशात उरगपुरला (आताचे उरैपूर-तिरुचिरापल्लीजवळ) पांड्य राजा उपस्थित होता असे वर्णिले आहे; तथापि या आरंभीच्या राजांविषयी आपणास फारशी माहिती नाही. त्यामध्ये नेडुं-जेळीयननामक राजाचे नाव संस्मरणीय आहे. त्याने चेर व चोल राजांचे आपल्या मदुराई राजधानीवरचे आक्रमण परतवून लावले. कोंगू आणि नीडूर येथील राजांचा पराभव केला. विद्वान व कवी यांना आश्रय दिला तसेच अनेक श्रौत याग केले, असे तद्विषयक गीतात म्हटले आहे.

यानंतर आंध्रांच्या दक्षिणेतील आक्रमणामुळे तमिळ प्रदेशाच्या उत्तर सीमेवरच्या कळवारनामक लोकांना दक्षिणेस स्थलांतर करावे लागले, त्यामुळे ही चोल व पांड्य राज्ये मोडकळून पडली. पुढे सहाव्या शतकाच्या अखेरीस कडुंगोन (५९०-६२०) याने नवीन राजवंश स्थापला. या वंशाचा चौथा राजा अरिकेसरी मारवर्मा (पराकुश-६७०-७००) याने बादामीच्या पहिल्या विक्रमादित्याला पल्लवांबरोबरच्या युद्धांत साहाय्य केले. या राजांच्या पश्चिमेचे गंग आणि त्यांचे सम्राट बादामीचे चालुक्य यांच्याशी वरचेवर लढाया होत.

या वंशातील श्रीमार श्रीवल्लभ राजाने (८१५-६२) श्रीलंकेवर स्वारी करून तेथील राजधानी लुटली. त्याचा सूड लंकाधिपतीने पल्लवांच्या साहाय्याने पुढे काढला. त्यात राजपुत्र दुसरा वरगुणवर्मा सामील झाला होता. या घरभेद्याला पुढे सिंहासन मिळाले, पण पल्लवांचे स्वामित्व स्वीकारावे लागले.

यानंतर पल्लव इतिहासातून गेले; पण पांड्यांना उत्तर सीमेवरील चोलांशी सामना देणे भाग पडले. परांतक चोलाशी केलेल्या युद्धात मारवर्मा द्वितीय राजसिंह याचा पराभव होऊन त्याला प्रथम लंकेत व नंतर केरळमध्ये आश्रय घ्यावा लागला. चोलांनी पांड्यांचा बराच प्रदेश खालसा केला आणि अशा रीतीने कडुंगोन याने स्थापिलेल्या पहिल्या पांड्य साम्राज्याचा अस्त झाला.

पांड्य राजांनी राजेंद्र चोल, पहिला कुलोत्तुंग व तिसरा कुलोत्तुंग या चोल राजांच्या कारकीर्दीत पुन्हा डोके वर काढण्याचा प्रयत्न केला; पण त्यांस यश आले नाही.

पुढे द्वितीय मारवर्मा सुंदर पांड्य (१२१६-३८) याने तिसऱ्या कुलोत्तुंगाचा पराभव करून आपले राज्य विस्तृत केले. त्यात आता तिरुचिरापल्ली आणि पुदुकोट्टई या उत्तरेच्या प्रदेशांचा समावेश झाला होता. याचा वंशज पहिला जटावर्मा सुंदर पांड्य (१२५१-६८) याने पांड्यांचे दुसरे साम्राज्य स्थापले. त्याने चेर, होयसळ व चोल राजांचा पराभव केला, लंकेवर स्वारी करून तिचा उत्तर भाग काबीज केला आणि काकतीय गणपतीचा पाडाव करून आपल्या साम्राज्याची उत्तर सीमा नेल्लोरपर्यंत वाढविली.

मारवर्मा कुलशेखर पांड्य (१२६८-१३०९) याच्या कारकीर्दीत मार्को पोलो हा परकीय प्रवासी पांड्य देशात आला होता. त्याने भारताची जगातील सर्वोत्कृष्ट देश म्हणून स्तुती केली आहे.

कुलशेखर पांड्याला एक औरस आणि एक अनोरस असे दोन पुत्र होते. राजाने जटावर्मा वीर पांड्य या अनौरस पुत्राला गादी देण्याचे ठरविल्यामुळे औरस पुत्र जटावर्मा सुंदर पांड्य याने आपल्या पित्याचा खून करून गादी बळकावली; पण वीर पांड्याने त्याला लवकरच पदच्युत केले. तेव्हा सुंदर पांड्य याने मलिक काफूर याचे साहाय्य मागितले. त्याने ते मोठ्या आनंदाने देऊन दक्षिण भारताच्या टोकाकडील या शेवटच्या हिंदू राज्याची इतिश्री केली (१३१०).

इतर भारतीय राजांप्रमाणे पांड्यांनीही विद्या व कला यांना आश्रय दिला. त्यांच्या मदुराई राजधानीतील मीनाक्षीसुंदरम् देवालयाची रचना कलात्मक आहे. राज्यकारभारात पांड्यांनी एक नवीन सुधारणा केली. प्रत्येक राजा आपणाबरोबर आपल्या राजकुमारांनाही राज्यशासनाचा अधिकार देई. जटावर्मा वीर पांड्याच्या काळी त्याच्या चार पुत्रांनी त्याच्याबरोबर राज्यकारभारात भाग घेतल्याचे कोरीव लेखांत उल्लेख सापडतात. त्यामुळे काही परदेशी प्रवाशांचा असा ग्रह झाला होता की, पांड्य राज्याचे अनेक विभाग झाले; पण वस्तुस्थिती तशी नव्हती.

पांड्य राजांनी काही गुहा खोदविल्या. सित्तन्नवासल, तिरुमलइपुरम येथील चित्रकला उल्लेखनीय आहे; तथापि त्यांचा भर वास्तुशिल्पांवर अधिक होता. या काळात वास्तुशिल्पात गाभारा आणि शिखर किंवा विमान यांच्या रचनेत फारसा फरक पडला नाही; मात्र अधिक लक्ष गोपुरांच्या बांधकामात केंद्रित झाले. गोपुरांची कल्पना प्राथमिक स्वरूपात असल्यामुळे गोपुरे फार उंच निर्माण झाली नाहीत; पण त्यांच्यातील बोजडपणा जाणवतो. ती पहिल्या दोन मजल्यांपर्यंत आयताकारी व लंबरूप राहून वर लंबाला साधारणतः पंचवीस अंशाचा कोन करीत आणि पुढे सरळ किंवा अंतर्वक्र रेषेत निमुळती होत. त्याला मध्ये द्वार असे. या काळात मंदिराच्या भोवती संरक्षणासाठी तट उभारू लागले. एवढेच नव्हे, तर हळूहळू मंदिर मध्यबिंदू कल्पून एकाबाहेर दुसरा अशी आयताकारी किंवा चौरस तटांची संख्या वाढत गेली. या काळातील श्रीरंगमचे मंदिर फारच विस्तृत असून तेथे एकात एक सात प्राकार आहेत.

मूर्तिशिल्पातील शिव, विष्णू, गणेश, द्वारपाल इ. शिल्पांवर पल्लव कलेचा मोठा प्रभाव पडलेला आहे.तिरुप्परंकुरम् येथील नटेश्वर, पार्वती, शिवगण, नंदी यांच्या मूर्ती प्रेक्षणीय आहेत. तद्वत् कळुगुमलई येथील शिव व त्याचा परिवार ही शिल्पेही लक्षणीय आहेत. येथे उमासहित शिव, मृदंगवादक, दक्षिणामूर्ती, नरसिंह, ब्रह्मा, विष्णू, स्कंद, चंद्र-सूर्य, सुरसुंदरी आणि टेकडीवरील गुहेतील पार्श्वनाथ, पद्मावती, अंबिका या सर्वांच्या मूर्ती सौंदर्यपूर्ण आहेत. उत्तरकालीन पांड्य शिल्पांपैकी मीनाक्षीसुदरम् मंदिरातील काही उत्तरकालीन पांड्य शिल्पेही प्रेक्षणीय आहेत.

 

संदर्भ : 1. Ravindran T.K., Ed. Journal of Indian History: Golden Jubilee Volume-Recent Discoveries in Pandyan History, Trivandrum, 1973.

2. Sanstri, K. A. N. History of South India, Madars, 1958.

3. Sanstri, K. A. N.The Pandyan Kingdom, London, 1929.

मिराशी, वा. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate