অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पानिपतच्या लढाया

पानिपतच्या लढाया

हरयाणा राज्याचा कर्णाल जिल्ह्यातील पानिपत या ऐतिहासिक स्थळी झालेल्या तीन प्रसिद्ध लढाया. हे स्थळ दिल्लीच्या वायव्येस सु. ८५ किमी. वर दिल्ली-अंबाला हमरस्त्यावर आहे.

पाहिली लढाई

हे युद्ध बाबर व इब्राहीम लोदी यांमध्ये दिल्लीच्या तक्ताकरिता २१ एप्रिल १५२६ मध्ये झाले. उत्तर भारतात मुसलमानी राजवट सुरू जाल्यापासून बाबरपर्यंत जे सुलतान झाले ते बहुतेक अफगाण होते, मोगल नव्हते. धर्माने हे सर्व एक असले, तरी राज्यतृष्णेत एक नव्हते, खल्जी, तुघलक, सय्यद आणि लोदी या वंशांतील सर्व सुलतान भारतात आपले राज्य कायम टिकावे या प्रयत्नात होते. यामुळे मोगलांच्या भारतावर होणार्‍या स्वार्‍यांना हे सुलतान सतत विरोध करीत आले. बाबर, तुर्क व मोगल या दोन रक्तांचा वाररसदार होता. त्याने अफगाणिस्तान व मध्य आशिया या दोन प्रदेशांत आपले राज्य स्थिर करण्याचा प्रयत्न केला; पण त्यात त्यास म्हणावे तसे यश आले नाही. म्हणून त्याने आपले लक्ष भारताकडे वळविले. भारतात आपले राज्य स्थिर करण्याच्या उद्देशाने त्याने भारतावर पाच-सात स्वार्‍या केल्या. त्या सर्व स्वार्‍यांत त्यास उणे अधिक यश मिळत गेले. यामुळे भारतात राज्य स्थापण्याचा त्याने पक्का निश्चय केला. त्याची शेवटची स्वारी याच हेतूने झाली होती. त्या वेळी भारतात लोदी घराण्यातील इब्राहीमचे राज्य चालू होते. या इब्राहीम लोदीला काही प्रतिस्पर्धी होते. त्यांपैकी एक त्याचा चुलता आलमखान लोदी व दुसरा पंजाबचा सुभेदार दौलतखान लोदी. या दोघांनीही बाबरास पत्र लिहून कळविले, की ‘आम्हास गादीवर बसविण्यास मदत केली, तर लोदी राजवटीच्या ताब्यात असलेल्या प्रदेशांपैकी काही प्रदेश आपणास देऊ व आपली अधिसत्ता मानू’. बाबर आपल्या हेतूच्या पूर्तीसाठी अशा संधीची वाटच पहात होता. ही पत्रे जाताच त्याने भारतावर स्वारी करण्याचे ठरवले. तो आपले सैन्य घेऊन भारतात आला. या वेळी दौलतखान व त्याच्या एक मुलगा दिलावरखान यांमध्ये वितुष्ट येऊन तो बाबरास मिळाला होता. बाबर भारतात आला असे पाहून इब्राहीमखान लोदी हा त्याच्याशी लढाई देण्याची तयारी करू लागला. बाबर तोपर्यंत पानिपतच्या जवळ पोहोचला होता; देव्हा इब्राहीम लोदी हाही पानिपतजवळ बाबाराशी लढाई करण्याच्या उद्देशाने आला. दोघांचे सैन्य पानिपतजवळ तळ देऊन राहिले. सु. आठ दिवस किरकोळ चकमकीशिवाय लढाई अशी झाली नाही; पण २१ एप्रिल १५२६ रोजी दोघांची पानिपतच्या मैदानावर मोठी लढाई झाली. या लढाईत इब्राहीमखानाच्या बाजूस एक लाख शिफाई होते, तर बाबारकडे सु. २५ हजार लोक होते असे म्हणतात; पण बाबराने या लढाईत आपल्या सैन्याची अशा रीतीने मांडणी केली की, लढाई सुरू होताच बाबरच्या सैन्याने इब्रहीमच्या सैन्याला पाठीमागून जाऊन घेरले. यामुळे इब्राहीम लोदीच्या सैन्यात गोंधळ उडाला. इब्राहीम शौर्याने लढला, तरी तो मारला गेला. पुढे त्याच्या सैन्याचा सर्वस्वी नाश होऊन बाबरास जय मिळाला. अशा तर्‍हेने जय मिळविल्यावर बाबरने दिल्लीस जाऊन राज्य विस्तृत करण्याचा प्रयत्न केला. एवंच आलमखान व दौलतखान दोघांच्याही तोंडांस पाने पुसली गेली.

दुसरी लढाई

हे युद्ध एका बाजूस अकबर व त्याचा पालक बैरामखान व दुसर्‍या बाजूस हेमू (हीमू) यांमध्ये दिल्लीच्या गादीसाठी ५ नोव्हेंबर १५५६ रोजी झाले. बाबरनंतर हुमायून उत्तर भारतात राज्य करीत असता शेरशाह सूरीच्या पुढे त्याचे काही एक न चालून त्याला राणात आश्रय घ्यावा लागला; पण तेथे तो स्वस्थ बसला नव्हता. त्याचे लक्ष भारतातील घडामोडींवर होते. १५५४ मध्ये शेरशाहचा मुलगा इस्लामशाह वारल्यानंतर त्याच्या वारसांत गादीविषयी भांडण सुरू झाले. या भांडणात सूरवंशाची राज्ययंत्रणा ढिली झाली आहे असे पाहून हुमायून अफगाणिस्तानमार्गे हिंदुस्थानात आला व त्याने १५५५ मध्ये दिल्ली सर केली; पण तेथे त्याचा जम बसण्यापूर्वीच तो मरण पावला. यामुळे सूरवंशातील एक वारस मुहम्मद आदिल (१५५४-५६) याने उचल खाल्ली व त्याने चुनार येथे आपले लहानसे राज्य स्थापन केले. त्या वेळी त्याच्या सहाय्यकांतील हेमू नावाचा एक कर्तबगार हिंदू महत्पदावर चढला होता. त्याने दिल्ली हस्तगत केली तेव्हा त्यास वाटले की, आता आपण राजा झालो. त्याने आपल्या नावाची नाणीही पाडली होती, असे म्हणतात. या वेळी अकबर व त्याचा पालक बैरामखान जलंदर येथे असता त्यांस ही बातमी लागली; तेव्हा ते दिल्ली जिंकण्याच्या उद्देशाने पानिपतजवळ आले. हेमूस ही बातमी समजताच तोही आपल्या सैन्यासह पानिपतजवळ आला. हेमूपाशी १,५०० हत्ती व १ लाख सैन्य होते अशी वदंता आहे. अकबराजवळ त्या वेळी फक्त २० हजार सैन्य होते. अशा स्थितीत पानिपतच्या मैदानावर ५ नोव्हेंबर १५५६ रोजी दोन्ही सैन्यांची गाठ पडली. हेमू फार त्वेषाने लढला. अकबराचा पराभवच व्हावयाचा; पण हेमूच्या डोळ्यास एक बाण लागला व तो पकडला गेला. अकबराने त्याचा शिरच्छेद केला. अकबराने ही लढाई जिंकली.

तिसरी लढाई

१४ जानेवरी १७६१ रोजी मराठे व अफगाण यांत झालेले युद्ध. अठराव्या शतकाच्या आरंभी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दक्षिण प्रायः निर्वेध झाली. त्यानंतर उत्तरेस दिल्ली दरबारात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करावयाचे हे मराठी राज्याचे जण सूत्रच होऊन बसले. ‘चलो दिल्ली’ या सूत्रानुसार पहिल्या बाजीराव पेशव्याने नर्मदा ओलांडून गुजरात, माळवा, बुंदेलखंड या भागांत संचार केला. त्याने व त्याच्या फौजांनी मोगली राजधानी दिल्ली गाठली. दक्षिणच्या सहा सुभ्यांची सुखत्यारी मागून तो स्वस्थ बसला नाही. त्याने नर्मदा ते चंबळपर्यंतच्या मुलखाची मागणी केली. १७४१ मध्ये या जहागिरीच्या सनदा बाळाजी बाजीराव पेशव्यास मिळाल्या. पुढील दहा वर्षांत राजस्थान, आग्रा, गंगा-यमुनेचा दुआब आणि बंगाल येथील राजकारणात मराठ्यांनी प्रवेश मिळविला.

अशा रीतीने मराठे मोगल बादशाहीची सूत्रे हातात घेत असता, त्यांना एक नवाच जबरदस्त शत्रू निर्माण झाला. हमदशाह अबदाली १७४८ पासून हिंदुस्थानवर स्वार्‍या करू लागला होता. त्याने १७५१ च्या अखेरीस लाहोरपर्यंत येऊन पंजाबचा काही भाग बळकाविला. आता हा राजधानीवर येतो की काय, या भीतीने बादशाहाने त्याचा प्रतिकार करण्याचे वजीरास सुचविले आणि वजीराने १७५२ च्या मार्च पहिन्यात मराठे सरदारांशी करारनामा केला. त्यांच्यावर संपूर्ण बादशाहीचे संरक्षण सोपविले गेले.

अबदालीन १७५७ मध्ये खुद्द राजधानीच गाठली. दिल्ली, आग्रा, मथुरा, वृंदावर लुटून अपार संपत्ती त्याने मिळविली आणि पंजाबात आपले अधिकारी नेमले. त्याची पाठ फिरते न फिरते तोच राघोबाचे हाताखाली मराठ्यांच्या फौजा चालून येऊन त्यांनी अबदालीची ठाणी उठविली आणि बादशाहाच्या वतीने पंजाबचा बंदोबस्त आरंभिला; पण अबदाली स्वस्थ बसणारा नव्हता. १७५९ च्या नोव्हेंबरात मोठ्या फौजेनिशी तो पंजाबात घुसला आणि मराठ्यांची ठाणी त्याने हस्तगत केली. रोहिल्यांना घेऊन दिल्लीनजीक शिंद्यांच्या फौजेस त्याने गाठले. या लढाईत दत्ताजी शिंदे गारद झाला आणि शिंद्यांच्या फौजेने रणातून पळ काढला. मल्हारराव होळकर मदतीस धाऊन आले; पण आता वेळ निघून गेली होती. होळकरांचा गनिमी कावा अबदालीपुढे कुचकामी ठरला.

पेशव्यांकडे बातमीदारांची पत्रे येऊ लागली की, वेळ आणीबाणीची आली आहे; हिंदुस्थानातील आपला अंमल उठला, अबदाली दिल्लीस येऊन पोहोचला आणि त्याने पंजाब, दिल्ली प्रदेश व्यापला. दुआब, आग्रा व राजस्थानातील सर्व राजेरजवाड्यांकडे त्याचे वकील रवाना झाले. आतापर्यंत केलेली सर्व कमाई फुकट गेली. रोहिले अबदालीस सामील झाले. शिंदे-होळकरांचा पाडाव झाल्यापासून आपल्या फौजांनी घीर सोडला आहे आणि शत्रूला गर्व चढला आहे. उत्तरेत जी बिकट समस्या निर्माण झाली, त्यांची चर्चा करण्याकरिता पेशव्याने आपल्या सरदारांना बोलाविले. एक आठवडामर ऊहापोह होऊन असे ठरले की, सदाशिवरावभाऊने उत्तरेत जाऊन शत्रूचा परिहार करावा. तेरा हजार निवडक हुजरात, बारा हजार सरदारांची फौज, इब्राहीमखान गारदीने तयार केलेले पाश्चात्त्य पद्धतीने लढणारे आठ हजार पायदळ आणि जंगी तोफखाना घेऊन १६ मार्च १७६० रोजी भाऊ विश्वासरावासह उत्तरेची वाट चालू लागला. १२ एप्रिलला विश्वासरावासह त्याने नर्मदा ओलांडली आणि उत्तरेतील हिंदू, राजपूत, जाट, बुंदेले तसेच राजेरजवाडे आणि मुसलमान नबाब, अमीर-उमराव या सर्वांना बादशाहीच्या रक्षणार्थ एकत्र येण्याचे आवाहन केले.

दिल्ली दरबारात मराठ्यांना अनुकूल असा एक पक्ष होता. मराठ्यांच्या मदतीने बादशाही चालवावी असे या पक्षाचे मत होते. पण मराठ्यांच्या उत्तरेतील राजकारणामुळे तसेच राजपूत, जाट यांच्या भांडणांत पडल्यामुळे दिल्ली दरबारात मराठ्यांना विरोध वाढला व द्वेषप्रेरित होऊन निजाम, जयपूरचा माधोसिंग, जोधपूरचा बिजेसिंग, नजीबखान व त्याचा गुरुतुल्य सहकारी शाह वलीउल्लाह यांनी अबदालीने मराठ्यांची खोड मोडावी, म्हणून त्यास निमंत्रण दिले. मराठ्यांशी सहकार्य करण्यास कोणी पढे येईना. राजस्थान, बुंदेलखंड येथील राजे, नजीब सोडून रोहिल्यांपैकी इतर सरदार व अयोध्येचा शुजाउद्दौला आपल्या साह्यास येतील, अशी खोटी आशा भाऊस वाटत होती; पण सर्व फोल ठरले, त्याला एकाकी शत्रूला तोंड द्यावे लागले. परख्या अबदालीला एतद्देशीय मदतनीस मिळाले; पण अबदाली काही झाले तरी येथे राहणार नसल्याने शेवटी आपणच सत्ताधारी होऊ, उलट मराठे सत्ताधारी झाल्यास आपणावर बंधने येतील, या विचाराने भाऊच्या मदतीस कोणी धाऊन आले नाहीत.

वाटेत जमीनदारांचे दंगे व अकाली पाऊस, या कारणाने चंबळ नदी ओलांडून आग्र्यास पोहोचण्यास भाऊच्या फौजेस तीन-साडेतीन महिने लागले. आग्र्याच्या दक्षिणेस १८ जूनला शिंदे-होळकरांच्या भेटी झाल्या. भाऊचा पहिला बेत आग्र्याजवळ यमुनापार करून अंतर्वेदीत उतरून शत्रूस गाठावयीचा होता; पण पाऊसकाळ लवकर सुरू झाला आणि यमुना दुथडी भरून चालली. बोटींचा पूल बांधून नदी ओलांडावयाचा विचार भाऊस सोडून द्यावा लागला. १४ जुलैस फौजा आग्र्यास पोहोचल्या. २१ तारखेस एक तुकडी राजधानी दिल्ली काबीज करण्याकरिता निघाली. २ ऑगस्टला राजधानीचे शहर मराठ्यांच्या ताब्यात आले.

दोन्ही फौजांमध्ये यमुना भरून चालली होती व ती अडीच-तीन महिने उतरण्याचा संभव नव्हता. तेव्हा वाटघाटीने काही निकाल लागतो की काय, हे पाहण्याकरिता बोलणी सुरू झाली; पण ती निष्फळ ठरली. शुजाउद्दौलाच्या मार्फतीने सूचना आली की, बिहारमध्ये जाऊन बसलेला दुसर्‍या आलमगीराचा पुत्र शाह आलम यास गादीवर बसवावे आणि आपणास वजीर नेमून दिल्लीचा कारभार चालवावा. अबदाली आणि मराठे या दोघांनी आपआपल्या देशांत परत जावे. शुजा या वेळी अबदालीस सामील होऊन, शत्रूच्या छावणीत दाखलही झाला होता. त्याने सुचविलेल्या अटीस अबदालीची कितपत संमती होती, हे कळण्याचा मार्ग नव्हता. अबदाली हिंतुस्थानात येऊन जवळ-जवळ आठ महिने झाले होते. नजीब हा त्याचा मुख्य सहाय्यक आणि मराठ्यांविरुद्ध उभारलेल्या कारस्थानाचा मुख्य सूत्रधार होता. नजीबाच्या संमतीशिवाय आता तह होतो कसचा; पण कदाचित शत्रुपक्षात फाटाफुट झाल्यास पहावे याकरिता भाऊने शुजाशी बोलणी चालू ठेवली. या वाटाघाटीतून निष्पन्न तर काही झाले नाही, उलट आपापसांतील वैमनस्यामुळे आणि स्वार्थामुळे जाटांच्या सर्व मागण्या मराठ्यांनी मान्य केल्या तरी, वजीर, गाझीउद्दीन आणि सुरजमल जाट भाऊस येऊन मिळाले नाहीत. जाटाने या संघर्षातून अंग काढून ध्यावे, हा त्याचा कृतघ्नपणाच होता. ग्वाल्हेर, भरतपूर, आग्रा हा जाटांचा मुलूख. ज्या प्रदेशांत मोहीम चालवावयाची, तेथील जमीनदारांचे साह्य मराठ्यांना आवश्यक होते.

अयोध्येच्या शुजाबद्दल भाऊस मोठी आशा वाटत होती. शुजास आपल्या बाजूस वळवून घेण्याबद्दल त्याने गोविंदपंत बुंदेल्यास पुनःपुन्हा लिहिले; पण भाऊंच्या पत्रांचा उपयोग न होता शुजा अबदालीस सामील झाला. रोहिले सरदार, नजीब आधीच त्यास मिळाले होते, याउलट एकही हिंदू राजा, राजपूत, जाट, बुंदेल भाऊस सामील न होता प्रकरणाचा निकाल कसा लागतो याची वाट पहात बसले. सर्व हिंदुस्थान एक होऊन पठाणांस विरोध करावा, या भाऊच्या हाकेस साथ मिळेना. अबदालीस पंजाब देऊन हे प्रकरण मिटविणे शक्य होते; पण पंजाब राखण्याची तर पेशव्याची आज्ञा. कोणत्या तरी एका पक्षाने माघार घेतल्याशिवाय अंतिम निर्णय लागावा तरी कसा? तहाच्या वाटाघाटी निष्फळ ठरल्या, तेव्हा युद्धाच्या दृष्टीने भाऊच्या हालचाली सुरू झाल्या.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate