অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पिसुर्लेकर, पांडुरंग सखाराम

पिसुर्लेकर, पांडुरंग सखाराम

पिसुर्लेकर, पांडुरंग सखाराम

(३० मे १८९४ – १० जूलै १९६९). गोव्यातील एक प्रसिध्द इतिहासकार. त्यांचा जन्म गोव्यातील शेणवी कुटुंबात पिसुर्ले (ता. सत्तरी) येथे झाला. आईचे नाव कृष्णाबाई. त्यांचे शिक्षण साखळी व पणजी येथे झाले. शिक्षकीपेशाचे प्रशिक्षण व वकिलीचे शिक्षण घेऊनही सुरुवातीस त्यांनी बिचोली येथे प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम केले. बोरकर कुटुंबातील रमाबाई यांच्याशी १९१३ साली त्यांचा विवाह झाला. लीलावती ही त्यांची मुलगी. रमाबाई १९६३ मध्ये मरण पावल्या.

पिसुर्लेकरांचे सर्व शिक्षण पोर्तुगीज भाषेमधून झाले होते; तथापि त्यांना इंग्रजी, फ्रेंच, कोकणी, संस्कृत या भाषा तसेच मोडी लिपी चांगल्या प्रकारे अवगत होती. त्यांचे लेखन मुख्यत्वे मराठी व पोर्तुगीज या दोन भाषांतच आढळते. शिक्षकीपेशानंतर त्यांनी पणजीच्या अभिलेखागारात काम पतकरले (१९३१). या अभिलेखागाराच्या संचालकपदावरुन ते १९६१ मध्ये निवृत्त झाले. पिसुर्लेकरांनी या अभिलेखागाराखालील दप्तरखाना सुधारला; त्यातील कागदपत्रे खंडवार लावली आणि त्यासंबंधी सूची व दोन मार्गदर्शिका प्रसिध्द केल्या. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने पणजी येथे इतिहास संशोधनकेंद्र स्थापन केले. त्याचे संचालकपद पिसुर्लेकरांकडे होते.

पिसुर्लेकरांनी स्फुटलेख व शोधनिबंध यांव्यतिरिक्त अनेक पुस्तके लिहिली. त्यांचे लेखन मुख्यत: पोर्तुगीज भाषेत असून त्याचे मराठी व इंग्रजी भाषांत भाषांतर झाले आहे. त्यांचे पुढील ग्रंथ महत्वाथाचे आहेत : अ आन्तीग् ईन्दिय् ई ऊ मून्दु इश्तेर्नु (१९२२),आश्पॅक्तुश् दा सिव्हिलिझासांव् दा ईन्दिय् आन्तीग् (१९२४), पुर्तुगेझिश् ई मारातश् (१९२६-३९), रेजिमॅन्तुश् दश् फोर्तालेझस् दा ईन्दिय् (१९५१), आजॅन्तिश् दा दिप्लोमासीय पुर्तुगेझ ना ईन्दिय् (१९५२), आस्सेन्तुश् दु कोंसेल्यु दु इश्तादु दा ईन्दिय् (१९५३-५७). यांखेरीज त्यांनी अनेक पोर्तुगीज कागदपत्रे प्रसिध्द केली. अ आन्तिगिदादि दु क्रिश्नाईज्मु या पुस्तकात कृष्णसंप्रदाय हा इसवी सनापूर्वीपासून अस्तित्वात होता, हे सिध्द करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यांचा पोर्तुगेज-मराठे संबंध अर्थात पोर्तुगेजांच्या दप्तरांतील मराठयांचा इतिहास (१९६७) हे पुस्तक महत्वायाचे असून मराठ्यांच्या इतिहासावर त्याने नवीन प्रकाश टाकला आहे

पिसुर्लेकरांना लेखनसंशोधनाबद्दल अनेक मानसन्मान मिळाले. पोर्तुगाल शासनाने त्यांना नाइट ऑफ द मिलिटरी ऑर्डर ऑफ सँटिएगो हा किताब दिला (१९३५). याशिवाय रॉयल एशिअ‍ॅटिक सोसायटी (बंगाल) आणि एशिअ‍ॅटिक सोसायटी (मुंबई) यांनी त्यांना सुवर्णपदके दिली (१९४८ व १९५३). लिस्बन विद्यापीठाने डी. लिट्. ही सन्मान्य पदवी त्यांना देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. कर्करोगाने ते पणजी येथे निधन पावले.

 

संदर्भ : Sen, S. P. Ed. Historians and Historiography in Modern India, Culcutta, 1973.

देशपांडे, सु. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate