অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पुष्यमित्र शुंग

पुष्यमित्र शुंग

पुष्यमित्र शुंग

(इ.स.पू.१८७१५१). शुंग वंशाचा मूळ पुरुष व प्रख्यात सेनापती. मौर्य वंशानंतर ख्रि. पू. स. १८७ मध्ये शुंग वंश उदयास आला. मौर्य वंशातील अखेरचे राजे अत्यंत निर्बल होते. त्यांच्या काळी बॅक्ट्रियाच्या डीमीट्रिअस या ग्रीक राजाने उत्तर भारतावर स्वारी करून साकेत (अयोध्या), मथुरा व पांचाल हे प्रदेश पादाक्रांत केले आणि पाटलिपुत्रापर्यंत धडक मारली. त्याच्या स्वतःच्या राज्यात उपद्रव निर्माण झाल्याने त्याला लवकरच भारतातून पाय काढावा लागला; तथापि या स्वारीमुळे मौर्य साम्राज्य खिळखिळे झाले, यात संशय नाही.

या स्वारीचे उल्लेख पतंजलीच्या महाभाष्यात अरूणद् यवनः साकेतम्| अरूणद् यवनः मध्यमिकाम् | असे आढळतात. या परिस्थितचा फायदा घेऊन शेवटचा मौर्य राजा बृहदरथ याचा शुंगवंशी सेनापती पुष्यमित्र याने सैन्यात फितुरी माजविली आणि मगधाची गादी बळकावली.

शेवटच्या मौर्य राजांच्या कारकीर्दीत मगध राज्याचा संकोच झाला होता; पण पुष्यमित्राने आपली सत्ता दूरवर पसरविली. मध्य भारतात विदिशा येथे त्याचा पुत्र अग्निमित्र प्रांताधिपती म्हणून राज्य करीत होता; पुष्यमित्राच्या सहाव्या वंशजाचा लेख अयोध्येस सापडला आहे. दिव्यादान ग्रंथावरून आणि तारानाथाच्या तद्विषयक उल्लेखावरून त्याचा अंमल पंजाबात जलंदर आणि शाकल (सियालकोट) पर्यंत पसरला होता असे दिसते.

पुष्यमित्राने दोन अश्वमे यज्ञ केल्याचा उल्लेख अयोध्येच्या लेखात आहे. तरीही त्याने आपली सेनापती ही पदवी बदलली नाही. कालिदासाचे मालविकाग्निमित्र नाटक तत्कालीन घटनांवर आधारलेले आहे. त्यातही त्याच्या याच पदवीचा उल्लेख आहे.

पुष्यमित्राने वैदिक धर्माचे आणि संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन केले. त्याने अशोकाचे हिंसाविरोधी निर्बंध बदलून वैदिक यज्ञयागास अनुमती दिल आणि स्वतःही अश्वमेघासारखे यज्ञ केले. पतंजलीच्या महाभाष्यात इदं पुष्यमित्रं याजयामः| असे उदाहरण आले आहे. त्यावरून त्याच्या यज्ञांत पतंजलीने स्वतः ऋत्विजाचे काम केले होते, असे अनुमान करतात.

पुष्यमित्राने बौद्धांचा छळ केला, असा एक प्रवाद आहे. दिव्यादनात म्हटले आहे की, पुष्यमित्राने पाटलिपुत्रातील कुक्कुटारामनामक बौद्ध विहार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता; पण त्यात त्याला यश आले नाही. नंतर त्याने चतुरंग सेनेसहित शाकलपर्यंत चाल केली आणि मार्गातील बौद्ध विहार उद्ध्वस्त करून बौद्ध भिक्षूंची कत्तल केली. शाकल येथे तर त्याने जो कोणी एका बौद्ध भिक्षूंचे शिर आणून देईल, त्याला शंभर दीनारांचे पारितोषिक मिळेल असे जाहीर केले; पण या सर्व दंतकथा दिसतात. त्यांना समकालीन लेखी आधार काहीच नाही.

बौद्धांनी अशोकाच्या पूर्ण चरित्राविषयी अशाच दंतकथा पसरविल्या होत्या. याच्या उलट शुंगांच्या राज्यात बौद्ध धर्म भरभराटीत होता, हे भारहुत आणि सांची येथील तत्कालीन स्तूपांवरून व तोरणांवरून दिसते. भारहुत येथील तोरणावर तर सुंगानं रजे| (शुंगांच्या राज्यात) असा स्पष्ट उल्लेख आहे. पुराणांतील उल्लेखावरून पुष्यमित्राने सु. ३६ वर्षे राज्य केले असे दिसते.


संदर्भ : Majumdar, R.C. Ed. The Age of Imperial Unity, Bombay. 1960.

मिराशी, वा. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate