অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पोर्तुगीज सत्ता, भारतातील

पोर्तुगीज सत्ता, भारतातील

पोर्तुगीज सत्ता भारतातील

सोळाव्या शतकात व्यापारासाठी अनेक यूरोपीय हिंदुस्थानात आले. त्यांपैकी पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील गोवा, दमण, दीव या प्रदेशांवर १९६१ अखेर अधिसत्ता गाजवली. नौदलात पुढारलेले पोर्तुगीज पंधराव्या शतकात दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून व्यापारासाठी भारतात आले. दुसऱ्या दों जुआंव राजाचा साहसी प्रतिनिधी पेद्रू द कूव्हील्यांउं हा भारतात येणारा पहिला पोर्तुगीज. १४८८ मध्ये तो अरब व्यापारीवेषात कननोर येथे पोहोचला. १४९१ मध्ये त्याने गोवा, कालिकत व मलबार किनाऱ्यावर मिळालेली माहिती गुप्तपणे पोर्तुगाल राजाच्या कैरो येथील प्रतिनिधीला पाठविली. यानंतर वास्को द गामा दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून १४९८ मध्ये कालिकत जवळच्या एका खेड्यात उतरला. त्याने सामुरी राजापासून कालिकत येथे वखार घालण्याची परवानगी मागितली. यानंतर दोन वर्षांनी पेद्रो आल्व्हरीश काब्राल भारतात आला (१५००). त्याने कालिकत येथे वखार घातली व व्यापार सुरू केला. काब्राल याने कोचील (कोचे) बंदराचा शोध लावून महत्त्वाची कामगिरी केली. भारतातील राजकीय परिस्थितीच्या माहितीवरून त्याच्या हे लक्षात आले की,कालिकत व कोचीन येथील राजांच्या शत्रुत्वाचा फायदा घेऊन कोचीनच्या राजाशी मैत्री संपादन करता येईल. १५०२ मध्ये पोर्तुगालच्या राजाने वास्को द गामा व इश्तेव्हव द गामा यांना भारतात धाडले. कालिकत येथे आल्यानंतर त्यांनी अरब व इराणी व्यापाऱ्यांना हाकलून पोर्तुगीजांना व्यापारी मक्तेदारी देण्यास सामुरी राजास सांगितले. कोचीन येथे वास्को द गामाने वखार घातली. तो परत गेल्यानंतर ⇨ अफांसो द अल्बुकर्क व फ्रॅन्सिस्कू द अल्बुकर्क हे भारतात आले. पोर्तुगीजांचे भांडण चालू होते. कोचीन येथे आलेल्या सामुरीच्या सैन्याला अल्बुकर्कने हाकलून देऊन, तेथे किल्ला बांधण्यास सुरुवात केली. १५०५ मध्ये पोर्तुगीजांच्या लक्षात आले की, मलबार किनाऱ्यावरील व्यापार ताब्यात ठेवण्यास पोर्तुगालहून ठराविक कालावधीत धाडलेल्या व्यापारी गलबतांचा फारसा उपयोग होणार नाही. म्हणून फ्रॅन्सिस्कू द आल्मेईदा हा सैन्य व आरमार घेऊन भारतात पहिला व्हाइसरॉय म्हणून आला. याला किलवा, अंजदीव, कननोर व कोचीन येथे गड बांधण्यास सांगितले होते. थोड्याच दिवसांत पोर्तुगीजांनी पश्चिम किनाऱ्यावर आपली सत्ता अशी प्रस्थापित केली की, त्यांनी ठिकठिकाणी बांधलेल्या गडांवरून पोर्तुगीज आरमारी परवाना घेतल्याविना भारतीयांना आपली गलबते बाहेर काढता येत नसत. हळूहळू पोर्तुगीजांनी आपली सैन्यशक्ती वाढवून अंजदीव, कननोर, कोचीन येथे तटबंदी करून तेथील अरबी व भारतीय गलबते नष्ट केली.

विजापूरच्या आदिलशाहाने १५१० च्या सुमारास गोव्यावर स्वारी करून गोवा घेतला. विजयानगर सम्राटाचा आरमारी प्रमुख तिम्मय्या (तिमोजा) याला गोवा आदिलशाहाच्या तावडीतून सोडवावयचा होता. म्हणून त्याने पोर्तुगीजांची मदत घेतली. या निमित्ताने अफांसो अल्बुकर्क याने १५१० मध्ये गोवा जिंकले. येथपासूनच अल्बुकर्कने भारतात पोर्तुगीज सत्ता वाढविण्यास सुरुवात केली.

अल्बुकर्क हा भारतातील पोर्तुगीज सत्तेचा पहिला गव्हर्नर जनरल. पोर्तुगीजांनी गोवे येथे सुरू केलेल्या गुलामांच्या व्यापारामुळे ते गुलामांच्या व्यापाराचे केंद्र बनले. अल्बुकर्कच्या अमानुष कृत्यांमुळे कालिकत, कोचीन व कननोर येथील राजांनी त्याने गोवा सोडावा, म्हणून पोर्तुगालच्या राजाला पत्र पाठविले होते; पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. गोव्यावर ताबा मिळाल्यावर कुडाळपासून चित्ताकूलपर्यंतचा प्रदेश पोर्तुगीजांच्या अंमलाखाली गेला. १५२० मध्ये पोर्तुगीजांनी सासष्टी, बारदेश व गोवा भागातील इतर प्रदेश जिंकले. १५२१ पासून गोवा ही पोर्तुगीजांची पूर्वेकडील प्रमुख वसाहत झाली. १५३१ मध्ये नू द कून्या याने गुजरातच्या सुलतानाबरोबर लढाई करून व दीव घेऊन १५३४ मध्ये वसई प्रांत जिंकला. पुढे पोर्तुगीजांनी दमण व आसपासचे किल्ले घेतले. १५८० च्या सुमारास पोर्तुगीजांच्या सत्तेखाली दीव, दमण, मुंबईसह वसई प्रांत, चौल, गोवे बेट, सासष्टी, बारदेश,होनावर, बार्सेलोर, मंगळूर, कननोर, कोचीन, नेगापटम् असे प्रदेश होते.

आपली सत्ता प्रस्थापित करीत असताना पोर्तुगीजांचा मोगल, इंग्रज, डच व मराठे यांच्याशी संबंध येऊन त्यांच्याशी संघर्ष झाले. हुमायूनच्या वेळेपासून ते औरंगजेबाच्या कारकीर्दीपर्यंत पोर्तुगीज व मोगल यांत शत्रुत्व होते. मोगलांचे आक्रमण जेव्हा दक्षिणेत झाले, तेव्हा पोर्तुगीज दाक्षिणात्यांच्या बाजूने लढले. पोर्तुगीज भारतातील साधनसंपत्तीचा फायदा घेत आहेत, हे लक्षात येताच अकबराने पोर्तुगीजांना हाकलून द्यावयाचे ठरविले. त्याला पोर्तुगीजांना राजकारणात ढवळाढवळ करू द्यावयाची नव्हती. १५७९ मध्ये पोर्तुगीजांनी आपली सत्ता बंगालमधील सातगाव भागात प्रस्थापित केली. तेथे मोठमोठे गड बांधले. गुलामांचा व्यापार सुरू केला. गुलाम मिळविण्यासाठी हिंदू व मुसलमानांना पकडून त्यांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा देण्यात येत असे. म्हणून शाहजहानने कासिमखानास पाठवून हुगळी पोर्तुगीजांपासून घेतली. औरंगजेबाच्या वेळी मात्र पोर्तुगीज व मोगल यांचे संबंध बदलले. मराठ्यांच्या वाढत्या सत्तेस आळा घालण्यासाठी मोगलांना सर्व तऱ्हेची मदत पोर्तुगीजांनी दिली. १७२० मध्ये शाह आलम या मोगल बादशाहाने फोंड्याचा किल्ला व त्याच्या परिसरातील गावे पोर्तुगीजांना बहाल केली; पण या वेळी त्यांना राज्यविस्ताराची इच्छा नसल्याने त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

डच भारतात येताच त्यांचा व पोर्तुगीजांचा संघर्ष होऊन हळूहळू पोर्तुगीजांची सत्ता कमी होत गेली. १६५८ मध्ये डचांनी नेगापटम् घेतले. १६६३ मध्ये मलबार किनाऱ्यावरील पोर्तुगीजांची सर्व ठाणी डचांनी जिंकली. डचांनी शिवाजीस बारदेशवर हल्ला करण्यास प्रवृत्त केले. मराठ्यांविरुद्ध पोर्तुगीज व्हाइसरॉयने डचांचे साह्य मागितले असता त्यांनी नकार दिला.

इंग्रज भारतात आले तेव्हापासून त्यांचा व पोर्तुगीजांचा संघर्ष चालू होता. पुष्कळदा पोर्तुगीज व इंग्रज एक होऊन एतद्देशियांच्या विरुद्ध लढले. १६६५ मध्ये पोर्तुगालच्या राजाने मुंबई बेट इंग्लंडच्या राजाला आंदण दिले. त्याने ते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला दिले. डच व इंग्रज यांची स्पर्धा, हिंदुस्थानी सत्ताधिशांचा विरोध, दक्षिण अमेरिका व हिंदुस्थान या दोन्ही ठिकाणी वसाहती वाढण्याचा न पेलणारा हव्यास यांमुळे हिंदुस्थानातील पोर्तुगीज सत्तेचा हळूहळू ऱ्हास झाला.

पोर्तुगीजांची सत्ता पश्चिम किनाऱ्यावर असल्यामुळे मराठ्यांचा व पोर्तुगीजांचा संबंध शहाजीच्या वेळेपासून आला. सुरुवातीला मराठ्यांची सत्ता मर्यादित असताना शिवाजी व मोगल यांच्या संघर्षात पोर्तुगीज गुप्तपणे शिवाजीला मदत करीत; परंतु १६६६ मध्ये शिवाजीने फोंडे किल्ल्याला वेढा घातला, तेव्हा पोर्तुगीजांनी विजापूरकरांना साह्य दिले; कारण फोंडा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात असणे पोर्तुगीजांना धोक्याचे वाटत होते. शिवाजीने १६७५ मध्ये फोंडा किल्ला घेतला. संभाजीच्या काळात मराठ्यांचे व पोर्तुगीजांचे संबंध शत्रुत्वाचे होते. मराठ्यांकडे असलेल्या फोंडे किल्ल्याला वेढा घालून मोगलांना मराठ्यांविरुद्ध सर्व तऱ्हेची मदत दिल्यामुळे संभाजीने पोर्तुगीजांविरुद्ध लढाई केली. तीत पोर्तुगीजांची दाणादाण उडाली. या सुमारास कान्होजी आंग्रे यांजकडून पोर्तुगीजांना त्रास होत होता. त्याचा नायनाट करण्यासाठी पोर्तुगीज व इंग्रज एक झाले. १७३९ मध्ये चिमाजी अप्पाने वसई घेतली. या मोहिमेनंतर पोर्तुगीजांकडे दीव-दमण व रेवदंडा हे किल्ले राहिले. मराठ्यांनी अनेक प्रसंगी त्यांची मदत मागितली होती. पेडणे, साखळी इ. ठिकाणच्या देसायांचे पोर्तुगीजांशी मित्रत्वाचे संबंध होते. वसई प्रांत त्यांच्या हातून गेल्यानंतर त्यांची आर्थिक स्थितीही बिघडली.

पोर्तुगीजांचा राज्यविस्तार हिंदुस्थानात फारसा झाला नाही. १५४१ मध्ये पोर्तुगालचा तिसरा दों जुआंव याच्या धर्मवेडाचे खूळ गोव्यात सुरू झाले. १५४२ मध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेव्हिअर गोव्यात आले. त्यांच्या अनुयायांनी गोव्यात अनेक चर्चे बांधली. ख्रिस्तीतरांवर साहजिकच धार्मिक जुलमांचे प्रकार सुरू झाले. ख्रिस्ती धर्मप्रसारार्थ केलेल्या नानाविध कायद्यांवरून पोर्तुगीजांनी केलेल्या धर्मछळाची कल्पना येऊ शकते. पोर्तुगालमध्ये ज्यू आणि मुसलमानांसाठी केलेले कायदे पुढे ख्रिस्तीतरांवर लादण्यात आले. १५६० मध्ये धर्म न्यायालय स्थापण्यात आले होते. पोप तेराव्या ग्रेगरीने धर्म न्यायालयाचा कायदा हिंदूंना लागू केला. धर्म न्यायालयाने दिलेल्या शिक्षा फारच कडक असत. हिंदूंवर धर्म न्यायालयाची सत्ता असू नये व शेंडीकर घेऊ नये, म्हणून मराठ्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले होते. गोव्यातील अनेक देवळे पाडून तेथे चर्चे बांधण्यात आली.

मराठ्यांच्या सत्तेचा कोकणात जोर कमी झाल्यावर सावंतवाडीकर भोसले यांनी १७८८ पर्यंत पोर्तुगीजांवर छोटे छोटे हल्ले केले होते. तरीही १७८८ मध्ये पेडणे, डिचोली, सत्तरी, फोंडा, केंपे, साखळी, काणकोण हे महाल पोर्तुगीज सत्तेखाली होते. १७५५ ते १९१२ पर्यंत सत्तरी महालातील राणे मंडळींनी पोर्तुगीजांविरुद्ध वीस वेळा उठाव करून प्रतिकार केला.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate