অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फिरिश्ता

फिरिश्ता

फिरिश्ता

(१५५० ? - १६२३ ?). भारतातील मध्ययुगीन मुसलमानी रियासतीचा फार्सी इतिहासकार. पूर्ण नाव मुहम्मद कासिम हिंदू शाह; तथापि फिरिश्ता या नावानेच तो अधिक परिचित आहे. त्याचा जन्म आस्ताराबाद (इराण) येथे झाला. त्याच्या जन्ममृत्यूच्या वर्षांबद्दल तज्ञांत मतैक्य नाही. लहानपणीच तो आपला पिता गुलाम अली याच्याबरोबर हिंदुस्थानात आला. गुलाम अलीला अहमदनगरच्या पहिल्या मुर्तजा निजामशाहने (कार. १५६५ -८८) मिरान हुसैन या आपल्या मुलास फार्सी शिकविण्यासाठी शिक्षक म्हणून नेमले; पण तो काही दिवसांतच मरण पावला. साहजिकच फिरिश्ता निराधार झाला; पण मुर्तजा निजामशाहने त्याचा सांभाळ केला. आपल्या विश्वासातील सेवक म्हणून पुढे निजामशाहने त्याच्याकडे संरक्षणपथकाचे नेतृत्व सुपूर्त केले (१५८७).

पुढे मिरान हुसैनने मुर्तजास पदच्युत करून गादी बळकावली (१५८८); पण वर्षभरातच पुन्हा बंडाळी होऊन मिरान हुसैनलाच पदच्युत करण्यात आले (१५८९) आणि पुढे लवकरच त्याचा खून झाला. फिरिश्ता या बंडाळीत तटस्थ राहिला व अस्थिर परिस्थिती पाहून त्याने विजापूरला प्रयाण केले (१५८९). येथे सुलतानाच्या दिलावरखान या खास मंत्र्याने त्यांचे स्वागत केले आणि दुसर्‍या इब्राहिम आदिलशाहाशी (कार. १५८०-१६२७) त्याची ओळख करून दिली; पण आदिलशाहने त्याची फारशी दखल घेतली नाही. तेव्हा दिलावरखानाने त्यास सैन्यात नोकरी दिली. यानंतर आदिलशाहीतील शिराझच्या इनायतखानाने त्याची आदिलशाहाकडे पुन्हा शिफारस केली (१५९३).

राजाने त्यास मीर खूंदने (मीरखव्वांद) लिहिलेल्या रौजतुस्सफा या ग्रंथाची एक प्रत दिली आणि भारतातील मुसलमानांचा अधिकृत इतिहास लिहिण्यास सांगितले. या पूर्वी या दिशेने त्रोटक असा प्रयत्‍न निजामुद्दीन बक्‌शीने केला होता. इब्राहिम आदिलशाहच्या आज्ञेवरून त्याने विविध कामानिमित्त सिंध, उत्तर प्रदेश, गुजरात, माळवा, बिहार वगैरे प्रदेशांत प्रवास केला. या प्रवासात त्या त्या प्रदेशातील इतिहासलेखनास उपयुक्त अशा अनेक महत्त्वाच्या घटनांची त्याने नोंदही करून ठेवली.

तारीख-इ-फिरिश्ता हा एक महत्त्वाचा ग्रंथ त्याने फार्सी भाषेत लिहिला (१६०६). गुलशन-इ-इब्राहिमी व तारीख-इ-नवरस-नामा या नावांनीही तो ओळखला जातो. या ग्रंथाची मांडणी प्रस्तावना व उपसंहार वगळता एकूण बारा प्रकरणांत त्याने केली आहे. पहिल्या दोन प्रकरणांत गझनी, लाहोर, दिल्ली येथील मोगलांसह मुस्लिम राजवटींची माहिती आहे. प्रकरण तीनमध्ये दक्षिण हिंदुस्थानातील गुलबर्गा, विजापूर, अहमदनगर, बीदर, एलिचपूर, गोवळकोंडे या राजधान्या असलेल्या मुस्लिम रियासतींचा विस्तृत इतिहास आहे. चार ते दहा प्रकरणांत गुजरात, माळवा, खानदेश, बंगाल, बिहार, मुलतान, सिंध व काश्मीर येथील मुस्लिम राजवंशांचा वृत्तांत दिला आहे.

अकरावे प्रकरण मलबारसंबंधी असून बाराव्या प्रकरणात हिंदुस्थानातील तत्कालीन संतमहंतांची माहिती आहे. उपसंहारात भारताची भौगोलिक विशेषतः हवामानविषयक माहिती आढळते. या ग्रंथासाठी त्याने सु. ३५ जुन्या संदर्भग्रंथांचा उपयोग केल्याचे प्रस्तावनेत म्हटले आहे; पण प्रत्यक्षात याहून अधिक ग्रंथ वापरले असावेत. अहमदनगरला असतानाच फिरिश्त्याने मानवी वैद्यकाचाही अभ्यास केलेला दिसतो. त्याच्या इख्तियारात-इ-कासिमी अथवा दस्तूरुलअतिब्बा नावाच्या या ग्रंथात वाग्‌भट, चरक व सुश्रुत यांचा संदर्भग्रंथ म्हणून आधार घेतल्याचा उल्लेख आहे. त्याच्या सुरूवातीच्या प्रकरणांचे इंग्रजीत भाषांतर कर्नल डोव्ह यानें १७६८ मध्ये केले. दक्षिणेकडील इतिहासविषयक प्रकरणांचे भाषांतर कॅप्टन जॉनथन स्कॉटने  १७९४ मध्ये केले; तर पूर्ण ग्रथांचे इंग्रजी भाषांतर जनरल जे. ब्रिग्ज याने १८२९ मध्ये केले. तो विजापूर येथे मरण पावला.

 

संदर्भ : 1. Elliot, H. M.; Dowson, John, The History of India as Told by Its Own Historians, Vol. VI, Delhi, 1964.

2. Verma, D. C. History of Bijapur, New Delhi, 1974.

देशपांडे, सु. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate