অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बरनी, जियाउद्दीन

बरनी, जियाउद्दीन

बरनी, जियाउद्दीन

१२८४ ?१३५७?). भारतातील एक मुस्लिम इतिहासकार. त्याच्या जन्ममृत्यूच्या नेमक्या तारखा उपलब्ध नाहीत. दिल्लीचा सुलतान धियासुद्दीन बल्बन याच्या कारकीर्दीत (इ. स. १२६६-८७) आणि नंतरच्या खल्‌जी काळात (१२९०-१३२०) त्याच्या घराण्यातील लोकांना दरबारी अधिकारपदे लाभली होती. मुअयिद-अल्-मुल्क हे त्याचे वडील. त्याचे मामा मलिक-अला-अल्-मुल्क हे दिल्लीचे कोतवाल होते. तो शेख निजामुद्दीन अवलियाचा भक्त होता. तसेच अमीर खुसरौ (१२५३-१३२५) व अमीर हसन या तत्कालीन प्रसिद्ध कवींशी त्याचे निकटचे संबंध होते. बरनी हा स्वतः मुहम्मद बिन तुघलकाकडे १७ वर्षे (१३२५-५१) नदीम (साथीदार) होता; तथापि फिरोजशाह तुघलकाच्या वेळी (१३५१-८८) बादशाहची त्याच्यावर इतराजी झाली व त्याला हद्दपार व्हावे लागले. त्याचे उत्तरायुष्य हालअपेष्टातच गेले. फार्सीमध्ये लिहिलेले त्याचे पुढील इतिहासग्रंथ प्रसिद्ध आहेत : तारिख-इ-फिरोझशाही, फतवा-इ-जहानदारी व नत्-इ-मुहम्मदी यांपैकीतारिख-इ-फिरोझशाही या बृहद्ग्रंथात मुस्लिम राज्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेली राजनीती आणि इस्लामविषयक कर्तव्ये यांचा ऊहापोह आहे. सुलतान बल्बनपासून फिरोझशाह तुघलकाच्या ६ वर्षांच्या कारकीर्दीपर्यंतचा काळ या इतिहासग्रंथात त्याने हाताळला आहे. हा ग्रंथ पूर्ण झाल्यावर त्याचे निधन झाले, असे म्हणतात. फतवा-इ-जहानदारी या ग्रंथात इतिहासाच्या धार्मिक तत्वज्ञानाचे विवरण आहे. त्यातून बरनीवरील सुफी विचारप्रणालीचा प्रभाव जाणवतो. इतिहासकाराने राज्यकर्त्यांची दुष्कृत्ये, अनाचार यांची दखल घ्यावी व निःपक्षपाती दृष्टिकोण स्वीकारावा, अशीही भूमिका त्याने घेतल्याचे दिसते. अखबार-इ-बर्मकिय्यान या त्याच्या ग्रंथात तत्कालीन दंतकथा व आख्यायिका यांचे दर्शन घडते.

 

संदर्भ रिजवी, सैयिद अतहर अब्बास, आदि तुर्क कालीन भारत, अलिगढ, १९५६.

कुलकर्णी, गो.त्र्यं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate