অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बिपिनचंद्र पाल

बिपिनचंद्र पाल

(७नोव्हेंबर १८५८- २० मे १९३२). भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर बंगाली नेते. त्यांचा जन्म उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात पॉइल (सिल्हेट जिल्हा) या गावी झाला. सध्या हा प्रदेश बांगला देशात अंतर्भूत होतो. त्यांचे वडील रामचंद्र पाल हे जमीनदार व वकील होते. हळूहळू ते मुन्सफच्या जागेपर्यंत चढले. ते वैष्णवपंथी होते. बिपिनचंद्रांची आई नारायणदेवी विशेष शिकलेल्या नव्हत्या; पण शिस्त व धार्मिक बाबी त्या कटाक्षाने पाळीत.

बिपिनचंद्रांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. त्यानंतर त्यांनी दोन मिशनरी व एका सरकारी माध्यमिक विद्यालयांतून इंग्रजी शिक्षण घेतले आणि कलकत्ता विद्यापीठाची प्रवेश परीक्षा दिली (१८७४). पुढे ते प्रेसिडेन्सी महाविद्यालयात दाखल झाले; पण दोन वेळा नापास झाल्यावर त्यांनी या औपचारिक शिक्षणास कायमचा रामराम ठोकला (१८७८). या सुमारास ते ब्राह्मोसमाजाकडे आकृष्ट झाले. त्याची अधिकृत दीक्षा त्यांनी नंतर घेतली. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या वडिलांस फार दुःख झाले. बिपिनचंद्रांनीही अखेरीस आपला दुराग्रह सौम्य केला.

बिपिन चंद्रांचे एकूण आयुष्य कष्टमय होते. विद्यार्थिदशेतच त्यांनी विपुल वाचन केले. ब्राह्मोसमाजाचे केशवचंद्र सेन यांच्या विचारांची छाप त्यांच्यावर पडली. याशिवाय पी.के. रॉय.

आनंदमोहन बोस, द्वारकानाथ गांगुली वगैरे विद्वानांचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्यांनी नृत्यकालीदेवी या ब्राह्मण विधवेशी पहिला विवाह केला (१८८१) आणि तिच्या मृत्यूनंतर पुढे दहा वर्षांनी ब्रिजमोहनदेवी या दुसऱ्या विधवेशी लग्न केले (१८९१).

सुरुवातीस त्यांनी शिक्षकी पेशा पतकरला. मुख्याध्यापक म्हणून त्यांनी कटक (१८७९), सिल्हेट (१८८०), बंगलोर (१८८१), हबिबगंज (१८८६) इ. ठिकाणी काम केले. वृत्तपत्रव्यवसायाकडेही त्यांची ओढ होती. १८८० साली त्यांनी परिदर्शक हे बंगाली साप्ताहिक सुरू कले. पुढे बेंगॉल पब्लिक ओपिनियन चे ते साहाय्यक संपादकही झाले (१८८२). लाहोरच्या ट्रिब्यून मध्ये साहाय्यक संपादक म्हणून ते १८८७ मध्ये रुजू झाले. कलकत्त्याच्या ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून काही काळ त्यांनी काम केले. ग्रंथालयाचे ते चिटणीसही होते (१८९०-९१). हे सर्व करीत असताना ते काँग्रेसच्या अधिवेशनांना हजर राहत. त्यांनी आसाममधील चहाच्या मळ्यातील मजुरांचा प्रश्न घसास लावला (१८९६) आणि मुख्य आयुक्त हेन्रीग कॉटन याला त्यात लक्ष घालणे भाग पडले.

बिपिनचंद्र धर्मशास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती घेऊन इंग्लंडला गेले (१८९८); पण ही शिष्यवृत्ती त्यांनी एक वर्षातच सोडली व इंग्लंडमध्ये ते राजकीय कार्य करू लागले. तेथून ते प्रचारमोहिमेतून अमेरिकेला गेले. १९०१ साली ते भारतात परतले. भारतात आल्यानंतर न्यू इंडिया हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले (१९०२). बंगालच्या फाळणीनंतर लोकमान्य टिळक व लाला लाजपतराय यांच्याबरोबर स्वदेशीच्या चतुःसुत्रीचा त्यांनी हिरिरीने पुरस्कार केला.

सारा बंगाल त्यांनी आपल्या व्याख्यानांनी जागृत केला. बहिष्कार व निःशस्त्र प्रतिकार यांचे ते पुरस्कर्ते होते. त्यांनी मद्रासलाही यांवर भाषणे दिली. त्यांनी वंदेमातरम् हे दैनिक सुरू केले (१९०६). त्यांनी अरविंद घोष यांना संपादक केले. यानंतर ते इंग्लंडला जाऊन राहिले (१९०८-११). या काळात एक नवीन विचार त्यांनी प्रसृत केला आणि भारत स्वयंशासित वसाहत म्हणून ब्रिटिशांना सहकार्य देईल, हे तत्त्व मांडले. या तत्त्वास एम्पायर – आयडिया हे नाव त्यांनी दिले. भारतात परत आल्यानंतर त्यांच्या एका लेखाबद्दल त्यांना एक महिन्याची शिक्षा झाली.

बिपिनचंद्र हे एक तत्त्वचिंतक होते. त्यांना देशाची सर्वांगीण तयारी झाल्याशिवाय स्वातंत्र्य नको होते. त्यांची राष्ट्रीयत्वाची कल्पना धर्मभावनांशी निगडित होती. ते होमरूल लीगचे सभासद होते, तसेच काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. काँग्रेसचे जे शिष्टमंडळ संयुक्त संसद समितीपुढे साक्षीकरिता १९१९ मध्ये गेले, त्यांत ते होते. त्यांनी गांधीजींच्या असहाकार चळवळीला विरोध केला. तसेच चित्तरंजन दास आणि स्वराज्य पक्ष यांवर टीकेची झोड उठविली.

मौलाना मुहंमद अली यांच्याशी जातीय प्रश्नासंबंधी त्यांचे मतभेद झाले आणि वाद निर्माण झाला (१९२०-२५). या विविध व्यक्तींशी त्यांच्या व्यक्तिनिष्ठ धोरणामुळे मतभेद झाल्यामुळे ते अखेर एकाकी पडले आणि टिळकांनंतरच्या गांधीयुगात त्यांचे नेतृत्व निष्प्रभ ठरले. ते १९२८ च्या सर्वपक्षीय परिषदेस उपस्थित होते; पण त्यांनी कोणतीच विशेष अशी कामगिरी पतकरली नाही व एकाकी, निःस्पृह कार्यकर्त्याची भूमिका स्वीकारली.

बिपिन चंद्रांनी अनेक वृत्तपत्रे काढली. वंदेमातरम सारखी जहाल वृत्तपत्रे अतिशय लोकप्रिय झाली. या आणि इतर वृत्तपत्रांतून त्यांनी आपले विविध विषयांवरील विचार मांडले. यांशिवाय त्यांनी तत्कालीन थोर व्यक्तींची चरित्रे लिहिली. त्यात व्हिक्टोरिया राणी (१८८७-बंगली), केशवचंद्र सेन (१८९३-इंग्रजी), रवींद्रनाथ टागोर, राजा राममोहन रॉय, अरविंद घोष, आशुतोष मुखर्जी वगैरेंची चरित्रे अंतर्भूत होतात. त्यांनी मेमरीज ऑफ माय लाइफ अँड टाइम्स (१९३२) या शीर्षकाने आत्मचरित्र लिहिले. याशिवाय इंडियन नॅशनॅलिझम (१९१८), द न्यू इकॉनॉमिक मेनेस टू इंडिया (१९२०) व ब्राह्मोसमाज अँड द बॅटल ऑफ स्वराज्य इन इंडिया (१९२६) ही त्यांची पुस्तके विशेष उल्लेखनीय आहेत. पहाडी आवाजाचे एक प्रभावी वक्ते म्हणून त्यांची ख्याती होती. लाल (लाला लजपतराय), बाल (बाळ गंगाधर टिळक) व पाल या त्रयीने वंगभंग, स्वदेशी व बहिष्काराचे प्रचंड आंदोलन करून जनजागृती केली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील ते एक चिरप्रेरक पर्व आहे.

 

लेखक : त्र्यं.र. देवगिरीकर

स्त्रोत : मराठी विश्वकोश


अंतिम सुधारित : 7/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate