অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बी कॉज ही इज अ लास्ट ॲथॉरिटी....

बी कॉज ही इज अ लास्ट ॲथॉरिटी....

इतिहास म्हणजे बदल, या चिंतनशील वाक्यात इतिहासाची समर्पक व्याख्या सांगणारे आणि समाज परिवर्तनाचा नवा उज्ज्वल इतिहास निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाचा प्रत्येक पैलु हा एका नव्या अध्यायाची निर्मिती करणारा आहे.

अमेरिकेतील टेनीस व्हॅली प्रकल्पाच्या धर्तीवर भारतातील हिराकुड नदीवर बांधण्यात आलेल्या दामोदर व्हॅली प्रकल्पाची मूहुर्तमेढ डॉ.बाबासाहेबांनी घातलेली असून या समितीच्या एका बैठकीसाठी बाबासाहेब त्या ठिकाणी गेले असता मुख्य बैठकीच्या पूर्वसंध्येला त्या प्रकल्पात काम करणारे अभियंते बाबासाहेबांच्या अनौपचारिक सदिच्छा भेटीस गेले. त्या भेटी दरम्यान बाबासाहेबांनी बोलण्यास सुरूवात केल्यानंतर अवघ्या चार-पाच मिनिटांत त्या सगळ्यांना बाबासाहेबांचा अभियांत्रिकी विषयातला असलेला प्रचंड आवाका लक्षात आला आणि त्या अभियंत्याचे स्तंभित चेहरे बघुन बाबासाहेबांनी आपले बोलणे थांबवून त्यांना आता तुम्ही काही बोला, असे सांगितले.

त्यावेळी तत्परतेने आणि अतिशय विन्रमतापूर्वक ते सगळे बाबासाहेबांना म्हणाले की, आम्हाला जर तुम्ही आत्ता जे बोललात त्यासंदर्भात काही बोलायचे असेल तर कमीत कमी आठ दिवस तरी तयारी करावी लागेल, यावर बाबासाहेबांनी त्यांना सांगितले की, आपली कार्यालयीन खरी बैठक तर उद्या आहे, आता मी आपल्या सोबत प्राथमिक मुद्यांच्या अनुषंगाने बोलतो आहे, त्यासाठी तुम्हाला तयारी करण्याची गरज का पडावी, यावर अभियंते म्हणाले की, निदान चार दिवसांचा तरी अवधी आम्हाला तयारीसाठी मिळाला तर त्या नंतरच आम्ही आपल्यासमोर या विषयाबाबत काही बोलू शकू, अभियंत्यांचे हे बोलणे ऐकून बाबासाहेब म्हणाले की, चार दिवस काय तुम्ही चार महिने जरी तयारी केली तरी मी आता जे काही वक्तव्य केले, जे सांगितले आहे, त्यावर तुम्ही काही तर्क करु शकणार नाही, कारण आय एम द लास्ट ॲथॅारिटी इन माय सब्जेक्ट.....

आपल्या विद्वत्तापूर्ण विचारांच्या दूरगामी चिंतनातून बाबासाहेबांनी सातत्याने आपल्या राष्ट्राला कोणत्या दिशेने घेऊन जायचे आहे, काय इष्ट, योग्य आहे, याला प्रथम प्राधान्य दिले. त्याचा नेमका आराखडा त्यांच्या कार्यात, विचारात, संपूर्ण जीवनात बघायला मिळतो. डॉ.आंबेडकरांचे स्वातंत्र्याविषयीचे चिंतन अधिक सखोल, मूलगामी आणि सर्वसमावेशक होते. राजकीय स्वातंत्र्याच्या जोडीने येथील अल्पसंख्याकांना सामाजिक,आर्थिक, सांस्कृतिक, वैचारिक स्वांतत्र्यही लाभले पाहिजे, ही त्यांची भूमिका त्यांनी पहिल्या गोलमेज परिषदेत मांडलेली आहे. त्या भाषणात बाबासाहेबांनी सांगितले होते की, आम्हाला असे सरकार पाहिजे आहे जे देशाचे खरे हित निष्ठापूर्वक साधेल आणि न्याय, निकडीचे असे सामाजिक आणि आर्थिक प्रश्न कुणाच्याही रागलोभाची पर्वा न करता सोडवील.

बाबासाहेब हे समाजचिंतक असल्यामुळे समाजातील व्यक्तीमनांच्या अनेक गरजांची त्यांना नेहमीच जाणीव असे. इथला सामान्य माणूस हा अनेक अंधश्रद्धांनी, संकुचित परिघातील अनेक दोषांनी बधीर झालेला आहे, हे त्यांना अवगत होते. म्हणून माणूस विज्ञाननिष्ठ व्हावा, आधुनिक मुल्यांचे त्यास भान यावे, त्याच्या हक्काची अस्मितेची जाणिव त्याला व्हावी, विभूतीपूजेतून, ग्रंथप्रामाण्यातून त्याने मुक्त व्हावे, तो निर्भय बनावा या व्यापक उद्दीष्टांभोवतीच बाबासाहेबांचे सर्व लढे केंद्रीभूत झालेले आहेत.

माणसाचा सर्वांगिण विकास हे अंतिम ध्येय असलेल्या बाबासाहेबांनी म्हटले की, घटनेने व्यक्तीला संरक्षणाबरोबर असा विश्वास द्यायला हवा की त्याला मिळालेले अधिकार कुणीही सक्तीने हिरावून घेऊ शकणार नाही. घटनेचा हा मूलभूत हेतू राबविण्यासाठी त्यांनी ज्या योजना हाती घेतल्या आणि जे कार्यक्रम राबविले ते अतिशय प्रभावी परिवर्तनवादी होते. डॉ.आंबेडकरांना नुसती राजनैतिक स्वतंत्रता नको होती. त्यांना सामाजिक बदलांची ओढ होती.

रक्तपात न घडवता सामाजिक, आर्थिक क्षेत्रात मूलभूत स्वरुपाचे बदल घडवून आणण्याचा मूलमंत्र फक्त सांसदीय लोकशाहीतच अवगत असल्याने तोच मानवी जीवनाच्या प्रवाहाशी सुसंगत ठरतो. या शब्दात त्यांनी या शासनपद्धतीचा गौरव केला. डॉ.बाबासाहेबांच्या मते, लोकशाही केवळ एक घोषणा किंवा शासनप्रकार असून चालत नाही, तर तो समाजाने अंगीकारलेला जीवनमार्ग असावा लागतो.व्यक्तीच्या मूलभूत हक्कांना संरक्षण देणे हे राज्यघटनेचे प्रमुख कार्य मानणाऱ्या बाबासाहेबांनी प्रत्येक व्यक्तीच्या अंगीभूत गुणांचा विकास झाला पाहिजे. त्यात स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, वरिष्ठ-कनिष्ठ असा भेद न मानता सर्वांना प्रगतीच्या समान संधी उपलब्ध होणे आवश्यक मानले. प्रत्येकाला समान स्वातंत्र्य असावे, मुक्त व्यक्तीमत्वाच्या नैतिक तत्वाची प्रतिष्ठापना व्हावी.

त्यातुन न्याय समाजाची उभारणी व्हावी या अपेक्षा फक्त लोकशाहीतच पूर्ण होऊ शकतात, असा विश्वास डॉ.आंबेडकरांनी व्यक्त केला होता. सांसदीय लोकशाही व्यवस्था ही सिमीत शासनाचा आदर्श असल्याने त्यांनी सांसदीय लोकशाहीचे समर्थन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे विद्याप्रेमी विद्वान आणि व्यासंगी पंडीत होते. थोर अर्थतज्ज्ञ, समाजचिंतक, पत्रकार, सुधारक या विविध भूमिका लीलया पार पाडणारे भारताचे पहिले कायदामंत्री असलेल्या डॉ. बाबासाहेबांचा मानवी जीवनाशी निगडित अशा अनेक विषयांचा सखोल अभ्यास होता. आपल्या या ज्ञानाचा पूरेपूर उपयोग मानवजातीच्या कल्याणासाठी, राष्ट्राच्या उभारणीसाठी त्यांनी केला. कुटुंब, कुटुंबाचा विकास, स्त्रियांचे आरोग्य, देशाची आर्थिक उन्नती, दारिद्रय निवारण,अन्नपुरवठा अशा विविध उपाययोजनां ज्या आपण आता राबवित आहोत त्या बाबासाहेबांनी खूप काळ आधीच सुचविलेल्या आहेत आणि व्यापक स्वरूपात त्याची तरतूदही करुन ठेवली.

कामगारांना, मजुरांना न्याय हक्क, सवलती देण्याची धडपड असलेल्या बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून सांसदीय राजकारणात प्रवेश मिळवला. 1937 च्या मुंबई लेजिस्लेटिव्ह असेंब्लीत आपल्या पक्षाचे तेरा उमेदवार त्यांनी विजयी करून पाठवले, आणि सांसदीय लोकशाहीत विरोधी पक्ष कसा जागरुक, तत्पर असावा लागतो याचा आदर्श बाबासाहेबांनी असेंब्लीच्या कारकीर्दित दाखविले. 1942 साली त्यांची व्हॅाईसरायच्या मंत्रिमंडळात मजूर आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यावर त्यांनी खाणकामगार, पोर्ट ट्रस्ट, रेल्वे इतर सार्वजनिक प्रकल्पातील कामगार, गिरणी कामगार, स्त्री मजूर यांच्या हिताकडे जातीने लक्ष देऊन न्याय सेवाशर्ती, गृहयोजना व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या. विमानतळ, राजरस्त्यांची कामे बांधकाम अग्रक्रमाने करून घेतली.

राज्यशास्त्र, नीतीशास्त्र, मानववंशशास्त्र, तत्वज्ञान, मानसशास्त्र, इतिहास, धर्म, घटनाशास्त्र, प्रशासन, कायदा, अर्थशास्त्र या विविध विषयांचा व्यासंग असलेल्या बाबासाहेबांनी त्या प्रत्येक विषयातील प्रस्थापित विचारांच्या पुढे जाणारा त्या ज्ञानशाखांमध्ये मूलभूत भर घालणारा नवा आणि दिशादर्शक वेगळा विचार मांडून त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींना सुखद आश्चर्यचा धक्का दिलेला होता. त्याबरोबरच त्यांची आपल्या क्षेत्रात ही कुणी असे मूलभूत संशोधन करावे, नवा विचार मांडावा, आपण मांडलेल्या सिद्धांतावर अभ्यासपूर्ण तर्कवाद करावा, अशी अपेक्षा असे. परंतु बाबासाहेबांच्या चिंतनाची उंची आणि व्यासंगातून आलेली अभ्यासपूर्ण मांडणी यापुढे कुणाला कधी जाता आले नाही.

एका व्यापक वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडलेल्या त्यांच्या विचांराना, भविष्यातील समस्यांचा आणि परिस्थितीचा अचूक वेध घेऊन सुचविलेल्या उपाययोजनांना तर्कवितर्क करण्याची गरज कधी पडली नाही, तर सध्या परिस्थितीत सुव्यवस्थित समाजजीवनासाठी त्यांनी सांगितलेले सिद्धांत आणि तत्व हे सर्वार्थाने सुयोग्य ठरणारे आहेत. त्यांना योग्य पद्धतीने आचरणात आणण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्या विचारांचा आदर्श मानणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाची आहे. त्यांनी मांडलेल्या विचारांच्या पुढे जाणारे आजपर्यंत काही मांडले गेले नाही, तशी शक्यताही नाही बी कॉज ही इज अ लास्ट ॲथॉरिटी.....त्यांना अभिप्रेत असलेल्या मार्गाने स्वउन्नती आणि राष्ट्राची उभारणी करण्याच्या जाणीवेतून सगळ्यांनी कृतीशील राहणे ही बाबासाहेबांना खरी श्रध्दांजली ठरेल, या कटीबद्ध संकल्पासह बाबासाहेबांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन...

लेखक - वंदना रघुनाथराव थोरात (वारेगावकर)
माहिती अधिकारी

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 4/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate