অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भरत

भरत

भरत

ऋग्वेदकाली या देशात भरत नावाचा मानवसमूह होता. ऋग्वेदाच्या तीन, सहा आणि सात या मंडलांमध्ये भरत हा शब्द अनेकदा बहुवचनी आला असून त्याचा अर्थ भरतनामक जनसमूह असा होतो. विश्वामित्र हा मंत्रद्रष्टा भरत गणातलाच होता. ऋग्वेदात एके ठिकाणी म्हटले आहे, की भरत मानवगणाचा एका युद्धात पराजय झाला असताना वसिष्ठ ऋषीच्या साहाय्याने त्या भरतगणांचे रक्षण झाले (ऋग्वेद- ७.८.४.). ऋग्वेदातील प्रसिद्ध राजे दिवोदास आणि सुदास हे या भरतगणातील होते (ऋग्वेद- ६.१६.१९). महाभारत किंवा भारत या ग्रंथामध्ये मुख्यतः कुरुवंशाची आणि त्या कुरुवंशात जन्मलेल्या कौरव-पांडवांची सविस्तर कथा आहे. हा कुरुराजवंशही भरतगणातलाच होता. या वंशातील अनेक पिढया राज्य करुन राज्यविस्तार केला, म्हणून या देशाचे भारत किंवा भारतवर्ष हे नाव पडले असावे.

या नावाच्या अनेक व्यक्तिही प्राचीन काळी झाल्या. त्यांपैकी पारंपारिक इतिहासात प्रसिद्ध असलेल्या भरतनामक व्यक्ती पुढीलप्रमाणे :

(१) भरत : वायुपुराणानुसारे (४५.७६) मनु हा मनुष्यांचा पहिला राजा; तो लोकांचे पालनपोषण करीत होता. त्यामुळे त्याला 'भरत' हे अभिधान प्राप्त झाले. म्हणून या देशाला भारत हे नाव प्राप्त झाले.

(२) भरत : या प्रदेशाला भारतवर्ष हे नाव मिळण्यापूर्वी त्याला अजनाभवर्ष म्हणत होते, असे अनेक पुराणे म्हणतात. नाभिनामक राजाचा पुत्र ऋषभदेव याचा पुत्र भरत नावाचा महायोगी, राजर्षि होऊन गेला. अखेरीस त्याने वानप्रस्थाश्रम स्विकारुन राजत्याग केला. या देशाला या राजामुळे 'भारतवर्ष' म्हणू लागले (भागवतपुराण ५.४.९; वायुपुराण - ३३.५२). पुलह ऋषीच्या आश्रमात गंडकी नदीच्या तीरावर देहान्त होईपर्यंत त्याने तपश्चर्या केली. देहान्ता नंतर हरिणाचा जन्म त्याला प्राप्त झाला या जन्मात त्याला पूर्वीच्या राजजन्माची स्मृती होती. त्याच्या राजजन्मामध्ये त्याचे एका हरिणीच्या नुकत्याच जन्मलेल्या लहान बछडयावर लक्ष गेले. त्या बछड्याची वात्सल्यवृत्तीने निगा राखत असता भरताला मृत्यू आला. म्हणून त्याला मृगजन्म झाला. या मृगदेहाचा त्याने गंडकी नदीमध्ये त्याग केला. त्यानंतर अंगिरस कुलात त्याचा जन्म झाला. जन्मतःच हा सिद्ध व मुक्त होता. जगाला ही सिद्धावस्था वा मुक्तावस्था कळू न देता जड म्हणजे मूढ वृत्तीने मौन धारण करुन याने जीवन व्यतीत केले. म्हणून यास जडभरत अशी संज्ञा प्राप्त झाली. भागवतपुराणात या भरताच्या तीन जन्मांची कथा विस्ताराने आली आहे. विष्णु, वायु, ब्रम्हांड व लिंग या पुराणांमध्ये या ऋषभदेव-पुत्र भरताचा उल्लेख आला आहे.

(३) भरत : भरत दाशरथी, वाल्मिकी रामायणात याची विस्तृत कथा आहे. अयाध्येचा राजा दशरथ याच्या कैकयी या राणीपासून याचा जन्म झाला. राम वनवासात असताना त्याला भेटून, आपणास अयोध्येचे राजपद नको, असे म्हणून रामाला वनवासातून परत फिरविण्याचा प्रयत्न याने केला; परंतु रामाने परतण्यास नकार दिला. रामाने आपली वनवासाची १४ वर्षे पूर्ण केली. रावणवधानंतर राम अयोध्येस परतला, तोपर्यंत रामाचा प्रतिनिधी म्हणूनच याने अयोध्येचे राज्य केले. अयोध्येच्या राज्याचा सिंहासनावर रामानंतर यालाच अभिषेक झाला. सिंधू नदीच्या दोन्ही तीरांवर गंर्धवाचे राज्य होते. त्याच्यावर विजय मिळवून सिंधूतीरावर तक्षशिला व पुष्कलावती या दोन नगरांची स्थापना भरताने केली, असे वाल्मिकी रामायणात म्हटले आहे.

(४) भरत : भरत दौष्यन्ती. हा पुरुवंशीय सम्राट होय. दुष्यंत राजापासून शकुंतलेच्या ठिकाणी याचा कण्वाश्रमात जन्म झाला.याचे दुसरे नाव 'दमन'. लहानपणीच याचे शौर्य व तेज दिसू लागले, म्हणून त्या आश्रमातील ऋषींनी 'सर्वदमन' असे त्याचे नाव ठेवले. शतपथ ब्राह्मणामध्ये याला सौद्युम्नी असेही म्हटले आहे. कण्वाश्रमात शकुंतला व दुष्यंत यांचा गांधर्वविवाह झाला. त्यानंतर लगेच दुष्यंत शकुंतलेला सोडून आपल्या राजधानीस परतला. महाभारतात म्हटले आहे, की त्यानंतर शकुंतला दुष्यंताकडे या बालकाला घेऊन गेली; पण दुष्यंताने तिला ओळखले नाही. तेव्हा आकाशवाणी झाली, 'शकुंतला ही तुझी पत्नी आहे. भरत हा तुझा पुत्र आहे. त्यांचा स्वीकार कर.' आकाशवाणीच्या आज्ञेच्या अनुसराने दुष्यंताने त्या दोघांचा स्वीकार केला व भरताला युवाराज्याभिषेक केला. या वेळी दुष्यंताची राजधानी प्रतिष्ठा म्हणजे प्रयाग ही होती. त्याने शेकडो अश्वमेध यज्ञ केले. ऐतरेय व शतपथ ब्राह्मणांत आणि महाभारतात याच्या अश्वमेध यज्ञांचा नेर्देश आहे. अनेक देश जिंकल्यावर त्याने आपली नवी राजधानी हल्ली दिल्ली आहे त्या ठिकाणी बसविली, त्याच्यापासून नंतरच्या पाचव्या पिढीत झालेल्या हस्तिन या राजाच्या नावाने या नगराला हस्तिनापूर म्हणू लागले, असे वायु आणि मत्स्य पुराणांमध्ये म्हटले आहे. त्याचा राज्यविस्तार झाला म्हणून या देशाला भारतवर्ष असे नाव पडले, असे महाभारतात (आदिपर्व २.९६) म्हटले आहे. कालिदासाने या कथेत फेरफार करुन अभिज्ञानशाकुंतल हे नाटक लिहिले आहे.

(५) भरत : नाट्यशास्त्राचा प्रणेता आचार्य. ⇨ नाट्यशास्त्रामध्ये 'नंदिभरत' असाही याचा उल्लेख आहे. विष्णुपुराणात (३.६.२७) गंर्धववेद नामक संगीतशास्त्रीय ग्रंथाचा कर्ता म्हणून याचा उल्लेख आहे. नाट्यशास्त्रास नाट्यवेद अशीही संज्ञा आहे. भरतमुनी स्वर्गात इंद्रसभेत नाट्यप्रयोग करीत असत. या नाट्यप्रयोगात नटमंडळी देवांची आणि ऋषींची नक्कल करीत. त्यामुळे देव आणि ऋषी रागावले व त्यांनी भरतमुनीला शाप दिला, की 'तुम्ही स्वर्गात न राहता पृथ्वीवर जन्माला याल.

भरतरचित नाट्यशास्त्रामध्ये नाट्याचे १० प्रकार सांगितले आहेत आणि आठ रसांचे स्पष्टीकरण केले आहे. नृत्य, वाद्य, गायन, अभिनय, अलंकार इ. विषयांची सविस्तर चर्चा भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये मिळते. भरताचे नाट्यशास्त्र ज्या स्वरुपात उपलब्ध आहे, त्यावरुन त्याच्यात अनेक बदल झाले आहेत आणि भरही पडली आहे, असे दिसते. महाकवी भास आणि कालिदास यांना भरत आणि त्याचे नाट्यशास्त्र माहीत होते, असे म्हणता येते.

यांशिवाय भरत नावाचे अनेक राजे व ऋषीपुत्र निर्देशिलेले आढळतात. 'भरत' हे नाव अग्निदेवालाही दिलेले ऋग्वेदात दिसते. अग्निपूजक वैदिक आर्यांच्या भरतनामक अग्नीची आराधना ज्या देशात सर्वत्र चालते, तो देश "भारत" असेही अनुमान करणे शक्य आहे.


संदर्भः 1. Pargiter, F.E. Ancient Indian Historical Tradition, Delhi, 1962.

2. Majumdar, R.C.Ed. Vedic Age, Bombay, 1957.

जोशी, लक्षमणशास्त्री

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 2/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate