অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारतीय राज्यघटना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनमोल देणगी

भारतीय राज्यघटना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनमोल देणगी

स्वतंत्र भारताची सार्वभौम जगप्रसिद्ध अशी राज्यघटना लिहून त्या घटनेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार ठरले असून घटनेने आपणास सर्व प्रकारची ताकत दिली आहे. या घटनेच्या आधारे भारत देश कसा चालविला जातो याचे दर्शन घडते आणि म्हणून संपूर्ण देशाला मार्गदर्शन करणारी, नियंत्रित करणारी, संपूर्ण देशाचा विकास घडवून आणणारी, देशातील माणसांना माणुसकीचे, मान सन्मानाचे आणि नैतिकतेचे दर्शन घडविणारी राज्यघटना संपूर्ण जगाला आदर्शवत अशी ठरणारी, देशातील सर्व जाती, धर्म, पंथ, लिंग भेद इत्यादीपासून संरक्षण देणारी राज्यघटना बाबासाहेबांच्या हातून लिहिली गेली आहे.

भारतीय राज्यघटनेमुळे भारतातील सर्व नागरिकांचे जीवन उजळून निघाले आहे, निघत आहे. घटनात्मक सर्व अधिकार संविधानामुळे आज सर्वांना मिळाले आहेत. भारतीय संविधान हे सर्व खाजगी, सार्वजनिक व मित्र क्षेत्राला मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारे आहे. मुलभूत अधिकार, समानता, अनुसूचित जाती-जमाती, जनजाती, धार्मिक, अल्पसंख्याक, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी उपाययोजना करणारे संविधान आहे.

शिक्षण, आरोग्य, संरक्षण, व्यवसाय, कंपनी, विद्यापीठ, न्यायालये, संसद, संघटना इत्यादी ठिकाणी संविधानाची मार्गदर्शक तत्वे व त्यातील तरतुदीनुसार नियोजन, संघटन, नियंत्रण, संदेशवहन, प्रशासन निर्माण करणारे आपले संविधान आहे. संविधानामुळे भारतीय राज्यव्यवस्थेला सुदृढ, सक्षम, समर्थ बनवून प्रचंड ऊर्जा व शक्ती लाभली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड मेहनत घेऊन भारतीय संस्कृती व विचारधारा विचारात घेऊन रात्रंदिवस काम करुन एक उत्तम, आदर्श लवचिक ग्रंथ ते स्वत: आजारी असताना देखील दोन वर्षे 11 महिने व सतरा दिवस सातत्याने, समतोल विचाराची कल्याणकारी संविधान देशाला अर्पण केली आहे.

भारताचा वैधानिक, औद्योगिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक संस्कार, संस्कृती व मुल्यविषयक असा सर्वांगीण विकास गतिमानतेने होणे, भारत सर्वार्थाने स्वावलंबी बनविणे, भारतातील कुपोषण, दारिद्य्र, शोषण व विषमता नाहीशी होणे, रोजगार निर्मिती करणे, जगातील इतर देशांना प्रगतीसाठी प्रचंड मदत करण्याची क्षमता निर्माण करणे आणि भारत देश संपूर्ण जगाचा शांततामय व कल्याणकारी व विकसनशील देश बनविण्याकडे घटनात्मक तरतुदींचा विचार करुन आज संविधानाच्या तत्वावर देशाने उचललेले अत्यंत महत्त्वाचे पाऊल प्रेरक ठरत आहे.

समाजाची पुनर्रचना, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायव्यवस्था या तत्वावर व्हायला हवी. जातीभेदाचे निर्मुलन होऊन सर्वांना समान संधी मिळावी हे बाबासाहेबांचे जीवनकार्य होते. शिक्षणाची कवाडे सर्वांना खुली व्हावेत यासाठी त्याचा आटोकाट पर्यंत होता. तो आज आपणास सफल होताना दिसत आहे. समताधिष्ठीत समाजरचना स्थापन होऊन सर्वांना मानवी हक्क प्राप्त व्हावेत हे महात्मा फुलेंचे गृहीतक होते व त्यांच्या विचारांचा वारसा बाबासाहेबांनी स्वीकारुन तो समृद्धही केला.

शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र देतानाच जाणीवेचा विस्तव विझू देऊ नका या डॉ. बाबासाहेबांच्या शिकवणूकीचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे.

सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचे त्यांचे अलौकिक व्यक्तिमत्व होते. मानव स्वंयपूर्ण व भयमुक्त झाला पाहिजे हा त्यांचा आग्रह होता, त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळेच मानवी जीवनाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे हे विसरता कामा नये आणि म्हणून ज्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. त्यांच्या त्यागाची आपण कधीच बरोबरी करु शकत नाही, त्यांच्या करुणे एवढी करुणा आपल्यात नाही व त्यांच्या पायांच्या धुळीचे सुद्धा आपणास सर येणारी नाही अशा या महामानवास त्यांचे 125 व्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्ताने आदरांजली अर्पण करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न असून त्या निमित्ताने परमपूज्य, बोधिसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांचे 125 व्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवी जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

लेखक - सुभाष बा. कनवाळू
सेवानिवृत्त तहसीलदार

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 3/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate