অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठा राजमंडळ

मराठा राजमंडळ

मराठा राजमंडळ

सामान्यत: छत्रपती शाहूनंतर सर्व किंवा एकेकटा सरदार स्वत:स मराठा राजमंडळ असे संबोधी. अशा सर्व सरदारांचे मिळून राजमंडळ होई. शिवाजी महाराज लोकविलक्षण योद्धे आणि अजब कारभारी होते. यांमुळे त्यांनी दैनंदिन कार्याच्या विभागणीसाठी अष्टप्रधानमंडळ स्थापन केले, तरी त्यायोगे लक्षात येण्यासारखे मराठी सत्तेचे विकेंद्रीकरण झाले नाही. संभाजीपुढे केंद्री-विकेंद्रीकरणाचा प्रश्र उभा राहिला नाही. त्याने महाराजांनी स्थापिलेली अष्टप्रधानपद्धती पुढे चालविली. अगतिकत्व, अकार्यक्षमत्व आणि निर्वासिततिव यांमुळे छत्रपती राजारामाला शिवाजीच्या एका सेनापतीच्या जागी दोन सेनापती आणि एक प्रतिनिधी अशी दोन पदे नव्याने उत्पन्न करावी लागली. त्यांपैकी राजारामानंतर दोन सेनापतींपैंकी एक पद लुप्त झाले आणि केवळ प्रतिनिधी एवढे एकच नवीन पद अष्टप्रधानांबरोबर कार्य करीत राहीले.

छ. शाहू औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यावर मराठी राज्याची सातारा व कोल्हापूर अशा दोन राज्यांत विभागणी झाली (१७०७), तथापि मुख्य मराठी राज्यसाताऱ्याचे म्हणूनच राहिले. त्यामुळे सर्व प्रधानमंडळ व नवीन उत्पन्न झालेले प्रतिनिधी हे पद ही तेथे चालत राहिली, तथापि नंतर पेशव्यांनी शाहूच्या संमतीने काही नवे सरदार उत्पन्न केले. त्यांत शिंदे, होळकर, पवार, गायकवाड, भोसले, रास्ते, पटवर्धन हे प्रमुख होते. भारताच्या विविध भागांत मराठी सत्तेचा विस्तार करण्यासाठी झालेल्या प्रयत्नांत या सर्व सरदारांना काही विशिष्ट अधिकार देऊन व त्यांच्या मदतीला छ. शाहूच्या संमतीने पेशव्यांनी नेमलेले काही मुल्टकी लोक नेमून गेऊन निरनिराळ्या प्रदेशांत कायम वस्ती करावी लागली. यामुळे एक प्रकारेबहुमुखी मराठी सत्ता उत्पन्न झाली. हीत जे जे सरदार उत्पन्न झाले, ते सर्व या राजमंडळाचे आपोआपच सभासद बवले.

शाहू जिंवत असेतोपर्यंत या सर्व सरदारांवर शाहूचा अधिकार चालत होता. पण शाहूला मुलगा नसल्यामुळे आपल्यानंतर वाढत्या राज्याची व्यवस्था कशी व कोणी करावयाची, हा प्रश्र शाहुपुढे उभा राहिला. त्याने याबाबत निरनिराळ्या सरदारांची चाचणी घेतली, पण तीत त्यास असे दिसून आले की, ह्या सर्व सरदारांपैकी कोणीही मराठी राज्याची धुरा उचलण्यास समर्थ नव्हता. तेव्हा गहे सर्व राज्य आपल्यानंतर पेशव्यांकडे जावे व त्यांनी या सर्व सरदारांवर हुकूमत चालवावी. तेव्हा त्याने आपल्या मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर तत्कालीनमुख्यप्रधान बाळाजी बाजीराव यास दोन याद्या लिहून दिल्या. त्या शाहूनंतर मराठ्यांचे राज्य कसे चालावे, यासाठी उत्तम मार्गदर्शक होत्या. त्या अशा:

श्री

‘’राजमान रा बालाजी प्रधान पडीत यास आज्ञा. तुम्ही फौज धरने, सरवास आज्ञा केली, त्याच्या दैव नाही, माहाराजास दुखन जाल, नाही, बर होत नाही, राजभार चा (ल) ला पाहिजे, तर पुढे वंस बसवणे, कोलापूरचे न करने, चिटनीसास सरव सागितले तसे करने, वंस होईल त्याच्या आज्ञेत चालन; राजमडल ; चिटणीस स्वामीचे इसवासू त्याच्या तुमच्या विचारे राज राखने बस होईल तो तुमची घालमल करनार नाही, सुदन आसा.‘’ दुसरी यादी

श्री

‘’राजमान रा बालाजी पडीत प्रधान आज्ञा जे राजभाग तुम्ही चालवाल हा भरवसा स्वामीस आहे पहिले सागितले खातरजमा ती चिटनीसानी आढल कली तुमचे मसतकी हत ठविला आहे बस होईल तो तुमचे पद प्रधान चालवील करील आतर तर सफत आसे त्याचे आज्ञेत चालन सेवा करत राज राखने बहुत काय लिहिने सुदन आसा.‘’

या दोन याद्यांमुळे पेशव्यांना सर्व मराठी राज्याचा कारभार चालविण्याचा अधिकार मिळाला आणि त्यांतून राजमंडळ ही संज्ञा उत्पन्न झाली. राजारामाच्या कारकीर्दींतच उत्पन्न झालेल्या दोन सेनापतिपदांपैकी, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यात लढाई होऊन घोरपडे राजारामाच्या विरूद्ध गेल्यामुळे एक सेनापतिपद कमी झाले. पहिल्या बाजीरावाच्या कारकीर्दीत त्याचे व तत्कालीन सेनापती त्र्यंबकराव दाभाडे याच्याशी लढाई होऊन तीत दाभाडे मारला गेल्यामुळे सेनापतिपदाची अवनती झाली. प्रतिनिधी घराण्यात आपले पद कायम ठेवू शकले, असा कोणीही कर्तबगार पुरूष उत्पन्न न झाल्यामुळे त्या पदाचीही पुढे अवनती झाली. तीच अवस्था अष्टप्रधानांतील सचिवपदाची झाली.

शाहूच्या कारकीर्दीत सातारा व कोल्हापूर अशा दोन राज्यांत मराठी राज्याची विभागणी झाल्यामुळे आणि रामचंद्रपंत कोल्हापुरकडे गेल्यामुळे त्या पदाचीही शाहूच्या राज्यात अवनती झाली. सुंमत, न्यायाधीश आणि धर्मशास्त्री यांचीही क्रमाने अवनती झाली. उलट बाजीरीव व बाळाजी बाजीराव यांनी जे सरदार उत्पन्न केले, त्यांपैकी वर सांगितलेले होळकरपदी पाच आणि पटवर्धन व रास्ते असे नवे दोन प्रमुख सरदार बनले, मुख्य प्रधानासह या सर्वांचे मिळून राजमंडळ होई आणि हे आपल्या अनेक पत्रांवर राजमंडळ असा प्रारंभीचशेरा मारीत. या सर्व राजमंडळावर अधिकार चालविण्याची सत्ता शाहूने दिलेल्या याद्यांमुळे पेशव्यास प्राप्त झाली. १७६१ च्या तिसऱ्या पानिपतच्या युद्धात भोसल्यांशिवाय राजमंडळात त्या वेळी असलेले सर्व सरदार सहभागी झाले होते आणि १७९५ मध्ये झालेल्या खडर्याच्या लढाईत तर राजमंडळातील त्या वेळचे झाडून सारे सरदार पेशव्यांच्या बाजूने सहभागी झाले.

या राजमंडळाचा एवढा परिणाम झाला की पेशव्यांचे राज्य गेले, पण राजमंडळातील भोसले व रास्ते यांशिवाय इतर सर्वाची संस्थानी राज्ये भारतास स्वातंत्र्य मिळून त्यात संस्थाने विलीन होईतो टिकली (१९४७).

 

संदर्भ: 1. Majumdar, R. C. Ed. Maratha Supremacy. Bombay, 1972.

2. Sardcsai G. S. New History of the Marathas, Vols, I to III, Bombay, 1957.

३.केळकर, न. चि. मराठे व इंग्रज, पुणे, १९३८.

खरे, ग. ह.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate