অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महात्मा गांधी

महात्मा गांधी

(२ ऑक्टोबर १८६९ – ३० जानेवारी १९४८). मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला. गांधी हे वैष्णव वाणी. गांधींचे आजोबा उत्तमचंद यांना पोरबंदर संस्थानची दिवाणगिरी मिळाली होती. गांधींचे वडील करमचंद हे प्रथम पोरबंदर संस्थानचे व नंतर राजकोट संस्थानचे दिवाण होते. आई पुतळीबाई व वडील हे दोघेही शीलसंपन्न व धर्मनिष्ठ होते. ते नियमाने धार्मिक ग्रंथांचे पठन करीत व आपल्या मुलाबाळांना धार्मिक कथा सांगून सदाचरणाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवीत. त्या वेळी धार्मिक नाट्यप्रयोग फार होत असत; ते पाहण्यात आणि ध्रुव, प्रल्हाद, हरिश्चंद्र यांच्या कथा ऐकण्यात मोहनदास बाळपणी सातआठ वर्षांचे असताना रंगून जात. हरिश्चंद्राच्या अद्‍भुतरम्य कथेचे त्यांना वेडच लागले होते. हरिश्चंद्र नाटक त्यांनी वारंवार पाहिले. अहिंसात्मक सत्याग्रहाला आवश्यक निष्ठेची मनोभूमिका लहानपणीच तयार झाली.

स्तुरबा आणि मोहनदास यांचे वय सारखेच होते. या दोघांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी झाला. ही विद्यार्थी दशा होती. घरचे वातावरण शीलसंपन्नाचे असले, तरी बाहेरचे सवंगडी आणि मित्र निरनिराळ्या कौटुंबिक परिस्थितीत होते. त्यांनी मांसाहार, धुम्रपान, वेश्यागमन इ. गोष्टींचे प्रलोभन मोहनदासांना दाखविण्याचा प्रयत्‍न केला. ते त्यात काही काळ फसलेही. परंतु तीव्र पश्चात्ताप होऊन ते त्यातून लवकरच बाहेर पडले. १८८७ साली ते मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.

८८५ मध्येच करमचंद यांचे निधन झाले. बेचरजी स्वामी यांनी पुतळीबाईंना सांगितले, की मोहनदासाला उच्च वैद्यकीय शिक्षणाकरिता इंग्‍लंडला पाठवावे. परंतु वैद्याला मृत शरीराला स्पर्श करावा लागतो हे बरे नव्हे, म्हणून बॅरिस्टर होण्याकरिता इंग्‍लंडला पाठवावे असे वडील बंधूंनी ठरविले.मोहनदासांना ही कल्पना फार आवडली. आई या धाकट्याला परदेशी पाठविण्यास नाखूष होती. परंतु मोहनदासांचा आग्रह पाहून तिने त्यांना मद्य, मांस व परस्त्री वर्ज्य करण्याची शपथ घ्यावयास लावली आणि ते १८८८ मध्ये इंग्‍लंडला गेले. या वेळी कस्तुरबाई गरोदर होत्या. अठराव्या वर्षीच हिरालालचा जन्म झाला. रामदास व देवदास नंतर काही वर्षांच्या अंतराने झाले. इंग्‍लंडमध्ये असताना गांधींनी शाकाहारी मंडळ स्थापन केले. वडिलांच्याच पायापाशी बसून हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती मित्रांच्या संवादांमध्ये अनेक धर्माच्या तत्त्वांचे जे विचार त्यांनी वारंवार ऐकले, ते इंग्‍लंडमध्ये गीता, बुद्धचरित्र व बायबलयांच्या वाचनाने अधिक दृढ झाले.

ते १० जून १८९१ रोजी बॅरिस्टर झाले. तत्पूर्वी लंडनची मॅट्रिक परीक्षाही ते उत्तीर्ण झालेच होते. स्वदेशी परतले. मातेचे निधन झाले होते, ही गोष्ट त्यांना परतल्यावर कळली. वडीलभावाने परदेशगमनाबद्दल त्यांच्याकडून प्रायश्चित्त घेवविले.

फ्रिकेतील सत्याग्रहसंग्रामाचे प्रथम पर्व

भारतात आल्यावर त्यांनी मुंबई येथे वकिली सुरू केली; पण जम बसेना. या वेळी इंग्रजी पद्धतीचा पोषाख ते करीत होते. पोरबंदराच्या एका मुसलमान व्यापाऱ्याने दक्षिण आफ्रिकेतील कज्‍जासाठी गांधींची गाठ घेतली व एका वर्षाच्या कराराने, १८९३ च्या एप्रिलमध्ये दक्षिण आफ्रिकेत नेले. दरबानचा लक्षाधीश व्यापारी दादा अब्दुल्ला याने प्रिटोरिया येथील व्यापारी तय्यबजी यावर ४०,००० पौडांची फिर्याद केली होती. गांधींनी त्या दोघांचे मन वळवून कज्‍जाचा निकाल सामोपचाराने करवून घेतला. आफ्रिकेत सु. २० वर्षे गांधी राहिले. वकिलीचा अनुभव घेतला. दोन्ही पक्षांच्या अंतःकरणात शिरून व समजूत घालून, कज्‍जाचा निकाल करणे यात गांधी तरबेज झाले. दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील बिनगो ऱ्या जमातींवरील विशेषतः हिंदी लोकांवरील, त्याचप्रमाणे तेथील मजुरांवरील होणा ऱ्या गोऱ्या सत्ताधाऱ्यांच्या जुलमांविरुद्ध आपल्या सत्याग्रहाचा किंवा निःशस्त्र प्रतिकाराचा दीर्घकालपर्यंत प्रयोग करण्याची संधी त्यांनी साधली. तेथील हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती इ. जमातींची व दलित जनांची अंतःकरणे काबीज केली. अनेक यूरोपीय मित्रही मिळविले.

क्षिण आफ्रिकेत प्रसिद्ध तत्त्वज्ञ, सेनापती व सत्ताधारी जनरल स्मट्स यांच्याशीच गांधींनी अनेक वेळा सत्याग्रही संग्राम केला. त्या वेळी नाताळ, ट्रान्सवाल व ऑरेंज फ्री स्टेट या तीन स्वतंत्र राज्यांत हिंदी लोकांची स्थिती अस्पृश्यांपेक्षाही वाईट होती. हिंदू मजूर मुदतीच्या कराराने तेथे मोठ्या संख्येने नेले जात होते. हिंदी व्यापारीही तेथे व्यापाराकरिता वस्ती करून राहिले होते. सर्वच बिनगो ऱ्या लोकांना निग्रोंप्रमाणेच वागवीत असत; सर्वांनाच कुली म्हणत. गोऱ्या वस्तीत राहण्याचा त्यांना प्रतिबंध होता. वर्णद्वेषाचे थैमान सुरू होते. वर्णभेदावर आधारलेले अनेक प्रकारचे जुलमी कर लादले होते. वर्णद्वेषावर आधारलेले नियम मोडले, तर गोरे लोक व पोलीस मारहाण करीत; बुटाने तुडवीत.

गांधींनी स्वतः अनेक वेळा असा अपमान व मारहाण सोसली. हिंदू लोकांच्या काही सवलती काढून घेणारे अपमानकारक बिल तेथील विधिमंडळात १८९४ मध्ये आले. गांधी त्या वेळी आफ्रिका सोडून स्वदेशी परतणार होते. परंतु आयत्या वेळी परत येण्याचा बेत रहित करून तेथेच राहून लढा देण्याचा संकल्प त्यांनी सोडला. नाताळ इंडियन काँग्रेस नावाची संस्था त्याकरिता स्थापन केली. सार्वजनिक फंडातील पैसा न घेता वकिली सुरू करून अगदी साधी राहणी अवलंबिली. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र सुरू केले. सार्वजनिक फंड आंदोलनाकरिता गोळा होत असे; त्याचा पूर्ण चोख हिशोब प्रतिमास सादर करण्याची प्रथा ठेवली. मजुरांवर तेथे राहण्याबद्दल जादा कर देण्याचे विधेयक विधिमंडळापुढे मान्य झाले होते. याविरूद्ध त्यांनी मोठी चळवळ केली. गोरे लोक त्यामुळे त्यांच्यावर खूप चवताळले होते. याच सुमारास १८९६ च्या जून महिन्यात गांधी भारतीयांना तेथील परिस्थिती समजावून सांगण्याकरिता तात्पुरते भारतास परतले. काही महिने भारतात राहून येथील वृत्तपत्रांत तेथील परिस्थितीबद्दल हृदयविदारक हकीकती त्यांनी प्रसिद्ध केल्या व दक्षिण आफ्रिकेत ते पुन्हा गेले. याच सुमारास बोअर युद्ध सुरू झाले. त्यात गांधीजींनी हिंदी लोकांचे शुश्रूषा पथक तयार करून दोन्ही बाजूंच्या गोऱ्या जखमी सैनिकांची सेवा केली. बोअर युद्धानंतर गांधींनी भारताला भेट दिली. १९०३ साली गांधी आफ्रिकेस पुन्हा परत गेले. तेथील दडपशाहीच्या कायद्याविरूद्ध त्यांनी सत्याग्रहाची चळवळ उभारली. त्यात कस्तुरबांसह अनेक स्त्रियांनीही भाग घेतला आणि कारावास भोगला. काळ्या कायद्याविरुद्ध कायदेभंगाच्या चळवळीला १९०७ मध्ये उग्र रूप आले. १९०८ मध्ये शेकडो हिंदी लोकांना कारावासाच्या शिक्षा झाल्या. गांधींनाही सक्तमजुरीची शिक्षा झाली. या सत्याग्रहाचे पडसाद आफ्रिकेप्रमाणेच इंग्‍लंड व हिंदुस्थान येथेही उमटले. १९१२ साली गोपाळकृष्ण गोखले हे जनरल स्मट्‌सने काळा कायदा रद्द करावा, म्हणून आफ्रिकेत गेले. तेव्हापासून गांधी व गोखले यांचा स्‍नेह जमला. गोखले यांस गांधींनी आपले राजकीय गुरू म्हणून अत्यंत पूज्य मानले. १८ डिसेंबर १९१३ रोजी गांधींना स्मट्सने बंधमुक्त केले व २१ जानेवारी १९१४ रोजी वर्णविद्वेषाच्या कायद्याच्या बाबतीत गांधी व स्मट्स यांच्यात तडजोड झाली.

फ्रिकेतील त्यांच्या वीस वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी रस्किनचे अनटू धिस लास्ट, टॉलस्टायचे किंग्डम ऑफ गॉड व थोरोचे निबंध वाचले. रस्किनच्या पुस्तकाचे त्यांनी सर्वोदय म्हणून गुजरातीत भाषांतर केले. दरबान शहराजवळ सु. चाळीस हे. जमीन खरेदी करून फिनिक्स आश्रम स्थापन केला. तेथूनच ते इंडियन ओपिनियन हे साप्ताहिक छापून प्रसिद्ध करू लागले. गांधी स्वतः शेतकाम करीत, छापखान्यात यंत्रेही फिरवीत. नंतर त्यांनी जोहॅनिसबर्गजवळ सु. ४४० हे. जागेत टॉलस्टाय फार्म स्थापिला. १९१३ मधील सत्याग्रह आंदोलनाची छावणी येथेच पडली होती. तत्पूर्वी त्यांनी १९०८ साली लंडनहून दक्षिण आफ्रिकेस परत जात असताना हिंद स्वराज्य हे पुस्तक प्रश्नोत्तररूपाने लिहून प्रसिद्ध केले. या पुस्तकात यांत्रिक उद्योगाने मानवाचा ऱ्हास होत आहे, हा विचार त्यांनी मांडला.

भारतातील सार्वजनिक जीवन

गांधी दक्षिण आफ्रिकेला कायमचा रामराम ठोकून इंग्‍लंडमार्गे ९ जानेवारी १९१५ रोजी मुंबईस परत आले. नामदार गोखले यांनी, भारतात गेल्यावर एक वर्षपर्यंत सार्वजनिक चळवळीत न पडता केवळ तटस्थपणे परिस्थिती समजावून घ्या, असे त्यांना बजावून सांगितले होते. मुंबई, मद्रास इ. शहरांमध्ये त्यांच्या सत्काराच्या सभा झाल्या. गांधींनी हरद्वारचे गुरुकुल व शांतिनिकेतन यांस भेटी दिल्या. हरद्वार येथे कांगडी गुरुकुलाचे आचार्य श्रद्धानंद यांची गाठ पडली. त्यांनीच प्रथम गांधींचा महात्मा म्हणून निर्देश करून गौरव केला. अहमदाबाद येथे साबरमती तीरावर २५ मे १९१५ रोजी सत्याग्रहाश्रम स्थापन केला. आश्रमात राहणाऱ्या एका अस्पृश्यामुळे अहमदाबाद येथील व्यापा ऱ्यांनी आश्रमास देणग्या देण्याचे बंद केले. आश्रम बंद पडण्याची वेळ आली. परंतु गांधींनी अस्पृश्यांना आश्रमात ठेवण्याचा आग्रह चालू ठेवला. हळूहळू पुन्हा अनुदान मिळू लागले व आश्रम स्थिरावला. विनोबा भावे, काकासाहेब कालेलकर, संगीतज्ञ खरे गुरूजी, गोपाळराव काळे, महादेवभाई देसाई, जे. बी. कृपलानी, किशोरलाल मश्नुवाला, प्यारेलाल इ. गांधींचे अनुयायी आश्रमी बनले. हा सत्याग्रहाश्रम तेव्हापासून हळूहळू भारताच्या राजकीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे मुख्य केंद्र बनला.

हिंदू विश्वविद्यालयाचा स्थापना समारंभ ४ फेब्रुवारी १९१६ रोजी झाला; त्या सभेत व्हाइसरॉय लॉर्ड हर्डिंग, अॅनी बेझंट, हिंदी महाराजे, त्यांच्या राण्या, उच्चपदस्थ अधिकारी व अनेक पुढारी उपस्थित होते. या सभेत गांधींनी भाषण केले. ते म्हणाले, ‘कालच्या चर्चेमध्ये भारताच्या गरिबीबद्दल मुक्त कंठाने भाषणे झाली. पॅरिसच्या जवाहि ऱ्यालाही दिपवून टाकणाऱ्या जडजवाहिरांनी मंडित राजेमंडळी येथे बसलेली आहेत. भारताची गरिबी नष्ट करावयाची तर अगोदर, डोळे दिपविणारे जडजवाहिर राजेमहाराजांपाशी आहेत, तेच काढून घेऊन याचा भारताच्या जनतेकरिता निधी निर्माण करावा. हे सर्व धन गरीब शेतकऱ्यांच्या श्रमातून निर्माण झाले आहे. शेतकऱ्याची मुक्ती शेतकरीच करू शकेल. वकील, डॉक्टर, जमीनदार हे करू शकणार नाहीत’. अशा अर्थाचे भाषण चालू असताना अॅनी बेझंट यांनी गांधींना हटकले व भाषण बंद करण्यास सांगितले. गांधी थांबले नाहीत. बेझंटनी ती सभा रागावून बरखास्त केली.

गांधींनी १९१७ मध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बिहारमधील चंपारण्यास भेट दिली. त्या परिसरात गोऱ्या लोकांचे उसाचे व निळीचे मळे होते व तेथील हिंदी शेतकरी त्यांची कुळे होती. हे मळेवाले शेतकऱ्यांना छळीत, लुबाडीत, मारीत व त्यांची आर्थिक पिळवणूक करीत. ब्रिटिश सरकारने गांधींना चंपारण्य सोडून जाण्याचा हुकूम दिला. तो गांधींनी मानला नाही. या वेळी राजेंद्रप्रसाद, ब्रिजकिशोर, मझरूल हक इत्यादींचा परिचय झाला. चंपारण्य जिल्ह्यातील ८५० खेड्यांतील सु. ८,००० शेतकऱ्यांच्या तक्रारी गांधींनी लिहून घेतल्या. १३ जून १९१७ रोजी सरकारला चौकशी समिती नेमावी लागली. समितीच्या शिफारशीप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांकडून खंड कमी घेतला जाईल, वेठबिगार रद्द होईल व इतर जुलमी प्रकार होणार नाहीत, असे १८ ऑक्टोबर रोजी जाहीर केले.

चंपारण्य सत्याग्रहामुळे गांधींजींचे भारतीय नेतृत्त्व चमकू लागले. त्यानंतर अहमदाबादच्या मजुरांच्या तुटपुंज्या पगाराचा प्रश्न उत्पन्न झाला. युद्धजन्य महागाई शिगेस पोहोचली होती. मजुरांचा सत्तर टक्के बोनस गिरणीवाल्यांनी रद्द करण्याचे जाहीर केले. सु. ८०,००० मजुरांनी सत्याग्रह करण्याचा बेत केला. बावीस दिवस संप चालला. गांधींनी मजुरांचा संप टिकविण्यासाठी उपोषण केले. तीन दिवसांत यश आले. मालकांनी ३५ % पगारवाढ मान्य केली. असे तंटे पुन्हा होऊ नयेत म्हणून मजुर-महाजन नावाची संस्था स्थापन झाली. मजुरांप्रमाणे शेतकऱ्यांचाही प्रश्न याच साली उत्पन्न झाला. खेडा जिल्ह्यात भयंकर दुष्काळ पडला तरी सरकार, चार आणेच पीक येऊन देखील, शेतसारा वसूल करू लागले. गांधींनी करबंदीची चळवळ हाती घेतली. ही चळवळ पसरू लागली, म्हणून सरकार नमले व शेतसारा माफ झाला.

पहिल्या जागतिक युद्धात भारतीयांनी मित्र राष्ट्रांना मदत करावी, म्हणून १९१७ साली व्हाइसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड याने भारतीयांची परिषद बोलाविली. त्या परिषदेत गांधींनी हिंदीमध्ये भाषण करून सैन्यभरतीला पाठिंबा दिला. या बाबतीत लोकमान्य टिळकांचे असे म्हणणे होते, की भारतीयांना स्वराज्याच्या अधिकारांचे आश्वासन मिळाले, तरच सैन्यभरतीला पाठिंबा द्यावा. गांधींनी बिनशर्तच पाठिंबा दिला. दक्षिण आफ्रिकेतील चळवळीपासून गांधींचा व दीनबंधू सी. एफ्. अँड्रूज या ख्रिस्ती धर्मप्रचारकाचा स्‍नेह जमला होता. ब्रिटिश सरकारचे भारतातील प्रतिनिधी आणि गांधी यांच्यामधला अँड्रूज हे एक महत्त्वाचा दुवा बनले. सैन्यभरतीच्या प्रचाराकरिता देशभर फिरत असता गांधींची प्रकृती अत्यंत परिश्रमाने ढासळली. अतिसाराचा विकार जडला. अंगात बारीक तापही सारखा राहू लागला. खेडा जिल्ह्याच्या सत्याग्रहापासून वल्लभभाई पटेल यांचा स्‍नेहसंबंध वाढू लागला होता. वल्लभभाई अहमदाबादला गांधींना भेटावयास आले. वल्लभभाईंनी औषधोपचार घ्यावा, असा त्यांना आग्रह केला. सुप्रसिद्ध डॉक्टर कानुगा यांनी प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी म्हणून औषधे व इंजेक्शन्स घेण्याचा आग्रह केला. गांधींनी तो नाकारला. एके दिवशी रात्री या दीर्घ आजारात गांधींना वाटू लागले, की आपली अखेरची वेळ आली आहे. वल्लभभाईंनी पुन्हा डॉ. कानुगांना प्रकृती तपासण्यास बोलाविले, त्यांनी नाडी तपासली. डॉक्टर म्हणाले, तशी भीती नाही, अत्यंत अशक्ततेमुळे मात्र मज्‍जातंतू क्षीण झाले आहेत. शेवटी एकच उपाय उपयोगी पडला; सर्व शरीराला बर्फाचा लेप केला होता. गांधी या आजारातून बाहेर पडले. निसर्गोपचारावर त्यांची फार भिस्त. आश्रमात कोणी आजारी पडले, तरी उपवास व निसर्गोपचार यांवरच ते भर देत.

र्मनांचा पराभव होऊन पहिले जागतिक युद्ध १९१८ साली संपले; ब्रिटन विजयी झाले. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुसलमानांची खिलाफत तोडून तिचे अनेक भाग केले. भारतातील मुसलमान त्यामुळे संपप्त झाले. ब्रिटिश सरकारने माँटेग्यू-चेम्सफर्ड समिती भारताच्या राजकीय हक्कांसंबंधी शिफारशी करण्याकरिता नेमली. त्यात स्वराज्याचे हक्क नव्हतेच. लोकप्रतिनिधींची कायदेमंडळे व द्विदल राज्यपद्धती देण्याचे मात्र ठरले; परंतु गव्हर्नरांचे व केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकार कायम ठेवले. भारतात असंतोष पसरत होता. तो दाबून टाकण्याकरिता न्यायमूर्ती रौलट याच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारशींप्रमाणे दडपशाहीचा कायदा केंद्र सरकारने मंजूर केला. या कायद्याच्या विरुद्ध गांधींनी सत्याग्रहाची चळवळ उभारली. गांधींनी भारतभर दौरा सुरू केला. ६ एप्रिल १९१९ रोजी देशभर हरताळ पाळण्यात आला. हिंदू व मुसलमान यांच्यामध्ये प्रचंड एकजूट घडून आली. पंजाब सरकारने पंजाबमध्ये शिरण्याची गांधींना मनाई केली. पंजाब सरकारने त्यांना अटक करून परत मुंबईला पाठविले. देशभर हाहाकार उडाला. जालियनवाला हत्याकांडामुळे गांधींनी सुरू केलेला सत्याग्रह तात्पुरता तहकूब केला. काँग्रेसने पंडित मदनमोहन मालवीय, मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास, उमर सोमानी इत्यादिकांची पंजाबात अथवा अन्यत्र झालेल्या अत्याचारांच्या चौकशीकरिता १४ ऑक्टोबर १९२१ रोजी सरकारने लॉर्ड हंटर यांच्या अध्यक्षतेखाली पाच गोरे व तीन हिंदी गृहस्थ यांची समिती नेमली. या समितीपुढे सत्याग्रहाचे प्रवर्तक म्हणून गांधींचीही साक्ष झाली. काँग्रेस समितीने असा निर्णय दिला, की लोकांना हिंसक मार्गापासून परावृत्त करण्याकरिता हरताळ पाळण्यात आला होता. सत्याग्रहाची चळवळ हे सरकारविरुद्ध बंड होते; परंतु सरकारच्याही हातून अन्याय झाले, अशी कबुली हंटर समितीने दिली. १९२० साली नागपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले; त्यात असहकारितेचे आंदोलन सुरू करण्याचा ठराव मान्य करण्यात आला. खिलाफतीचे पुनरुज्‍जीवन करण्याची चळवळही याच चळवळीबरोबर उभारली. देशभर सभा, मिरवणुका, प्रभात फे ऱ्या निघू लागल्या. कायदेमंडळांवर देशातील शेकडो प्रतिनिधींनी बहिष्कार घातला. हजारो लोकांनी सरकारी नोकऱ्या सोडल्या. अनेक वकिलांनी व बॅरिस्टरांनी वकिलीची कामे सोडली. परदेशी मालावर व ब्रिटिश कापडावर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन देशभर पसरले. राष्ट्रीय शिक्षणाच्या खाजगी संस्था स्थापण्यात आल्या. परंतु ब्रिटिश सरकारने दडपशाही सुरू केली. लक्षावधी लोकांना कारावासात टाकले. गांधींनी या अनत्याचारी असहकारितेची शेवटची पायरी म्हणून सामुदायिक कायदेभंग व करबंदी करण्याच्या चळवळीचा संकल्प सोडला. बार्डोली तालुक्यात ही चळवळ सुरू करावयाचे ठरविले. गांधींनी बार्डोली येथेच आपला मुक्काम ठेवला. परंतु उत्तर प्रदेशात चौरीचौरा येथे दंगे होऊन लोकांनी जाळपोळ केली व त्यात पोलिसांची हत्या झाली. त्यामुळे गांधींनी काँग्रेसच्या मुख्य कार्यकारिणीची बार्डोली येथे ११ व १२ फेब्रुवारी १९२२ रोजी बैठक बोलावून बार्डोलीचा सत्याग्रह तहकूब ठेवला. महात्मा गांधींना त्यानंतर १० मार्च रोजी अहमदाबाद येथे पकडण्यात येऊन राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. गांधींनी न्यायालयापुढे आपण राजद्रोह केला हे मान्य केले व सांगितले: ब्रिटिश राज्यपद्धती आणि तिचा कायदा हा भारतीय जनतेच्या हिताच्या विरुद्ध आहे. मी बादशहाविरुद्ध अप्रीती उत्पन्न केली नाही, तर ब्रिटिशांच्या राज्यपद्धतीविषयी अप्रीती उत्पन्न केली आहे. अशी अप्रीती उत्पन्न करणे हे कर्तव्य व सद्‍गुणाचे दर्शन मी समजतो. न्यायाधीश ब्रुमफील्ड यांनी निकाल देताना सांगितले: तुमचे ध्येय उच्च व तुमचे वर्तन थोर साधूला शोभण्यासारखे आहे. परंतु तुमच्या सत्याग्रहाचा उद्देश उच्च व प्रयत्‍न अत्याचाराविरुद्ध असले तरीही अत्याचार घडले; म्हणून तुम्हास मोठ्या खेदाने मला शिक्षा सुनवावी लागत आहे. सहा वर्षांच्या साध्या कैदेची शिक्षा मी फर्मावितो. येरवडा जेलमध्ये गांधींना रवाना केले. तेथे १९२४ साली त्यांचा आंत्रपुच्छशोथ हा विकार बळावला; त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ५ फेब्रुवारीला त्यांना मुक्त करण्यात आले. त्यानंतर गांधींनी ब्रिटिश राज्यकर्त्यांशी लढा न करता, सामाजिक सुधारणांसारख्या विधायक कार्यक्रमास वाहून घेतले. मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास, विठ्ठलभाई पटेल इ. काँग्रेस नेत्यांनी स्वराज्य पक्ष स्थापून कायदेमंडळात स्वराज्याच्या हक्कांकरिता झगडायचे ठरविले. हिंदु-मुस्लिम ऐक्य, अस्पृश्यतानिवारण, खादीग्रामोद्योग, गावसफाई इ. कार्यक्रम गांधींनी हाती घेतले. गांधींनी देशभर प्रवास करून प्रचार केला. राजगोपालाचारी, जवाहरलाल नेहरू हे गांधींच्याच विधायक कार्यक्रमात सहकार्य करू लागले आणि गांधींच्या कार्यक्रमाचे ते समर्थक बनले. काँग्रेसमधील एम्. आर्. जयकर, न. चिं. केळकर, मदनमोहन मालवीय इ. मंडळी, मुसलमानांचे मन वळविणे अशक्य आहे, असे म्हणून हिंदू महासभेकडे वळली. काँग्रेसमधील अनेक मुसलमान नेते, बॅ. जिना, सर अली इमाम यांनी डिसेंबर १९२५ मध्ये अलीगढ येथे मुस्लिम लीगचे अधिवेशन भरवून मुसलमानांची फळी उभी केली. भारतातील राजकीय असंतोष केंद्राच्या व प्रांतांच्या विधिमंडळांत शिरलेल्या स्वराज्य पक्षाच्या द्वारे वारंवार प्रकट होऊ लागला; हे पाहून नवे आंदोलन उद्‍भवण्याच्या अगोदरच राजकीय स्वयंनिर्णयाचे हक्क वाढवावे, म्हणून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सायमन आयोग नेमण्याचे ठरविले. ३ फेब्रुवारी १९२८ रोजी सायमन आयोग मुंबई बंदरात उतरला. तेव्हापासून त्याविरुद्ध निदर्शने सुरू झाली. देशभर ब्रिटिशविरोधी निदर्शनांचे थैमान सुरू झाले. काँग्रेसने सायमन आयोगावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. लाहोरला लाला लजपतराय व लखनौला जवाहरलाल नेहरू यांच्यावर उग्र निदर्शने चालू असताना लाठीहल्ला झाला. लाला लजपतराय या लाठीहल्ल्याने उत्पन्न झालेल्या दुखण्यातच कालवश झाले. भारताचे राजकीय वातावरण तप्त झाले, हे पाहून पंडित जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसचे उद्दिष्ट संपूर्ण स्वातंत्र्य जाहीर करण्याचे ठरविले. गांधी साम्राज्यांतर्गत स्वराज्याचे समर्थक होते. या दोघांना त्यांनी आश्वासन दिले, की ३१ डिसेंबर १९२९ पर्यंत साम्राज्यांतर्गत स्वराज्य मिळाले नाही, तर मी संपूर्ण स्वातंत्र्यवाला होईन. त्याच सुमारास भगतसिंग इ. सशस्त्र क्रांतिकारकांच्या हालचाली सुरू झालेल्या गांधींच्या लक्षात आल्या. लॉर्ड आयर्विन यांच्या आगगाडीखाली नवी दिल्ली स्टेशनजवळ बाँबस्फोट झाला. भारताच्या राजकीय चळवळीला हिंसक वळण मिळणार असे दिसू लागले. ते टाळण्याकरिता गांधींनी १९३० साली सविनय कायदेभंगाची घोषणा केली. १२ मार्च १९३० रोजी सकाळी ६·३० वाजता साबरमती आश्रमातून गांधींनी स्वराज्य मिळाल्याशिवाय परत येणार नाही; अशी प्रतिज्ञा करून समुद्र किना ऱ्यावरील दांडीकडे मिठाचा कायदा तोडण्याकरिता ७२ सत्याग्रही वीरांसह यात्रा सुरू केली. ६ एप्रिलला यात्रा संपली. गांधींनी बेकायदेशीर रीतीने मीठ गोळा केले. देशभर मिठाचा कायदा मोडणारे सत्याग्रह आंदोलन उभे राहिले. ४ मे १९३० रोजी पहाटे गांधींना कराडी या गावी अटक झाली; येरवड्याच्या तुरुंगात सरकारने त्यांची रवानगी केली. देशामध्ये लक्षावधी लोक कायदेभंग करून कारावासाची शिक्षा भोगू लागले. २५ जानेवारी १९३१ रोजी शांततामय वातावरण निर्माण करण्याकरिता लॉर्ड आयर्विन यांनी गांधींची बिनशर्त सुटका केली. गांधी आणि आयर्विन यांच्यात वाटाघाटी सुरू होऊन ५ मार्च १९३१ रोजी ⇨गांधीआयर्विन करार झाला. भारताच्या राजकीय स्वयंनिर्णयाच्या हक्काचा प्रश्न चांगल्या रीतीने सोडविण्याकरिता इंग्‍लंडमध्ये नोव्हेंबर १९३१ मध्ये भारतीय प्रतिनिधींची गोलमेज परिषद भरली. गांधी त्या परिषदेस उपस्थित राहिले. इंग्‍लंडमध्ये त्या वेळी कमरेला पंचा, अंगावर उबदार साधी शाल व पायात वहाणा असा त्यांचा पोषाख होता. गोलमेज परिषदेमध्ये भाषण करताना गांधींनी सांगितले, की ब्रिटिश प्रजाजन म्हणविण्यात मला एके काळी अभिमान वाटत होता; आता बंडखोर म्हणून घेणे मला जास्त आवडेल. हिंदू, मुसलमान, स्पृश्य व अस्पृश्य यांना विभक्त मतदार संघ द्यावे की नाही याबद्दल तेथे हिंदी प्रतिनिधींमध्ये मतभेद झाले. अशा प्रकारची जातीयता स्वराज्यात राहू नये, त्याकरिता प्राण गेले तरी चालतील, असे गांधींनी त्या परिषदेत निकराने जाहीर केले. भारतात आल्यावर ३ जानेवारी १९३१ रोजी गांधींना अटक झाली. त्यानंतर वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, राजेंद्रबाबू, सुभाषचंद्र बोस, डॉ. अन्सारी, आझाद, कस्तुरबा, कमला नेहरू इ. राष्ट्रीय नेत्यांना ब्रिटिश सरकारने अटक करून त्यांची कारागृहात रवानगी केली. १८ ऑगस्ट १९३२ रोजी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी डॉ. भी. रा. ऊर्फ बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहावरून अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ दिल्याचे जाहीर केले. हे ऐकल्यानंतर गांधींनी २० प्‍टेंबर रोजी या प्रश्नावर प्राणांतिक उपोषण सुरू केले. डॉ. आंबेडकरांशी त्यांनी वाटाघाटी केल्या. तारीख २६ रोजी गांधींचा जीव वाचविण्याकरिता डॉ. आंबेडकरांनी तडजोड केली व येरवडा करार झाला. ८ मे १९३३ पासून त्यांनी पापाचे प्रायश्चित म्हणून २१ दिवसांचे उपोषण सुरू केले. सरकारने त्यांची लगेच मुक्तता केली. १२ जुलै १९३३ रोजी गांधींनी सामुदायिक सत्याग्रहाचे आंदोलन मागे घेतले; परंतु त्यांनी १९३४ मध्ये वैयक्तिक कायदेभंग सुरू केला. त्यातही पुन्हा त्यांना एक वर्षाची कैदेची शिक्षा झाली. परंतु पुन्हा उपोषण सुरू केल्यामुळे सरकारने त्यांची काही दिवसांनी मुक्तता केली. जानेवारी १९३४ मध्ये बिहार येथे भयंकर धरणीकंप झाला. हजारो लोक मेले, लाखो घरे जमीनदोस्त झाली. गांधींनी भूकंपग्रस्त भागात फिरून लोकांची सेवा केली. गांधींनी शेट जमनालाल बजाज या आपल्या एका थोर अनुयायाच्या सांगण्यावरून वर्धा येथील सेवाग्राम येथे आश्रम स्थापन केला. तेथे ते अखेरपर्यंत राहिले आणि विधायक कार्यक्रमाला पुन्हा त्यांनी वाहून घेतले. त्यांनी १९३८ मध्ये बंगालचा दौरा केला. बंगाल हे सशस्त्र क्रांतिकारकांचे केंद्रस्थान होते. शेकडो सशस्त्र क्रांतिकारक कारावासात खितपत पडले होते. त्यांना ब्रिटिश सत्ताधाऱ्यांशी विचारविनिमय करून त्यांनी बंधमुक्त केले. प्रांतिक व केंद्रीय निवडणुकींत १९३७ मध्ये बंगाल व पंजाब सोडून बहुतेक प्रांतांमध्ये काँग्रेस बहुमताने निवडून आली. सात प्रांतांमध्ये काँग्रेस मंत्रिमंडळांचे राज्य झाले होते. दुसरे जागतिक महायुद्ध १९३९ मध्ये सुरू झाले. युद्धसहकार्य नाकारून गांधींच्या सल्ल्याप्रमाणे या काँग्रेसच्या मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. बॅ. जिनांच्या सल्ल्यानुसार मुस्लिम लीगने काँग्रेस मंत्रिमंडळ बरखास्त झाल्यामुळे देशभर मुक्तिदिन साजरा केला. १९४१ च्या एप्रिलमध्ये गांधींनी पुन्हा वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. भारतात शांतता नांदावी व युद्धप्रयत्‍नाससाहाय्य व्हावे, म्हणून ११ मार्च रोजी भारताला स्वराज्याचे हक्क युद्ध संपल्याबरोबर द्यावेत असे चर्चिल यांच्या मंत्रिमंडळांने ठरवून सर स्ट्रॅफर्ड क्रिप्स यांचा आयोग भारताकडे पाठविला. गांधीप्रभृती नेते आणि क्रिप्स यांच्यात वाटाघाटी झाल्या; परंतु त्या अखेर फिसकटल्या. याचे कारण गांधींना युद्धसहकार्य करायचे नव्हते. गांधींनी ब्रिटिशांना विरोध न करण्याचे युद्धारंभीचे धोरण नंतर बदलले होते. म्हणून त्या वेळचे व्हाइसरॉय वेव्हेल यांनी गांधी शब्दाचे पक्के नव्हते, अशा अर्थाचे विधान या संदर्भात केले असावे. गांधींनी ८ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीची मुंबई येथे बैठक बोलाविली. त्या बैठकीत त्यांनी भारत स्वतंत्र झाला आहे, असा निर्णय जाहीर केला आणि छोडो भारत आंदोलन देशभर सुरू केले. गांधींनी लोकांना सांगितले, की करा किंवा मरा. ९ ऑगस्ट रोजी गांधींसह शेकडो नेत्यांची धरपकड झाली आणि त्यांना कारागृहात डांबण्यात आले. गांधींना पुणे येथील आगाखान बंगल्यात स्थानबद्ध केले. त्यांच्याजवळ कस्तुरबा, महादेव देसाई, डॉ. गिल्डर, डॉ. सुशील नायर, सरोजिनी नायडू इत्यादींना ठेवले. महादेव देसाई हे गांधींचे चिटणीस. त्यांना तेथेच मृत्यू आला. गांधींच्या पत्‍नी कस्तुरबा ह्या हृदयविकाराने आजारी होत्या. २२ फेब्रुवारी १९४३ रोजी त्यांना मृत्यू आला.  या अत्यंत प्रियजनांचा वियोग गांधींनी मोठ्या धैर्याने सहन केला. कस्तुरबांनी गांधींबरोबर मोठ्या निष्ठेने आदर्श पतिव्रता म्हणून जीवन व्यतीत केले. ६ मे १९४४ साली गांधीजींची बिनशर्त मुक्तता झाली. २ ऑक्टोबर १९४४ रोजी एक कोटी बारा लाखांचा कस्तुरबा निधी सेवाग्राम येथे गांधींच्या स्वाधीन करण्यात आला. काँग्रेस कार्यकारिणीचे जवाहरलाल नेहरूप्रभृती सभासद व अन्य नेते यांची जून १९४५ मध्ये कारागृहातून मुक्तता झाली. १९४६ मध्ये इंग्‍लंडमध्ये मजूर पक्षाचे मंत्रिमंडळ अॅटली यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ झाले. त्यांनी मे १९४६ मध्ये भारताच्या स्वराज्याची योजना तयार केली. संविधान परिषद व हंगामी राष्ट्रीय मंत्रिमंडळ बनविण्याचा अधिकार भारताला त्या योजनेप्रमाणे मिळाला. २९ जुलै १९४६ रोजी मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या मागणीकरिता आंदोलन उभारले. भारताची फाळणी अपरिहार्य झाली. गांधींना ती मुळीच मान्य नव्हती. एक वेळ माझ्या देहाचे दोन तुकडे पडले तरी चालेल, पण भारताची फाळणी मी होऊ देणार नाही, असे गांधींनी जाहीर केले. परंतु ३ जून १९४७ रोजी जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल इ. नेत्यांनी भारताची फाळणी मान्य केली. या सुमारास हिंदु-मुसलमानांचे यादवी युद्ध देशभर पेटले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे स्वातंत्र्य जाहीर झाले. हिंदु-मुसलमानांच्या भयंकर कत्तली चालूच होत्या. गांधींनी दिल्लीतील वातावरण शांत होईपर्यंत उपोषण करण्याचे जाहीर केले. १३ जानेवारी १९४८ रोजी बेमुदत उपोषण सुरू केले. भारत सरकारने पाकिस्तानचे ५५ कोट रु. परत करावे, अशी गांधींची मागणी होती. ही मागणी वल्लभभाई प्रभृती नेत्यांना मान्य नव्हती; परंतु गांधींचा जीव वाचविण्याकरिता ती अखेर मान्य करावी लागली. १६ जानेवारी रोजी गांधींनी उपोषण सोडले. ३० जानेवारी १९४८चा दिवस उजाडला. काँग्रेसने सत्तेचा स्वीकार न करता जनतेच्या दारिद्याचे प्रश्न सोडवावेत, विधायक कार्यक्रमाला वाहून घ्यावे, म्हणून लोकसेवक संघ योजना गांधींनी तयार केली. ग्रामराज्य हा भारतीय स्वराज्याचा पाया बनावा, असे भारताच्या संविधानाचे तत्त्व तीत समाविष्ट केले. राष्ट्रीय मंत्रिमंडळात पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात तीव्र मतभेद उद्‍भवले होते. गांधीजींनी सरदारांना पटविले, की ही फूट देशास अहितकारक आहे. संध्याकाळी पाच वाजले. बिर्ला भवनमधून गांधी प्रार्थनास्थानाकडे जावयास निघाले. प्रार्थनास्थानाकडे जातानाच पुण्याचे नथुराम गोडसे हे नारायण आपटे या साथीदारासह त्या प्रार्थनेच्या सभेत शिरले. गांधींच्या जवळ जाऊन प्रणाम करून नथुराम गोडसे यांनी गांधींच्या अंगावर गोळ्या झाडल्या. गांधी ‘हे राम’ म्हणत धरणीवर पडले आणि गतप्राण झाले. भारतीय जनता दुःखसागरात बुडाली. जगातील मोठमोठे नेते, विचारवंत, शास्त्रज्ञ, विज्ञानवेत्ते, कलाकार दुःखाने व्यथित झाले. सर्वश्रेष्ठ विज्ञानवेत्ते अॅल्बर्ट आइन्स्टाइन यांनी ही वार्ता कळल्याबरोबर उद्‍गार काढले, की असा महान माणूस या भूतलावर वावरत होता, याचेच आश्चर्य वाटते. अनेक तत्त्ववेत्त्यांनी म्हटले, की मानव जातीला पापातून मुक्त करणारा व शांततेचे मानवी विश्व भविष्यकाली निर्माण होईल, अशी आशा निर्माण करणारा हा माणूस होता. ‘राष्ट्रपिता’ म्हणून सर्वश्रेष्ठ अद्वितीय बहुमान गांधींना प्राप्त झाला.

 

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate