অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मीराबाई

मीराबाई

(सु. १४९८–सु. १५४७). मध्ययुगीन भारतातील एक श्रेष्ठ कृष्णभक्त संत कवयित्री. ‘मीरा’किंवा ‘मीराँ’ हा शब्द फार्सी भाषेतून राजस्थानीत आला असावा. त्याचा अर्थ ‘श्रेष्ठ’, ‘श्रीमंत’ असा आहे. ‘अमीर’ या शब्दाचे ते संक्षिप्तरूप आहे. संस्कृतमध्येही ‘मीर’ शब्द आहे; पण त्याचा अर्थ ‘समुद्र’ असा आहे. मीरेची अधिकृत चरित्रपर माहिती फारशी उपलब्धही नाही आणि जी आहे, ती विवाद्य आहे.तिच्या वडीलांचे नाव रतनसिंह. ते मेडतिया (राजस्थान) येथील राठोड होते. मीरेचा जन्म तिच्या वडिलांच्या जहागिरीतील चोकडी (कुकडी) गावी झाला. बालपणी एका लग्नाची वरात पाहून ‘माझा विवाह कोणाशी होणार ?’ असे मीरेने आईस विचारले असता, आईने कृष्णाच्या मूर्तीकडे बोट दाखवून ‘हा तुझा पती’ असे सांगितले. तेव्हापासून कृष्णाची प्रेमभक्ती तिच्या मनात उत्पन्न झाली, अशी आख्यायिका आहे. बालपणीच मातृवियोग झाल्याने आजोबा राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. दूदाजी मोठे वैष्णवभक्त होते. त्यांच्या भक्तीचा आणि धार्मिक वृत्तीचा खोल संस्कार मीरेवर झाला. नृत्य, संगीत, साहित्यादी कला तिला चांगल्या अवगत असाव्यात. अनेक अभ्यासकांच्या मते संत रैदास हे तिचे गुरू होत. उदयपूरचे महाराणा संग यांचे पुत्र भोजराज यांच्याशी तिचा विवाह झाला; पण अल्पकाळात तिला वैधव्य प्राप्त झाले. त्यानंतर वडील, सासरे, दीर रतनसिंह इत्यादींच्या एकामागून एक झालेल्या निधनांमुळे तिची वैराग्यवृत्ती वाढत गेली व मन भक्तीतच अधिक रंगू लागले. राजघराण्यातील स्त्रीने सर्वांसमक्ष मदिंरात नाचावे, गावे हे न आवडल्याने राणा विक्रमादित्याने (भोजराजाचा सावत्र भाऊ) मीरेचा अनेक प्रकारे छळ केल्याचा निर्देश तिच्या पदांतून आढळतो. मीरेचा जन्म, विवाह, वैधव्य व मृत्यू यांच्या सनांबाबत अभ्यासकांमध्ये खूपच मतभेद आहेत; तथापि जन्म १४९८, विवाह १५१६, वैधव्य १५२६ व मृत्यू द्वारका येथे १५४६ ह्या सनास सर्वसाधारणपणे अभ्यासकांची मान्यता आहे. १५३३ च्या सुमारास मीरा मेवाडवरून मेडत्यास आली असावी. १५३८ मध्ये जोधपूरच्या मालदेवाने वीरमदेवाकडून (मीरेचे काका) मेडता जिंकून घेतल्यानंतर ती सर्वस्वाचा त्याग करून वृंदावनास गेली असावी आणि १५४३ च्या सुमारास ती द्वारकेस गेली असावी. तेथेच ती शेवटपर्यंत होती.

रैदास, वल्लभसंप्रदायी विठ्ठलनाथ, तुलसीदास, जीवगोस्वामी इ. नावे मीरेचे दीक्षागुरू म्हणून घेतली जातात. तिच्या पदांत गुरू म्हणून रैदासाचे निर्देश अधिक आहेत; निर्णायकपणे तिचा एकच विशिष्ट गुरू ठरविणे अशक्य आहे. विविध भक्तीसंप्रदायांचा व साधनापद्धतींचा तिच्या संवेदनशील मनावर प्रभाव पडला असणे व त्यांतून तिने त्या त्या व्यक्तींचा आदराने निर्देश केला असणे शक्य आहे.

तिच्या रचनांबाबतही निश्चित माहिती उपलब्ध नाही. नरसीजी रो माहेरो, गीत गोविंदकी टीका, राग गोविंद, सोरठके पद, मीराँबाईका मलार, गर्वागीत, राग विहाग आणि फुटकर पद ह्या तिच्या रचना म्हणून सांगितल्या जातात; तथापि पदावलीचा अपवाद सोडल्यास वरील सर्वच रचनांचे तिचे कर्तृत्व शंकास्पद मानले जाते. पदावली ही तिची एकमेव, महत्त्वपूर्ण व प्रमाणभूत कृती म्हणतायेईल; तथापि पदावलीतील पदांची नेमकी संख्या अनिश्चित आहे. विविध संस्करणांतील तिच्या पदांची संख्या किमान २० व जास्तीत जास्त १३१२ अशी आढळते. तिच्या पदावलीची आजवर अनेक संस्करणे निघाली. त्यांतील मीराँबाईके भजन (लखनौ १८९८), मीराँबाईकी शब्दावली (अलाहाबाद १९१०), मीराँबाईकी पदावली (प्रयाग १९३२), मीरा की प्रेमसाधना (पाटणा १९४७), मीराँ स्मृतिग्रंथ (कलकत्ता १९५०), मीराँ बृहत्‌ पदसंग्रह (काशी १९५२), मीरा माधुरी (काशी १९५६), मीराँ सुधासिंधु (भीलवाडा १९५७) इ. संस्करणे उल्लेखनीय होत.

मीरेच्या भाषेचे मूळ रूप राजस्थानी असले, तरी तीत ब्रज व गुजरातीचेही बरेच मिश्रण आढळते. ही भाषा जुनी गुजराती व जुनी पश्चिमी राजस्थानी वा मारू गुर्जर म्हणता येईल. तिच्या रचनेत यांव्यतिरिक्त पंजाबी, खडी बोली, पूरबी इ. ज्या भाषांचे मिश्रण आढळते, त्याचे कारण तिच्या पदांचा झालेला प्रसार व त्यांची दीर्घकालीन मौखिक परंपरा हे होय. मीरेची पदे अत्यंत भावोत्कट व गेय असून ती विविध रागांत बद्ध आहेत. परशुराम चतुर्वेदी यांनी त्यांतील दोहा, सार, सरानी,उपमान, सवैया, चांद्रायण, कुंडल, तांटक, शोभन इ. छंद शोधून काढले आहेत. त्यांत विविध अलंकारांचाही वापर केला आहे; तथापि ह्या गोष्टींपेक्षा त्यांतील स्त्रीसुलभ आर्तता, आत्मार्पण भावना, भावोत्कटता व सखोल अनुभूतीच काव्यदृष्ट्या अधिक श्रेष्ठ ठरते. ‘मीरा के प्रभु गिरिधर नागर’ ही तिच्या अनेक पदांत येणारी नाममुद्राहोय.

ह्या पदांतील प्रमुख विषय भक्ती असला, तरी त्यांत वैयक्तिक अनुभव, कुलमर्यादा, गुरूगौरव, आप्तांशी झालेले मतभेद व त्यांनी केलेला छळ तसेच आराध्यदेवतास्तुती, प्रार्थना, प्रणयानुभूती, विरह, लीलामाहात्म्य, आत्मसमर्पण इ. विषयही आले आहेत. भक्त, संगीतप्रेमी व काव्यरसिक ह्या सर्वांनाच ही पदे कमालीची मोहिनी घालतात. कृष्णविरहाची पदे त्यांत संख्येने अधिक असून ती उत्कट व हृदयस्पर्शी आहेत.

नाभादास, प्रियादास, ध्रुवदास, मलूकदास, हरिराम व्यास इ. संतचरित्रकारांनी व संतांनी मीरेबद्दल अत्यंत आदराने गौरवोद्‌गार काढले आहेत. मध्ययुगीन राजस्थानी, गुजराती व हिंदी साहित्यात संत कवियित्री म्हणून मीरेचे स्थान अनन्यसाधारण आहे. भाषिक प्रदेशांच्या मर्यादा उल्लंघून भारताच्या कानाकोपऱ्यांत मीरेची भक्तिभावाने ओथंबलेली उत्कट पदे पोहोचलेली आहेत. अनुप जलोटा, लता मंगेशकर, एम्‌. एस्‌ सुब्बुलक्ष्मी ह्या प्रख्यात गायकांनी मीरेची पदे गायली असून त्यांच्या ध्वनिमुद्रिका अत्यंत लोकप्रिय आहेत. मंगेश पाडगावकरांनी मीरेच्या निवडक साठ पदांचे मराठीत रूपांतर केले आहे. (मीरा १९६५).

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate