অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मोगलकाळ

मोगलकाळ

हिंदुस्थानात तेराव्या शतकात मुस्लिम सत्तेचा उदय झाला आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) तिला अवनत अवस्था प्राप्त झाली. दिल्लीच्या सुलतानशाहीचा मोगलपूर्व काळ हा भारतातील मुस्लिम सत्तेचा पहिला कालखंड ठरतो. [→ मुसलमानी अंमल, भारतातील]. सुलतानशाहीच्या ऱ्हासानंतर साधारणतः इ. स. १५२६ ते १७०७ दरम्यानच्या काळाला मोगलकाळ ही संज्ञा रूढ झाली आहे. काही इतिहासकार मोगलकाळाची सांगता दुसरा बहादुरशाह याच्या पदच्युतीने झाली (१८५७) असे मानतात. या काळात मोगलांचे राज्य वाढतवाढत जवळजवळ सर्व हिंदुस्थानावर पसरले होते. इतिहासाच्या इतर कालखंडांप्रमाणेच मोगलकाळाबद्दलसुद्धा इतिहासकारांमध्ये एकवाक्यता आढळत नाही. राज्याची साधनसामग्री, साम्राज्यविस्तार, कला-वाङ्‌ममयीन क्षेत्रांतील निर्मिती, प्रशासन, लष्करी व्यवस्था, परराष्ट्रीय संबंध, व्यापार-उदीम आदी दालनांतील भरभराट यांमुळे मोगलकाळाने समृद्धीचा मोठा टप्पा गाठलेला होता.

ऐतिहासिक साधने

मोगलकाळाविषयीची ऐतिहासिक साधनसामग्री विपुल प्रमाणात उपलब्ध झाली आहे. तीत विविध प्रकारची नाणी, पुरातत्त्वीय अवशेष यांबरोबरच तुर्की, फार्सी, अरबी इ. भाषांत लिहिलेली आत्मचरित्रे, तवारिखा, फर्माने, पत्रे, आज्ञा इत्यादींचा भरणा आहे. आत्मचारित्रात तूझुक-इ-बाबुरी (बाबर) आणि तूझुक-इ-जहांगिरी (जहांगीर) ही अत्यंत महत्त्वाची असून काही सम्राटांनी राजदरबारातील इतिहासकारांकडून वृत्तांत (दिवान) लिहून घेतले. याशिवाय गॅझेटीअरच्या धर्तींवर व विशेषतः महसूलाच्या संदर्भात तयार केलेले दस्तूर-उल्-अमल आणि अखबारात-इ-दरबार-इ-मुअल्ला नावाचे वृत्तांत प्रसिद्ध आहेत. यांपैकी अनेकांचे विविध भाषांत भाषांतर झालेले आहे. बाबराच्या आत्मचरित्राचे नाव बाबरनामा किंवा तूझुक-इ-बाबरी असून त्यात पुढील कालखंडांतील- १५०८–१९, १५२०–२५ आणि १५२९–३०-घटनांची नोंद नाही. याखेरीज काही ऐतिहासिक कालखंड यात वगळलेले आहेत.

हुमायूनच्या हयातीत लिहिलेला कानून-ई-हुमायूनी हा ग्रंथ उपलब्ध आहे. घियासुद्दीन मुहम्मद ऊर्फ ख्वांदअमीर हा त्याचा लेखक. हुमायूनची फर्माने, तसेच तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीचे त्यात वर्णन मिळते. मिर्झा हैदर याने तारीख-इ-रशीदीमध्ये कामरानचा कंदाहार विजय, हुमायून व शेरशाहामधील कनौजचे युद्ध, हुमायूनचे पलायन, लाहोर येथे सर्व भावंडांचा मिलाफ, कामरानचा विरोध, काश्मीर विजय इ. घडामोडींचे वर्णन केले आहे. मीर अब्दूल लतीफ कजवीनी याने नफायसुल मआसिरमध्ये हुमायून, मिर्झा अस्करी, हिन्दाल, उमराव शमसुद्दीन, मुहम्मद अतगाखान, बैराम खान, अली कुली सुल्तान व अनेक कर्वीच्या जीवनाचा वृत्तांत रेखाटला आहे. बाबरची मुलगी गुलबदन बेगम हिने अकबराच्या सल्लानुसार हुमायूननामाची रचना (१५८०–९०) केली. बाबराबद्दलची व्यक्तिगत माहिती याच ग्रंथातून मिळते. बायजीद बिएत याने रचलेले तजकिरात-इ-हुमायूं व अकबर आणि जौहर आफताबचीचा तजकिरात-उल्-वाकिआत हे ग्रंथ हुमायूनकालीन घटनांचा ऊहापोह करतात. अबुल फज्ललिखित अकबरनामा, ख्वाजा निजामुद्दीन अहमदचा तबकात-इ-अकबरी, इब्राहिम इब्ने जरीरलिखित तारीख-इ-इब्राहिमी, मुल्ला अहमदकृत तारीख-इ-अलफी इ. ग्रंथ हुमायूनच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकतात. यांव्यतिरिक्त शेख रिज्कुल्लाह मुश्ताकीकृत वाकिआत-इ-मुश्ताकी, अब्दुल कादिर बदाऊनीलिखित मुन्तखाब-अल्-तवारिख अथवा तारीख-इ-बदाऊनी, फिरिश्ताकृत, (मोहम्मद कासिम हिंदू शाह)तारीख-इ-फिरिश्ता इ. ग्रंथांतही हुमायूनविषयी माहिती आहे. यांपैकी बहुतेक ग्रंथ फार्सीत असून ख्वांदअमीरलिखित कानून-ई.हुमायूनी व्यतिरिक्त इतर ग्रंथांची रचना अकबर किंवा जहांगीरच्या कारर्कीदीत झाली.

अकबरकालीन प्रमुख साधनांमध्ये विशेषतः फार्सी ग्रंथांचा अंतर्भाव होतो. शेख अबुल फज्ललिखित आईन-इ-अकबरी व अकबरनामाहे ग्रंथ क्रमशः अकबराच्या प्रशासकीय व शासकीय पद्धतींविषयीचे आहेत. ख्वाजा निजामुद्दीन तबकात-इ-अकबरीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अकबरनामा व्यतिरिक्त २८ ऐतिहासिक साधनांवर तो ग्रंथ आधारलेला आहे. अब्दुल कादिर बदाऊनी लिखितमुन्तखाब-अल्-तवारीख तीन खंडांत विभागला आहे. त्यात सबुक्तगीन ते हुमायून त्याचप्रमाणे अकबराचे समकालीन सूफी संत, कवी, विद्वान आणि वैद्य इत्यादींचा इतिहास समाविष्ट आहे. मुहम्मद अमीनचा अवाफौल-ए-अखबार, शेख अल्लादाद फैजी सरहिंदीचा अकबरनामा, शेख अबुल फज्लचा मक्तूबात-इ-अल्लामी व रुक्कात-इ-अबुल फज्ल, महम्मद शरीफ (मुतमिनखान) चाइकबाल-नामा-इ-जहांगिरी, ख्वाजा कामगारखानाचा मआसिर-इ-जहांगिरी, मुल्ला अब्दुल बाकी नहबन्दीचा मआसिर-इ-रहीमी, शाहनवाजखान औरंगाबादीचा मआसिर-उल्-उमरा, इनायत उल्लाचा तकमील-इ-अकबरनामा, हाजी मुहम्मद आरिफ कन्धारीचातारीख-इ-अकबरशाही, मीर मुहम्मद मासूमचा तारीख-इ-मासूमी, अहमद यादगारचा तारीख-इ-सलातीन-इ-अफगाना, नुर-अल्-हकचा जुबदत-उत्-तवारीख इ.अनेक ग्रंथ अकबरकालीन इतिहासावर प्रकाश टाकतात.

जहांगीरलिखित तूझुक-इ-जहांगिरी या ग्रंथास वाकियात-इ-जहांगिरी वा जहांगीरनामा, तारीख-इ-सलीमशाही, इकबालनामा इ. नावांनी संबोधिले जाते. जहांगीरचा सुरुवातीचा १८ वर्षांचा वृत्तांत त्यात मिळतो. मुतमद खानलिखित इकबालनामा-इ-जहांगिरीतीन भागांत विभागला आहे. कामगारखानरचित मआसिर-इ-जहांगिरी हा ग्रंथ अधिक विश्वसनीय असून अनेक प्रकरणांमध्ये तो विभागला आहे. शेख अब्दुल वहाबचा इन्तिखाब-इ-जहांगिरी, असद बेग (आजाद बेग) लिखित विकाया-इ-आजादबेग इ. इतर ग्रंथ जहांगीरचा इतिहास स्पष्ट करतात.

शाहजहानचा इतिहास सपष्ट करणारा प्रमुख ग्रंथ, दरबारी इतिहासकार मुहम्मह अमीन कजवीनीलिखित पादशाहनामा होय. यासशाहजहाननामा किंवा तारीख-इ-शाहजहानी दहसाल असे म्हणतात. अब्दुल-लाहुरी हमीद हा शाहजहानच्या दुसरा दरबारी इतिहासकार. त्याने पादशाहनाम्यात कजवीनीच्याच विचारांची पुनरावृत्ती केली आहे. त्याचा शिष्य मुहम्मद वारिस याने आपल्याशाहजहाननाम्यात उरलेली माहिती पूर्ण केली. इनायतखानाने (मुहम्मद ताहिर) व सादिकखानानेसुद्धा शाहजहाननाम्याची रचना केली. जलालुद्दीन तबातबाईकृत पादशाहानामा, मुहम्मद सालिहलिखित अमल-इ-सालिह, ईश्वर दास नागरांचा फुतूहात-इ-आलमगिरी, भीमसेनचा नुस्ख-इ-दिलकूशा, युसूफ मीरचा मजहर-इ-शाहजहानी, बख्तावर खानाचा मिरत-उल्-आलम, सुजानराय खत्रीचा खुलकस-तुल-तवारीख इ. ग्रंथ शाहजहानकालीन इतिहासाची मीमांसा करतात.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate