অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

यादव घराणे

यादव घराणे

यादव घराणे

महाराष्ट्रातील मध्ययुगातील एक इतिहास प्रसिद्ध राजघराणे. त्याची महाराष्ट्र व त्यालगतच्या प्रदेशावर पाचवा भिल्लम (कार. ११८५ – ९३) याच्या कारकीर्दीपासून यादव घराण्याच्या ऱ्हासापर्यंत (इ. स. १३१८) अधिसत्ता होती. या घराण्यातील राजे हे सुरुवातीस राष्ट्रकूटांचे मांडलिक असून पुढे दुसऱ्या भिल्लमाच्या कारकीर्दीत (इ.स. ९७५ –१००५) ते चालुक्यांचे (कल्याण) मांडलिक होते. या घराण्याची माहिती प्रामुख्याने त्यांच्या पुराभिलेखांतून (सु. पाचशे लेख) आणि हेमाद्रिलिखित चतुर्वर्ग चिंतामणि ग्रंथाच्या व्रतखंडातून मिळते. हे यादव आपणास श्रीकृष्णाचे वंशज म्हणवीत आणि 'द्वारावतीपुरवराधीश्वर') द्वारका या श्रेष्ठ नगरीचे अधिपती) असे बिरुद धारण करीत. या वंशातील पहिला ऐतिहासिक पुरुष दृढप्रहार (नवव्या शतकाचा प्रथमार्ध) हा होता. याची राजधानी चंद्रादित्यपुर (नासिक जिल्ह्यातील चांदोर) येथे होती; तर इतर काहींच्या मते ती श्रीनगर (सिन्नर?) येथे होती; दृढप्रहाराचा पुत्र पहिला

सेऊणचंद्र हा बलाढ्य झाला. त्याने आपल्या नावे सेऊणपुरनामक नगर स्थापून तेथे आपली राजधानी नेली. याच्या अंमलाखाली असलेल्या नासिक, नगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांच्या प्रदेशाला सेऊणदेश असे नाव पडले. यात मुख्यतःखानदेशचा भूप्रदेश होता.

पुढे सेऊणचंद्राच्या वंशातील वद्दिग याने राष्ट्राकूट तिसरा कृष्ण याचे स्वामित्व स्वीकारले; पण नंतर राष्ट्रकूट सत्तेचा ऱ्हास होत असताना या वंशातील दुसऱ्या भिल्लमाने उत्तरकालीन चालुक्यांचे मांडलिकत्व स्वीकारून तैलपाला वाक्पती मुंजाबरोबरच्या युद्धात साहाय्य केले.

यानंतर बाराव्या शतकाच्या अखेरीस या वंशात पाचवा भिल्लम (कार. सु. इ. स. ११८५–९३) हा बलाढ्य राजा उदयास आला. त्याने उत्तरकालीन चालुक्यांनंतर प्रबळ झालेल्या कलचुरींचा पराभव करून चालुक्यांच्या साम्राज्याचा बराचसा भाग काबीज केला आणि आपल्या राज्याची दक्षिण सीमा कृष्णा नदीपलीकडे नेली. नंतर त्याने आपली राजधानी देवगिरी (दौलताबाद) येथे नेली आणि तेथे स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला.

पाचव्या भिल्लमाला होयसळांशी दीर्घकाळ झगडावे लागले. शेवटी लोक्किगुंडी येथील लढाईत त्याचा सेनापती जैत्रसिंह याचा पराभव होऊन विजयश्रीने होयसळास माळ घातली.

भिल्लमानतंर त्याचा पुत्र जैत्रपाल किंवा जैतुगी गादीवर आला. त्याने काकतीय राजा महादेव याचा रणांगणांवर वध करून त्याचा मुलगा गणपती याला कैदेत टाकले, पण पुढे त्याला मुक्त करून त्याचे राज्य त्यास परत दिले.

जैतुगीचा मुलगा दुसरा सिंधण (कार. १२१०-४६) गादीवर आला. हा महाप्रतापी निघाला. याने होयसळ नृपत्ती वीर बल्लाळाचा पराभव करुन कृष्णा अणि मलप्रभा नद्यांच्या दक्षिणेचा मुलूख परत मिळविला. काकतीय गणपतीला व खानदेशमधील पिंपळगाव तालुक्यातील भंभागिरी (भामेर) च्या लक्ष्मीदेवाला जिंकले, कोल्हापूरच्या वायव्येस २० किमी. वर असलेल्या पन्हाळा किल्ल्यात आश्रय घेतलेल्या शिलाहारवंशी ⇨ दुसरा भोज याचा पराभव करून त्याला बंदीत टाकले, शिलाहारांचे राज्य खालसा केले आणि चांद्याच्या परमार भोजदेवाला शरण आणले. उत्तरेत माळव्याच्या अर्जुनवर्मदेवाचा पराभव करून त्याच्या खोलेश्वर सेनापतीने वाराणसीपर्यंत चढाई केली आणि तेथील रामपाल राजाला पळवून लावले. तसेच गुजरातच्या लवणप्रसाद वाघेल्याला शरण आणले आणि भृगुकच्छ (भडोच) च्या सिंधुराजाचा पाडाव केला.

सिंघणाचे दक्षिणेतील विजय, सेनापती बीचण आणि उत्तरेतील सेनापती खोलेश्वर याने मिळविले होते. खोलेश्वर मूळचा विदर्भातील होता. त्याने विदर्भात अनेक देवालये बांधली व अग्रहार स्थापन केले. त्यापैकी एक अग्रहार सध्या अमरावती जिल्ह्यात खोलापूर गावच्या रूपाने विद्यमान आहे.

सिंघणानंतर त्याचा नातू कृष्ण (कार. १२४६ – ६१) गादीवर आला; कारण सिंघणाचा पुत्र जैतुगी त्याच्या हयातीतच निधन पावला होता. कृष्ण हाही शूर होता. त्याने गर्जर नृपती चौलुक्यवंशी वाघेला वीसलदेव, मालवराजा जैतुगिदेव, चोल नृपती राजेंद्र (तिसरा) व कोसल देशांच्या राजांवर विजय मिळविले. यातील कोसल नृपती छत्तीसगढातील तिसऱ्या जाजल्लदेवाचा उत्तराधिकारी असावा, पण त्याचे नाव माहीत नाही. कृष्णराजाने अमरावतीजवळ खंडेश्वर येथे एक देऊळ बांधले. त्यात त्याच्या काळचा १२५४ - ५५ चा एक शिलालेख आहे.

कृष्णानंतर त्याचा मुलगा रामदेव याला गादी मिळावयास पाहिजे होती, पण तो अल्पवयी असल्याने कृष्णाचा धाकटा भाऊ महादेव (कार. १२६१ – १२७०) राज्य करू लागला. त्याच्या काळची मुख्य महत्त्वाची घटना म्हणजे उत्तर कोकणचा शिलाहार राजा सोमेश्वर याचा त्याने केलेला पराभव. त्याने त्याचा प्रदेश आपल्या राज्यास जोडला. सोमेश्वराचा जमिनीवर पराभव झाल्यावर तो आपल्या जहाजात बसून समुद्रात गेला, पण तेथेही महादेवाच्या आरमाराने त्याला जलसमाधी दिली. या युद्धाचे वर्णन करताना हेमाद्रीने म्हटले आहे की, ‘महादेवाच्या प्रतापापेक्षा वडवानलाला तोंड देणे सोमेश्वरला जास्त पसंत पडले’. महादेवाच्या पूर्वीच्या यादवांनी माळवा व तेलंगण या प्रदेशांवर आक्रमण केले होते. पण महादेवाने तसे केले नाही. याचे कारण माळव्याच्या राजाने आपल्या लहान मुलाला गादी देऊन तो स्वतः तपश्चर्येला निघून गेला. तेलंग्यांनी तर एका स्त्रीला (रुद्रम्माला) गादीवर बसविले, असे हेमाद्रीने म्हटले आहे.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate