অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रंगो बापूजी

रंगो बापूजी

रंगो बापूजी

(एकोणिसावे शतक). सातारचे ⇨प्रतापसिंह भोसले (कार. १८०८−१८३९) यांचा निष्ठावान सेवक, मुत्सद्दी व वकील. त्याचे पूर्ण नाव रंगो बापूजी गुप्ते-देशपांडे. त्याचा जन्म शिवकालात प्रसिद्धीस आलेल्या रोहिडखोऱ्याच्या दादाजी नरस प्रभू या मावळ्यातील ऐतिहासिक घराण्यात झाला. त्याची जन्मतिथी, स्थल आणि बालपण यांविषयी अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही. छ. प्रतापसिंह वासोटा किल्ल्यात बाजीरावाच्या नजरकैदेत असताना त्यांच्या विपन्नावस्थेची हकीकत इंग्रजांपर्यंत पोचविणे,गव्हर्नर एल्‌फिन्स्टनच्या साहाय्याने त्यांची सुटका करणे इ. कामी इतरांबरोबर रंगो बापूजीने महत्त्वाची कामगिरी बजावली होती. हा प्रतापसिंहांकडे राहिला तर ते कंपनीस धोक्याचे ठरेल, असे वाटून कंपनी सरकारने त्यास परगणे नासिक येथे अमीन (मामलतदार) म्हणून नेमले. होळकर-इंग्रज यांतील मेहिदपू (मध्यप्रदेश−उज्जैनच्या उत्तरेस सु. ५० किमी.) येथे झालेल्या संघर्षात तो कॅप्टन ब्रिग्जबरोबर होता (१८१७).

१८२० साली तो परगण्याचा अमीन होता. जिवापेक्षा अधिक श्रम करून आपण कंपनीची चाकरी केल्याचा त्याने निर्वाळा दिला होता; तथापि १८३१ च्या सुमारास त्याने कंपनीची नोकरी सोडली व तो परत छत्रपतींच्या सेवेत रूजू झाला. तत्पूर्वी १८३० मध्ये अक्कलकोट येथे इंग्रज आणि सातारकर यांच्या सत्तेविरुद्ध पुकारलेल्या बंडातही सातारकरांतर्फे तो सामील झाला असावा.

प्रतापसिंह महाराजांना इंग्रजांनी पदच्युत केल्यानंतर (१८३९) महाराजांची कैफियत कंपनी सरकारपुढे मांडण्यासाठी तो ३० जून १८४० रोजी विलायतेत दाखल झाला. मिलन, कॅप्टन कोगन या इंग्रजांनी त्यास मुंबईत मदत केली. कॅप्टन कोगन यास द. म. २,००० रु. पगार देऊन लंडनमध्ये शिष्टाई करण्याचे काम दिले व या कामासाठी महाराजांनी एकूण ५० हजार रुपये रंगो बापूजीकडे सुपूर्द केले. महाराजांना न्याय मिळेल याची खात्री न वाटल्याने रंगो बापूजीसह सर्व शिष्टमंडळ मायदेशी परत येण्यास निघाले. पुन्हा एकदा प्रयत्‍न करून पाहू, या उद्देशाने मॉल्टाहून रंगो बापूजी परत लंडनला गेला. प्रतापसिंह राजाची संपूर्ण हकीकत मोडी लिपीत त्याने छापूनकाढली (१८४३). इंग्रजी भाषेचा अभ्यास करून त्याने अनेक पत्रे लिहिली. फेब्रुवारी १८४३ मध्ये त्याने कंपनीच्या प्रोप्रायटर्ससमोरभाषण केले. या सर्व कामात त्याला मोठे कर्ज झाले. महाराजांच्या मृत्यूनंतरही (१८४७) पुढे ६ वर्षे इंग्लंडात राहून त्याने आपली बाजूमांडण्याचा अयशस्वी प्रयत्‍न केला.

मायदेशास परत येण्याच्या सुमारास ग्रँट डफ, ब्रिग्ज, रॉबर्टसन, इत्यादी त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याला एक चांदीचे तबक प्रदानकेले (१८५४). त्यावर ‘चौदा वर्षे इंग्लंडात धन्याची एकनिष्ठेने सेवा बजावणारा रंगो बापूजी यास त्याच्या चाहत्यांनी वर्गणी जमवून तेतबक नजर दिले’, असा मजकूर स्वदस्तुरीने इंग्रज मित्रांनी कोरला आहे.

साताऱ्यास परत आल्यावर १८५७ च्या उठावाचा लाभ घेऊन छत्रपतींचे राज्य परत मिळविण्याचा त्याने पुन्हा प्रयत्‍न केला. मांग,रामोशी, सरकारी कारकून, घोडदळ यांना आमिषे दाखवून त्याने आपल्या कटात सामील करून घेतले. परळी-दरोडा प्रकरणात त्यानेपुढाकार घेतला. सातारा आणि महाबळेश्वर येथील इंग्रज अधिकाऱ्यांना मारणे, खजिना लुटणे इ. उद्योगही त्याने केले; पण हा कटफसला आणि ५ जुलै १८५७ रोजी रंगो बापूजी भूमिगत झाला. त्यानंतरचा त्याचा इतिहास अज्ञात आहे. पत्नी काकई वयाच्या ८०−८२व्या वर्षी मरण पावली. त्याचा मुलगा सीताराम रंगो यास कटाच्या आरोपावरून पकडून सातारा येथे फाशी देण्यात आले.

 

संदर्भ : १. ठाकरे, केशव सीताराम, प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी, मुंबई, १९४८.

२. सरदेसाई, गो. स. मराठी रिसायत, उत्तर विभाग−३, (१७९५−१८४८), १९२९.

३. खोबरेकर, वि. गो. इंग्रजी सत्तेविरुद्ध महाराष्ट्रातील सशस्त्र उठाव, मुंबई, १९५९.

कुलकर्णी, अ. रा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate