অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रट्ट घराणे

रट्ट घराणे

रट्ट

कर्नाटकातील एक प्राचीन राजघराणे. या घराण्याचा रट्टगुडी किंवा रट्टगुड्लू असाही उल्लेख करतात. या घराण्याचा संस्थापक पृथ्वीराम. या घराण्याचा अंमल इ. स. ८५० ते १२५० दरम्यान कलदारि-बेळगावच्या परिसरातल्या कुंडी नामक प्रदेशावर होता. प्रथम त्यांची राजधानी सुगंधवर्ती (सौंदत्ती-बेळगाव जिल्हा) येथे असून नंतर वेळुग्राम (विद्यमान बेळगाव) येथे होती. प्रारंभी ते राष्ट्रकूटांचे मांडलिक (इ. स. ८७५–९७३) असून नंतर त्यांनी कल्याणीच्या चालुक्यांचे मांडलिकत्व (इ. स. ९७३–११७०) अंगीकारले. बाराव्या शतकाच्या अखेरीस ते स्वतंत्र झाले. रट्टांचा इतिहास प्रामुख्याने त्यांच्या कोरीव लेखांवरून ज्ञात होतो. हे कोरीव लेख बेळगाव जिल्ह्यातील वटनल, सोगळ, मुत्‌वाड, नेसर्गी, कलहोळे व खानापूर तसेच कोल्हापूर संस्थानातील रायबाग या ठिकाणी शेकडोंनी मिळाले आहेत; तथापि या घराण्याची संपूर्ण विश्वासनीय वंशावळ व राजांचे काल अद्यापि ज्ञात झालेले नाहीत.

रट्ट राजे आपला उल्लेख महामंडलेश्वर या उपाधीने करीत असत. याशिवाय त्यांनी लट्टलुपूर्वारधीश्वर किंवा लट्टनूर-पूर्वारधीश्वर ही बिरुदेही धारण केली होती. काही राजे उदा., एरग, आपल्यामागे रट्ट नारायण, रट्ट मार्तण्ड याही उपाध्या लावीत. कोन्नूर येथील ताटेश्वरदेवाच्या मंदिरातील शिलालेखात कार्त्तवीर्य या रट्ट राजाचा उल्लेख चक्रवर्ती असा केला आहे. रट्टांचा सुवर्णगरुडध्वज होता. एका ताम्रपटावर गरुडप्रतिमेची त्यांची मुद्रा आढळली आहे. या घराण्यातील एरग, सेन, दुसरा व चौथा कार्त्तवीर्य, मल्लिकार्जुन,लक्ष्मीदेव इ. राजांची नावे ज्ञात असून ते प्रजाहितदक्ष होते, असे उल्लेख येतात.

हे रट्ट राजे जैनधर्मी असले, तरी त्यांनी सहिष्णू धोरण अवलंबिले होते. त्यामुळे जैन मंदिरांप्रमाणेच शिवाची देवालयेही त्यांनी बांधली आणि पूजाअर्चेसाठी दाने दिली. त्यांच्या पदरी अनेक विद्वान, कवी व लेखक असत. अशा काही तत्कालीन प्रसिद्ध व्यक्त्तींची नावे कोरीव लेखांतून आढळतात. त्यांपैकी गुरुवर्य मुनिचंद्र देव, मुल्लभट्टारक, गुणकीर्ति, इंद्रकीर्त्तिस्वामी, कनकप्रभावदेव हे कार्यक्षम प्रशासक असून त्यांचा रट्ट राजांवर प्रभाव होता. कन्नड कवी कमलादित्य, जैन कवी कर्णपय्य आणि नेमिचंद्र हे पहिल्या कार्त्तवीर्याच्या दरबारातील सन्मानित विद्वान होते. याशिवाय बालचंद्र, पार्श्वपंडित, कनकप्रभा, सिद्धान्तदेव हे बहुभाषिक असून सिद्धान्तदेव हा तीन वेदांत पारंगत होता.

प्रशासनाच्या सोयीसाठी रट्टांच्या राज्याचे नेसर्गी, सौंदत्ती, हुबळी, बनिहल्ली, वेळुग्राम, बेलवोळा, बनवासी इ. स्वतंत्र भागांत विभाजन केलेले होते. याशिवाय खेड्यांची व्यवस्था ग्रामपंचायतीमार्फत केली जाई. त्यांच्या सभासदांना महाजन म्हणत. गामुण्ड किंवा गौड नावाचा अधिकारी या सभेचा प्रमुख असे आणि वंशपरंपरागत हे पद त्याच्या घराण्यात येई. अशा पाच-सहा गामुण्डांच्यावर एक नायक नावाचा अधिकारी असे. नेसर्गीच्या नायकाचा (हब्बेन) उल्लेख कोरीव लेखात येतो. सर्व खेड्यांची सभा होई, तिला महानाडू म्हणत. व्यापाऱ्यांच्याही श्रेणी होत्या. त्या श्रेणींचा बेडिचिलगल नावाचा व्यापारी प्रमुख होता. कृषी हाच प्रमुख व्यवसाय होता. शेतसारा हा सर्वात महत्त्वाचा महसूल होता. दण्ड्य आणि प्रतिसिद्य नावाचे दुसरे कर होते. जमिनीची मोजणी करणे, सीमा ठरविणे,जलसिंचनाची व्यवस्था करणे यांकरिता स्वतंत्र अधिकारी असत. भूमापनासाठी निवर्तन परिमाण प्रचारात होते. फुलबाग, फळबागा यांची विशेष काळजी घेण्यात येई.

राजा हा शासनाचा प्रमुख होता. दण्डनायक हा सैन्याचा प्रमुख असे. चामंड आणि निंब या दोन सेनाप्रमुखांची नावे कोरीव लेखांत डोकावतात. राजा मंत्रिगणाच्या सल्ल्याने व सहकार्याने सर्व कारभार करीत असे. या मंत्र्यांपैकी बिजराज नावाच्या प्रधान मंत्र्याचे नाव कोरीव लेखात आढळते. वैजन हा दुसरा एक मंत्री होता. त्याच्याकडे शांततेच्या काळात करमणूक आणि युद्धाच्या वेळी राजालासमयोचित सल्ला देण्याचे महत्त्वाचे काम असे. राजा युवराजाची निवड आपल्या चाणाक्ष मुलांतून किंवा लहान भावांतून करी आणि त्यांना लढाईत व प्रशासनात सामावून घेई.

दुसरा लक्ष्मीदेव हा रट्ट घराण्यातील शेवटचा राजा. त्याचे यादव राजा दुसरा सिंधण (कार. १२१०–४६) याच्याशी बिनसले. तेव्हा सिंधणाने सेनापती बिचण यास त्याच्यावर धाडले. दोघांमध्ये १२२८–३८ दरम्यान केव्हातरी युद्ध होऊन रट्टांचा पराभव झाला. काही इतिहासकारांच्यामते ही घटना १२५० मध्ये घडली असावी. सिंधणाने बिचणाला तेथील प्रशासक नेमून पुढे त्याला जहागीरदाराचा दर्जा दिला.

 

संदर्भ : 1.Fleet, J. F. The Dynasties of the Kanares districts, Calcutta, 1896.

2. Murthy, Krishna K. Social and Cultural Life in Ancient India. Delhi, 1982.

3. Saletore, B. A. Ancient Karnataka, Poona, 1936.

देशपांडे, सु. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate