অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राजदप्तरविद्या

राजदप्तरविद्या

राजदप्तरविद्या

(डिप्लोमॅटिक्स). प्राचीन भारतातील नृपती परराज्याशी केलेले करारमदार सरदार-सरंजामदारांस दिलेल्या सनदा, प्रजेच्या कल्याणासाठी काढलेले जाहीरनामे, बक्षीसपत्रे, हुकूमनामे आदी महत्त्वाचे दस्तऐवज एका सिबंद पेटीत आपल्याजवळ प्रासादात वा जामदारखान्यात ठेवीत असत. ह्यासच पुढील कालात राजदप्तर हे नामाभि धान प्राप्त झाले. राजदप्तरविद्या म्हणजे अशा ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास. कागद वापरात येण्यापूर्वीही हे लिखाण ताम्रपट, चामडे, रेशमी कापड, साधे कापड, भूर्जपत्रे व ताडपत्रे यांवर होत असे.

चिन्यांनीइ. स. १०५ च्या सुमारास शोधून काढलेला कागद इ. स. १००० नंतर हिंदुस्थानात वापरला जाऊ लागला. मुसलमानी अंमल दिल्लीत इ. स. १२०६ मध्ये सुरू झाला. त्यावेळेपासून राज्यकारभाराचे काम कागदावर सुरू झाले. मोगल राज्यास कागझी राज्य म्हणजे कागदावर चालणारे राज्य असे म्हणत मुसलमानांनी आपले दप्तर बगदादच्या खलीफाच्या धर्तीवर फार्सी भाषेत राखले. शाही दप्तर दरोगा नावाच्या बादशहाच्या वजीराच्या हाताखालील अंमलदाराच्या ताब्यात असे. ते वजीराच्या महालात एका स्वतंत्र खोलीत जतन करून ठेवीत. शाही दप्तरात फर्माने, परराज्याशी झालेले करार, तहनामे, दरबारी हुकूम, महजर यांचा अंतर्भाव असे.

वरील महत्त्वाच्या कागदांशिवाय राज्याचे बाकीचे दप्तर ठेवण्यासाठी राजधानीत राज निवासाजवळ दप्तरखाना असे. फतेपुर सीक्री येथील किल्ल्यामध्ये दप्तरखान्याची जागा पाहावयास मिळते. ही जागा म्हणजे एक प्रशस्त दिवाणखाना होय. याची लांबी १५ मी. आणि रूंदी ८५ मी., बाजूला ओसरी व लागून अंगण (आवार) आहे. आग्रा येथील दप्तरखान्याची जागा परदेशी प्रवाशांनी पाहिली होती. १६४० साली भारतात आलेला प्रवासी सेबॅस्टीयन मनरिक म्हणतो, ‘कोठीच्या समोरच्या प्रसादात सर्वाधिकारी सुलतान रहात असून त्याने काढलेले जाहीरनामे, दिलेल्या सनदा, लिहिलेल्या पत्रांचे तर्जूमे (प्रती) वगैरे सर्व दप्तरखान्यात ठेवलेले असत’.

बादशाह दौऱ्यावर किंवा स्वारीवर गेला, म्हणजे आपल्या बरोबर शाही दप्तर घेत असे; कारण हुकूम सोडताना पूर्वीचे सर्व कागदपत्र पहावे लागत. त्यास चलतेदप्तर असे म्हणत. अकबर बादशाहाने काबूलवर स्वारी केली, तेव्हा स्वारी बरोबर शाही दप्तरातील कागदपत्रे उंटांच्या पाठीवरून वाहून नेल्याचे उल्लेख आहेत.

हीच पध्दत औरंगजेबाने चालू ठेविली. औरंगजेबाने काश्मीरवर १६६२ मध्ये स्वारी केली. तेव्हा स्वारीबरोबर शाही दप्तर होते; ते वाहून नेण्यास ८० उंट, १३ हत्ती, २० बैलगाड्या लागल्या असे निफोलाव मनुची सांगतो. शिवाजींचा दप्तरखाना रायगडावर होता, असे कानुजाबता सांगतो. तो झल्फिकार खानाने १६८९ मध्ये किल्ला काबीज केल्यावर जाळून टाकला. शिवकाली राजदप्तर चिटणीसांच्या ताब्यात असे. पुढे छ. संभाजीबरोबर खंडो बल्लाळ चिटणीस लेखन-साहित्य घेऊन, आलेल्या पत्रांना उत्तरे लिहून पाठवीत असे.

मराठेशाहीच्या राज्यकारभाराची इत्थंभूत माहिती सांगणाने ते पेशवेदप्तर. ह्या दप्तरात १७३६-३७ मध्ये एकूण अधिकारी व कारकून मिळून एकंदर ३६ माणसे काम करीत होती. त्यांच्या वेतनावर रू. १८,५०५ वार्षिक खर्च होत असे.

माधवराव पेशव्यांच्या कालापासून ह्या दप्तराचे सहा भाग करण्यात आले. त्यांपैकी एक बेरजी व चलते दप्तर, हे त्या दप्तरातील मोठे विभाग होत. एक बेरजी हे पुण्यास स्थानिक असणारे दप्तर. चलते दप्तर हे हुजूरांबरोबर फिरणारे दप्तर होते. पुण्याच्या पेशवेदप्तरात रोजकीर्दी म्हणून विभाग आहे. त्यात सु. ८५० रूमाल रोजकीर्दीचे आहेत. त्या सर्व रोजकीर्दी बहुतेक स्वारीत लिहिलेल्या आहेत. रोजकीर्दीत पोता (पोता सांभाळणारे पोतेदार-पोतदार-पोडदार), रवासुदगी (पावती) व दफाता (स्मरणवही, घडलेल्या गोष्टींचे यंत्रण) असे तीन भाग येतात.

दफाता रोजकीर्दीत नेहमी शेवटी येतो. ह्या भागात इनाम देणे, खालसा करणे, गाव, प्रांत यांचे मक्ते देणे, वसुली, कामगारांच्या नेमणुका करणे वगैरेंच्या नोंदी सापडतात. इनाम कमिशन जहागीरदार व इनामदार यांचा दावा खरा किंवा खोटा होता, ह्याचा निर्णय ठरविण्याच्या कामी दफातातील नोंदींचा उपयोग करी. रोजकीर्दीवरून पेशव्यांच्या हालचालींचे व स्वाऱ्यांचे मुक्काम देता येतात. माधवराव पेशव्यांचे कारकर्दीत चलते दप्तरात एकूण ८८ आसामी काम करीत होते. ह्याचे कारण राज्याच्या विस्ताराबरोबर दप्तरांचा विस्तारही वाढला होता.

अष्टीच्या लढाईतून दुसऱ्या बाजीराव पेशव्याने जेव्हा पळ काढला, तेव्हा त्याजबरोबर खजिना आणि हुजूर दप्तर होते. शिंदे, होळकर, पटवर्धन तसेच राजपुतादी राजांचे राजदप्तर खानगी खात्याकडे असे.

इंग्रजांच्या वखारींत बारनिशी व रोजनिशी ठेवली जात असे. त्यांत फार्सी, मराठी, इंग्रजी इ. पत्रांची आवक-जावक नोंदवही असे, यांवरून इंग्रजांनी केलेले तहनामे व याद्या उपलब्ध झाल्या. ‘सिक्रेट अँड पोलिटिकल डिपार्टमेंट डायरीज’ या शीर्षकाखाली तो पत्रव्यवहार (१८२० पर्यंत) आहे. हा पत्रव्यवहार महत्त्वाच्या राजकीय घटनांनी भरला आहे. पुढे प्रत्येक खात्याची सरकारी कार्यवृत्ते अकारविल्हे लावण्यात आली. १९२० नंतर मॅक्सवेलची फाइल पद्धत अस्तित्वात आली. स्वातंत्र्योत्तर काळात त्रिवर्णी फाइल पद्धत अंमलात आली.

यूरोपात कागदपत्रे लिखाणाचा इतिहास ग्रीस आणि रोमन राज्यांच्या अस्तित्वापासून सापडतो. अथेन्स राजवटीत लिहिलेले लेख इ. स. पू. ३६० मध्ये ‘मदर ऑफ द गॉडेस’ या प्रार्थना मंदिरात एकत्र करून ठेवले. प्राचीन आणि मध्यमयुगीन यूरोपातील खाजगी व्यक्तींनी अगर संस्थांनी लिहिलेले कोरीव लेख यांची जपणूक रोमन आणि ग्रीक कालात शासनाने केली. नगरपालिकांसाठी केलेले कायदे तसेच त्यांच्याकडील आर्थिक व्यवहारांचे अभिलेख व जन्मनोंदी, दत्तकनोंदी, राजांच्या वंशावळी,मिळकती तसेच इतर व्यवहार यासंबंधीचे अभिलेख इ. स. ५३० पासून जपून ठेवलेले आढळतात.

धार्मिक संस्था, सत्पात्र व्यक्ती किंवा अधिकारी यांना दिलेले दानलेख, दान घेणाऱ्यांच्या वंशावळी, दानभूमीचा तपशील ह्या नगरपालिका व प्रांतिक सरकारे यांनी जपून ठेवलेल्या आढळतात. दहाव्या व अकराव्या शतकांपासून यूरोपात चर्च या संस्थेकडून पुराभिलेखांचे संरक्षण पद्धतशीरपणे होऊ लागले. पुष्कळशा चर्चमधील पुराभिलेख संग्रहांत आठव्या व नवव्या शतकांतील कागदपत्रे सापडतात.

सतराव्या शतकाच्या सुरुवातीस पाचवा पोप पॉल याने प्रिव्ही व्हॅटिकन पुराभिलेखागाराची स्थापना केली, तर इटलीमध्ये ती अकराव्या शतकापूर्वीच स्थापन झाली होती. इंग्लंडमधील सर्वांत जुना पुराभिलेख इ. स. ११३० चा आहे. इ. स. १३२३ मध्ये उपलब्ध अभिलेखांची पहिली सूची तयार झाली.

सतराव्या शतकात राजदप्तर व प्रशासनावर अनेक पुस्तिका निघू लागल्या. राजदप्तर या विषयावरील पहिला ग्रंथ दी रे दीप्लोमॅतिका (१६८१) हा झां माबीयोन या धर्मगुरूने इ. स. १६८१ मध्ये प्रसिद्ध केला. या ग्रंथाच्या शीर्षकावरून डिप्लोमॅटिक्स हा शब्द प्रचारात आला. यात राजा व त्याचे पुत्र यांनी शपथपूर्वक केलेल्या सत्कृत्यांचा समावेश होतो.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate