অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राजपुतांचा इतिहास

राजपुतांचा इतिहास

राजपुतांचा इतिहास

मध्ययुगात राजस्थान आणि त्याच्या आसपासच्या भागात वर्चस्व प्रस्थापित करणारे बहुविध राजवंश. राजस्थानात उदयास आलेल्या राजवंशांना राजपुत्र अशी संज्ञा आहे. राजपूत हा तिचा अपभ्रंश होय. संस्कृतातील ‘राजन्य’ शब्दासारखाच राजपूत याचा क्षत्रिय या अर्थी उपयोग होतो. राजपुतांच्या वंशाविषयी विद्वानांनी भिन्न मते व्यक्त केली आहेत. टॉडच्या मते राजपूत हे मध्य आशियातील शकांचे वंशज होत. व्हिन्सेन्ट स्मिथचे मत होते, की राजपूत हे इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकांत भारतात घुसलेल्या परकी टोळ्यांतून उत्पन्न झालेले गुर्जर होत. देवदत्त भांडारकरांनी असे दाखविण्याचा प्रयत्न केला, की गुर्जर हे हूणांबरोबर भारतात येऊन स्थायिक झालेले खिजर होत.

चंद बरदईच्या पृथ्वीराज रासो मध्ये असे म्हटले आहे, ‘की जेव्हा पृथ्वी म्लेच्छांच्या छळाने त्रस्त झाली, तेव्हा वसिष्ठाने आपल्या होमकुंडातून परमार, चालुक्य, परिहार (प्रतीहार) आणि चाहमान या चार वीरपुरुषांना एकामागून एक उत्पन्न केले’. म्हणून या राजपूत कुलांना अग्निकुले असे म्हणतात. या गोष्टीचा अर्थ देवदत्त भांडारकरांनी असा लावला, की हे राजवंश परकी असल्यामुळे त्यांना होमहवनाने शुद्ध करून घेऊन क्षत्रिय मानण्यात आले. प्रतीहारराजे स्वतःस गुर्जर म्हणवत याचा ही त्यांनी निर्देश केला. याच्या उलट चिंतामणराव वैद्यांनी असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, की ही चारी कुले अस्सल क्षत्रिय जातीची होती. काही विद्वानांनी प्रतीहारांना गुर्जर म्हणण्याचे कारण ते मूळचे राजस्थानातील गुर्जरच्या प्रदेशांतून आले हे होय, असे प्रतिपादिले आहे. तेव्हा राजपुतांच्या उत्पत्तीचा प्रश्न  अत्यंत वादग्रस्त झाला आहे.

सातव्या शतकाच्या आरंभी राजस्थानात नवीन राज्ये उदयास आलेली दृष्टीस पडतात. भिल्लमाल आणि अबू येथे चापोत्कट (चावडा), मांडव्यपुर (मंडोर) येथे प्रतीहार, मेवाडात गुहिलपुत्र (गुहिलोत), चितोड आणि कोटा येथे मौर्य राजवंश राज्य करीत असल्याचे तत्कालीन कोरीव लेखांवरून आढळते. ७११ मध्ये अरबांनी सिंधवर स्वारी केली आणि लवकरच सर्व सिंध पादाक्रांत करून मुलतान जिंकून घेतले; कनौज आणि काश्मीरला शह दिला.

७२६ च्या सुमारास सिंधचा राज्यपाल जुनैद याच्या नेतृत्वाखाली त्यांनी सौराष्ट्र, राजस्थान, माळवा आणि गुजरात या प्रदेशांवर स्वाऱ्या करून सैंधव, कच्छेल्ल, मौर्य आणि गुर्जर राजांचा उच्छेद केला आणि दक्षिणापथ जिंकण्याच्या उद्देशाने गुजरात नवसारीपर्यंत धडक मारली, पण तेथे तरुण चालुक्य वंशी अवनिजनाश्रय पुलकेशी याने त्यांच्याशी घनघोर युद्ध करून त्यांचा पुरा मोड केला आणि त्यांच्या टोळधाडीपासून दक्षिण भारताचे संरक्षण केले.

सिंधमध्ये अरबांनी घातलेला धुमाकूळ आणि सौराष्ट्र, राजस्थान आणि माळवा येथे त्यांनी मिळविलेले विजय तसेच त्यांची क्रूर आणि विध्वंसक कृत्ये, बळजबरीचे धर्मपरिवर्तन आणि जनतेचा छळ ही लक्षात घेता पुलकेशीच्या या विजयाचे महत्त्व ध्यानात येईल. त्यायोगे हर्षनिर्भर होऊन बादामीच्या चालुक्य सम्राटाने पुलकेशीवर ‘दक्षिणापथसाधार’, ‘चलुक्किकुलालंकार’, ‘पृथिवीवल्लभ’ आणि ‘अनिवर्तकनिवर्तयिता’ अशा पदव्यांचा वर्षाव केला. या युद्धाचे रोमहर्षक वर्णन पुलकेशीच्या ताम्रपटात आले आहे.

राजस्थानातील चाप व मौर्य राजवंश या आपत्तीतून वर येऊ शकले नाहीत. पण प्रतीहार, चाहमान आणि गुहिलपुत्रांनी अरबांना लवकरच पिटाळून लावले आणि उत्तर हिंदुस्थानचे त्यांच्या अत्याचारांपासून रक्षण केले. पुढे तर त्यांनी विशाल आणि सुसमृद्ध अशी साम्राज्ये स्थापून अरबांप्रमाणेच तुर्की आणि मोगल आक्रमकांशी शतकानुशतके लढा दिला आणि स्वधर्म व स्वदेश यांचे रक्षण केले.

राजपुतांच्या सर्वच कुळ्या अस्सल भारतीय क्षत्रिय वर्णाच्या होत्या असे नाही. भारतात यवन, शक, पल्हव, कुशाण, हूण इ. अनेक परकी जमातींची आक्रमणे झाली, कालांतराने त्यांनी भारतीय धर्म व संस्कृती स्वीकारली आणि ते भारतीयांत मिसळून गेले. विदिशेजवळ तक्षशिलेल्या यवनराजाचा दूत हेलिओडरस याने उभारलेला गरुडध्वज आहे. त्यावरील लेखात तो आपला भागवत (भगवान विष्णूचा उपासक) असा निर्देश करतो. मनुस्मृतीत (१०,४३-४४) म्हटले आहे की कांबोज, यवन, पल्हव, दरद, खश इ. लोक पूर्वी क्षत्रिय होते. पण संस्कार न झाल्यामुळे त्यांना वृषलत्व किंवा शूद्रत्व प्राप्त झाले आहे. धार्मिक संस्कार न केल्यामुळे या परकी जाती मूळच्या क्षत्रिय असताही शुद्रत्वाप्रत गेल्या, हे मत संमत झाल्यावर ते संस्कार त्यांच्याकडून करवून घेऊन त्यांना क्षत्रियत्वाचा दर्जा प्राप्त करून देणे कठीण नव्हते आणि तसे झालेही.

परकी आक्रमकांमध्ये हूण हे प्रसिद्ध आहेत. भारतात आल्यावर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. हूण राजा मिहिरकुल हा शिवोपासक होता. हूणांनी भारतात राज्ये स्थापल्यावर ते हळूहळू भारतीयांत मिसळून गेले आणि पुढे त्यांची गणना राजपुतांच्या श्रेष्ठ अशा कुळांत होऊ लागली. त्यांचे शरीरसंबंध भारतातील उच्च क्षत्रिय कुळांशी झाले. उदा., कलचुरी आपणास चंद्रवंशी म्हणवत. त्या कुलातील महाप्रतापी कर्णनृपतीचा विवाह हूण राजकन्या आवल्लदेवी हिच्याशी झाला होता आणि त्यांचा पुत्र यशःकर्ण हा पित्यानंतर गादीवर आला. तेव्हा हूण हे भारतीय क्षत्रियांत गणले जात होते, यात संशय नाही.

राजपुतांची छत्तीस कुळे आहेत, असे कान्हडदे प्रबंधात (सर्ग ३, श्लो. ३८ इ.) म्हटले आहे. पण त्यात खालील कुळांचाच नामनिर्देश आहे-चौहान, वाघेल, देवडा, सोळंकी, राठोड, परमार, बारड, हूण, हरियडा, चावडा, दोडिया, यादव, हूल, निकुंभ आणि गुहिल. याशिवाय तत्कालीन वाङ्मय आणि कोरीव लेख यांच्यावरून आणखी काही राजपूत कुळांची - उदा., भाटी, जोहिय, कच्छपघात, चंदेल्ल यांची माहिती होते. पृथ्वीराज रासोत छत्तीस नावे दिली आहेत. त्यामध्ये कलचुरी, सैन्धव इ. नावे आहेत. पण तो ग्रंथ पुष्कळ नंतरचा आहे. यातील हूणांसारखे एखादे कुल परकी असले, तरी इतर तशी आहेत असे म्हणण्यास पुरावा नाही. प्रतीहार, चाहमान (चौहान), परमार, गुहिलपुत्र यांच्या काही कोरीव लेखांत तर त्यांचे मूळ पुरुष ब्राह्मण होते असे म्हटले आहे. राजपूत राजे हिंदू धर्माचे आणि संस्कृतीचे कट्टर अभिमानी होते आणि त्यांनी त्याच्या रक्षणाकरिता प्राणही वेचण्यास कधी मागे पुढे पाहिले नाही.

<राजपुतांनी भारताच्या इतिहासात मोठी महत्त्वाची कामगिरी बजावली. गुर्जरवंशी पहिला नागभट याने आठव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास सिंधमधील मुसलमानांच्या पूर्वेकडील आक्रमणास पायबंद घालून उत्तर भारताचे त्यांच्या टोळधाडीपासून संरक्षण केले. त्याच्या वंशातील वत्सराज, दुसरा नागभट, भोज, महेन्द्रपाल इ. राजांनी उत्तर भारतात विस्तृत साम्राज्य स्थापले आणि मुसलमानांशी सतत युद्धे करून हिंदू धर्म आणि सुस्कृती यांचे रक्षण केले. प्रतीहार भोजाने सूलतानवर अनेकदा स्वारी करून ते घेण्याचा प्रयत्न केला, पण तेथील सूर्यमूर्तीच्या नाशाचा अरबांनी धाक घातल्यामुळे पुजाऱ्यांच्या विनवणीवरून त्याला परत फिरावे लागले. मुसलमानांच्या छळापासून भारताला मुक्त केल्याची द्योतक अशी ‘आदिराह’ पदवी त्याने धारण करून त्या छापाची चांदीची ‘आदिवराह द्रग्म’ नाणी पाडली होती. गुहिलोत वंशातील प्रख्यात राजा बाप्पा रावळ याचीही अशाच कामगिरीविषयी ख्याती होती; पण तत्कालीन लेख न मिळाल्यामुळे तिचे निश्चित स्वरूप सांगता येत नाही.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate