অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रामचंद्रपंत अमात्य

रामचंद्रपंत अमात्य

रामचंद्रपंत अमात्य

(सु. १६५०? – १७१६). शिवकाळातील एक मुत्सद्दी व राजनीतीवरील आज्ञापत्र या प्रसिद्ध ग्रंथाचा कर्ता. त्याचा जन्म तत्कालीन सुशिक्षित ब्राह्मण कुटुंबात झाला. त्याच्या जन्ममृत्यूंचे सन व तारखा यांबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही.

रामचंद्रपंत हा निळो सोनदेव या अमात्याचा कनिष्ठ पुत्र होय. निळो सोनदेव यांचे उपनाम भादाणेकर. त्यांच्याकडे पूर्वापार देशमुखी वतन होते.

१६५७ सालापासून निळोपंत शिवाजी महाराजांच्या सेवेत होते आणि १६६५ च्या सुमारास त्यांना अमात्यपद मिळाले असावे. त्यांच्या मृत्युनंतर १६७२ च्या सुमारास त्यांना अमात्यपद मिळाले असावे. त्यांच्या मृत्युनंतर १६७२ साली महाराजांनी अमात्यपद निळो सोनदेवाचा ज्येष्ठ पुत्र नारोपंत याजकडे सोपविले; परंतु तो अकार्यक्षम असल्याने १६६८ सालापासून सिंधुदुर्गचा सबनीस असलेला त्याचा धाकटा भाऊ रामचंद्रपंतच पहात असे. राज्याभिषेकाच्या वेळी नेमलेल्या अष्टप्रधानांच्या यादीत मात्र नारो निळकंठ आणि रामचंद्र निळकंठ या दोघांचाही ‘अमात्य’ म्हणून उल्लेख आहे; परंतु प्रत्यक्षात सर्व कारभार राचंद्रपंताकडे होता.१६७७ च्या सुमारास अमात्यपदावरून दूर करून महाराजांनी ते पद रघुनाथ हणमंते यास दिले. पण नंतर ते राजाराम महाराजांच्या काळात परत रामचंद्रपंताकडे आले.

शिवाजींनंतरच्या काळात रामचंद्रपंत आणि छत्रपती संभाजी यांचे संबंध सलोख्याचे नव्हते. छ. राजारामाने १६९३ साली परत एकदा रामचंद्रपंताला अमात्यपद दिले. ते त्याने दीर्घकाळ उपभोगिले. राजाराम जेव्हा दक्षिणेतील मराठ्यांचा किल्ला जिंजी येथे आश्रयार्थ गेले, तेव्हा मोगलव्याप्त अशा स्वराज्याच्या मुलूखाचे संरक्षण संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या साहाय्याने रामचंद्रपंताने केले. राजारामाने त्यास ‘हुकुमतपन्हा’ हा किताब दिला होता. मराठी राज्यावर कोसळलेले मोगलाचे अरिष्ट टाळण्याची महत्वपूर्ण कामगिरी त्याने बजावली.

शाहूंची सुटका झाल्यानंतर १७०७ मध्ये रामचंद्रपंताने महाराणी ताराबाईंचाच पक्ष उचलून धरला व राजारामांचा पुत्र दुसरा शिवाजी यांस छत्रपती बनविले व पन्हाळगडावर मराठ्यांची दुसरी राजसत्ता निर्माण केली. पुढे ताराबाईंशीदेखील न पटल्याने आणि कदाचित काळाची गरज म्हणून त्याने राजारामांची दुसरी पत्नी राजसबाई हिचा पुत्र दुसरा संभाजी यांस ताराबाई आणि दुसरा शिवाजी यांना पदच्युत करून छत्रपतिपद मिळविण्याच्या कामी सहाय्य केले. त्यावेळच्या राजवाड्यांतील या रक्तहीन सत्तांतरात रामचंद्रपंताचा मोठा वाटा होता, हे पोर्तुगीजांशी झालेल्या त्याच्या पत्रव्यवहारावरून सिद्ध होते. त्याच्या दूरदृष्टीचा आणि मुत्सद्देगिरीचा येथे प्रत्यय येतो.

राजनीतीवरील आज्ञापत्र हा ग्रंथ त्याने छत्रपती संभाजीस उद्देशून १७१५ च्या सुमारास रचला. त्याचा मृत्यु पन्हाळ्यास १७ फेब्रुवारी ते १३ मार्च १७१६ च्या दरम्यात केव्हातरी झाला असावा, असे इतिहासतज्ञ मानतात. तेथे त्याची छत्री आहे.

सभासद बखारीत रामचंद्रपंताविषयी म्हटले आहे -‘राजियाचा (शिवाजी) लोभ फार की हा मोठा शहाणा, दैवाचा, भाग्यवंत, बापापेक्षा लक्षगुणी थोर होईल.’ मराठ्यांच्या पाच राजवटी पाहिलेल्या या पुरुषाबद्दल रियासतकार गो. स. सरदेसाई म्हणतात, ‘शिवाजींच्या वेळेपासून राज्याची एकनिष्ठ सेवा केलेला असा हा एकच पुरूष मराठ्यांचे इतिहासात मोठा सन्मान्य दिसतो. त्याच्या राज्यकारभाराचा अनुभव त्याने लिहिलेल्या राजनीतीत ओतलेला आहे.’

संदर्भ : १. गर्गे, स. मा. करवीर रियासत, पुणे, १९८०.

२. बनहट्टी, श्री. ना.शिवाजी राजांची राजनीति, पुणे, १९६१.

कुलकर्णी, अ. रा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate