অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राष्ट्रकूट वंश

राष्ट्रकूट वंश

राष्ट्रकूट वंश

भारतातील एक प्राचीन इतिहासप्रसिद्ध राजवंश. त्याची अधिसत्ता प्रामुख्याने महाराष्ट्र व त्यालगतच्या प्रदेशांवर इ.स. ७५३ ते ९७५ यांदरम्यान होती. राष्ट्रकूट हे एक प्राचीन अधिकारपद होते. राज्याच्या मोठ्या विभागाला राष्ट्र म्हणत. प्राचीन ताम्रपटांत ग्रामकूटांप्रमाणे राष्ट्रकूटांचा उल्लेख येतो. ग्रामाचा मुख्य तो ग्रामकूट व राष्ट्र या विभागाचा प्रशासक तो राष्ट्रकूट. त्यांना राजदानांची माहिती दिलेली असते. ग्रामकूट म्हणजे गावचे पाटील. तसे राष्ट्रकूट म्हणजे राष्ट्र नामक देशाच्या विशाल भागाचे अधिपती. राष्ट्रकूटांची अनेक घराणी प्राचीन काळी महाराष्ट्रात राज्य करीत होती. ती परस्परसंबद्ध होती असे नाही.

सर्वांत प्राचीन ज्ञात राष्ट्रकूट घराणे कुंतल देशात कृष्णानदीच्या खोऱ्यात राज्य करीत होते. त्याचा मूळ पुरुष मानांक (सु. कार. ३५०–७५) हा होय. याने आपल्या नावे मानपूरनामक नगर स्थापून तेथे आपली राजधानी केली. हे मानपूर सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्याचे माण असावे.

ह्या राष्ट्रकूट नृपतींना कुंतलेश्वर म्हणत. विदर्भाचे वाकाटक आणि कुंतलचे राष्ट्रकूट यांची राज्ये एकमेकांना लागून असल्याने त्यांच्यामध्ये वारंवार कटकटीचे प्रसंग उद्‌भवत. मानांकाने विदर्भाला त्रस्त केले होते, असे राष्ट्रकूटांच्या पांडरंगपल्ली ताम्रपटात म्हटले आहे; तर वत्सगुल्म (वाशीम) च्या विंध्यसेन वाकाटकाने कुंतलेशाचा पराजय केल्याचा उल्लेख अजिंठ्याच्या लेखात आला आहे. मानांकाचा पुत्र देवराज याच्या काळी गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त (विक्रमादित्य) याने आपला राजकवी कालिदास याला या कुंतलेश राष्ट्रकूटांच्या दरबारी वकील म्हणून पाठविले होते. या प्रसंगाने कालिदासानेकुंतलेश्वरदौत्य रचले होते. ते आता उपलब्ध नाही; पण त्यातील काही उतारे राजशेखर व भोज यांच्या अलंकार ग्रंथांत आले आहेत. मानपूर येथे हे घराणे बादामीच्या दुसऱ्या पुलकेशीच्या (कार. ६११-४२) काळापर्यंत टिकले. पुलकेशीने त्यांचा पराभव करून त्यांचा प्रदेश खालसा केला.

दुसरे राष्ट्रकूट घराणे विदर्भात सहाव्या शतकात कलचुरींचे मांडलिक म्हणून उदयास आले. त्याचे काही ताम्रपट रामटेकजवळ नंदिवर्धन, अकोला व मुलताई येथे सापडले आहेत. कलचुरींच्या उच्छेदानंतर त्यांनी बादामीच्या चालुक्यांचे स्वामित्व स्वीकारले आणि पुढे ते राष्ट्रकूटांचे मांडलिक झाले. त्यांची राजधानी प्रथम नंदिवर्धन, नंतर भंडारा जिल्ह्यातील पद्मपूर (पद्मनगर) आणि शेवटी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे होती. हे घराणे दहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत टिकले.

या दोन्हींपेक्षा अत्यंत कीर्तिमान असे तिसरे राष्ट्रकूट घराणे औरंगाबाद जिल्ह्यात उदयास आले. त्याची आरंभीची राजधानी अद्यापि अनिश्चित आहे. नंतर तिसऱ्या गोविंदाच्या काळात ती मयूरखंडी येथे होती; पण तिचेही ठिकाण निश्चित नाही. ⇨पहिल्या अमोघवर्षा ने नवव्या शतकात ती मान्यखेट (मालखेड) येथे नेली. तेथे ही घराणे शेवटपर्यंत राज्य करीत होते.

या घराण्याचा पहिला विख्यात राजा दंतिदुर्ग (कार. ७१३– ५८) हा होय. हा प्रथम बादामीच्या चालुक्यांचा मांडलिक होता; पण पुढे त्याने त्यांचे जूं झुगारून दिले. याने सु. ४५ वर्षे राज्य केले. याने लाट (दक्षिण गुजरात), महाराष्ट्र, विदर्भ हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले. नंतर त्याने मालव, कोसल (छत्तीसगड), कलिंग (ओरिसा), श्रीशैलम् वगैरे दूरदूरच्या प्रदेशांवर स्वाऱ्या केल्या; पण त्यांपासून त्याच्या राज्याचा विस्तार झालेला दिसत नाही. त्याने चालुक्य कीर्तिवर्म्याचा ७५३ च्या सुमारास पराभव केला.

दंतिदुर्गानंतर त्याचा चुलता पहिला कृष्ण (सु. कार. ७५६–७३) याने चालुक्य सम्राट दुसरा कीर्तिवर्मा याचा पुन्हा पराभव करून चालुक्य राजवटीचा अंत केला. नंतर त्याने गंगवाडीच्या गंगांचा आणि वेंगीच्या पूर्वचालुक्यांचा पराभव केला. अशा रीतीने राष्ट्रकूट साम्राज्याचा पाया घातला. त्याच्या काळी ⇨वेरूळ येथील कैलास लेणे खोदण्यात आले. कृष्ण सु. ७७३ मध्ये निधन पावला असावा.

कृष्णानंतर त्याचा मुलगा दुसरा गोविंद (कार. ७७३–८०) गादीवर आला. पण त्याच्या काळी सर्व सत्ता त्याचा धाकटा भाऊ ध्रुव याच्या हाती होती. शेवटी ध्रुवाने त्याला पदच्युत करून सु. ७८० मध्ये गादी बळकावली.

नंतर ध्रुवाने गोविंदाच्या पक्षाचे गंग आणि पल्लव राजे यांचा पराभव करून गंग राजपुत्र शिवमार याला बंदिवान केले आणि गंगवाडी खालसा केली. पुढे त्याने उत्तर भारतात स्वारी करून दोआबापर्यंत आक्रमण केले. गुर्जर प्रतीहार नृपती वत्सराज याला राजपुतान्यात पिटाळून लावले आणि बंगालच्या पालनृपती धर्मपाल याचा दोआबात पराभव केला. तेव्हापासून गंगा व यमुना नद्यांची चिन्हे राष्ट्रकुटांच्या ध्वजावर झळकू लागली.

ध्रुवानंतर ⇨तिसरा गोविंद (सु. कार. ७९३–८१४) हा गादीवर आला. हा आपल्या पित्यापेक्षा जास्त पराक्रमी निघाला. त्याने आपल्या स्तंभ नामक वडील भावाचा आणि त्याच्या पक्षाच्या व बंदीतून मुक्त झाल्यावर उलटलेल्या गंग राजाचा पराभव केला. गंगाला पुन्हा बंदीत टाकले, पण स्तंभाला पुन्हा गंगवाडीचा अधिपती नेमले. नंतर त्याने आपल्या पित्याप्रमाणे उत्तर भारतात स्वारी केली. तीत त्याने वत्सराजाचा पुत्र द्वितीय नागभट याचा पराजय केला. पालनृपती धर्मपाल आपला हस्तक कनौजचा अधिपती चक्रायुध याच्यासह त्याला शरण आला. नंतर गोविंदाने हिमालयापर्यंत स्वारी केली.

परत नर्मदातीरी आल्यावर त्याने तिच्या काठाने जाऊन मालक. डाहल (चेदि), ओड्रक (ओरिसा) इ. देश जिंकून पावसाळ्यात श्रीभवन (गुजरातेतील सारमोण) येथे मुक्काम केला. तेथे त्याचा मुलगा ⇨पहिला अमोघवर्ष इ.स. ७९९ मध्ये जन्मला. गोविंद नंतर मयूरखंडीला परत आला. तेथे काही काळ राहून त्याने दक्षिणच्या दिग्विजयाची तयारी केली आणि तुंगभद्रेच्या तीरी हेलापूर येथे तळ दिला. तेथून त्याने गंग, पल्लव, पांड्य आणि केरळ देशांवर स्वाऱ्या करून तेथील राजांचा पराभव केला. त्यांना आपले स्वामित्व स्वीकारावयास भाग पाडले. त्याने वेंगीचा पूर्वचालुक्य दुसरा विजयादित्य याचा पराभव करून त्याचा धाकटा भाऊ भीम याला गादीवर बसविले. अशा रीतीने हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आपले साम्राज्य विस्तारले.

तिसऱ्या गोविंदानंतर त्याचा पुत्र पहिला अमोघवर्ष (कार. ८१४–८०) गादीवर आला. त्यावेळी तो पंधरा-सोळा वर्षांचा होता. अमोघवर्षाच्या कारकीर्दीत अनेक बंडे झाली. पूर्वचालुक्य विजयादित्याने आपली गादी परत मिळविली. गंगांनी राष्ट्रकुटांना गंगवाडीतून हाकलून लावले. गुजरातेत तिसऱ्या गोविंदाने स्थापिलेल्या राष्ट्रकूट शाखेनेही स्वातंत्र्य पुकारले. अमोघवर्षाने शेवटी यांपैकी बहुतेकांना काबूत आणले; पण या बंडाळ्यांमुळे त्याच्या राज्याला शांतता लाभू शकली नाही.

अमोघवर्षाच्या काळी विद्येला उत्तेजन मिळाले. त्याने स्वतः कविराजमार्ग नामक साहित्यशास्त्रीय ग्रंथ कन्नड भाषेत लिहिला. त्या भाषेतील आद्य ग्रंथांत त्याची गणना होते. त्याचा प्रश्नोत्तरमालिका नामक दुसऱ्या ग्रंथावरून तसेच कोरीव लेखांतील उल्लेखावरून तो मधून मधून आपल्या युवराजावर राज्यकारभार सोपवून धार्मिक चिंतनाकरिता मठात जाऊन राहत असे, असे दिसते. त्याने एकदा मोठ्या साथीच्या निवारणाकरिता आपल्या हाताचे बोट कापून ते कोल्हापूरच्या महालक्ष्मीस अर्पण केल्याचा कोरीव लेखात उल्लेख आहे. तसेच त्याच्या दरबारी अनेक जैन कवींनी आपले ग्रंथ रचल्याचे उल्लेख आहेत. जिनसेनाचे आदिपुराण, महावीराचार्याचे गणित-सारसंग्रह वगैरे ग्रंथ त्याच्या कारकीर्दीत रचले होते.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/31/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate