অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लिन्‌लिथगो, लॉर्ड व्हिक्टर अलेक्झांडर जॉन होप

लिन्‌लिथगो, लॉर्ड व्हिक्टर अलेक्झांडर जॉन होप

लिन्‌लिथगो, लॉर्ड व्हिक्टर अलेक्झांडर जॉन होप

(२४ सप्टेंबर १८८७-५ जानेवारी १९५२). दुसऱ्या महायुद्ध काळातील ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय (१९३६-४३). त्यांचा जन्म खानदानी घराण्यात ॲबरकॉर्न (पश्चिम लोथिअन-स्कॉटलंड) येथे झाला. ईटन (केंब्रिज विद्यापीठ) येथे त्याने उच्च शिक्षण घेतले. त्याला १९०८ मध्ये वडिलार्जित उमरावपद प्राप्त झाले. पहिल्या महायुद्धात (१९१४-१८) त्याने पश्चिम आघाडीवरील सैन्यदलात विशेष कामगिरी केली. त्यानंतर त्याची आरमारात मुलकी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. इंग्लंडमध्ये मजूरपक्ष सत्तेवर येताच हुजूरपक्षाच्या उपाध्यक्षपदी त्याची निवड झाली (१९२४).

शाही कृषी आयोगाचा तो अध्यक्ष म्हणून हिंदुस्थानात आला (१९२६-२८). येथील अनेक प्रश्नांची माहिती त्याने करून घेतली. हिंदुस्थानात घटनात्मक बदल करण्यासाठी नियुक्त केलेल्या निवड समितीचाही तो अध्यक्ष होता. पुढे त्यांची व्हाइसरॉय म्हणून हिंदुस्थानात नेमणूक झाली (१९३६).

त्याने प्रारंभी १९३५ च्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले. प्रांतिक स्वायत्ततेच्या तत्त्वानुसार काँग्रेसने निवडणुकीत भाग घेतला आणि सात प्रांतांत स्वतंत्र मंत्रिमंडळे बहुमताच्या तत्त्वावर स्थापन केली (१९३७). त्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेत प्रांतिक गव्हर्नरांनी विशेष अधिकार वापरून ढवळाढवळ करु नये, अशी काँग्रेसची अपेक्षा होती, परंतु मुस्लिम लीग आणि एकूण सरकारी धोरण यांमुळे मंत्रिमंडळांना हवी ती स्वायत्तता लाभली नाही. त्यातच १९३९ साली दुसरे जागतिक महायुद्ध सुरू झाले.

काँग्रेस व एतद्देशियांचा सल्ला न घेता हिंदुस्थानने महायुद्धात भाग घेतल्याचे लिनलिथगोने जाहीर केले. वसाहतीचे स्वराज्य व इतर किरकोळ आश्वासने देऊन, महायुद्धात भारतीयांनी सक्रिय साह्य करावे, असे लिन्लिथगोने सुचविले, सरकारला साह्य नाकारण्यासाठी आणि व्हाइसरॉयच्या घोषणेचा निषेध व्यक्त करण्यासाठी डिसेंबर १९३९ मध्ये काँग्रेसच्या मंत्रिमंडळांनी राजीनामे सादर केले.

वसाहतीचे स्वराज्य, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व संस्थानिक मिळून युद्ध सल्लागार मंडळ नेमण्याचे आणि युद्ध समाप्तीनंतर हिंदुस्थानची आगामी घटना तयार करण्यासाठी सर्वपक्षीय घटना समिती बोलाविण्यात येईल असे लिन्लिथगोने ऑगस्ट १९४० मध्ये घोषित केले. घोषणेतील आश्वासने सरकारने पाळली नाहीत म्हणून काँग्रेसने म. गांधींच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह सुरू केला. त्यावेळी मुस्लिम लिगने हिंदुस्थानच्या फाळणीचा पुरस्कार केला.

आंतरराष्ट्रीय परिस्थिती १९४१ मध्ये बदलली. जपानने जर्मनीची बाजू घेऊन युद्धात उडी घेतली आणि इंडोनेशियात वर्चस्व स्थापून सिंगापूर, रंगून आदी प्रदेश व्यापले. सागरीमार्गे जपान भारतावर आक्रमण करील, अशी चिन्हे दिसू लागली. लिन्लिथगोने युद्धसाहित्य व वीस लाखांची फौज तयार केली. हिंदुस्थानातील राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळावा म्हणून स्टॅफर्ड क्रिप्सच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ भारतात आले.

युध्दोत्तर काळात भारतीय संघराज्यास वसाहतीचे स्वराज्य देणारी घटना मांडण्यात येऊन लोकप्रतिनिधींची घटना समिती बोलविण्यात येईल, असे क्रिप्सने जाहीर केले. क्रिप्स योजना अयशस्वी झाल्यानंतर म. गांधींनी ८ ऑगस्ट १९४२ रोजी ⇨छोडो भारत आंदोलन सुरू केले. परिणामतः म. गांधींसह मान्यवर नेत्यांना अटक झाली. या वेळी सुभाषचंद्र बोस यांनी नजरकैदेतून पलायन करून जपानमध्ये आझाद हिंद सेनेची उभारणी केली.

लिन्लिथगोचे देशातील चळवळ दडपण्याचे प्रयत्न निरर्थक ठरले व त्याला इंग्लंडला परत जावे लागले. पुढे स्कॉटलंडमध्ये एडिंबरो विद्यापीठाच्या कुलपतिपदी त्याची नियुक्ती झाली (१९४४-५२). त्या पदावर असतानाच तो ॲबरकॉर्न येथे मरण पावला.

 

पहा : भारतीय संविधान; भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास.

संदर्भ : 1. Kulkarni, V. B. British Statesment in India, New Delhi, 1961.

2. Majumdar, R. C. Ed. Struggle for Freedom, Bombay, 1971.

३. तळवलकर, गोविंद, सत्तांतर : १९४७, दोन खंड, मुंबई, १९८३.

देशपांडे, सु. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate