অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळक

टिळक

लोकमान्य बाळ गंगाधर : (२३ जुलै १८५६–१ ऑगस्ट १९२०). थोर भारतीय नेते,भगवद्‌गीतेचे आधुनिक भाष्यकार व प्राच्यविद्या पंडित. त्यांचा जन्म रत्नागिरीस झाला. त्यांचे जन्मनाव केशव; परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. टिळक कुटुंबाचे मूळ गाव चिखलगाव (ता. दापोली, जि. रतिनागिरी).

चिखलगावची खोतीदारी त्यांच्याकडे होती. पणजोबा केशवराव यांनी पेशव्यांच्या काळात मानाची जागा मिळवली होती. आजोबा रामचंद्रपंत यांनी उत्तर आयुष्यात संन्यास घेतला. टिळकांचे वडील गंगाधरपंत व आई पार्वतीबाई. गंगाधरपंतांना कौटुंबिक अडचणीमुळे इंग्रजी शिक्षण सोडून पुण्याहून गावी जावे लागले. पुढे त्यांनी मराठी शाळेत शिक्षकाची नोकरी केली. बाळ गंगाधऱ टिळकांचे पारंपरिक संस्कृत अध्ययन घरातच झाले. १८६६ मध्ये गंगाधरपंतांची बदली पुण्यास झाल्यामुळे टिळक आपल्या मातापित्यांबरोबर पुण्यास आले. पुण्यास आल्यावर थोड्याच दिवसांत टिळकांची आई मरण पावली आणि गंगाधरपंतांची बदलीही ठाण्यास झाली. तथापि पुण्यात राहूनच ते १८७२ मध्ये मॅट्रिक झाले.

तत्पूर्वी १८७१ मध्येच त्यांचा कोकणातील लाडघर गावच्या बल्लाळ बाळ कुटुंबातील सत्यभामाबाई (माहेरचे नाव तापीबाई) यांच्याशी विवाह झाला. त्यांना तीन मुली आणि विश्वनाथ, रामभाऊ व श्रीधर असे तीन मुलगे होते. त्यांचे नातू ज. श्री. टिळक हे केसरीचे विद्यमान संपादक असून खासदार आहेत.

गंगाधरपंत १८७२ मध्ये निधन पावले. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी काही रक्कम ठेवली होती. त्यामुळे टिळकांनी डेक्कन कॉलेजमध्ये नाव घालते. महाविद्यालयातील पहिल्या वर्षी नियमित व्यायाम करून प्रकृती सुदृढ व निकोप राखण्यावर त्यांनी भर दिला. या कमावलेल्या शरीराचा पुढे दगदगीच्या राजकीय जीवनात व कारावासात त्यांना फार मोठा उपयोग झाला. १८७६ मध्ये ते बी.ए. पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. एम्. ए. मात्र होऊ शकले नाहीत. अखेर त्यांनी एल्एल्.बी. ही पदवी घेतली.

डेक्कन कॉलेजमध्येच टिळक आणि आगरकर यांचा स्नेह जमला. दोघांनी देशकार्याला वाहून घेण्याचा संकल्प केला. याच सुमारास निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले होते; तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना मिळाले. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पतकरला. चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १८८१ मध्ये आर्यभूषण छापखाना काढला आणि केसरी (मराठी) व मराठा(इंग्रजी) ही दोन वृत्तपत्रे सुरू केली.

प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठ्यांचे संपादक होते. वृत्तपत्रांच्या द्वारे लोकशिक्षण, राजकीय जागृती व शासकीय अन्यायाचा प्रतिकार हे त्यांचे ऐतिहासिक कार्य येथूनच सुरू झाले. वृत्तपत्रीय जीवनाच्या प्रारंभीच कोल्हापूर संस्थानचे दिवाण माधवराव बर्वे यांच्यावर केसरी व मराठ्यातून अनेक लेख प्रसिद्ध झाले. त्यांच्या गैरकारभारावर तसेच इंग्रज सरकारच्या छत्रपती शिवाजींसंबंधीच्या वर्तणुकीवर त्यांनी कडाडून टीका केली. त्याबद्दल टिळक व आगरकर यांना चार महिन्यांची शिक्षा होऊन डोंगरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. २६ ऑक्टोबर १८८२ रोजी त्यांची सुटका झाली.

विष्णुशास्त्री १८८२ मध्ये मरण पावले; तथापि १८८४ मध्ये वेडरबर्न, वर्ड्‌स्वर्थ, मंडलिक, तेलंग, दांडेकर, य.मो. केळकर, भांडारकर वगैरे प्रभृतींच्या मदतीने टिळक–आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेतर्फे १८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.

टिळक गणित व संस्कृत विषय शिकवीत. पुढे टिळकांचे संस्थेतील एकंदर धोरणासंबंधी मतभेद झाले. आपल्या चाळीस पानी राजीनाम्यात टिळकांनी ‘निर्वाहापुरते वेतन’ या तत्त्वाऐवजी ‘सांपत्तिक स्थितीनुसार वेतन’ तसेच ‘राष्ट्रीय शिक्षण संस्थे’च्या उद्दिष्टाविरुद्ध ‘सरकारच्या मदतीवर चालणारी संस्था’ हे धोरण संस्थेच्या मूळ धोरणाला धक्के देणारे आहे, असे आग्रहाने सांगितले. या प्रश्नावर त्यांचा आगरकरांशी वाद झाला. याशिवाय दुसरा वाद ‘आधी कोण? राजकीय की सामाजिक?’ या विषयावर झाला होता.

आगरकरांना सामाजिक सुधारणा महत्त्वाच्या वाटत होत्या आणि देश सुधारण्यासाठी किंवा स्वातंत्र्यासाठी ते सामाजिक सुधारणांना प्राधान्य देत. स्वतंत्रतेचा किंवा राष्ट्रीयत्वाचा अभिमान म्हणून जो काही जोम आहे, तो जोपर्यंत जाज्वल्य व जागृत आहे; तोपर्यंत समाजरचना कशीही असली, तरी तीतील दोष राष्ट्राच्या उन्नतीस अथवा भरभराटीस आड येत नाहीत, अशी टिळकांची भूमिका होती. स्वाभिमान, उत्साह, स्वराज्यनिष्ठा हाच राष्ट्राचा खरा आत्मा किंवा जीव आहे आणि हा जिवंतपणा जेथे वसत आहे, त्या ठिकाणी सुईच्या मागोमाग जसा दोरा तद्वतच सामाजिक सुधारणाही मागोमाग येत असतात, अशी इतिहासाची साक्ष आहे; असे ते आग्रहपूर्वक प्रतिपादीत. राष्ट्राची सामाजिक प्रगती होऊ नये, असे त्यांचे म्हणणे नव्हते; पण ती राजकीय प्रगतीच्या आणि स्वाभिमानाच्या अनुषंगानेच झाली पाहिजे.

मात्र आगरकरांची भूमिका याच्या बरोबर विरुद्ध होती. सामाजिक सुधारणेशिवाय देश स्वातंत्र्याला पात्र होणार नाही, म्हणून प्रथम समाजातील रूढी, अज्ञान, अंधश्रद्धा, पापपुण्याच्या कल्पना यांच्या पाशांतून त्याची मुक्तता झाली पाहिजे, जातिभेद नष्ट झाले पाहिजेत, असे ते निकराने मांडीत. परकीय सरकारने लोकमताची पर्वा न करता सुधारणेसाठी योग्य ते कायदे करावेत, असे आगरकरांचे मत होते. टिळकांचे म्हणणे असे होते की, ‘आमच्या सुधारणा आम्हीच करू, परकीय सत्तेची ढवळाढवळ आमच्या सामाजिक वा धार्मिक बाबतीत होऊ नये. मात्र लोकमत अनुकूल असेल आणि धर्मवचनांच्या बाबतींत तडजोड होत असेल, तर असा कायदा करण्यास आमची काही हरकत नाही ’.

या व अशा प्रकारच्या वर्णव्यवस्था, वेदोक्त प्रकरण आदी धार्मिक बाबींशी संबंध येणाऱ्‍या गोष्टींवर जे वाद झाले, त्यांसंबंधी टिळकांची भूमिका ही त्यांच्या धर्मविषयक श्रद्धेतून घडविली गेली होती, असे दिसते. टिळकांना राष्ट्राइतकाच हिंदू धर्माचाही जाज्वल्य अभिमान होता. धर्म हा त्यांच्या व्यासंगाचा विषय होता. त्यांनी वेद, उपनिषदे, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्रे, गीता व आचार्याची भाष्ये यांचा अभ्यास केला होता. हिंदुत्व हे स्वत्वाचे फळ आहे असे ते मानीत. ज्यास हिंदुत्वाचा अथवा हिंदू धर्माचा अभिमान नाही, त्यास हिंदू लोकांनी काय समाजसुधारणा कराव्यात ते सांगण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणत.

डेक्कन एज्युकेशन संस्था सोडल्यानंतर १८९०–९७ या प्रारंभीच्या काळात टिळकांनी केलेले कार्य त्रिविध स्वरूपाचे होते. या काळात पुढील प्रकरणे उद्‌भवली :

(१) संमतिवयाचा कायदा,

(२) ग्रामण्य प्रकरण,

(३) रमाबाईंचे शारदासदन,

(४) हिंदुमुसलमानांचे दंगे,

(५) सार्वजनिक समाजकार्य इत्यादी. या सर्व प्रकरणांत त्यांची भूमिका राजकारणी पुरुषाची होती आणि स्वराज्य हा त्यांचा प्रधान हेतू होता. याकरिता ब्रिटिश सरकारच्या राज्यकारभारातील दोष व अन्याय यांवर वृत्तपत्रांतून उघड टीका करून त्यांनी कायद्याची मर्यादा प्रथम सांभाळली. तसेच प्रांतिक परिषदा व काँग्रेसच्या कार्यात भाग घेऊन त्याचे स्वरूप जहाल राष्ट्रवादी बनविले व जनतेच्या मनात ज्वलंत देशाभिमान व स्वातंत्र्यप्रेम चेतवून, स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष संघर्ष करण्यास लोकांची मनोभूमिका तयार करण्याचा प्रयत्न केला, स्वातंत्र्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी त्यांना अर्जविनंत्यांचे राजकारण करणाऱ्‍या नेमस्त पक्षाविरुद्ध सतत संघर्ष करावा लागला. ब्रिटिश सत्ता हा ईश्वरी अंश आहे व उदारमतवादी इंग्रज हळूहळू भारताचे राजकीय हक्क मान्य करतील, त्यांच्या सदिच्छेवर अवलंबून राहणे, हीच उत्तम नीती होय; ही नेमस्त भूमिका सोडून ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच’, या भूमिकेपर्यंत लोकांना नेण्याचे कार्य, हा लोकमान्यांचा संकल्प होता. केसरी व मराठ्यातील तेजस्वी लेखांनी तसेच प्रसंगोपात्त प्रखर भाषणांनी लोकजागृतीचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले

संमतिवयाच्या कायद्यावरून भारतभर जी धामधूम माजली, तिच्यात कायदाविरोधी पक्षाचे अग्रेसरत्व टिळकांकडे आले. सुधारणा पाहिजे, परंतु ती सरकारी कायद्याने होणे योग्य नाही, ही विचारसरणी टिळकांनी पुरस्कारिली. या वादात धर्मशास्त्राची गुंतागुंत होती म्हणून डॉ. भांडारकरांनी कायद्याला पुष्टी देणारा लेख लिहिला. त्या वेळी टिळकांनी त्याचा निकराने प्रतिवाद केला. टिळकांनी जरी कायद्याविरुद्ध आंदोलन आरंभिले, तरी काही सुधारणा अंमलात याव्यात यासाठी एक संस्था स्थापण्याचा ते विचार करीत होते. त्या संस्थेतर्फे काही मौलिक सुधारणांची वाच्यताही झाली होती. उदा., सोळा वर्षांच्या आत मुलींची व वीस वर्षांच्या आत मुलांची लग्ने करू नयेत; कोणी कोणास हुंडा देऊ नये; विधवांचे वपन करू नये इत्यादी.

पुण्यातील पंचहौद मिशनच्या चालकांनी १८९० मध्ये शहरातील काही प्रतिष्ठितांना व्याख्यानाच्या निमित्ताने पाचारण केले. त्या सर्व गृहस्थांसाठी चहा-बिस्किटांचा पाहुणचार ठेवण्यात आला होता. हा सर्व समारंभ गोपाळराव जोशी यांनी घडवून आणला व पुणे वैभव या पत्रात यासंबंधीची सविस्तर हकीकत प्रसिद्ध केली. काहींनी अब्रुनुकसानीचा दावा पुणे वैभववर लावला. टिळकांनी तेथे चहा घेतला असल्यामुळे, पुढे प्रायश्चित्ताचा विषय निघाला. या सर्व पाप्यांना शिक्षा कुणी द्यावयाची, हा प्रश्न उपस्थित होऊन शंकराचार्यांकडे वादी या नात्याने काहींनी फिर्याद केली. अनेक कारणांवरून बाकीचे सुटले. टिळकांनी काशीक्षेत्रात सर्व प्रायश्चित्त केल्याचा दाखला दाखविला; यामुळे ते त्या प्रकरणातून मुक्त झाले.

पंडिता रमाबाईंनी स्त्रीशिक्षणासाठी शारदासदन ही संस्था काढली होती. पं. रमाबाई मुळच्या हिंदू; पण पुढे ख्रिस्ती झाल्या होत्या. यामुळे ही संस्था म्हणजे प्रौढ मुलींच्या अगर विधवांच्या बौद्धिक आणि व्यावहारिक उन्नतीसाठी निघालेली नसून तिचा मूळ उद्देश ख्रिस्ती धर्मप्रसाराचा आहे, असे टिळकांचे मत होते. बाईंनी ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या संस्थांकडून मदत घेण्यास सुरुवात केली आणि ख्रिस्ती लोकांचे साहाय्य मिळविले. शारदासदनमधील दोन मुलींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्या वेळी टिळकांनी कडक शब्दांत टीका केली. याचा परिणाम असा झाला की, बाईंनी पुणे सोडले व स्त्रीशिक्षणाचे आपले कार्य केडगावी सुरू ठेवले.

हिंदुमुसलमानांचे अनेक ठिकाणी १८९३ मध्ये दंगे झाले. या संघर्षात हिंदू आणि मुसलमान असे दोनच पक्ष नसून सरकार हा एक तिसरा पक्ष आहे, हे लक्षात घेतल्याशिवाय दंग्यांच्या कारणांची उपपत्ती लागणार नाही, असे टिळकांचे मत होते. सरकारचे पक्षपाती धोरण, म्हणजेच फोडा आणि झोडा ही नीती, दंग्यांस कारणीभूत होते अशी टीका ते करीत. नेहमी सर्वांनी सुख-संतोषाने राहून एकमेकांच्या हक्कांस जपावे, असे ते म्हणत. या दंग्यांनंतरच लोकजागृतीची साधने म्हणून गणपती व शिवजयंती या उत्सवांना सार्वजनिक स्वरूप देण्याची कल्पना पुढे आली. १८ सप्टेंबर १८९४ आणि १५ एप्रिल १८९६ या अनुक्रमे केसरीच्या दोन अंकांत त्यांनी या उत्सवांचे उद्देश स्पष्ट केले: राष्ट्रीय जागृती करणे, स्वातंत्र्याकांक्षा वृद्धिंगत करणे, महापुरुषांचे स्मरण करणे आणि धर्म व संस्कृती यांचे ज्ञान सामान्यजनांस करून देणे.

पुण्यात प्रतिष्ठित झालेली सार्वजनिक सभा त्यांनी नेमस्तांचा पराभव १८९५ मध्ये करून आपल्या ताब्यात घेतली आणि दुष्काळनिवारणाचे महत्त्वाचे कार्य सुरू केले. १८९६ च्या दुष्काळात शेतकऱ्‍यांना त्यांनी सांगितले की, पीक कमी असेल तर सारामाफी हा तुमचा हक्क आहे, तो मागून घ्या. सरकारच्या धोरणानुसार लोकांनी हक्काने मदत मागावी. दुष्काळाच्या पाठोपाठ प्लेग आला. त्या वेळी प्लेगप्रतिबंधासाठी नेमलेल्या कमिशनर रँड याच्या हाताखालील गोऱ्‍या अधिकाऱ्‍यांनी धुमाकूळ घातला, तेव्हा त्यावर टिळकांनी टीकेची झोड उठविली. आपद्ग्रस्तांसाठी स्वस्त धान्य दुकाने काढली व सार्वजनिक रुग्णालये उघडली. २२ जून १८९७ रोजी चाफेकरबंधूंनी रँडचा खून केला. त्या वेळी सरकारने पुण्यावर अनन्वित जुलूम केला. टिळकांनी ‘राज्य करणे म्हणजे सूड उगविणे नव्हे’, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे एकापाठोपाठ एक प्रखर लेख लिहिले. परिणामतः त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात येऊन खटला झाला आणि त्यांना अठरा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. टिळक मोठे विद्वान म्हणून शिक्षा करणे बरे नव्हे, असे माक्स म्यूलर यांनी सरकारला सांगितले; त्यामुळे त्यांपैकी सहा महिने शिक्षा सरकारने कमी केली व ते ६ सप्टेंबर १८९८ रोजी तुरुंगातून मुक्त झाले.

टिळकांच्या खऱ्‍या कारकीर्दीला आणि अखेरपर्यंत चालविलेल्या त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामाला १८९९ नंतरच अधिक तेज चढले. त्या वेळी राजद्रोहाची शिक्षा भोगून टिळक परत आले होते व त्यांची लोकप्रियता वाढली होती. शिक्षा भोगूनही त्यांच्या ध्येयधोरणांत तीळमात्रही बदल झाला नाही, हे त्यांच्या ४ जुलै १८९९ रोजी लिहिलेल्या ‘पुनश्च हरिः ॐ !’ या केसरीतील अग्रलेखावरून स्पष्ट होते. त्यांनी लॉर्ड कर्झन याच्या कारकीर्दीवर, विशेषतः त्याने लादलेल्या शिक्षणसंस्थांवरील बंधनांवर, टीका केली. शिवाय वसाहतवादाच्या धोरणावर कडाडून हल्ला केला व केसरीच्या अग्रलेखात इंग्लंडचा नैतिक व बौद्धिक अधःपात होत आहे, असे निक्षून सांगितले. याच वेळी त्यांनी राष्ट्रसभेच्या कार्याविषयी नवीन विचार मांडले. जनतेत प्रचंड चळवळ उभारून सर्व राष्ट्राची शक्ती राष्ट्रसभेच्या मागण्यांच्या मागे उभी केली पाहिजे, असे त्यांचे मत होते.

या सुमारास टिळकांना ताईमहाराज प्रकरणामुळे फार मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकरणातील शेवटचा निकाल टिळकांच्या मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर लागला. केवळ मित्रप्रेमामुळे हे प्रकरण उद्‌भवले. यात इंग्रज अधिकारी, कोल्हापूरचे संस्थानाधिपती व बळवंतराव नागपूरकर यांनी टिळकांचे चारित्र्यहनन करण्याच्या उद्देशाने, खोटी साक्ष देण्याच्या आणि खोटे दस्तऐवज करण्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर फौजदारी खटला केला; पण टिळकांची सर्वांमधून निर्दोष मुक्तता होऊन त्यांनी दत्तक घेतलेल्या जगन्नाथमहाराज यांची वारसदार म्हणून पुढे निश्चिती झाली.

लॉर्ड कर्झन याने २० जुलै १९०५ रोजी बंगालची फाळणी जाहीर केली. सर्व देशभर प्रक्षोभ उसळला आणि उग्र आंदोलन सुरू झाले. टिळकांनी बंगालमधील चळवळीला पाठिंबा दिला. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतुःसूत्रीचा त्यांनी हिरिरीने पुरस्कार केला. आपली उन्नती करून घ्यावयाची, ती स्वदेशी आणि बहिष्कार यांसारख्या मार्गांनीच केली पाहिजे; ती स्वदेशी हतभागी झालेल्या आमच्या लोकांस वर येण्याचा जर काही मार्ग असला, तर तो स्वावलंबन व स्वार्थत्याग हाच होय; असा संदेश देऊन ते आता लोकांना प्रतिकाराचे आवाहन करू लागले.

बारिसाल येथे प्रांतिक परिषदेच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीत वंदेमातरम्‌च्या घोषणा देण्यात आल्या, म्हणून पोलिसांनी निर्घृण लाठीमार केला आणि लोकांची डोकी फोडली. त्यासंबंधी लिहिताना टिळक सांगतात, ‘अधिकाऱ्‍यांनी कायदेशीरपणे लोकांच्या तोंडास गवसणी अडकविली किंवा कायदेशीरपणे लोकांची डोकी फोडली म्हणून लोकांनी हा कायदेशीर छळ निमूटपणे सोसावयाचा किंवा कसे, हा बंगालच्या लोकांपुढे प्रश्न होता. ज्याप्रमाणे कायदेशीर जुलूम लोकांवर करण्यात येतो, त्याप्रमाणे शांततेने, स्थिरबुद्धीने आणि संकटास धीमेपणाने तोंड द्यावयाचे पण हार जावयाचे नाही, या दृढ निश्चयाने जुलुमी हुकूमांचा प्रतिकार लोकांस करता येतो.

जुलूम तो जुलूम; मग तो कायदेशीर असो किंवा बेकायदेशीर असो’. एकीकडे ही फाळणीविरोधी चळवळ अधिकाधिक उग्र होत असताना राष्ट्रीयसभेत नेमस्त आणि जहाल यांच्या कार्यक्रमांबद्दल मतभेद झाले. स्वदेशी, बहिष्कार आदी चतुःसूत्री कलकत्त्याला मान्य झाली होती; पण सुरतेस १९०७ च्या अखेरीस भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात फूट पडली. टिळकांनी अध्यक्षांच्या निवडीलाच हरकत घेतली होती, त्यावरून गडबड झाली.

टिळकांच्या अंगावर काठ्या, जोडे फेकण्यात आले तरी टिळक निश्चल होते. पुढे पोलिसांनी मंडप ताब्यात घेतला. काँग्रेसमधील या फाटाफुटीनंतर लवकरच २४ जून १९०८ रोजी टिळकांना मुंबईस पुन्हा राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात येऊन त्यांच्यावर खटला भरण्यात आला. याला कारण म्हणजे ‘देशाचे दुर्दैव’ व ‘हे उपाय टिकाऊ नाहीत’ हे अनुक्रमे १२ मे १९०८ व ९ जून १९०८ च्या केसरीतील अग्रलेख होत.

ज्यूरीत सात इंग्रज व दोन हिंदी गृहस्थ होते. सात विरुद्ध दोन मतांनी ज्यूरींनी त्यांना दोषी ठरविले व कोर्टाने सहा वर्षे काळे पाणी व १,००० रु. दंडाची शिक्षा फर्मावली. ही शिक्षा ऐकवल्यानंतर टिळकांनी काढलेले धीरोदात्त उद्‌गार संस्मरणीय झाले. ते म्हणाले, ‘ज्यूरींनी काहीही निकाल दिला असला, तरी मी पूर्ण निर्दोषी आहे, अशी माझी धारणा आहे. न्यायालयाची सत्ता श्रेष्ठ असेल, पण वस्तुजाताच्या नियतीचे नियमन करणारी सत्ता त्याहूनही श्रेष्ठ आहे. माझ्या स्वातंत्र्यापेक्षा माझ्या हालाअपेष्टांनीच मी अंगीकृत केलेले कार्य अधिक भरभराटीस यावे, असाही परमेश्वराचा संकेत असेल’.

टिळकांना झालेल्या या शिक्षेच्या निषेधार्थ मुंबईत गिरणी कामगारांनी प्रथमच हरताळ पाळला, काही प्रमाणात दंगाही झाला. काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी टिळकांना ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले. मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांच्या जीवनात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. या बंदिवासात त्यांनी आपला गीतारहस्य हा अत्यंत मौलिक ग्रंथ लिहिला, तर पुण्यास त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई यांचे १९१२ मध्ये निधन झाले. सहा वर्षांच्या कारावासानंतर १५ जून १९१४ रोजी सरकारने त्यांना मुक्त केले.

टिळकांनी १९१५ मध्ये हिंदी स्वराज्यसंघ या विषयावर चार लेख लिहून कोणत्या प्रकाराची राज्यव्यवस्था इष्ट होईल, याचे विवेचन केले. १ मे १९१६ रोजी होमरूल लीग वा हिंदी स्वराज्यसंघ त्यांनी बेळगाव येथे स्थापन केला. तत्पूर्वी १९१५ मध्येच ॲनी बेझंट यांनी मद्रासला होमरूल लीग ही संस्था स्थापन केली होती. होमरूलची चळवळ टिळकांनी व बेंझटबाईंनी संयुक्तपणे चालविली. १९१८ च्या मार्चमध्ये ते होमरूल लीगचे शिष्टमंडळ घेऊन इंग्लंडला गेले.

तत्पूर्वी १९१६ मध्ये लखनौ येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे वेळी त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याच काँग्रेस अधिवेशनात मुख्यतः टिळकांच्या प्रयत्नांनी काँग्रेस-लीग करार झाला व काँग्रेस-लीग संयुक्त अधिवेशन होऊन स्वराज्याच्या मागणीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या काँग्रेसमध्ये जहाल व नेमस्त या दोन पक्षांच्या आणि हिंदू व मुसलमान यांच्या एकीचे अपूर्व दृश्य दिसले.

भारतमंत्री सर एडविन माँटेग्यू यांनी २० ऑगस्ट १९१७ रोजी भारताला भेट देऊन अनेक संस्थांचे चालक, विविध शिष्टमंडळे व पुढारी यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी टिळकांचीही व्यक्तिशः भेट घेतली. या वेळी माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा जाहीर झाल्या. टिळक इंग्लंडमध्ये असताना रौलट कायदा जाहीर झाला होता व त्याच्या निषेधार्थ महात्मा गांधींच्या आदेशानुसार झालेल्या हरताळातून जालियनवाला बागेतील हत्याकांड घडले होते. ‘गांधीच्या सत्याग्रहात व नंतर घडलेल्या भयंकर प्रसंगात मी तुमच्याबरोबर नव्हतो, याचे मला वाईट वाटते’; असे उद्‌गार टिळकांनी मुंबईस उतरल्याबरोबर काढले.

१९१९ मध्ये अमृतसर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात हिंदुस्थान आजच जबाबदारीच्या स्वराज्यास पात्र आहे; माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा अपुऱ्‍या, असमाधानकारक व निराशाजनक आहेत, असा ठराव मंजूर करून घेण्यात त्यांना यश आले; परंतु सुधारणा अपुऱ्‍या असल्या तरी त्यांचा त्याग करू नये; आज जे मिळेल तेवढे तर पदरात घ्याच, पण तेवढ्याने संतुष्ट होऊन चळवळ सोडू नका, असा टिळकांचा सल्ला होता.

सर व्हॅलेंटाइन चिरोल यांच्या इंडियन अनरेस्ट या १९१५ साली प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात आपल्याविरुद्ध बदनामीकारक मजकूर छापल्याबद्दल टिळकांनी लंडनच्या कोर्टात अब्रुनुकसानीची फिर्याद केली होती. १९१९ च्या फेब्रुवारीत तिचा निकाल टिळकांच्या विरुद्ध लागला. या खटल्यात टिळकांचे फार नुकसान झाले; पण याच ग्रंथाने ‘फादर ऑफ इंडियन अनरेस्ट’–भारतीय असंतोषाचे जनक, हे टिळकांचे गौरवास्पद अभिधान रुढ केले.

टिळकांना १९१६ च्या जून महिन्यात ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पुण्याला मोठा समारंभ होऊन त्यांना एक लाखाची थैली अर्पण करण्यात आली. ती सर्व रक्कम राष्ट्रकार्यासाठी वापरण्याची घोषणा करून ते म्हणाले, ‘आपली मातृभूमी आपणा सर्वांस या उद्योगास लागण्याबद्दल आवाहन करीत आहे. मातृभूमीच्या या आव्हानाकडे लक्ष देऊन कोणताही भेदभाव मनात न ठेवता, आपण सर्व राष्ट्रदेव होऊ या’.

गव्हर्नरांनी १० जून १९१८ रोजी मुंबईला युद्धपरिषद भरविली. त्याला टिळक हजर होते; पण लॉर्ड विलिंग्टन यांनी प्रास्ताविक भाषणात होमरूल मागण्यावर टीका केली. टिळकांनी आपल्या भाषणात बजावले की, हिंदुस्थानवर आज ना उद्या स्वारी झाली, तर हिंदी लोक तिच्या प्रतिकारासाठी आपले देहही खर्ची घालतील; पण स्वराज्य, स्वदेश व संरक्षण यांची साखळी मात्र तोडता येणार नाही. विलिंग्टन यांनी त्यांना थांबविले, तेव्हा टिळकांनी सभात्याग केला.

सुधारणा राबविण्यासाठी त्यांनी डेमॉक्रॅटिक स्वराज्य पक्षाची स्थापना केली. या पक्षाचा जाहीरनामा २० एप्रिल १९२० रोजी प्रसिद्ध केला. हा जाहिरनामा म्हणजे ऐतिहासिक दस्तऐवजच. साम्राज्यात ग्रेट ब्रिटनच्या बरोबरीने भारताचे स्थान, जागतिक शांततेची प्रस्थापना, व्यापारी लुटीपासून मुक्तता वगैरे तत्त्वे त्यात नमूद केली आहेत. हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी त्यांनी म. गांधींना दाखविला होता आणि त्यांनी त्यास संमती दर्शविली होती.

टिळकांनी आपले तन, मन, धन प्रामुख्याने राजकीय चळवळीकडे लावलेले असले , तरी त्यांनी ज्या इतर काही कार्यांत लक्ष पुरविले; तीही महत्त्वाची आहेत. या राजकीय कार्याबरोबरच टिळकांची अनेकविध सामाजिक कार्ये चालू होती. सुरत काँग्रेसनंतर त्यांनी दारूबंदीची चळवळ सुरू केली. त्यावर लेख लिहून त्यांनी व्याख्यानेही दिली. प्रत्यक्ष निरोधन करण्यापर्यंत चळवळीची मजल गेली. टिळकांनी पैसाफंड ही संस्था वृद्धिंगत करून लाखो रुपयांचा निधी सामाजिक हितासाठी जमा केला.

पंचांगसंशोधन हा व्यासंग त्यांना लहानपणीच जडला होता. पुढे त्यांनी तो अधिक शास्त्रशुद्ध रीत्या आपल्या स्वतंत्र पंचांगाद्वारा प्रसिद्ध केला. आपल्या देशाच्या औद्योगिक प्रगतीचा विचार टिळक सदैव करीत होते आणि थोड्या भांडवलात कोणते धंदे काढता येतील याची चर्चा ते प्रसंगपरत्वे करीत असल्याची पुष्कळ उदाहरणे ‘आठवणी-आख्यायिकां’च्या स्वरूपात आढळतात. मराठी वर्णमाला छापण्याच्या दृष्टीने सुधारण्याची कल्पना टिळकांच्या मनात पुष्कळ वर्षे घोळत होती. तिचा १९०४ साली प्रत्यक्षात त्यांनी प्रयोगही केली होता. पुढे इंग्लंडमध्ये असताना त्यांच्या ह्या खटपटीस यश आले व मराठी टंकांमध्ये त्यानुसार अनेक सुधारणा करण्यात आल्या.

कलकत्ता येथील ऐतिहासिक काँग्रेस अधिवेशनासाठी अध्यक्ष म्हणून टिळकांचे नाव पं. मालवीय यांनी सुचविले होते; पण तत्पूर्वीच टिळकांचे मुंबईस काही दिवसांच्या आजारानंतर सरदारगृहात देहावसान झाले. सु. १५ वर्षे त्यांना मधुमेहाचा विकार होता. अखेरीस मलेरियाचा ताप व अतिश्रम यांमुळे थकवा आला होता. या वेळीसुद्धा देशाच्या स्वातंत्र्याची त्यांची तळमळ दिसते. मृत्यूसमयी त्यांच्याजवळ त्यांचे मुलगे, मुली व इतर आप्तेष्ट, तसेच न. चिं. केळकर, डॉ. साठे, डॉ. देशमुख, कृ. प्र. खाडिलकर वगैरे मित्रमंडळी होती. टिळकांच्या मृत्यूची बातमी वाऱ्‍यासारखी मुंबईत व देशभर पसरली. सारा देश दुःखाच्या सागरात लोटला गेला. म. गांधींनी १ ऑगस्ट हा दिवस असहकाराच्या चळवळीचा शुभारंभ म्हणून मुक्रर केला. त्यांनी आपल्या श्रद्धांजलीत सांगितले, ‘त्यांची राष्ट्रभक्ती म्हणजे आसक्त्ती होती. त्यांचा धर्म म्हणजे देशप्रेम. ते जन्मतःच लोकशाहीवादी होते. त्यांचे जीवन म्हणजे ग्रंथच म्हणावा लागेल. त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांनी देशहितासाठी खर्ची घातली. त्यांचे खाजगी जीवन धुतलेल्या तांदळासारखे स्वच्छ होते. त्यांनी आपली प्रखर बुद्धिमत्ता देशकार्यासाठी समर्पित केली. लोकमान्यांइतके सातत्याने कोणत्याही व्यक्तीने स्वराज्याचे तत्त्व आतापर्यंत सांगितले नव्हते. इतिहासामध्ये त्यांचे नाव आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून नोंदले जाईल आणि भावी पिढी लोकमान्य नेता म्हणून आदराने त्यांचे स्मरण करील.’

वृत्तपत्रकार चिपळूणकर, टिळक, आगरकर, नामजोशी वगैरे चालक मंडळींनी केसरी–मराठा ही वृत्तपत्रे काढली. केसरी मराठीतून, तर मराठा इंग्रजीतून निघत असे. प्रथम आगरकर केसरी पहात व त्यातून लिहीत आणि टिळक मराठा पहात व त्यातून लेखन करीत. कोल्हापूर संस्थानच्या बर्वे दिवाणावरील लेखांमुळे केसरी–मराठावर अब्रुनुकसानीची फिर्याद झाली आणि टिळक व आगरकर या संपादकद्वयाला १०१ दिवसांची कैद भोगावी लागली.

चिपळूणकरांच्या मृत्यूप्रसंगी केसरीने अग्रलेखात ध्येयनिष्ठेचा आत्मविश्वास प्रगट केला, तो असा : ‘चिपळूणकर गेले, तथापि आमची अशी उमेद आहे की, देशोन्नतीसाठी झटण्याचा केलेला संकल्प होता होईल तो आम्ही ढळू देणार नाही.’ आरंभी टिळकांचा ओढा इंग्रजी लेखनाकडेच जास्त होता. त्यामुळे केसरीतून ते क्वचितच लिहीत.

सुरुवातीच्या व्यवस्थेत पुढे वैचारिक मतभेदांमुळे फरक पडला. शिवाय वृत्तपत्रांचे व्यवहार सोसायटीबाहेर ठेवल्याशिवाय सभासदांच्या विचारांची ओढाताण थांबणार नाही, असे वाटून वृत्तपत्रांची जबाबदारी केळकर–टिळकांनी स्वतंत्र रीत्या अंगावर घेतली (१८८७). टिळक केसरी–मराठा या वृत्तपत्रांचे व आर्यभूषण या छापखान्याचे कर्जासह रीतसर मालक झाले, पण त्यात वासुदेवराव केळकर व हरि नारायण गोखले हे भागीदार होते. पुढे १८९१ मध्ये टिळक डेक्कन एज्युकेशन सोसायटीमधून बाहेर पडले आणि त्यांनी कर्जासह केसरी–मराठा ही वृत्तपत्रे स्वतंत्र रीत्या चालविण्यास घेतली.

मात्र आर्यभूषण छापखाना केळकर–गोखल्यांकडेच राहिला. तत्संबंधी ‘सालगुदस्ता’ याकेसरीच्या अग्रलेखात वृत्तपत्रांना कठीण प्रसंगातून जावे लागत आहे, हा विषय हाताळला आहे. त्यांनी केसरीचे स्वरूप कसे असेल, हे स्पष्ट करताना लिहिले आहे की, ‘केसरी हा निर्भयपणे व निःपक्षपातीपणे सर्व प्रश्नांची चर्चा करील. ब्रिटिश सरकारची खुशामत करण्याची जी वाढती प्रवृत्ती आज दिसून येते आहे, ती देशहिताची नाही.केसरीतील लेख केसरी या नावाला साजेसे असतील.’

टिळकांनी केसरीतून एकापेक्षा एक असे अनेक सरस अग्रलेख लिहिले. त्यांच्या या प्रखर आणि ब्रिटिशांविरुद्ध लेखांबद्दलच्या राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना तीन वेळा कारावास भोगावा लागला. तथापि त्यांनी आपल्या लेखनविषयक धोरणात किंचितही बदल केला नाही. त्यामुळे केसरीचा खप झपाट्याने वाढला व तो लोकप्रिय झाला.

टिळकांचे केसरीतील लेख व भाषणे यांतील प्रत्येक शब्द सरळ, स्पष्ट, युक्तिवादात्मक, व्यावहारिक, सामान्य मनुष्याला समजणारा व उमजणारा असल्यामुळे त्याचे मर्म समजले नाही, असा वाचक किंवा श्रोता आढळलाच नाही; असे न. चिं. केळकर म्हणतात. १८९६ पासून केसरी–मराठा ही वृत्तपत्रे चालविताना टिळकांना न. चिं. केळकर, कृ. प्र. खाडिलकर आणि दे. गो. लिमये ही सहकारी मंडळी लाभली. त्यामुळे टिळकांच्या अनुपस्थितीतही केसरी–मराठा नेहमीच्याच आवेशाने प्रसिद्ध होत राहिले.

ग्रंथलेखन

टिळकांनी बहुतेक मराठी स्फुटलेखन केसरीतून केले. केसरीव्यतिरिक्त काही लेखन टिळकांनी मराठा या त्यांच्या इंग्रजी वृत्तपत्रातून केले. या साप्ताहिकांच्या बाहेर टिळकांनी केलेले स्फुटलेखन फार थोडे आहे. त्यात उल्लेखनीय म्हणजे लिमयेकृत भारतीय युद्ध, अवंतिकाबाई गोखलेकृत गांधीचरित्र व डॉ. गर्देकृत ईशगुणादर्श या पुस्तकांच्या प्रस्तावना होत.

टिळकांचा संस्कृत व इंग्रजी वाङ्‌मयाचा गाढा अभ्यास होता. भारतीय तत्त्वज्ञान हा त्यांचा आवडीचा विषय. त्यांनी पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचेही अध्ययन केले होते. त्यांच्या व्यापक व्यासंगाचे उत्कृष्ट प्रतिबिंब गीतारहस्यात पहावयास मिळते.

राजकीय क्षेत्रात टिळक काम करीत असताना कधी तुरुंगात व अन्य वेळी त्यांना थोडीशी उसंत मिळाली, त्या काळात त्यांनी काही ग्रंथ लिहिले. बहुतेक त्यांचे लेखन संशोधनपर असून प्रत्येक ग्रंथात त्यांनी काही स्वतंत्र मते प्रतिपादन केली आहेत. त्यांचे प्रमुख ग्रंथगीतारहस्य, ओरायन, आर्क्टिक होम इन द वेदाज आणि वेदांगज्योतिष.

मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी श्रीमद्‌भगवद्‌गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र हा ग्रंथ १९१०–११ च्या हिवाळ्यात लिहिला व १९१५ मध्ये प्रसिद्ध केला. हा ग्रंथ म्हणजे गीतेवरचे भाष्य असून ते कर्मयोगपर आहे. तत्पूर्वी सर्व भाष्ये व टीका बाजूला ठेवून नुसते गीतेचेच स्वतंत्रपणे पारायण करून टिळकांना गीतेचा जो बोध झाला, तो त्यांनी यात विवेचकपणे प्रतिपादन केला आहे. त्यांच्या मते गीता निवृत्तिपर नसून ती प्रवृत्तिपर आहे.

ओरायन हा एक त्यांचा संशोधनात्मक प्रबंध आहे. १८९२ च्या लंडन येथील ओरिएंटल परिषदेसाठी त्यांनी तो तयार केला. त्यात वेदाचा कालनिर्णय हा विषय हाताळला. माक्स म्यूलरने जो वेदांचा काळ ठरविला तो भाषिक संशोधनावर ठरविला असल्याने तो बरोबर नाही; संशोधनाची ही पद्धत एकांगी होय, असे टिळकांचे मत होते. म्हणून त्यांनी दैवतशास्त्र, भाषाशास्त्र, संहिता आणि ब्राह्मणे यांतील ज्योतिषशास्त्रविषयक सर्व संदर्भ एकत्रित करून ज्योतिषाच्या गणिताने वेदांचा काळ सु. इ. स. पू. ४५०० वर्षे हा ठरविला. या ग्रंथाची याकोबी व ब्लूमफील्ड या पाश्चात्त्य प्राच्यविद्या पंडितांनी स्तुती केली आहे.

आर्क्टिक होम इन द वेदाज हाही टिळकांचा एक संशोधनपर प्रबंध असून १८९८ साली टिळक येरवड्याच्या तुरुंगात असताना त्याची कल्पना त्यांना सुचली. या पुस्तकात त्यांनी आर्यांचे मूलस्थान उत्तर ध्रुवाच्या प्रदेशातच असले पाहिजे, हे अनुमान मुख्यतः वेदांतील ऋचांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्या गीतारहस्यातून ज्या कर्मयोगाचा पुरस्कार टिळकांनी केला, तोच कर्मयोग प्रत्यक्ष जीवनात आचरून दाखविला. लोकसंग्रहाची दृष्टी राखून लोकमान्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीला समाजाच्या सर्व थरांतील लोकांचे अधिष्ठान मिळवून दिले. गीतारहस्य हे त्यांचे अक्षय विचारधन असून ते आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ तत्त्वज्ञान होय. गांधींच्या सर्वांगीण व सर्वंकष राजकीय-सांस्कृतिक कार्याला अनुकूल अशी पार्श्वभूमी निर्माण करण्याचे श्रेय लोकमान्यांना द्यावे लागते. म्हणून आधुनिक भारताच्या इतिहासात टिळकयुग हा फार महत्त्वाचा टप्पा मानण्यात येतो.

 

संदर्भ :

1. Keer, Dhananjay, Lokamanya Tilak, Bombay, 1959.

2. Parvate T. V. Bal Gangadhar Tilak, Ahamedabad, 1958.

3. Ram Gopal, Lokamanya Tilak, Bombay, 1965.

४. केळकर, न. चिं. लोकमान्य टिळक यांचे चरित्र, ३ खंड, पुणे, १९२३–२८.

५. जावडेकर, शं. द. लोकमान्य टिळक व गांधी, पुणे, १९४६.

६. जोशी, लक्ष्मणशास्त्री, संपा. लोकमान्य टिळक लेखसंग्रह, नवी दिल्ली, १९६९.

७. फाटक, न. र. लोकमान्य, मुंबई, १९७२.

८. बनहट्टी, श्री. ना. टिळक आणि आगरकर, पुणे, १९५७.

देशपांडे, सु. र.

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate