অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वाकाटक घराणे

वाकाटक घराणे

वाकाटक घराणे

महाराष्ट्रातील एक प्राचीन प्रसिद्ध राजवंश. या वंशाची माहिती पुराणे, शिलालेख व तांम्रपट यांतून मिळते. प्राचीन काळी भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध अशी साम्राज्ये अस्तित्वात आली,त्यांमध्ये वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. या राजघराण्याचा मूळ पुरुष वाकाटक हा इ.स. २०० च्या सुमारास होऊन गेला. त्याचा एक त्रुटित लेख आंध्र प्रदेशातील अमरावती स्तूपाजवळ एका अष्टकोनी स्तंभखंडावर कोरला आहे. त्यात त्याने तेथे केलेल्या दानाचा उल्लेख आहे. हा वाकाटक गृहपती (गृहस्थ) जवळच्या प्रदेशातून (बहुधा पूर्वीच्या हैदराबाद संस्थानच्या दक्षिण भागातून) यात्रेकरिता तेथे गेला असावा.

अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यात या घराण्यातील पहिला राजपुरुष विंध्यशक्ती याला ‘द्विज’ म्हटले आहे, त्यावरून हे घराणे ब्राह्मण होते असे दिसते. त्याच्या विष्णुवृद्ध गोत्राचा निर्देश वाकाटकांच्या अनेक ताम्रपटांत येतो. विंध्यशक्ती आरंभी सातवाहनांचा मांडलिक असावा; पण सन २५० च्या सुमारास योग्य संधी साधून त्याने आपले स्वतंत्र राज्य स्थापले असे दिसते. हा आणि त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन यांचा नामनिर्देश पुराणात आला आहे.

प्रवरसेन हा महापराक्रमी निघाला. त्याने अनेक देश जिंकून चारी दिशांत आपले राज्य पसरविले. त्याने अनेक सोमयाक, वाजपेय आणि चार अश्वमेध करून सम्राट ही पदवी धारण केली. ऐतिहासिक काळात दक्षिण किंवा उत्तर भारतात ही पदवी दुसऱ्या कोणी राजाने धारण केलेली माहीत नाही.

पहिल्या प्रवरसेनाने साठ वर्षे (कार. २७० ते ३३०) राज्य केले. त्याला चार पुत्र होते. ते चारही राजे झाले, असे पुराणात म्हटले आहे. तेव्हा प्रवरसेनानंतर त्याच्या विस्तृत साम्राज्याचे चार भाग झालेले दिसतात. ज्येष्ठ पातीची राजधानी प्रारंभी नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ नंदीवर्धन येथे आणि नंतर वर्धा जिल्ह्यातील प्रवरपुर (सध्याचे पवनार) येथे होती. हिच्या अंमलाखाली उत्तर विदर्भ होता.

दुसरी शाखा वत्सगुल्म (अकोला जिल्ह्यातील वाशिम) येथे राज्य करीत होती. तिचा अंमल दक्षिणेस गोदावरीपर्यंत पसरला होता. दुसऱ्या दोन शाखांपैकी एक छत्तीसगढात आणि दुसरी दक्षिण महाराष्ट्रात (सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागात) राज्य करीत असावी. या शाखा १००-१२५ वर्षांत तेथे दुसऱ्या वंशांचे राज्य झाल्यामुळे नष्ट झाल्या असाव्यात. त्यांचे लेख अद्यापि सापडले नाहीत.

नंदिवर्धन शाखेत अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. त्या शाखेतील पहिला पृथिवीषेण हा गुप्तनृपती दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य याचा समकालीन होता. माळवा-काठेवाड या देशांवर राज्य करणाऱ्या शकक्षत्रपांचा उच्छेद करताना चंद्रगुप्ताने त्याचे साहाय्य घेतले असावे. पुढे हे राजकीय सख्य दृढ करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपली कन्या प्रभावती-गुप्ता वाकाटक राजकुमार दुसरा रुद्रसेन याला दिली.

विवाहानंतर थोड्याच वर्षांनी हा रुद्रसेन कालवश झाला. तेव्हा आपल्या अल्पवयस्क दिवाकरसेन नामक मुलाच्या नावाने प्रभावती-गुप्ता राज्यकारभार पाहू लागले. तिला राज्यकारभारात मदत करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपले काही अधिकारी व मुत्सद्दी विदर्भात पाठविले होते. त्यामध्ये कविकुलगुरू कालीदास होता. तो नंदीवर्धन राजधानीपासून केवळ पाच किलोमीटरवर असलेल्या रामगिरीवर (सध्याच्या रामटेकवर) अनेक वेळा गेला असावा. तेथे त्याला आपल्या नितांतसुंदर मेघदूत काव्याची कल्पना सुचून त्याने ते काव्य विदर्भातच पुरे केले असे दिसते. दिवाकरसेनानंतर गादीवर आलेल्या दामोदरसेन ऊर्फ प्रवरसेन यांस सेतुबंध नामक प्राकृत काव्य रचण्यात कालिदासाने मदत केली, अशी प्राचीन आख्यायिका आहे.

द्वितीय प्रवरसेनाचा पुत्र नरेंद्रसेन (कार. ४५० ते ४७०) याच्या काळी वाकाटकांनी आपली सत्ता उत्तरेस माळव्यावर पसरविली. त्याच्या काळात बस्तर जिल्ह्यात राज्य करणाऱ्या नलनृपती भवदत्तवर्म्याने विदर्भावर आक्रमण करून नागपूरपर्यंतचा प्रदेश जिंकला. त्यावेळी वाकाटकांनी आपली राजधानी भंडारा जिल्ह्यातील पद्मपूर येथे नेली.

नरेंद्रसेनाचा पुत्र द्वितीय पृथिवीषेण याने नलांना विदर्भातून पिटाळून लावले आणि आपली सत्ता मध्य भारतात पूर्वीच्या नागोद संस्थानापर्यंत पसरवली. तेथे त्याच्या मांडलिकाचे दोन लेख सापडले आहेत. द्वितीय पृथिवीषेणाच्या सु. इ.स. ४९० मध्ये झालेल्या निधनानंतर या ज्येष्ठ पातीचे राज्य वत्सगुल्म शाखेच्या राज्यात समाविष्ट झाले.

वत्सगुल्म शाखेचा मूळ पुरुष सर्वसेन हा पहिल्या प्रवरसेनाचा पुत्र होता. त्याने हरिविजय नामक काव्य आणि काही सुभाषिते प्राकृतात रचली. या शाखेचा शेवटचा राजा हरिषेण (कार. ४७५-५००) हा अत्यंत बलाढ्य होता. त्याने आपला अंमल उत्तरेस माळव्यापासून दक्षिणेस कुंतल देशापर्यंत आणि पश्चिमेस कोकणापासून पूर्वेस आंध्र देशापर्यंत बसविला. याच्यानंतर याचा मुलगा नादान निघाल्यामुळे वनवासीच्या कदंबांनी विदर्भावर स्वारी केली. त्या लढाईत विदर्भाच्या मांडलिकांच्या फितुरीमुळे हरिषेणाचा मुलगा मारला गेला असे दिसते. याप्रमाणे इ. स. ५२५ चया सुमारास वाकाटक वंशाचा अस्त झाला.

सांस्कृतिक प्रगती : वाकाटकांचा काळ त्यांनी धर्म, विद्या व कला-कौशल्य यांस दिलेल्या उदार आश्रयाबद्दल प्रसिद्ध आहे. बहुतेक वाकाटक राजे शिवोपासक होते; पण प्रभावती - गुप्तेच्या प्रभावामुळे तिचा पती द्वितीय रुद्रसेन विष्णूचा उपासक झाला. वाकाटकांनी अनेक मंदिरे बांधली व त्यांना शिल्पादिकांनी विभूषित केले. त्यांचे उल्लेख कोरीव लेखांत येतात. त्यांच्या काळात राजधानीजवळच्या रामगिरी (रामटेक-नागपूर) येथील देवालयांना फार महत्त्व प्राप्त झाले होते.

प्रभावती-गुप्तेचे दोन ताम्रपट तेथून दिले होते. त्यांतील एकात रामगिरिस्वामीच्या (भगवान रामचंद्राच्या) पादुकांचा उल्लेख आहे. तसाच उल्लेख कालीदासाने तेथे रचलेल्या मेघदूतात आला आहे. दुसऱ्या प्रवरसेनांनी आपल्या नावे प्रवरपुर (पवनार-वर्धा) नावाचे नगर स्थापून तेथे राजधानी नेल्यावर आपल्या रामोपासक प्रभावती-गुप्ता मातेकरिता त्या ठिकाणी भगवान रामचंद्राचे उत्तुंग देवालय बांधले होते. त्याचे अवशेष तेथे सापडले आहे.

वाकाटकांनी अनेक विद्वान ब्राम्हणांना ग्रामदाने दिली होती. त्या संदर्भात एकट्या द्वितीय प्रवरसेनाचेच दहा-बारा ताम्रपट सापडले आहेत. वत्सगुल्मच्या हरिषेण राजाच्या वराहदेवनामक मंत्र्याने अजिंठ्याचे क्रमांक सोळाचे लेणे कोरवून घेऊन त्याला सुंदर चित्रांनी विभूषित केले होते. खानदेशातील त्याच्या एका मांडलिकाने सतरा व एकोणीस क्रमांकांची लेणी कोरविली होती.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 8/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate