অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

संत नामदेव

संत नामदेव

नामदेव

(२६ ऑक्टोबर१२७०–३जुलै १३५०).वारकरी संप्रदायाच्या ज्ञानदेवादी श्रेष्ठ संतकवींपैकी एक. पित्याचे नाव दामाशेटी; आईचे गोणाई. नरसी-बामणी हे त्यांच्या घराण्याचे मूळ गाव म्हणून सांगितले जाते; तथापि हे गाव नेमके कोठले ह्याबद्दल अभ्यासकांत ऐकमत्य नाही.कराडजवळील नरसिंगपूर हेच ते गाव असावे, असे एक मत आहे.

नरसी-बामणीचा ‘नरसी-ब्राह्मणी’ असा उल्लेख करूनमहाराष्ट्रसारस्वतकारवि.ल.भावे ह्यांनी ते सोलापूरकडचे गाव असल्याचे म्हटले आहे;तथापि असे गाव सोलापूर जिल्ह्यात नाही. मराठवाड्यात नरसी आणि बामणी अशी दोन गावे आहेत.त्यांतील अंतरही फारसे नाही.

नरसी ह्या गावाजवळच नामदेवांची समाधी व देऊळ आहे. ह्या गावी त्यांच्या घराची जागा दाखविली जाते. त्यांचे आजोळ कल्याणी किंवा काणणीहेही ह्याच परिसरातले.नरसी आणि बामणी ही दोन स्वतंत्र गावे असली, तरी त्यांचा उल्लेख एकत्रच केला जातो. हे लक्षात घेऊन नामदेवांची नरसी-बामणी ही ह्या दोन गावांत सामावलेली असावी, असे सामान्यतः मानलेजाते.नामदेवकृत म्हणून समजले जाणारे एक ‘आत्मचरित्र’ नामदेवांच्या संकलित गाथ्यात अंतर्भूत आहे.त्यात “गोणाई दामाशेटी झाले पाणिग्रहण।संसारी असोन नरसीगावी।।”असा निर्देश सापडतो.

नामदेवांचाजन्म नरसी-बामणीचा, की पंढरपूरचा ह्यासंबंधीही वाद आहे. वि.ल.भावे व महाराष्ट्रकवि चरित्रकार ज.र.आजगावकर ह्यांच्या मते नामदेव नरसी-बामणी येथेच जन्मले; तथापि नामदेव पंढरपुरी जन्मल्याचा निर्वाळा बहुतेक प्राचीन संतचरित्रकारांनी दिलेला आहे.एकनाथांनी लिहिलेल्या नामदेव- चरित्रावरून नामदेवांच्या आईने पुत्रप्राप्तीसाठी पंढरीच्या विठोबास नवस केला होता आणि त्यापूर्वीच नामदेवांचे आईवडील पंढरपुरात येऊन राहू लागल्याचे दिसते. नामदेवांचे बालपण पंढरपुरात गेल्याचेही ह्या चरित्रात नमूद आहे.

नामदेवांच्यानावावर मोडणारे उपर्युक्त ‘आत्मचरित्र’ हा नामदेवांचे चरित्रविषयक तपशील जाणून घेण्याच्या दृष्टीने उपयोगात आणला जाणारा एक मुख्य आधार आहे.त्यानुसार असे दिसते,कीनामदेवांच्या घरचा व्यवसाय शिंप्याचा होता.‘शिंपियाचे कुळी जन्म मज झाला’ असेत् यातम् हटले आहे.नामदेवांच्या घरात विठ्ठलभक्तीचे वातावरण होते.नामदेवांनाही बाळपणापासून विठ्ठलभक्तीची ओढ लागली. एकदा विठ्ठलासाठी नैवेद्य घेऊन देवळात गेलेले नामदेव देव नैवेद्य खाईना, म्हणून त्याच्या पायांवर डोके आपटूनप्राण द्यावयास निघाले आणि भक्त वत्सल देवाने त्यांची ही भक्ती पाहून नैवेद्य आनंदाने खाल्ला, अशी आख्यायिका आहे.

नामदेवांचा विवाह राजाई नावाच्या स्त्रीशी झालेला होता आणि तिच्यापासून त्यांना नारायण, महादेव, गोविंद आणि विठ्ठल असे चार पुत्र झाले; लिंबाई नावाची एक मुलगी झाली. विठ्ठलभक्तीमुळे नामदेव उत्तरोत्तर विरक्त होतचालले. घरातील परिवार मोठा होता. त्याची जबाबदारी नामदेवांनी घेतली पाहिजे, असे त्यांच्या मातापित्यांस वाटे. त्यामुळे नामदेवांच्या विठ्ठल वेडाला त्यांच्या घरातूनविरोध होऊ लागला.नामदेव भक्ती परमार्थाच्या मार्गावरून ढळले नाहीत; उलट हे कुटुंबच भक्तिमार्गाशी समरसले.

सुमारे १२९१ मध्ये नामदेवांची ज्ञानदेवांशी भेट झाली असावी.आपली भक्ती गुरूपदेशावाचून अपुरीच आहे, ह्याची जाणीव ह्या भेटीनंतर त्यांना झाली आणि त्यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचरांकडून उपदेश घेतला;त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. अशी आख्यायिका आहे, की नामदेवविसोबांना भेटावयास गेले असता, विसोबा शंकराच्या देवळात पिंडीवर पाय ठेवून निजले होते.तेदृश्यपाहून नामदेवांना चीड आली व त्यांनी विसोबांची निर्भर्त्सना केली; परंतु विसोबांनी देव नसेल तेथे माझे पाय उचलून ठेव, असे म्हटल्यावर ‘देवाविण ठाव हे बोलणेचि वाव’ हाविचार नामदेवांच्या मनालाभिडला.गुरूपदेशामुळे त्यांचा अहंकार नष्ट झाला.विशुद्धभक्तीलाअद्वैतबोधाचे अधिष्ठान प्राप्त झाले.

पुढे श्रीज्ञानदेव पंढरपूर येथे आले आणि ‘भूतळीची तीर्थे पहावी नयनी’ अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. ‘सर्वसुख आहे मज पांडुरंगी’ अशीच नामदेवांची धारणा असल्यामुळेतीर्थयात्रा करण्याची त्यांना आवश्यकता वाटत नव्हती; परंतु अखेरीस ते ज्ञानदेवांबरोबर निघाले. महाराष्ट्रातील अनेक संत ह्या तीर्थयात्रेत सामील झालेले होते. रतातीलअनेक तीर्थे त्यांनी पाहिली. ह्या तीर्थयात्रेहून परतल्यानंतर ज्ञानदेवांनी लवकरच समाधी घेतली (१२९६). तो रसंग नामदेवांनी पाहिला. नामदेव त्यावेळी अवघे सव्वीस वर्षांचे होते आणि त्यानंतर आपल्या आयुष्याची उर्वरित ५४ वर्षे त्यांनी भागवत धर्माच्या प्रचारासाठी वेचिली.‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावूजगी’ ही त्यांची भूमिका होती.

नामदेवांच्या चरित्राचे आणि कार्याचे एक अभ्यासक ग. वि. कविटकर ह्यांनी असे मत मांडले आहे, की ह्या दीर्घकाल खंडात मदेवांनी भारतभर अनेक पदयात्रा केल्या;दक्षिणेतील श्री शैलशिखर, अरुणाचल, चिदंबरम्, विष्णुकांची, रामेश्वर आदी ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या होत्या; त्यांच्या प्रभावामुळे दक्षिणेतील दर्जी ही जात स्वतःलानामदेवम् हणवून घेऊ लागली, तर भूसागर आणि मल्ला ह्या जातींनी ‘नामदेव’ हे आपल्या जातीचे एक पर्यायी नावम् हणून स्वीकारले; गुजरात, सौराष्ट्र,सिंधुप्रदेश,राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश येथे हीनामदेवांचे वास्तव्य झाले होते. लोक जागृतीच्या ध्येयपूर्तीसाठी विविधप्रदेशांतील भाषा त्यांनी आत्मसात केल्या होत्या,असे ही कविटकर ह्यांचेप् रतिपादन आहे.

नामदेव उत्तर भारतात गेले असल्याची प्रमाणे अनेक प्रकारे मिळतात.विशेषतःपंजाबातील त्यांच्या वास्तव्याची व कार्याची जाणीव आजही ठळकपणे मिळते. ‘नामदेवजीकी मुखबानी’ म्हणून प्रसिद्ध असलेली नामदेवांची हिंदी भाषेतील ६१ पदे शिखांच्या ग्रंथसाहिबात अंतर्भूत आहेत.त्यांतील ३ विवक्षित पदे अन्य कवींची आहेत, असे एक मत आहे. नामदेवांच्या हिंदीवर मराठीची छाप तर आहेच; परंतु व्रज,अवधी,राजस्थानीअशाभाषांचेही संस्कार आहेत.

व्रजादी भाषा बोलणाऱ्या प्रदेशांत त्यांचे वास्तव्य झाल्याचे आणि त्यांनी ह्या भाषा निदान काही प्रमाणात आत्मसात केल्याचे हे द्योतक आहे.नामदेवांची सु. सव्वाशे हिंदी पदेही आता उपलब्ध झालेली आहेत.विष्णुस्वामी, बहोरदास किंवा बोहरदास, जाल्लो, लब्धा, केसो कलंधर किंवा कलधारी ह्यांसारखे अनेक शिष्य नामदेवांना पंजाबात मिळाले. त्यांपैकी जाल्लो किंवा जाल्हण सुतारासारखे काही शिष्य नामदेवांसोबत पंढरपूरला आले.

केसो कलधारी ह्याने भावलपूर संस्थानात भागवत धर्माची ध्वजा फडकविली. तेथे ‘कलधारिकी गद्दी’ ह्या नावाने प्रसिद्ध असलेला त्याचा आश्रम तसेच त्याची समाधीही आहे. नामदेवांची अनेक मंदिरे आज पंजाबात पहावयास मिळतात. पंजाबातील गुरदासपूर जिल्ह्यात घुमान किंवा घोमान गावी असलेले मंदिर (गुरुद्वारा बाबा नामदेवजी) प्रसिद्धआहे. नामदेवांचे शिष्य बोहरदास यांनी हे मंदिर उभारले, असे म्हणतात. प्रतिवर्षी माघ शुद्ध द्वितीयेस येथे मोठी यात्रा भरते. राजस्थानातआणि उत्तर प्रदेशातही नामदेवमंदिरे आहेत. उत्तर भारतातील रैदास (रविदास किंवा रोहिदास),धना, रज्‍जब, तुलसीदास, पीपा, रामानंद, कबीर आदींनीनामदेवांचा उल्लेख केलेला आहे.

गुजरातमधील विख्यात संत नरसी मेहतांनीही आपल्या काव्यातून नामदेवांचा निर्देश अनेकदा केलेला आहे. देवाने नामदेवांच्या घराचे छप्पर शाकारले, असे राजस्थानातील संत मिराबाईंनी आपल्या एका कवनात म्हटले आहे. उत्तर भारतातप्रसिद्धी पावलेले नामदेव हे दुसरेच कुणी नामदेव असावेत, ही शंका विविध अभ्यासकांनी साधार खोडून काढलेली आहे. ग्रंथसाहिबातील पदांवरील मराठीची छाप, त्यांत येणारा ‘बीठलु’ हा विठ्ठलवाचक शब्द, नामदेवांच्या रूढ चरित्राशी मिळतेजुळते असे ह्या पदांतून येणारे काही उल्लेख पाहता पंजाबात गेलेले नामदेव कुणी वेगळे नव्हते, ही बाब स्पष्ट होते.

ऐंशी वर्षांचे वय झाल्यानंतर इहलोक सोडून जाण्याचे त्यांनी ठरविले. आषाढ शुद्ध एकादशी,शके१२७२ रोजी विठ्ठलापुढे जाऊन ‘आज्ञा द्यावी’ अशी विनंती केली.त्यानंतरआषाढवद्यत्रयोदशी,शके१२७२ह्या दिवशी त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलमंदिराच्या महाद्वारात समाधी घेतली. विठ्ठलदर्शनासाठी येणाऱ्या सर्वसंतसज्‍जनांची धूळ आपल्या मस्तकी लागावी, ही त्यांची इच्छा असल्यामुळे महाद्वाराच्या पहिल्या पायरीखालीच हे समाधिस्थान तयार करण्यात आले होते.

नामदेवांच्या कुटुंबीयांनीहीजनाबाईसह ह्याच दिवशी समाधी घेतली, असे म्हटले जाते. नामदेवांची सून लाडाई हिचे नाव शेवटी गुंफलेला एक अभंग मिळतो. त्यातून मिळणाऱ्या वृत्तांतानुसार लाडाई ही ह्या प्रसंगी कल्याणी येथे प्रसूतीसाठीगेलेली होती; त्यामुळे तिला मात्र ह्या भाग्याला वंचित व्हावे लागले. ‘ऐकिला वृत्तांत सर्व जाले गुप्त।माझेंचि संचित खोटे कैसें।।’ असे उद्‌गार ह्या अभंगात आढळतात. ‘सर्व जाले गुप्त’ ह्या शब्दांचा आधार उपर्युक्त वदंतेस आहे; तथापि नामदेवांच्या वर्तुळातील एक संत परिसा भागवत ह्यांनी मात्र ह्या प्रसंगाचे वर्णन करीत असताना एकट्या नामदेवांच्या समाधीचाच उल्लेख केलेला आहे. शिवाय ह्या समाधीनंतर नामदेवांचा पुत्र विठा किंवा विठ्ठल ह्याने लिहिलेले काही अभंग आहेत.

‘तळहाताची सावली करून तुमची वंशावळी पोशीन असे वचन, हे पांडुरंगा, तू दिल्याचे आमचे वडील आम्हाला सांगत असत; पण ते तू विसरलास’ अशा आशयाची तक्रार विठाने पांडुरंगाला उद्देशून रचिलेल्या एका अभंगातकेल्याचे दिसते. त्यामुळे साऱ्यांनीचसमाधी घेतली, ह्या वदंतेत तथ्य दिसत नाही.

नामदेवांच्यापूर्वचरित्राविषयी वाद आहेत. संत होण्यापूर्वी ते दरवडेखोर होते, असे मत महाराष्ट्रकविचरित्रकार आजगावकरांनी मांडलेले आहे. ह्या मताला नामदेवगाथेतील एका ५६ चरणी अभंगाचा आधार आहे. त्यात नामदेवाविषयी ‘प्राक्तनाचे योगे।भरलासे ओहटा।पाडितसे वाटा चोरांसंगे।। ब्राह्मण, कापडी। गरीब साबडी।केली प्राणघडी बहुतांची।।’ असे म्हटलेले आहे. तथापि हा अभंग त्यात आढळणाऱ्या काही फार्सी शब्दप्रयोगांवरून उत्तरकालीन आणि प्रक्षिप्त वाटतो.नामदेवगाथेत नामदेवांचे आत्मचरित्र म्हणून ओळखले जाणारे १६५ अभंग आहेत.

नामदेवांची पत्‍नीराजाई हिने रुक्मिणीकडे नामदेवांसंबंधी केलेली तक्रार त्यांत आलेली आहे. त्यात राजाई सांगते, की सुई आणि कातर हीच शिंप्याची शस्त्रे असता ‘हा बाण आणि सुरी वागवीतसे’.तथापि उपर्युक्त १६५ अभंगांना नामदेवांचे आत्मचरित्र निःसंदेहपणे म्हणण्यासारखी परिस्थिती नाहीच,हे रा. चिं. ढेरे ह्यांनी दाखवून दिले आहे. वर उल्लेखिलेल्या ५६ चरणी अभंगातच नव्हे, तर ह्या तथाकथित आत्मचरित्रातही अन्य काही ठिकाणीही बरेच फार्सी शब्द आलेले आहेत. शिवाय त्यात एके ठिकाणी नामदेवांच्या तोंडून कबीर आणि रोहिदास ह्या उत्तरकालीन संतांची स्तुती वदविली आहे. त्यामुळे नामदेवांनंतर काही शतकांनी कुणी तरी हे अभंग लिहिले असावेत, असे मत ढेरे ह्यांनी मांडलेले आहे.

नामदेवांनी शतकोटी अभंग रचण्याची प्रतिज्ञा केली होती, असे म्हटले जाते; तथापि ती त्यांना पूर्ण करता आली, असे दिसत नाही. नामदेवांचे म्हणता येतील असे सु. पाच-सहाशे अभंगच आज उपलब्ध होतात.नामदेवगाथांमध्ये अंतर्भूत असलेले पुष्कळसे अभंग नामदेवांचे वाटत नाहीत.⇨ विष्णुदास नामानावाचा एक संत सोळाव्या शतकात होऊन गेला. त्याचे पुष्कळसे अभंग नामदेवांचे म्हणून समजण्याची चूक घडत आलेली आहे.नामदेवगाथांत ह्या विष्णुदास नाम्याचे, तसेच ‘नामदेव’ आणि ‘नामा यशंवत’ ह्या दोन अन्य नामदेवांचे अभंगही अंतर्भूत आहेत. आजही खरीखुरी नामदेवगाथा निर्णायकपणे निश्चित करणे अभ्यासकांनाशक्य झालेले नाही. अशा ह्या गाथांतून जे अभंग सामान्यतः नामदेवांचेमानलेजातात त्यांत ‘आदि’, ‘तीर्थावळी’ आणि ‘समाधी’ अशा तीन प्रकरणांत सांगितलेलेज्ञानेश्वरचरित्रआहे.त्या आधारे ते ज्ञानेश्वरांचे आद्य चरित्रकार समजले जातात; परंतु हेचरित्रसुद्धा खरोखरच नामदेवकृत आहे किंवा काय, ह्या बद्दलही ढेरे ह्यांच्यासारख्या साक्षेपी अभ्यासकांनी शंका व्यक्त केलेली आहे.त्याचरित्राची निवेदनशैली पौराणिक आहे.

नामदेवांसारखा समकालीन करणार नाही अशा चुकाही त्यात आहेत.साधी पण भावोत्कट अभिव्यक्ती हे नामदेवांच्या म्हणून मानल्यागेलेल्या बहुतेकरचनांचेवैशिष्ट्य आहे.शब्दकळेचे प्राचीनत्वही ह्या रचनांतून लक्षणीयपणे प्रत्ययास येते. नामदेवांच्या उत्कट ईश्वरभक्तीचा अत्यंत विलोभनीय असा आविष्कारत्यांतआढळतो.पहाटेच्या वेळी चारा आणावयासजाणाऱ्या पक्षिणीची वाट तिचे उपाशी पिलू पाहात राहते;तशीच ईश्वरचरणांची आस आपणासरात्रंदिवस लागली असल्याचे त्यांनी एका अभंगात म्हटले आहे.‘भेटीलागेमाझाफुटतसेप्राण’, असा आवेग व्यक्तविणारे नामदेव प्रसंगी देवावर रुसून ‘पतितपावन नाम ऐकूनी आलो मी द्वारा। पतितपावन नव्हेसी म्हणूनी जातो माघारा’ असे बोलही त्याला ऐकवितात; परंतु देवावरचा त्यांचा रुसवाही भक्तीचे एक निरागस रूप म्हणून पुढे येतो, कारण विठ्ठलाशी त्यांनी जोडलेले नाते मूल माऊलीचे आहे.‘तू माझी माऊली मी तुझे वासरू । नको पान्हा चोरू पांडुरंगे।’ असा त्यांचा आर्तोद्‌गार ह्याच नात्यातून सहजपणे उमटतो. ‘विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन।’विठ्ठलस्मरण प्रेमपान्हा।।’व‘विठ्ठलचि पाही सर्वांभूती ’ ह्या शब्दांत त्यांनी आपल्या जीवनाचा आशय सांगून टाकलेला आहे.विठ्ठलाचे हे सर्वांभूती असणे ग्रंथसाहिबात अंतर्भूत असलेल्या आपल्या पदांतूनही नामदेव आवर्जून सांगतात (जत्र जाऊ तत बिठलू भैला).

एका पदात आपल्या व्यवसायावर एक रूपक करून त्यातून आपले अंतःकरण हरीशी शिवले गेले असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे(सुईने की सुई रूपे का धागा।नामे का चितु हरि सउ लागा।।).नामदेवांचे म्हणून सांगितले जाणारे एक चित्र लॉरेन्सबिनयन आणि आर्नोल्ड ह्यांच्या द कोर्ट पेंटर्स ऑफ द ग्रँड मुघल्सह्यापुस्तकात दिलेले आढळते.धाबळी पांघरलेले आणि गळ्यात तुळशीमाळ घातलेले नामदेव विविध हिंदू-मुसलमान साधूंसमवेत त्यात दाखविलेले आहेत. नामदेवांच्या चित्रावर त्यांचे नावही अरबी लिपीत आहे.मात्र हे चित्र समकालीन नसून सतराव्या शतकातले आहे.

 

संदर्भ:१.आजगावकर, ज. र. श्री नामदेवमहाराज आणि त्यांचे समकालीन संत, मुंबई, १९२७.

२.ढेरे, रा. चिं. संपा. संतांच्याआत्मकथा, पुणे, १९६७.

३. ढेरे, रा. चिं. संपा. संतांच्याचरित्रकथा, पुणे, १९६७.

४.तुळपुळे, शं. गो. पांचसंतकवी,पुणे, १९४८.

५. भावे, वि. ल.महाराष्ट्र-सारस्वत (शं. गो. तुळपुळेह्यांच्यापुरवणीसह),मुंबई, १९६३.

६.महाराष्ट्र शासन, श्रीनामदेवचरित्र,काव्यआणिकार्य,मुंबई, १९७०.

७.मुळे, मा. आ. श्रीनामदेवचरित्र, पुणे, १८९२,पुनर्मुद्रण १९५२.

कुलकर्णी, अ. र.

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate