অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

संत सावता महाराज

संत सावता महाराज

सांवता माळी

(१२५०–१२९५). एक मराठी संतकवी. ते संत ज्ञानदेव-नामदेव यांचे समकालीन असून पंढरपूरजवळील अरणभेंडी (अरण) ह्या गावचे रहिवासी होत. वडिलांचे नाव परसूबा व आईचे नाव नांगिताबाई. त्यांच्या जीवनाविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. भेंड गावातील रूपामाळी भानवसे ह्यांची मुलगी जनाबाई हिच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन अपत्ये होती. मुलगा विठ्ठल व कन्या नागाबाई. गृहस्थाश्रमी असूनही ते विरक्त वृत्तीचे होते.

संतश्रेष्ठ ⇨ ज्ञानेश्वर व ⇨ नामदेव ह्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील निरनिराळ्या जातीतल्या संतांनी अभंगांद्वारे विठ्ठलाचा व भक्तीचा महिमा गायिला. सांवता महाराज हे निस्सीम विठ्ठलभक्त होते. ⇨ वारकरी संप्रदाया तील तत्कालीन संतसज्जनांमध्ये त्यांचा मोठा लौकिक होता. विठ्ठलभक्तीने भारलेल्या त्यांच्या अभंगरचनांनी काव्यामध्ये भक्तिभावनेचा मळा फुलविला. त्यांचे फार थोडे अभंग उपलब्ध आहेत.

श्रीसकलसंतगाथे च्या पहिल्या खंडामध्ये (आवृ. २) त्यांचे काही अभंग प्रसिद्घ झाले आहेत. काशीबा गुरव नावाचे एक गृहस्थ त्यांचे अभंग लिहून ठेवीत. आपल्या मळ्यातील भाजीपाल्यामध्येही त्यांनी विठ्ठलाचे रूप पाहिले. उदा., कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥ लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी ॥

सांवता माळी यांनी विठ्ठलाच्या दृष्टिगोचररूपाचे भावस्पर्शी वर्णन पुढील एका अभंगामध्ये केले आहे

‘विठ्ठलाचें रूप अतर्क्य विशाळ। हृदयकमळ मंत्रसिद्घ॥

दिगंबर मूर्ती गोजरी सांवळीं । तोडे पायीं वाळी मनगटीं ॥

कटीवरी हात, हातीं पद्म शंख । पुष्पकळी मोख अंगुलींत ॥

सांवता माळी म्हणे शब्दब्रम्ह साचें । नाम विठ्ठलाचें कलियुगीं ॥’

रब्रह्मभेटीचे वर्णनही सावता माळी यांनी एका अभंगामध्ये केले असून त्यांच्या अभंगांमधून विठ्ठलभक्तीचा उत्कट आविष्कार व व्यावसायिक निष्ठा प्रत्ययास येते. आपल्या नित्य व्यवसायातील अनुभवांचे अनेक संदर्भ देऊन त्यांनी अभंगरचना केल्या. उदा., ‘शांति शेवंती फुलली । प्रेम जाई जुई व्याली ॥’ श्रीज्ञानदेव व नामदेव ह्या थोर संतांचा सहवास त्यांना वारंवार लाभला असावा. संत नामदेवांनी त्यांच्या अद्वैताचा उल्लेख पुढील शब्दांत वर्णिला आहे: ‘धन्य ते अरण, रत्नाचीच खाण । जन्मला निधान सावता तो । सांवता सागर, प्रेमाचा आगर । घेतला अवतार माळ्या घरी ॥’ अरणभेंडी ह्या गावी त्यांच्या पुण्यतिथीचा सोहळा प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो. त्यांच्या समाधीकालाविषयीचा पुढील अभंग प्रसिद्घ आहे :

‘बारा शतें सतरा शालिवाहन शक । मन्मथ नामक संवत्सर ॥

ऋतु ग्रीष्म कृष्ण आषाढ चतुर्दशी । आला उदयासी सहस्त्रकर ॥

सांवता पांडुरंगस्वरुपीं मिनला । देह समर्पिला ज्याचा त्यासी ॥

सांवता माळी यांची कविता संख्येच्या दृष्टीने अल्प असली, तरी तिची रचना प्रासादिक आहे. त्यावरून त्यांच्या ठिकाणी पारमार्थिक व काव्यात्मक या दोन भिन्न वृत्ती कशा एकवटल्या होत्या, याची कल्पना येते. त्यांनी आपल्या अभंगांतून अध्यात्मप्रधान कर्मयोग सहजपणे प्रतिपादिला आहे. तत्कालीन भगवद्‌भक्तांत त्यांना मोठा मान होता, याचे चपखल शब्दांत एकनाथांनी वर्णन केले आहे. ते म्हणतात, ‘एका जनार्दनी सांवता तो धन्य । तयाचे महिमान न कळे काहीं ॥’.


संदर्भ  १. आजगावकर, ज. र. सांवता माळी : प्राचीन मराठी संतकवि, खंड एक, मुंबई, १९५७.

२. बेणारे, गो. गो. संपा. पंढरी-संदेशसांवता माळी विशेषांक, पंढरपूर, १९८३.

३. राऊत, गो. वि. श्रीसांवताचरित्र, अमरावती, १९३०.

पोळ, मनीषा

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate