অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सातवाहन वंश

सातवाहन वंश

सातवाहन वंश

प्राचीन भारतातील एक बलाढ्य सुप्रसिद्घ राजवंश. या वंशातील राजांनी इ. स. पू. सु. दुसऱ्या शतकापासून इ. स. तिसऱ्या शतकादरम्यान मुख्यत्वे महाराष्ट्रात अधिसत्ता गाजविली. या वंशाविषयीची माहिती मुख्यत्वे त्यांची नाणी, शिलालेख, रुद्रदामनचा जुनागढ येथील प्रस्तरलेख, आपस्तंब धर्मसूत्र, वायु, विष्णु, मत्स्य आदी पुराणे; जैन ग्रंथ वगैरेंतून मिळते.

या वंशाच्या मूलस्थानाबद्दल आणि नावाबद्दलही विद्वानांत मतभेद आहेत. तसेच या राजवंशाच्या कालखंडाबद्दल आणि राजांच्या एकूण संख्येबद्दल विद्वानांत एकमत नाही. पुराणांतील राजांची काही नावे तत्कालीन कोरीव लेखांतल्या पुराव्याशी जुळत नाहीत; तथापि सामान्यतः या वंशातील तीस राजांनी सु. ४५० वर्षे राज्य केले असे मानण्यास हरकत नाही.

पुराणांत या राजांना आंध्र किंवा आंध्रभृत्य म्हटले आहे; परंतु त्यांचे आरंभीचे लेख व नाणी महाराष्ट्रात उपलब्ध झाली, त्यांवरून त्याचा उदय महाराष्ट्रात झाला असावा. पुराणांतील वंशावळी लिहिल्या गेल्या त्यावेळी त्यांची सत्ता आंध्र प्रदेशावर पसरली होती; म्हणून त्यांना पुराणांत आंध्र वा आंध्रभृत्य अशी नावे मिळाली असावीत.

सम्राट अशोकाच्या निधनानंतर (इ. स. पू. २३२) हा वंश उदयाला आला असावा. या वंशाला कोरीव लेखात ‘सातवाहन कुल’ असे म्हटले आहे, त्यावरून त्याचा संस्थापक कोणी सातवाहन राजा असावा. या सातवाहन राजाची प्रारंभीची नाणी मराठवाड्यात व विदर्भात सापडली आहेत. नेवासे येथील उत्खननांतही ती सापडली आहेत. या पुराव्यांवरून त्यांची सत्ता इ. स. पू. तिसऱ्या-दुसऱ्या शतकांत होती असे दिसते.

सातवाहन हा या वंशाचा उत्पादक असला, तरी त्याचा नामनिर्देश पुराणांत आढळत नाही; कारण आरंभी त्याचे राज्य बरेच मर्यादित असावे; तथापि त्याने महाराष्ट्रातील महारठी व महाभोजी अधिपतींशी सख्य आणि वैवाहिक संबंध जोडून ते लवकरच वाढविले असावेत. त्याच्यानंतर बहुधा तिसऱ्या पिढीतील सिमुक (श्रीमुख) याचे नाव या वंशाचा उत्पादक म्हणून पुराणांत येते. तो इ. स. पू. २०० च्या सुमारास राज्य करू लागला असावा.

जुन्नरजवळ नाणेघाटातील लेण्यात त्याचा पुतळा कोरून त्याखाली त्याचे नाव ‘सिमुक सातवाहन’ असे कोरले होते. तसेच त्याचा पुत्र सातकर्णी, सून नागनिका व काही राजपुत्र यांचेही पुतळे तेथेच कोरून त्यांच्या पीठांवर त्यांची नावे कोरली होती. सर्व पुतळे आता नष्ट झाले आहेत; पण त्यांची नावे अवशिष्ट आहेत.

सिमुकाने २३ वर्षे राज्य केले असे पुराणे सांगतात. त्याच्या राज्यात पुणे, नासिक, अहमदनगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचा अंतर्भाव होता. त्याची राजधानी प्रतिष्ठान (औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण) येथे होती असे दिसते.

सिमुकाच्या निधनाच्या वेळी त्याचा पुत्र प्रथम सातकर्णी (कार. इ. स. पू. २००–१७७ ) हा अल्पवयस्क असल्यामुळे सिमुकाचा भाऊ कृष्ण हा गादीवर आला. त्याच्या अमात्याने नासिकजवळच्या ‘पांडवलेण्यां’तील एक लेणे कोरवून ते बौद्घ भिक्षूंना अर्पण केले, असे तेथील कोरीव लेखावरून कळते. या लेखात कृष्णाचा निर्देश ‘सातवाहन कुलातील कृष्ण राजा राज्य करीत असता’ असा केला असल्याने तो सातवाहन राजाचा पुत्र नसून बहुधा तिसऱ्या पिढीतील त्यांचा वंशज असावा.

कृष्णानंतर प्रथम सातकर्णी गादीवर आला. पुराणांत याला कृष्णाचा पुत्र म्हटले आहे; तथापि नाणेघाटात सिमुक, सातकर्णी, त्याची राणी नागनिका, तिचे पुत्र वगैरेंचे पुतळे कोरले होते; पण त्यांमध्ये कृष्णाचा पुतळा नव्हता. त्यावरून सातकर्णी हा सिमुकाचा पुत्र असावा.

सातकर्णीने नर्मदा नदीच्या उत्तरेस आपल्या राज्याचा विस्तार केला. सांचीच्या तोरणावर त्याचा नामनिर्देश आहे. तत्कालीन कलिंगनृपती खारवेल याने त्याच्या राज्यावर स्वारी करण्याकरिता चतुरंग सेना पाठविली होती; पण ती नागपूरजवळच्या कन्हान (कृष्णवेणा) नदीजवळ आल्यावर बहुधा सातकर्णीच्या सेनेच्या आगमनाची वार्ता मिळाल्यावर तिला परत फिरावे लागले.

सातकर्णीने नागाधिपती महारठी कळलाय याची कन्या नागनिका हिच्याशी विवाह केला होता. त्याने दोनदा अश्वमेध करून दक्षिणेतील आपले सार्वभौमत्व प्रस्थापित केले. याशिवाय त्याने राजसूय, अग्न्याधेय, आप्तोर्याम, दशरात्र, त्रयोदशरात्र, अंगिरसत्रिरात्र, गवामयन इ. अनेक श्रौत याग करून बाह्मणांना हजारो गाई, हत्ती, घोडे, कार्षापणनामक तत्कालीन नाणी दान दिली. त्यांचा तपशील नागनिकेच्या नाणेघाटातील लेखांत दिला आहे.

सातकर्णीच्या नाण्यांच्या प्राप्तिस्थानावरून त्याचे राज्य मध्य महाराष्ट्र, पश्चिम आंध्र व माळवा अशा विस्तृत प्रदेशांवर होते. तसेच नाणेघाट लेखाच्या आरंभी इंद्र, धर्म, संकर्षण, वासुदेव व चार लोकपालांचा उल्लेख आला आहे. त्यावरून सातकर्णी भागवत संप्रदायाचा अनुयायी असावा, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.

सातकर्णीला वेदिश्री आणि शक्तिश्री असे दोन पुत्र होते. पुराणांत यांच्या ऐवजी पूर्णोत्संग आणि स्कंदस्तंभी अशी नावे आढळतात. अनेक विद्वानांनी वेदिश्री हा अल्पवयस्क असल्यामुळे नागनिका काही काळ राज्यकारभार पाहात होती असे म्हटले आहे; पण ते बरोबर दिसत नाही. नाणेघाटातील लेखात तिचे वर्णन ‘महिना-महिना उपोषण करणारी, गृहतापसी, ब्रह्मचर्यव्रताचे पालन करणारी, दीक्षा, व्रत आणि यज्ञ यांच्या अनुष्ठानांत निपुण’ असे केले आहे. त्यावरून ती त्या काळी आपले जीवन धार्मिक वृत्तीने घालवीत होती, यात संशय नाही. त्या काळी तिचा ज्येष्ठ पुत्र वेदिश्री हा राज्य करीत होता. त्याचे वर्णन नाणेघाटातील लेखात ‘दक्षिणापथपति’असे केले आहे. [⟶ नागनिका].

वेदिश्रीनंतर अनेक राजांनी राज्य केले. त्यांची नावे व शासनाची वर्षे पुराणांत दिली आहेत; पण ती सर्वस्वी विश्वसनीय नाहीत. या वंशातील आठवा राजा आपीलक याचे मात्र एक तांब्याचे नाणे छत्तीसगढमध्ये महानदीच्या काठी बालपूर येथे सापडले आहे. सतरावा राजा ⇨हाल हा गाथा सप्तशती नामक सुप्रसिद्घ प्राकृत भाषेतील सातशे गाथांच्या संग्रहाचा कर्ता म्हणून विख्यात आहे.

हाल राजानंतरच्या पाच राजांच्या कारकीर्दीविषयी पुराणांत किंवा इतरत्र काहीच माहिती मिळत नाही. या कालात कुशाण सम्राटांच्या भूमक आणि नहपान या क्षत्रपांनी (प्रांताधिपतींनी) गुजरात व महाराष्ट्र जिंकून तेथे आपला अंमल बसविला. नहपान व त्याचा जामात ऋषभदत्त यांचे शक संवत् ४१ ते ४६ पर्यंतचे लेख महाराष्ट्रात नासिक, कार्ले वगैरे ठिकाणी सापडले आहेत. त्यांवरून नहपानाचेसाम्राज्य दक्षिणेत कृष्णा नदीपासून उत्तरेत अजमीरपर्यंत पसरले होते असे दिसते.

प्रभदत्त वा उषवदात याने बौद्घ भिक्षूंकरिता नासिकजवळ लेणी कोरविली, त्यांच्या चरितार्थाकरिता ग्रामदाने दिली, तसेच धर्मशाळा, उद्याने, तलाव इ. लोकोपयोगी कृत्ये केली आणि सहस्र ब्राह्मणभोजने घालून ब्राह्मणांनाही विविध प्रकारची दाने दिली. विदर्भातही रुपिअम्मनामक महाक्षत्रपाचा अंमल होता, हे पौनी (भंडारा जिल्हा) येथे अलीकडे सापडलेल्या छायास्तंभावरून माहीत झाले आहे.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/12/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate