অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिंघण

सिंघण

सिंघण

( ? –? जून १२४७). यादव घराण्यातील एक महाप्रतापी व कलाभिज्ञ राजा. त्याच्या पूर्वजीवनाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही; तथापि त्याचे अनेक ताम्रपट आणि शिलालेख महाराष्ट्र, कर्नाटक, माळवा, गुजरात, दक्षिण कोकण वगैरे प्रदेशांत उपलब्ध झाले आहेत. त्यावरुन त्याचे राज्यरोहन, लढाया, सेनापती, राज्यपाल आणि विस्तृत साम्राज्य यांची माहिती मिळते.

जैत्रपाळाचा (जैतुगी) सिंघण हा ज्येष्ठ मुलगा इ. स. सु. १२०० मध्ये राज्यारूढ झाला. त्याच्या राज्यरोहणासंबंधी ताम्रपटांत एकवाक्यता नाही. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक धोरण अवलंबिले. पूर्वी यादवांच्या आधिपत्याखाली असलेल्या राज्याचा बराच भाग होयसळांनी बळकाविला होता. त्यापैकी कृष्णा व मलप्रभा नद्यांच्या दक्षिणेचा देश सिंघणाने परत मिळविला. त्यावेळी किसुकाडचा विक्रमादित्य आणि गुत्तलचा दुसरा वीर विक्रमादित्य हे होयसळांचे मांडलिक राजे सिंघणाचे अंकित झाले. यादवांनी बेळवोळ, हुलिगेरे, हनगळ हे प्रांत लागोपाठ घेतले. तेव्हा होयसळांनी बनवासीच्या उत्तर सीमेवर यादवांना कडवा प्रतिकार केला. घनघोर युद्घ होऊन होयसळांचा राजा दुसरा बल्लाळ याचा पराभव झाला (१२११). सिंघणाने बल्लीग्राम (बेलगामी –शिमोगा जिल्हा) ही बनवासी प्रांताची राजधानी काबीज केली. पुढे सिंघणाच्या बीचण या सेनापतीने श्रीरंगपटणच्या जाजल्लदेवास नमविले (१२१३)आणि वरटाधिपती कक्कलाचा पराभव केला. त्यामुळे तुंगभद्रा नदी ही यादवांच्या साम्राज्याची दक्षिण सीमा झाली.

दक्षिणेकडील युद्घात यादवांचे विक्रमापाल आणि पाऊस हे दोन सेनापती धारातीर्थीवर पडले; तर बीचणाने प्रमुख लढायांचे नेतृत्व केले. यानंतर गोव्याचा कदंब त्रिभुवनमल्ल आणि रट्ट घराण्यातील वेणुग्रामचा (बेळगाव) चौथा कार्त्तवीर्य हे सिंघणाचे अंकित झाले. या सुमारास जैत्रपाळाने आंध्र प्रदेशात गादीवर बसविलेल्या काकतीय वंशातील गणपती राजाने राज्यविस्ताराचे धोरण अवलंबिले. तेव्हा सिंघणाने त्यावर स्वारी करुन त्याचा पराजय केला. पुढे सिंघणाने कोल्हापूरच्या शिलाहार वंशातील दुसरा भोज यावर स्वारी केली. खिद्रापूरजवळ (कोल्हापूर जिल्हा) कृष्णवेजी आणि कुवेजी या नद्यांच्या संगमाजवळ घनघोर लढाई होऊन भोजाचा सेनापती बन्नेस मारला गेला आणि भोजाने प्रणालक (पन्हाळा) किल्ल्यात आश्रय घेतला. तो किल्ला जिंकून सिंघणाने तिथेच भोजास बंदिवासात ठेवले (१२१८). त्यानंतर सिंघणाने खानदेशातील भंभागिरीच्या (भामेर) लक्ष्मीदेवाला जिंकले.

दक्षिणेकडील विजयानंतर सिंघणाने आपला मोर्चा माळव्याचे परमार आणि गुजरातचे चालुक्य राजे या यादवांच्या पिढीजात शत्रूंकडे वळविला. सिंघणाचा सेनापती खोलेश्वर याने माळव्याचा अर्जुन परमार याचा पाडाव करुन त्याचा मांडलिक सिंधूराजाला ठार मारले आणि त्याच्या शंख नावाच्या पुत्रास कैद केले. पुढे लवणप्रसाद वाघेल्यांच्या राज्यात यादव सैन्याने जाळपोळ केली. तेव्हा लवणप्रसादाने तह केला; पण सिंघणाने अचानक या चढाईतून माघार घेतली.

पुढे १२२१–२९ दरम्यान सिंघणाने पुन्हा गुजरात-माळव्यावर आक्रमणे केली. त्यावेळी त्याने लाटचा मांडलिक राजा शंख आणि परमार राजा देवपाल यांचा संयुक्त संघ स्थापन केला. त्यांना सामोरे जाणे कठीण आहे, हे चालुक्य राजा वीरधवल याच्या लक्षात आले. शिवाय उत्तरेकडील मुस्लिम आक्रमणासाठी तो तिकडे गेला. तेव्हा त्याचा मंत्री वस्तुपाल याने एक युक्ती योजली आणि सिंघणाच्या दरबारात आपला एक गुप्तहेर पाठवून स्वारीवर निघण्याचा सिंघणाचा बेत कटकारस्थानाने रहित करविला.

सिंघणाचे साम्राज्य उत्तरेस खानदेशापासून दक्षिणेस कर्नाटकातील शिमोगा–अनंतपूर जिल्ह्यांपर्यंत आणि पश्चिम किनारपट्टीपासून (उत्तर कोकण सोडून) पूर्वेस आंध्र प्रदेशातील भागानगर (हैदराबाद) वऱ्हाडपर्यंत पसरले होते. बीचण आणि खोलेश्वर या त्याच्या सेनापतींनी अनुक्रमे कर्नाटक आणि उत्तर हिंदुस्थानात जय मिळविले.

बीचणाने रट्ट, कदंब, गुप्त, पांड्यघराण्यांतील राजांवर जरब बसवून इ. स. १२३८ च्या सुमारास कावेरीच्या काठी यादवांचा विजयस्तंभ उभारला; तर खोलेश्वराने भृगुकच्छच्या सिहाडीचा वध केला आणि तिथे यादवांचा एक जयस्तंभ बांधला. याशिवाय त्याने बनारसचा राजा, रामपाल, नागण,जाजल्ल यांसारख्या राजांनाही अंकित केले होते.

सिंघणाने आपल्या विस्तृत साम्राज्याच्या कारभारासाठी प्रत्येक राज्यघटकांवर आपले राज्यपाल -अधिकारी नेमले होते. कर्नाटक-बेळवोळचा कारभार मल्लिसेट्टी या अधिकाऱ्याकडे होता; तर जोगदल सोमनायकाकडे सिंदवाडीचे आधिपत्य होते. याशिवाय वेंकुव रावुताकडे बेलउला, हुलिगेरे-बनवासी व बसकुरा भाग दिला होता. शिवाय दण्डनायक नागरस, जोगदल पुरुषोत्तम, महाप्रधान हे मय्यनायक इ. काही कर्तबगार अधिकारी होते.

सिंघण हा केवळ एक पराक्रमी आणि धडाडीचा राजा नव्हता, तर कला आणि विद्वानांचा भोक्ता होता. त्याने चांगदेव, अनंतदेव,शारंगधर यांसारख्या विद्वानांना आश्रय दिला होता. चांगदेवाच्या मार्गदर्शनाखाली सिद्घांत शिरोमणी यासाठी एक पाठशाळा (पाटण-चाळीसगाव तालुका) येथे स्थापन करण्यात आली होती.

शारंगधराने संगीतावर लिहिलेला संगीतरत्नाकर हा ग्रंथ प्रसिद्घ आहे. खोलेश्वर या त्याच्या सेनापतीने विदर्भात दहा–बारा मंदिरे बांधली, असा उल्लेख आंबेच्या कोरीव लेखात आहे. त्यांपैकी विष्णू ,योगेश्वरी व गणपती ही मंदिरे धारुरदेशात व रामनारायण हे आंबे येथे बांधले. याशिवाय या काळात योगेश्वर महादेव आणि चण्डिकादेवी या मंदिरांचे बांधकाम केल्याचा उल्लेख अनुक्रमे मार्डीलेख व भांडकलेख यांतून आढळतो. कोल्हापूर आणि खिद्रापूर येथील सिंघणाच्या कोरीव लेखांत तत्कालीन महालक्ष्मी आणि कोप्पेश्वर मंदिरांच्या देखभाल व पूजाअर्चेसाठी तसेच अंगभोगासाठी देणग्या दिल्याचा उल्लेख आहे.

सिंघणाला जैतुगी आणि शारंगपाणीदेव हे दोन मुलगे होते. जैतुगी सिंघणापूर्वीच मरण पावला; पण त्याला कृष्ण आणि महादेव असे दोन मुलगे होते. त्यामुळे सिंघणाच्या निधनानंतर त्याचा द्वितीय पुत्र शारंगपाणीदेव व नातू कृष्ण यांत यादवी उत्पन्न होऊन अखेर कृष्णदेव राज्यारूढ झाला.


पहा : यादव घराणे.

संदर्भ : 1. Deshpande, S. R. Yadava Sculpture, New Delhi, 2003 (reprint).

2. Majumdar, R. C. Ed. The Struggle for Empire, Bombay, 1998.

3. Verma, O. P. The Yadavas and Their Times, Nagpur, 1970.

४. पानसे, मु. ग. यादवकालीन महाराष्ट्र, मुंबई, १९६३.

देशपांडे, सु. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate