অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुखदेव

सुखदेव

सुखदेव

( १५ मे १९०७ –२३ मार्च १९३१). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिकारक. मूळ नाव सुखदेव रामलाल थापर. जन्म लुधियानातील चौरा बाजार येथे. या ठिकाणाला नऊ घर असेही संबोधतात. आईचे नाव शल्ली देवी असे होते. त्यांनी पंजाबमध्ये क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीच्या योजनेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांना धमकावले. यामुळे ब्रिटिश सरकारविरुद्ध सुखदेव अशी स्थिती निर्माण झाली.

सुखदेवांनी ल्यालपूर (पंजाब) येथे १९२६ पासून तरुणांना एकत्र जमविण्यास सुरुवात केली. त्यांनी ‘ हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ‘च्या वाङ्‌मयाचा तरुणांत प्रचार केला. दिल्ली येथे १९२८ मध्ये सर्व क्रांतिनेत्यांची गुप्त परिषद भरली. तीत ‘ हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ’ नावाची नवीन देशव्यापी संघटना उभारण्याचे ठरले. केंद्रीय समितीत सुखदेव व भगतसिंग हे पंजाबतर्फे होते. यात शिववमी, चंद्रशेखर आझाद आणि कुंदनलाल हे विद्यार्थीही होते. संघटनेच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार बाँबची कवचे बनविण्यासाठी सुखदेव लाहोरला गेले. नंतर तयार बाँबची चाचणी झांशी येथे घेतली. लाहोरच्या नॅशनल कॉलेजमधील अभ्यासिकेत सुखदेव यांनी हिंदुस्थानचा इतिहास, रशियन राज्यक्रांती या विषयांचा चिकित्सकपणे अभ्यास केला. जागतिक पातळीवरील क्रांतिकारक साहित्याचे विविध दृष्टिकोण त्यांनी अभ्यासले. कॉम्रेड रामचंद्र,भगतसिंग आणि भगवतीचरण व्होरा यांच्या मदतीने त्यांनी ‘नौजवान भारत सभा’ ही संघटना लाहोर येथे स्थापन केली. या संघटनेचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे ठरविण्यात आले :

(१) स्वातंत्र्यलढ्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे.
(२) तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करणे.
(३) जातियतेविरुद्घ लढणे
(४) अस्पृश्यतेची प्रथा बंद करणे.

या कार्यक्रमांत त्यांनी सक्रिय भाग घेतला. १९२९ मध्ये लाहोर खटल्याबद्दल तुरुंगात असताना त्यांनी कैद्यांना मिळणाऱ्या अमानुष वागणुकीबद्दल उपोषण केले.

नोव्हेंबर १९२८ मध्ये लाला लजपतराय यांनी सायमन कमिशन लाहोरला आले असता निदर्शनाचे नेतृत्व केले होते. निदर्शनाच्या वेळी झालेल्या लाठीमारामध्ये ते घायाळ झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा सूड म्हणून ब्रिटिश अधिकारी साँडर्स याचा गोळ्या झाडून वध करण्यात आला. या कटामध्ये सुखदेव यांचाही सहभाग असल्याने भगतसिंग, राजगुरु यांच्यासोबत त्यांना लाहोरच्या तुरुंगात ठेवण्यात आले. पक्षपाती, वसाहतवादी दृष्टीने ग्रासलेल्या न्यायाधीशांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. सुखदेव आणि त्यांचे साथीदार भगतसिंग, राजगुरु यांना खटल्यातून सोडविण्याचे प्रयत्न म. गांधीजींनी केले; मात्र त्यांना त्यात यश आले नाही. लाहोरच्या तुरुंगात २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, राजगुरु यांच्यासोबत सुखदेव यांनाही फासावर चढविण्यात आले. ब्रिटिश सरकारच्या या अन्यायी, पक्षपाती वृत्तीमुळे भारतीय जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. फासावर चढविण्याअगोदर काही वेळापूर्वी सुखदेव यांनी म. गांधीजींना पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये त्यांनी क्रांतीकारकांबद्दल घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन प्रमुख विचारधारांवर प्रकाश टाकला आहे. सुखदेव यांना हंसराज व्होरा यांच्या प्रयत्नांमुळे लाहोर खटल्यात माफीचा साक्षीदार होण्याची संधी आली; मात्र त्यांनी ती बाणेदारपणे अव्हेरली. या आणि अशा अनेक प्रसंगांतून सुखदेव यांचे अतुलनीय धैर्य, प्रखर देशभक्ती आणि त्यागी वृत्ती यांचा प्रत्यय येतो.

क्रांतिकारक सुखदेव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लुधियाना येथील शाळेला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

लेखक : अमोल राऊत

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate