অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सूर घराणे

सूर घराणे

सूर घराणे

मुसलमानी अंमलातील मोगलकाळात उदयाला आलेला एक अफगाण वंश. या वंशातील सुलतानांनी अठरा वर्षे (इ. स. १५३८– ५६) दिल्लीच्या तख्तावर अधिसत्ता गाजविली. या घराण्यात शेरशाह (कार. १५३८– ४५), इस्लामशाह (कार. १५४५— ५४), फीरुझशाह (कार. १५५४) आणि मुहम्मद आदिलशाह (कार. १५५४– ५६) हे सुलतान झाले. त्यांपैकी शेरशाह (शेरखान) व इस्लामशाह या दोन सुलतानांची कारकीर्द उल्लेखनीय होय.

सूर या घराण्याचा संस्थापक शेरशाह याचे मूळ नाव फरीद असून त्याचे, आजोबा इब्राहीम सूर हे अफगाणिस्तानमधील सुलेमान पर्वतश्रेणीतील रोह गावी घोड्यांचा व्यापार करीत असत; तथापि या धंद्यात त्यांना फारशी प्राप्ती होत नव्हती आणि तिथे विशेष जम बसेना, म्हणून ते बहलूल लोदीच्या काळात (१४५१—८९) आपले नशिब अजमाविण्यासाठी हसन या मुलासह हिंदुस्थानात आले. त्यांना नारनौल या ओसाड परगण्यात हिस्सारच्या जमालखान सारंगखानीच्या हाताखाली चाळीस घोडेस्वारांच्या तुकडीचे सेनानायकत्व व काही खेड्यांची जहागीर मिळाली. त्यांच्या मृत्यूनंतर ती हसनकडे आली.

हसनचे कर्तृत्व पाहून जमालखानने त्याची जौनपूरला राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आणि त्याला पाचशे घोडेस्वारांच्या निर्वाहासाठी ससराम व खवास्सपूर तांडा या परगण्यांची जहागीर दिली. हसनला चार पत्न्यांपासून आठ मुलगे झाले. त्यांपैकी पहिल्या अफगाण पत्नीची फरीद व निझाम ही मुले असून सुलेमान व अहमद ही सर्वांत धाकट्या पत्नीची (जी मुळात गुलाम होती) अपत्ये होत. फरीदचे (शेरशाह) बालपण खडतर होते. त्याने जौनपुरात अरबी व फार्सी भाषांबरोबर अन्य विषयांचा अभ्यास केला. त्यानंतर शेरशाहने बाबरची चाकरी पतकरुन बाबरला अनेक स्वाऱ्यांत मदत केली. तेव्हा बाबराने त्याची मूळ जहागीर त्यास मिळवून दिली (१५२८).

बाबराने शेरशाहसह बिहारची बेगम दुदूबिबी हिला मुहम्मद लोदीविरुद्घच्या वेढ्यात मदत केली. तिने बाबराचे मांडलिकत्व पतकरले आणि शेरशाहची नायब म्हणून नियुक्ती केली. तिच्या मृत्यूनंतर (१५३०) बिहारची सर्व सत्ता शेरशाहच्या हाती आली आणि नंतर त्याने बंगालवर वर्चस्व मिळविण्यासाठी गौडला वेढा दिला (१५३७). त्याने रोहतास किल्ला आणि बंगाल-बिहारचा बहुतेक सर्व भाग जिंकला आणि गौड येथे राज्यभिषेक करुन (३० मे १५३८) मोगलांचा चडसा (१५३९) व कनौज (१५४०) या लढायांत पराभव केला. दिल्लीचे तख्त शेरशाहकडे आले. शेरशाह धडाडीचा योद्घा व कुशल राज्यकर्ता होता. [→ शेरशाह].

शेरशाहला आदिलखान, जलालखान व कुत्बखान हे तीन मुलगे होते त्यांपैकी धाकटा कुत्बखान लहानपणीच वारला. आदिलखान व जलालखान त्याच्या मृत्यूच्या वेळी (१५४५) अनुक्रमे रणथंभोर व रेवा येथे राज्यपाल होते. त्या दोघांत आदिलखान ज्येष्ठ असून शूर, पण आळशी व खुशालचेंडू होता. म्हणून सरदारांनी जलालखानला कालिंजर येथे २६ मे १५४५ रोजी राज्यारूढ केले. त्याने इस्लामशाह हा किताब धारण केला. त्यानंतर तो राजधानी आग्रा येथे गेला आणि तेथील सैन्याची सहानुभूती मिळविण्यासाठी त्याने सैनिकांना दोन महिन्यांचा पगार दिला.

सरदारांनी आदिलखानास समझोत्यासाठी आग्ऱ्याला बोलाविले आणि कुत्बखान नाईब, खवासखान, ईसाखान नियाझी व जलालखान बिन जुलू या चार मातब्बर सरदारांनी त्याच्या सुरक्षिततेची हमी घेतली, तेव्हा तो भेटण्यास निघाला; कारण त्यास इस्लामशाह दगाफटका करण्याची दाट शंका होती. इस्लामशाहने प्रथम त्यास आग्ऱ्याच्या नैर्ऋत्येकडील बयाण हे ठाणे देण्याचे कबूल केले व नंतर शब्द फिरविला.

शिवाय त्यास कैद करण्याचे गुप्त कटकारस्थान रचले. तेव्हा या चार सरदारांनी इस्लामशाहास पदच्युत करण्याचे ठरवून युद्घाची तयारी केली; परंतु आदिलखानाच्या सैन्याचा पराभव होऊन खवासखान व ईसाखान यांना मेवातकडे आश्रय घ्यावा लागला आणि आदिलखान बुंदेलखंडाकडे पळून गेला. त्याची नंतर काहीच माहिती उपलब्ध नाही. मात्र आदिलखानास गादीवर बसविण्याच्या कटकारस्थानातील सरदारांपैकी जलालखान बिन जुलू आणि त्याचा भाऊ यांना इस्लामशाहने मृत्युदंडाची सजा दिली.

कुत्बखान याने लाहोरच्या हैबतखान या राज्यपालकडे आश्रय घेतला होता. त्यास इतर काही सरदारांबरोबर हैबतखानाने ग्वाल्हेरकडे पाठवून दिले; परंतु बहुतेकांना सुलतानाने ठार मारले. त्यामुळे इतर सरदार अस्वस्थ झाले. हैबतखानाच्या नेतृत्वाखाली नियाझींनी सुलतानला विरोध करण्यासाठी सैन्याची जमवाजमव केली आणि अंबालाकडे कूच केले. त्यांना खवासखान येऊन मिळाला; परंतु विजय प्राप्त झाल्यास हैबतखानाची सुलतान बनण्याची महत्त्वाकांक्षा लक्षात येताच खवासखान याने युद्घाच्या दिवशीच आपली फौज माघारी बोलविली. त्यामुळे साहजिकच हैबतखानाचा अंबालाजवळील युद्घात पराभव झाला. त्याचा सुलतानाने पाठलाग केला व काश्मीरमध्ये त्याने अखेर आश्रय घेतला; परंतु त्याची आई व मुली शाही फौजांच्या हाती पडल्या. त्यांना हाल करुन मारण्यात आले. खवासखान कुमाऊँ टेकड्यांतील राजाकडे आश्रयास गेला आणि सुलतानास पुढे शरण आला; तरीसुद्घा सुलतानाने त्याला निर्घृणपणे ठार केले.

इस्लामशाह आपल्या विरोधकांच्या बाबतीत विलक्षण कठोर होता आणि बहुतेकांना त्याने मृत्युदंडाच्या शिक्षा फर्माविल्या. शिवाय मोगलांच्या हालचालींवर त्याचे बारीक लक्ष होते. जेव्हा हुमायून सिंधू नदी पार करुन आत आला आहे, अशी बातमी त्यास मिळाली, तेव्हा तो आजारी असूनसुद्घा त्यास तोंड देण्यास सज्ज झाला; पण हुमायून काबूलकडे गेला. तेव्हा आपल्या आवडत्या स्थळी ग्वाल्हेरला तो परतला. साडेनऊ वर्षांच्या संघर्षमय कारकीर्दीनंतर २२ नोव्हेंबर १५५४ रोजी तो अल्पशा आजाराने मरण पावला.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/12/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate