অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सोळंकी घराणे

सोळंकी घराणे

सोळंकी घराणे

गुजरात, कच्छ, सौराष्ट्र इ. प्रदेशांवर राज्य करणारा एक मध्ययुगीन राजवंश. याचा चौलुक्य वा चालुक्य राजवंश असाही उल्लेख करतात. राजपुतांच्या चार अग्निकुलांत याचा अंतर्भाव होतो. वरील प्रदेशांवर सोळंकी घराण्याचा दहावे ते तेरावे शतकांदरम्यान अंमल होता. या घराण्याचा मूळ पुरुष मूलराज हा सामंतसिंह या चावडा (चाप) घराण्यातील राजाचा सेनापती व भाचा होता. त्याने सामंतसिंहाचा पराभव करून अनहिलवाड (पाटण) येथे राजधानी केली.

चाप घराण्याच्या आधिपत्याखालील उर्वरित प्रदेश पादाक्रांत करून त्याने कच्छसह उत्तरेस सांचोरपर्यंत (सत्यपुर) व दक्षिणेस साबरमतीपर्यंत राज्यविस्तार केला. त्याला शाकंभरीच्या पहिला विग्रहराज या चाहमान राजाच्या आक्रमणास तोंड द्यावे लागले. मूलराजने आपले राज्य चामुण्डराज (कार. ९९५-१०१०) या मुलाकडे सुपूर्द केले. त्याने परमार सिंधुराज याच्या आक्रमणाला यशस्वी रीत्या तोंड दिले; मात्र कलचुरी राजा दुसरा कोक्कल याच्या सामर्थ्यापुढे त्याला नमावे लागले.

चामुण्डराजला वल्लभराज व दुर्लभराज हे दोन मुलगे होते. वल्लभराजच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या दुसऱ्या मुलाकडे सत्ता सोपविली. दुर्लभराज (कार. १०१०-२२) यास चाहमान राजा महेंद्र याने स्वयंवर सभेत (नाडोल येथे) बहीण दिली. तेव्हा तिला लग्नाची मागणी घालणारे माळवा, मथुरा आदी राज्यकर्ते निराश झाले. त्यांनी दुर्लभराजवर आक्रमण केले. परंतु दुर्लभराजने त्यांचा पराभव करून कीर्तिराजचे लाट लुटले (१०१८); मात्र कीर्तिराजला पदच्युत करून ते आपल्या राज्यात समाविष्ट केले नाही. दुर्लभराजने आपला पुतण्या व नागदेवचा मुलगा पहिला भीमदेव याच्यासाठी राजत्याग केला.

पहिल्या भीमदेव (कार. १०२२-६४) राजाच्या कारकिर्दीत महमूद गझनीने सोमनाथ मंदिर लुटून गुजरात पादाक्रांत केले (१०२४); तेव्हा भीमदेवने कच्छमधील कंठकोटमध्ये आश्रय घेतला आणि महमूद परत गेल्यानंतर राजधानीत परतला. नंतर त्याने परमार धंधुकाकडून मौंट अबू घेतले आणि त्या ठिकाणी प्राग्वाट घराण्यातील विमल याला राज्यपाल नेमले. विमलने तेथे प्रसिद्ध आदिनाथ मंदिर बांधले. धंधुकाला पुनःस्थापित केले. पुढे धंधुकाचा मुलगा पूर्णपाल मौंट अबू येथे स्वतंत्रपणे १०४२ पर्यंत राज्य करीत होता; परंतु भीमदेवच्या मौंट अबू येथील कोरीव लेखांवरून (१०६२) हा प्रदेश भीमदेवच्या आधिपत्याखाली आला असावा आणि तो तेराव्या शतकाअखेर सोळंकीच्या अधिसत्तेखाली होता.

भिनमालच्या परमार कृष्णराजला भीमदेवने पदच्युत करून तुरुंगात टाकले; परंतु दक्षिण मारवाडवर स्वामीत्व मिळविण्यात नाडोलच्या चाहमान अहिल व त्याचा वारस अणहिल्ल यांच्यामुळे अडथळा आला. एवढेच नव्हे, तर अहिलच्या नातवाने (बालप्रसाद) त्याला कृष्णराजला मुक्त करण्यास भाग पाडले. पुढे भीमदेवने सिंधू नदी पार करून पंजाबात प्रवेश केला आणि सिंधच्या हम्मुकराजाचा पराभव केला. त्याच्या गुजरातमधील अनुपस्थितीत परमार भोजाच्या कुलचंद्र या सेनापतीने अनहिलवाड लुटले. परत आल्यानंतर भीमदेवने कलचुरी कर्णाच्या मदतीने माळव्यावर आक्रमण केले. तसेच दशार्ण, काशी, अयोध्या आणि यांत्रीदेश येथील राजांचा पराभव केला. पुंड्र आणि आंध्र येथील सत्ताधीशांनी त्याच्याबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले.

भीमदेवला मूलराज, क्षेमराज आणि कर्ण असे तीन मुलगे होते. त्यांपैकी मूलराज लहानपणीच वारला. क्षेमराजाची माता उपस्त्री होती. म्हणून भीम-देवने कर्णाला राज्य देऊन वानप्रस्थाश्रम स्वीकारला. कर्णाने (कार. १०६४-९४) त्रैलोक्यमल्ल हे बिरुद धारण केले आणि नवसारीपर्यंत राज्यविस्तार केला. त्याने परमार जयसिंह याला ठार मारून माळवा हस्तगत केला; परंतु नंतर त्यास परमार जगद्देवच्या हातून पराभव पत्करावा लागला.

त्याने भिल्ल राजा आश याचा पराभव करून अहमदाबाद-जवळील आशपल्ली (आधुनिक अस्वल) घेतले. त्याने गोव्याच्या कदंबवंशी जयकेशीन राजाच्या मयणल्लदेवीनामाक कन्येशी विवाह करून राजनैतिक संबंध जोडले. त्याच्यानंतर त्याचा अज्ञान मुलगा जयसिंह (कार. १०९४-११४३) गादीवर आला. तेव्हा त्याची आई मयणल्लदेवी राजमुखत्यार (रीजंट) म्हणून राज्यकारभार पाहात असे. तो सज्ञान झाल्यावर त्याने सिद्धराज ही पदवी धारण केली. सौराष्ट्रातील आभीरांचा पराभव करून तो प्रदेश जिंकला. तसेच परमारांकडून भिनमालही घेतले. नाडोल व शाकंभरी येथील चाहमान राजे त्याचे मांडलिक झाले. नंतर त्याने माळवा घेऊन चंदेल्लांच्या महोबा व कालंजरवर स्वारी केली. त्यांची भिल्सा नगरी जिंकली.

कल्याणीचा चालुक्य राजा सहावा विक्रमादित्य याचाही पराभव केला. जयसिंह हा सोळंकी घराण्यातील एक श्रेष्ठ, कलाभिज्ञ व पराक्रमी राजा होता. त्याच्या कारकिर्दीतील कोरीव लेखांत त्याचे राज्य उत्तरेकडे जोधपूर येथील बाली आणि सांभर (जयपूर) पर्यंत; तर पूर्वेकडे भिल्सा आणि पश्चिमेकडे काठेवाड व कच्छपर्यंत विस्तारले होते. सिद्धपूर येथील साधू-संन्याशांना उपद्रव देणाऱ्या बार्बरा यांचे बंड त्याने मोडले. सौराष्ट्रात त्याने सज्जन या दंडाधिपतीस राज्यपाल नेमले. चाहमान अर्णोराज यास आपली कन्या देऊन त्यास मांडलिक केले. त्याच्या अखेरच्या कारकिर्दीत परमार राजा जयवर्मन याने माळवा परत जिंकून घेतला आणि नाडोलचा चाहमान राजा आशा यानेही सोळंकीची सत्ता झुगारून दिली.

यसिंह शैवपंथी होता. त्याने सिद्धपूर येथे रुद्रमहाकालाचे मंदिर बांधले. परमार राजा भोजाप्रमाणेच तो विद्येचा चाहता होता. त्याने ज्योतिष, न्याय, पुराण या विषयांच्या अध्ययनासाठी नेक पाठशाळा स्थापन केल्या. त्याच्या दरबारात अनेक विद्वान होते. त्यांपैकीच जैन पंडित हेमचंद्र हे होत.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate