অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इंग्रजी साहित्य -मिल्टनचे युग

इंग्रजी साहित्य -मिल्टनचे युग

मिल्टनचे युग

(१६२५–१६६०) : शेक्सपिअर काळातून मिल्टनच्या काळाकडे येताना इंग्‍लंडच्या समाजजीवनात व विचारप्रणालीत अनेक बदल घडून आलेले दिसून येतात. हे बदल मुख्यतः धार्मिक व राजकीय असून काही प्रमाणात सामाजिक स्वरूपाचे आहेत; मात्र त्यांना सामाजिक क्रांतीचे स्वरूप नाही. पहिला जेम्स व पहिला चार्ल्स यांच्या कडव्या, अनुदार व असहिष्णू धोरणामूळे राजसत्तेविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया निर्माण झाली. आर्चबिशप लॉर्डसारख्या अधिकाऱ्यांच्या संकुचित वृत्तीमुळे धार्मिक क्षेत्रात विरोधी वृत्ती बळावली. ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे प्रस्थापिताला विरोध करण्याची एक तऱ्हेची कडवी प्रवृत्ती. ह्या प्रवृत्तीमुळे धर्माचे विशुद्ध स्वरूप शोधण्याचा प्रयत्‍न सुरू झाला. ही प्रक्रिया ‘धर्मसुधारणे’पासूनचे (रेफॉर्मेशन) चालू झालेली होती. बायबलच्या इंग्रजी भाषांतराने ते लोण आता सामान्यांपर्यंत जाऊन पोचवले होते. सामान्यांना आपल्या धार्मिक व ऐहिक आशा-आकांक्षांचे आणि नीतिमूल्यांचे प्रत्यंतर बायबलच्या साध्या, सोप्या परंतु प्रवाही व आवेशपूर्ण भाषेत, प्रतिपादनात व मूल्यकल्पनांत येत होते. ह्यांतून धर्माच्या विशुद्धीकरणाचा पाठपुरावा करणारा ‘प्यूरिटन पंथ’ निर्माण झाला. त्याने एलिझाबेथनंतरच्या काळातील नीतिमूल्यांबद्दलची शिथिलता, लैंगिक बाबतीतील स्वातंत्र्य आणि धार्मिक बाबींतील औदासिन्य यांवर कडाडून हल्ला चढविला. सामाजिक व आर्थिक परिवर्तनांनुळे सामान्य मध्यम वर्ग, व्यापारी यांना महत्त्व आले होते. जुनी प्रतिष्ठित घराणी व व्यक्ती यांची जागा ह्या नव्याने श्रीमंत होणाऱ्या शहरी मंडळींनी व ग्रामीण भागातील नव्या सधन वर्गाने (जेंट्री) घेतली. पृथ्वीवरील राजांच्या जुलमी अधिसत्तेपेक्षा सर्वशक्तिमान परमेश्वराची स्वर्गीय अधिसत्ता अधिक महत्त्वाची व तिचे प्रतिबिंब व्यक्तीच्या सदसद्‌विवेकबुद्धीमध्ये दिसले पाहिजे, अशा विचारांचा व्यक्तिवाद धार्मिक क्षेत्रात प्रभावी ठरला. त्यामुळे प्यूरिटन क्रांती घडून आली. लोकसत्ताकाचा प्रयोग झाला. पूर्वीच्या शिथिलतेविरुद्ध प्रतिक्रिया म्हणून इंग्‍लंडमधील नाट्यगृहे अनीतिप्रवर्तक मानून बंद करण्यात आली (१६४२). नटांना हद्दपार करण्यात आले.

प्यूरिटनांच्या ह्या कडवेपणामुळे ते सर्व बाबतींत असहिष्णू असून त्यांना कोणत्याही प्रकारच्या कलांचे व करमणुकींचे वावडे आहे अशी समजूत पसरली; परंतु वस्तुस्थिती तशी नव्हती. इंग्‍लंडच्या लोकसत्ताकाचा सर्वाधिकारी क्रॉमवेल हा संगीतप्रेमी होता आणि मिल्टनसारख्या श्रेष्ठ प्यूरिटन कवीमध्ये प्रबोधनातील सौंदर्यपूजा आणि प्यूरिटनांचा शुद्धतेचा आग्रह ह्यांचे मिश्रण आढळते.

ह्या काळातील सर्व प्रवृत्तींचा परिपाक म्हणजे जॉन मिल्टनची कविता. ह्या काव्याने प्रबोधनातील काव्यगुणांवर व संस्कृतीवर कळस चढविला. मिल्टन हा पंडित कवींमध्ये अग्रगण्य मानावा लागेल. पांडित्यावर त्याने आपल्या सौंदर्यासक्तीचे अलंकार चढविले व श्रेष्ठ काव्यगुणांनी काव्याला एक वेगळे तेज आणले. प्यूरिटनांची विशुद्धीकरणाची तळमळ, व्यक्तिगत सदसद्‌विवेकबुद्धीवर मदार, तीवर आधारलेली स्वातंत्र्यलालसा, दुर्दम्य महत्त्वाकांक्षा, राष्ट्रगौरव ह्यांसारख्या गुणांचा समुच्चय त्याच्या पॅरडाइस लॉस्ट (१६६७) ह्या महाकाव्यात दिसून येतो. पूर्ववयात मिल्टनने लॅटिन व इटालियन भाषांत रचना केली. नंतरच्या काळातील धर्मपर काव्यात भक्ती व नादमाधुर्य यांचे मिश्रण (‘ऑन द मॉर्निंग ऑफ ख्राइस्ट्स नेटिव्हिटी’, १६२९) आढळते. कोमस (१६३४), लिसिडास (१६३७), ल'ओलेग्रो (१६३२), आणि इल् पेन्सरोझो (१६३२) ह्यांसारख्या काव्यरचनांत सौंदर्यपूजा, मानवता, धर्मनिष्ठा व निसर्गप्रेम यांचे मिश्रण दिसते. तात्कालिक विषयांवर लिहिलेल्या त्याच्या गद्य पुस्तिकांमध्ये व प्रचारकी निबंधांमध्ये स्वातंत्र्याबद्दलची तळमळ दिसते. परमेश्वरी आज्ञेचे उल्लंघन करण्याच्या मानवाच्या आद्य पतनावर आधारलेले पॅरडाइस लॉस्ट  हे महाकाव्य त्याने लिहिले. आदाम आणि ईव्ह सैतानाच्या मोहाला बळी पडले (पॅरडाइस लॉस्ट ); तथापि त्याच सैतानाच्या मोहाचा प्रतिकार करून ईश्वराच्या पुत्राने परमेश्वराची कृपा मानवासाठी परत संपादन केल्याचे कथानक पॅरडाइस रीगेन्ड (१६७१) ह्या काव्यात आहे. ते अधिक सरळ व साध्या शैलीत आहे. त्याने उत्तरकाळात लिहिलेली सॅमसन अ‍ॅगनिस्टीस (१६७१) ही ग्रीक नाट्यतंत्रावर आधारलेली शोकात्मिका कवीच्या व्यक्तिगत विकलावस्थेवर प्रकाश टाकते. महाकाव्य अथवा नाटक ह्या वस्तुनिष्ठ वाङ्‍मयप्रकारांत मिल्टनने गुंफलेला आत्मचरित्राचा व आत्माविष्काराचा धागा अत्यंत आकर्षक वाटतो.

मिल्टनच्या काळात व नंतरही ‘कॅव्हलिअर कवी’ म्हणून संबोधिलेले दरबारी कवी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण काव्याने महत्त्वाचे ठरतात.  रॉबर्ट हेरिक (१५९१–१६७४),  टॉमस कारू (१५९५ ?–१६४० ?),  जॉन सक्‌लिंग (१६०९–१६४२),  रिचर्ड लव्हलेस (१६१८–१६५८) ह्यांच्या काव्यात एक तर्‍हेची मृदुता, सरलता व तरल सौंदर्यदृष्टी आढळते. चिंतनशीलतेने त्याला वेगळे परिमाण लाभले आहे.

जॉर्ज हर्बर्ट (१५९३–१६३३), रिचर्ड क्रॅशॉ (१६१२ ?–१६४९), हेन्‍री व्हॉन (१६२२–१६९५) ह्या कॅव्हलिअर कवींच्या काव्यात धार्मिक चिंतनाचा धागा बेमालूम मिसळला आहे. त्यांच्या काव्यात भावकाव्याच्या उत्कटतेबरोबरच धर्मभावनेचा कडवेपणा जाणवतो. ह्यांशिवाय जॉन डनच्या मीमांसक काव्यसंप्रदायातील  अब्राहम काउली (१६१८–१६६७), टॉमस ट्राहर्न (१६३७ ?–१६७४) ह्या कवींची चिंतनपर कविता, डनच्या सर्व गुणदोषांसह प्रकट झालेली दिसते. ट्राहर्नच्या काव्यात सौंदर्य, ओज ह्यांबरोबर उत्कटता आणि चिंतनशीलता साधलेली दिसते.

मिल्टनच्या काळापर्यंत गद्यशैलीने फार मोठा प्रगतीचा पल्ला गाठला होता. भाषेचे स्वरूप आता अधिक स्थिर झाले होते. बेकनसारख्यांनी गद्यशैलीत नव्या जाणिवा, नवा अर्थवाहीपणा निर्माण केला होता. बायबलच्या भाषांतरांच्या द्वारा मूळ हिब्रू भाषेतील प्रवाह, ओज व काव्यात्मकता ह्यांचा प्रभाव इंग्रजी भाषेवर पडलेला दिसतो. प्यूरिटन धर्मप्रचारकांनी आपल्या प्रवचनांतून ह्या शैलीला व्यवहाराची जोड दिली व सामान्यांच्या दैनंदिन व्यवहाराला व विचारभावनांना वाट देणारे सामर्थ्य तीत आणले.

रॉबर्ट बर्टन (१५७७–१६४०) व  टॉमस ब्राउन (१६०५–१६८२), आयझाक वॉल्टन (१५९३–१६८३), टॉमस फुलर (१६०८–१६६१) ह्या लेखकांनी गद्यशैली मुक्त स्वरूपात वापरली. बर्टनच्या अनॅटमी ऑफ मेलँकलीमध्ये (१६२१) किंवा ब्राउनच्या रिलीजिओमेडिसीमध्ये (१६४२) सामान्य व्यवहारातील भाषा व पांडित्यपूर्ण लॅटिन शैली ह्यांचे मिश्रण दिसते. विज्ञाननिष्ठा व पारंपरिक कल्पना ह्यांचाही संगम दिसतो. एकोणिसाव्या शतकातील चार्ल्स लँबसारख्या (१७७५–१८३४) निबंधकारांनी ह्यांतील शैलीच्या वैशिष्ट्यांचे अनुकरण केलेले दिसते. चरित्रे व आत्मचरित्रे लिहिण्यासाठीही गद्याचा उपयोग आता केला जाऊ लागला. फुल्क ग्रेव्हिलचे (१५५४–१६२८) फिलिप सिडनीचे चरित्र, आयझाक वॉल्टनची जॉर्ज हर्बर्ट व जॉन डन यांची चरित्रे, लॉर्ड हर्बर्ट ऑफ चेरबरी (१५८३–१६४८) व मार्गारेट डचेस ऑफ न्यूकॅसल यांची हृद्य आत्मचरित्रे पुढील रेस्टोरेशन काळातील गद्याची पूर्वसूचक आहेत.

रेस्टोरेशन काळ

(१६६०-१७००) : १६६० च्या सुमारास इंग्‍लंडच्या राजकीय व सामाजिक जीवनामध्ये क्रांतिकारक बदल घडून आले. ह्या बदलांमुळे वाङ्‍मयाच्या प्रेरणा व स्वरूप यांतही स्थित्यंतर घडून आले. एलिझाबेथकालीन काव्य व नाटक ह्यांत जो भडकपणा व अतिरेकी उत्साह दिसत होता तो मिल्टन काळात ओसरला होता; पण त्याची जागा नैतिक व धार्मिक पुनरुत्थानाच्या ध्येयवेडाने घेतली होती. समाजजीवन नियंत्रित असावे, नाट्यादी करमणुकीसुद्धा त्याज्य ठरवाव्या, ह्या प्यूरिटनकाळातील अतिरेकी आग्रहाने व समाजात वरचेवर झालेल्या बदलांमुळे एक नवी स्थिर घडी असावी, अशी विचारप्रक्रिया सुरू झाली. प्यूरिटन लोकसत्ताकाचा शेवट घडून आला व फ्रान्समध्ये परागंदा जीवन कंठणारा दुसरा चार्ल्स परत इंग्‍लंडच्या राजसत्तेवर आला (१६६०). त्याच्याबरोबर सर्व निर्बंध झुगारून देण्याची व केवळ प्यूरिटनांच्या सोवळेपणाचीच नव्हे, तर सर्वच नीतिनियमांची चेष्टा करण्याची प्रवृत्ती बळावली. ह्यांचे प्रत्यंतर ह्या काळातील नाट्यवाङ्‍मयात विशेषतः दिसून येते.

राजसत्तेबरोबरच राजदरबाराचे व लंडन शहराचे महत्त्व वाढले. व्यक्तिगत भावनांची जागा सामाजिक प्रेरणा, सभ्यता, नागरिकत्वाची जाणीव यांनी घेतली. नागरी रीतीरिवाज व त्यांतून येणारी अभिजातता ह्यांना महत्त्व आले. कल्पनेची जागा बुद्धीने घेतली आणि वैचारिक चिकित्सेची आणि विश्लेषणाची प्रवृत्ती वाढीला लागली. ही प्रवृत्ती गद्याला पोषक होती; म्हणून हा काळ मुख्यत: गद्याचा आहे. स्फुट सुभाषितवजा अशी गद्याभिव्यक्ती ह्या काळात रूढ होऊ लागली. स्वच्छंदतेची जागा अभिजातता घेऊ लागली. रोजच्या व्यवहारातील प्रसंग, विचार व भावना यांच्या अभिव्यक्तीचे भाषा एक समर्थ साधन बनली.

समाजजीवनात मध्यमवर्गीयांचा प्रभाव अधिकाधिक प्रमाणात दिसू लागला. लेखकवर्ग हा अजून आश्रयदात्यांवर व राजदरबारावर अवलंबून असला, तरी वाङ्‍मयात सामान्यांच्या विचारभावनांचे आणि आशाआकांक्षांचे प्रतिबिंब अधिकांशाने पडू लागले. कॉफी हाऊसमध्ये बसणाऱ्या लेखकमंडळींत राजकीय, वाङ्‍मयीन, धार्मिक इ. विषयांवर चर्चा होऊ लागल्या. वृत्तपत्रांच्या प्रसाराने त्यांना वाङ्‍‍मयरूप मिळाले. पंडितांना व विद्वानांनादेखील साध्या व सोप्या भाषेत आपला आशय व्यक्त करावा, असे तीव्रतेने वाटू लागले.

१६६५ मधील प्लेगच्या साथीनंतर व १६६६ साली लागलेल्या मोठ्या आगीनंतर लंडन शहराची पुनर्रचना झाली. राजसत्ता परत आली असली, तरी तिच्यावर नियंत्रण ठेवण्यात मध्यम वर्ग यशस्वी ठरला.

आधुनिक गद्यशैलीची निश्चिती ही ह्या युगाची इंग्रजी वाङ्‍मयाला प्रमुख देणगी. जॉन ड्रायडनच्या गद्यलेखनावरून हे स्पष्टपणे दिसून येते. त्याच्या गद्यलेखनात समकालीन वाङ्‍मयीन अभिरुची नियमबद्ध करण्याचा व अभिजात प्रवृत्तींना प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्‍न दिसतो. त्याच्या एसे ऑन ड्रॅमॅटिक पोएझीत (१६६८) त्याने अभिजात नाट्यकृतींतील नियमबद्धता पुरस्कारिलेली दिसते. ह्या त्याच्या निबंधाने आणि त्याने लिहिलेल्या प्रस्तावनांनी इंग्रजीमधील पद्धतशीर साहित्यसमीक्षेचा पाया घातला, असे मानले जाते.  जॉन बन्यन (१६२८–१६८८) हा ह्या काळचा श्रेष्ठ गद्यलेखक. ह्याच्या गद्य-लेखनात बायबलच्या गद्यपद्यशैलीचे सुपरिणाम दिसतात. ग्रेस अबाउंडिंग...(१६६६), द होली वॉर (१६८२), द लाइफ अँड डेथ ऑफ मिस्टर बॅडमन (१६८०) ह्या बन्यनच्या कथात्मक ग्रंथांत मानवी स्वभावाचा परिणामकारक आविष्कार घडवून आणणारी वर्णनशैली, विनोद व काहीसा विस्मयजनक विक्षिप्तपणा ह्या गुणांचा प्रत्यय येतो. ह्या सर्व गुणांचा प्रकर्ष त्याच्या द पिलग्रिम्स प्रोग्रेस (१६७८) ह्या रूपकात्मक कथेत दिसतो. बायबलवरील परमश्रद्धेने प्रेरित होऊन ख्रिस्ती धर्ममूल्यांचा गौरव करण्यासाठी बन्यनने ही कथा लिहिली; परंतु तिच्यातील धर्मतत्त्वे कोरडी नाहीत. ती सामान्यांच्या भाषेत त्यांच्या विचारभावनांशी एकरूप होऊन ललित स्वरूपात प्रकट झाली आहेत. ही रूपककथा अत्यंत जिवंत, वास्तववादी आणि नाट्यमय झाली आहे. या ग्रंथाने सामान्यांच्या जीवनाशी जवळचे नाते जोडले. वरील गुणांमुळे ही रूपककथा एक प्रकारे अठराव्या शतकात बहराला आलेल्या कादंबरीची पूर्वसूचक ठरते. बन्यनची वृत्ती प्यूरिटन काळाला जवळची असली, तरी त्याचे लेखन रेस्टोरेशन काळात झाले. त्याच्या लेखनात सत्यान्वेषी ऋजुता, नीतिमूल्यांबाबत पराकाष्ठेची तळमळ इ. ह्या काळात उठून दिसणारे गुण दिसतात.

गद्याचा उपयोग रोजनिशा लिहिण्यासाठीही करण्यात आला सॅम्युएल पेपिस (१६३३–१७०३) व जॉन ईव्हलिन (१६२०–१७०६) ह्यांच्या रोजनिशांचा उपयोग गद्यशैलीला स्थिर, सुगम, सरळ रूप देण्यासाठी झाला.

गद्यशैलीत जे गुण ठरले, त्यांचाच उपयोग काव्यात करण्यात आला. परंतु त्यामुळे काव्याला एख प्रकारची मर्यादा पडली. ठराविक काव्यात्म शब्दयोजनेला महत्त्व आले. टीकात्मक, विडंबनपर व उपहासपर काव्याला ह्या काळात उधाण आले. व्यक्तिगत दोषांवर, शारीरिक व्यंगांवर अथवा खाजगी कुलंगड्यांवर काव्यमाध्यमाच्या द्वारा प्रच्छन्न वा उघड टीका करण्याची वृत्ती बळावली. तरल, सूक्ष्म भावनाविष्कारापेक्षा रोखठोकपणा व व्यवहारवाद काव्यात येऊ लागला. गद्याप्रमाणे काव्यशैली सफाईदार होऊन अभिजात स्वरूपात प्रकट होऊ लागली. तीत सूक्ष्मतेचा अभाव असला, तरी बुद्धीची चमक आहे. काव्यार्थ स्पष्टपणे मांडण्याची प्रवृत्ती आहे. ड्रायडनच्या रिलिजिओ लेसी (१६८२), द मेडल (१६८२), द हाइंड अँड द पँथर (१६८७) आणि विशेषत: अँब्सलम अँड अ‍ॅचिटोफेल (१६८१) ह्या रूपकात्मक राजकीय विडंबनकाव्यांत हे सर्व गुण प्रामुख्याने दिसतात. सॅम्युएल बटलरच्या (१६१२–१६८०) ह्यूडिब्रॅस (३ भाग; १६६३, १६६४, १६७८) ह्या काव्यात प्यूरिटन काळातील सोवळेपणा व कर्मठपणा ह्यांचे विदारक विडंबन दिसते. कवीची विनोदबुद्धी अत्यंत तीव्र असून त्याची शैली धारदार व मर्मभेदी आहे. ह्या काळात भावकाव्याला ओहोटी लागली व उपहास विडंबनपर बौद्धिक काव्याला महत्त्व आले, ते प्रामुख्याने ह्या दोन प्रमुख कवींच्या उपहास विडंबनपर काव्यामुळे.

 

रेस्टोरेशन काळातील नाट्यवाङ्‍‍मयात तीन प्रकार आढळतात. धीरोदात्त नायक आणि त्यांची वीरवृत्ती यांवर आधरलेली ‘हिरोइक’ नाटके हा एक, स्वभावातील तर्‍हेवाईकपणावरील नाटके (कॉमेडी ऑफ मॅनर्स किंवा आचारविनोदिनी ) हा दुसरा आणि सामाजिक रीतिरिवाजांवर अधिष्ठित असलेली नाटके हा तिसरा. जो संयम गद्यपद्यात दिसतो, तो हिरोइक नाटकांत दिसून येत नाही. उलट अत्यंत भडक, अतिरेकी अशा प्रसंगांची रेलचेल दिसते. भावना आत्यंतिक टोकाला नेऊन भिडवण्याचा प्रयत्‍न दिसतो. संवादामध्ये दर्पोक्ती व अतिशयोक्ती यांचा सुकाळ आढळतो. ह्यांतील ‘हिरोइक कप्लेट’ ही यमकबद्ध रचना ड्रायडनने टिरॅनिक लव्ह (१६६९), काँक्‍वेस्ट ऑफ ग्रानाडा (१६७०) व औरंगजेब (१६७६) ह्या नाटकांतून रूढ केली. ही शैली पुढे अँटनी आणि क्लीओपात्रा ह्यांच्या कथेवर आधारेलल्या ऑल फॉर लव्ह (१६७८) ह्या नाटकात ड्रायडनने सोडली व पुन्हा निर्यमक छंदाचा आश्रय घेतला.

आचारविनोदिनी म्हणजे सामाजिक चालीरीतींवर व आचारांवर आधारलेली विनोदप्रधान नाटके. ह्या काळातील हा एक वैशिष्ट्यपूर्ण नाट्यप्रकार होय. प्यूरिटनांनी बंद केलेली नाट्यगृहे ह्या काळात पुन्हा उघडण्यात आली. तसेच स्त्रियांचा रंगभूमीवर प्रवेश झाला. परिणामतः नाट्य निर्बंधमुक्त स्वरूपात अवतरू लागले. आचारविनोदिनीचे प्रगत स्वरूप दर्शविणारी नाटके पुढीलप्रमाणे होत: जॉर्ज एथारिजची (१६३५ ?–१६९२ ? ) द कॉमिकल रिव्हेंज किंवा लव्ह इन अ टब (१६६४), शी वुड इफ शी कुड (१६६८), सर फॉप्‍लिंग फ्‍लटर  किंवा द मॅन ऑफ मोड (१६७६). टॉमस शॅडवेलची (१६४२ ?–१६९२)एप्सम वेल्स (१६७३), द स्क्‍वायर ऑफ अ‍ॅल्सेशिया (१६८८) आणि बेरी फेअर (१६८९). विल्यम विचर्लीची (१६४०–१७१६) लव्ह इन अ वुड (१६७२), द जंटलमन डान्सिंग मास्टर (१६७३), द कंट्री वाइफ (१६७५),द प्‍लेन डीलर (१६७७).  विल्यम काँग्रीव्हची (१६७०–१७२९) द ओल्ड बॅचलर (१६९३), लव्ह फॉर लव्ह (१६९५) आणि द वे ऑफ द वर्ल्ड (१७००). आचारविनोदिनीच्या संदर्भात विचर्ली आणि काँग्रीव्ह ह्यांची कामगिरी विशेष मोलाची आहे.

वरील नाटकांतून स्त्रीपुरुषसंबंधांबाबत मोकळेपणा आढळतो. खटकेबाज संवादांना, बुद्धिगम्य विनोदाला, कोटिबाजपणाला महत्त्व आलेले आढळते. ह्यांतील काही नाटकांतील हीन अभिरुची जमेस धरूनही सुखात्मिकेला त्यांनी प्राप्त करून दिलेली लोकप्रियता व प्रतिष्ठा महत्त्वाची मानावी लागेल.

लेखक : अ.के.भागवत

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate