অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्याकरण

व्याकरण

एकोणिसाव्या शतकापासून स्थिर झालेल्या भाषाशास्त्र या ज्ञानशाखेत भाषेचा वर्णनात्मक अभ्यास मोडतो आणि त्यात

(१) ⇨ वर्णविचार,

(२) पदविचार (मॉर्फॉलजी),

(३) वाक्यविचार (सिंटेक्स),

(४) अर्थविचार आणि

(५) शब्दसंग्रहाचा विचार (कोश) एवढे भाग आहेत. व्याकरण (ग्रॅमर) ही संज्ञा सामान्यत: या पाच भागांपैकी २ + ३ एवढ्या क्षेत्रासाठी वापरतात. [परंतु काही जण ती केवळ २ साठी, केवळ ३ साठी, २ + ३ + ४ साठी, किंवा १ + २ + ३ + ४ (मात्र ५ वगळून) साठी वापरतात.] असे जरी असले , तरी व्याकरणाची परंपरा पुष्कळ आधीची आहे; खरे तर एकाहून अधिक परंपरा आहेत.

व्याकरणाच्या परंपरा

मानवी इतिहासात चार ठळक परंपरा दिसतात. प्राचीन अभिजात भारतीय परंपरा (इ. स. पू. सहाव्या शतकापासून), युरोपीय परंपरा (इ. स. पू. चौथ्या शतकापासून), चिनी परंपरा (इ. स. दुसऱ्या शतकापासून), अरबी परंपरा (इ. स. आठव्या शतकापासून). अर्वाचीन मराठी विचारांवर पहिल्या दोघींचा प्रभाव दिसतो. व्याकरणाचा उद्‌भव वाङ्‌मय शिकण्याचे एक साधन म्हणून, किंवा भाषा शिकण्याचे साधन म्हणून झाला. त्याला स्वतंत्र ज्ञानशाखेची प्रतिष्ठा मागाहून लाभली.

प्राचीन अभिजात भारतीय परंपरा सुरुवातीला तरी संस्कृत भाषेशी निगडित होती.

‘व्याकरण’ म्हणजे फोड करून उलगडा करणे. वेद जुने झाल्यावर वेदविद्या पुढे आली आणि तिला सहायक म्हणून शिक्षा (उच्‍चारण), कल्प (धर्मविधी), व्याकरण किंवा शब्दशास्त्र, निरुक्त (अपरिचित शब्दांचा उगमाकडे जाऊन उलगडा करणे), छंदस् (पद्यरचना) आणि ज्योतिष (आकाशस्थ गोल आणि कालमापन) ही सहा वेदांगे पुढे आली [→ वेद व वेदांगे]. कालांतराने ती वेदविद्येपासून कमी-अधिक सुटी झाली. प्रथम व्याकरण शास्त्रपदवीला पोचले. ⇨ पाणिनीने संस्कृतचे तयार व्याकरण (इ. स. पू. सहावे-पाचवे शतक) दिले. ⇨ पतंजली, ⇨ भर्तृहरी (⇨ वाययपदीय कर्ता), ⇨ नागोजी भट्ट, ⇨ भट्टोजी दीक्षित यांनी त्याच्यामागील सैद्धांतिक बैठकीच्या स्पष्टीकरणात वेगवेगळ्या पद्धतींनी भर घातली.

पाश्चात्त्य परंपरा जरी प्लेटो व ऍरिस्टॉटल यांच्या स्फुट विचारांपासून सुरू होते, तरी डायोनायसस थ्रॅकस (इ. स. पू. दुसरे शतक) याचा पदविचार आणि ऍपोलोनियस डिस्कोलस (इ. स. दुसरे शतक) याचा वाक्यविचार या ग्रीक व्याकरणग्रंथांमुळे ती स्थिर होते. प्रिसियन (इ. स. सहावे शतक) याच्या लॅटिन व्याकरणाचा नंतरच्या सर्व शालेय व्याकरणावर पगडा होता. शुद्ध कसे बोलावे आणि लिहावे, हे व्याकरण शिकल्याने समजते, हा त्याचाच विचार ⇨ दादोबा पांडुरंग तर्खडकरांपर्यंत येऊन पोचतो.

भारतात व्याकरणाने मीमांसा (वायार्थांचा शोध), तर्क (लॉजिक), अलंकार (र्‍हेटारिक) आणि तत्त्वज्ञान यांच्यामधील वादांत तटस्थ राहून स्वायत्तता जपण्याचे धोरण स्वीकारले. उलट पाश्चात्त्य व्याकरण थेट आधुनिक काळापर्यंत या वादांत पुष्कळदा अडकत गेले. पाणिनीय व्याकरणाचा परिचय झाल्यावर स्वायत्त व्याकरण किती परिपक्व असू शकते, याची जाणीच पाश्चात्त्यांना झाली आणि वर्णनात्मक भाषा-विज्ञानाची पायाभरणी सुलभ झाली. ‘ग्रॅमर’ म्हणजे ना केवळ लिहिण्याची कला, ना केवळ वाडमयाचा अन्वयार्थ लावण्याचे साधन, ना केवळ ‘र्‍हेटारिक’, ‘लॉजिक’, ‘मेटॅफिजिक्स’ (तत्त्वज्ञान) यांत शिरण्याचा उंबरठा, ही जाणीव व्हायला विसावे शतक उजाडावे लागले.

व्याकरणाचा आद्य प्रश्न

भाषेचे भाषाशास्त्रीय वर्णन करायचे, म्हणजे कोणत्या भाषेत कोणते प्रयोग उपलब्ध असतात, याची व्यवस्था स्पष्ट करायची, उपलब्ध असतात म्हणजे बोलणाराने/लिहिणाराने आपले मनोगत (अर्थ) शब्दोच्‍चार/लेखन (शब्द) यांच्या मदतीने व्यक्त करण्यासाठी उपलब्ध आणि ऐकणाराने/वाचणाराने शब्दश्रवण/वाचन (शब्द) यांच्या मदतीने ते मनोगत (अर्थ) जाणून घेणे. या प्रकारे शब्दांचा आणि अर्थांचा मेळ बसतो. तो भाषाप्रयोगांच्या मागे असलेल्या भाषाव्यवस्थेमुळे, (शब्द म्हणजे लहानमोठी ऐकलेली/वाचलेली बाह्य शब्दरूपे. अर्थ म्हणजे व्यक्त झालेली/जाणून घेतलेली अंतर्गत अर्थरूपे.)

ब्दरूप आणि अर्थरूप यांचा संबंध म्हणजे शब्दार्थसंबंध. शब्दकोशामध्ये हा शब्दार्थसंबंध विशेष पातळीवर दाखवला जातो. उदा., घ्, ओ, ड, आ हे वर्ण या क्रमाने घेतले म्हणजे (घोडा हे) शब्दरूप; चार पाय, आयाळ, केसाळ शेपूट इ. असलेला शाकाहारी सस्तन प्राणी म्हणजे अर्थरूप; आणि पुल्लिंगी, एकवचनी नाम हा शब्दार्थसंबंध. याउलट व्याकरणात हा शब्दार्थसंबंध सामान्य पातळीवर दाखवला जातो. उदा. कर्त्याच्या जागी नाम, कर्माच्या जागी नाम, विधेयाच्या जागी क्रियापद ही सामान्यत: या क्रमाने ठेवली ,म्हणजे वाक्य तयार होते (रचना), अवरोही सूर, एक बलकेंद्र, सलग उच्‍चारण हे त्याचे शब्दरूप (शब्दांकन) आणि अमुक वस्तुस्थिती असल्याचा दावा करणे, हे त्याचे अर्थरूप (अर्थांकन), रचना शब्दार्थसंबंध दाखवते. सामान्य पातळीवर राहणारे व्याकरण आणि विशेष तपशिलांत शिरणारा कोश ही परस्परांना पूरक असतात.

व्याकरणगत रचनेचा आद्य प्रश्न असा, की केवळ काही हजार अशा शब्दकोशगत शब्द-अर्थ-जोड्यांमधून केवळ अगणित अशा शब्द आणि अर्थाच्या व्याकरणगत रचना कशा उपलब्ध होतात? त्या उपलब्ध होतात, म्हणजे भाषाप्रयोग करणाऱ्यांना स्वीकाराव्याशा वाटतात (म्हणजे ‘साधु’ ठरतात); त्यांचे व्यवस्थापन होते, म्हणजे व्याकरणाच्या नियमांत त्या बसतात (म्हणजे ‘सिद्ध’ ठरतात). सिद्ध रूपे ‘साधु’ ठरली आणि ‘साधु’ रूपे सिद्ध रूपांतून सुटली नाहीत. म्हणजे व्याकरणाने रचना कशा उपलब्ध होतात, ते दाखवण्याचे काम चोख बजावले. रचनेच्या बरोबर शब्दांकनाचे आणि अर्थांकनाचे नियम दिल्याशिवाय रचना पूर्णपणे सिद्ध होत नाही.

व्याकरणगत नियमांची बांधणी

व्याकरणगत नियमांचे रचनेचे नियम, शब्दांकनाचे नियम आणि अर्थांकनाचे नियम असे गट पडतात. या नियमांनी सिद्ध होणाऱ्या रचना एकात एक सामावलेल्या असतात.

लहानात लहान पदघटक (फॉर्मेटिव्ह), नंतर पद (वर्ड), पदबंध (फ्रेज), वाक्य (सेंटेन्स), वाक्यबंध (सेंटेन्स-सीक्वेन्स) आणि शेवटी प्रबंध (टेक्स्ट) अशी श्रेणीव्यवस्था मानली; तर व्याकरणाचे पदविचार (पदांची पदघटकांतून सिद्धी) आणि वाक्यविचार (पदबंध, वाक्य, वाक्यबंध यांची सिद्धी) असे दोन भाग मानता येतील. (पदघटकांनाच प्रकृतिप्रत्यय, रूपिम, पदिम अशाही संज्ञा वापरल्या जातात.)

दांची पदघटकांत फोड करताना मराठी भाषेच्या पदविचारात समास (प्रकृती + प्रकृती), साधित (प्रकृती + कोशविस्तार करणारे - पणा, - इक, - वणे, अ-सारखे साधक प्रत्यय), अभ्यस्त (प्रकृती + द्विरुक्ती), नामविकार, क्रियाविकार या रचना विचारात घ्याव्या लागतात.

दबंधांची पदांत फोड करताना विविध प्रधान-गौण-अन्वय दिसून येतात. उदा. ‘क्षणापुरती ओळख’, ‘स्वभावाची ओळख’, ‘मैत्रीण म्हणून ओळख’ या पदबंधांत ‘ओळख’ या प्रधान घटकाचा गौण घटकांकडून अनुक्रमे अर्थविस्तार, अर्थपूरण, अर्थविशदीकरण झाले आहे.

वाक्‍याची पदबंधांत फोड करताना कर्ता-क्रियापद, कर्म-क्रियापद यांसारखे अन्वय दिसून येतात.

वाक्‍यांची वाक्‍यबंधात जोड करताना ‘मी जिंकलो, मी हरलो’, ‘मी जिंकलो किंवा मी हरलो’ अशा विविध प्रकारची जोडणी होते.

वाक्‍यबंधांची प्रबंधात जोड करताना काही नियम असलेच, तर ते व्याकरणाचे नसून निबंधन (कंपोझिशन), वादविवाद (डिबेट), अलंकार (र्‍हेटारिक) यांचे नियम असणार.

खाद्या रचनेची फोड करताना तिच्यामधील घटकांचे एकमेकांत नाते असते. ते अन्वयाचे असते किंवा जातीचे असते.

जातो : जाईन - येतो : येईन

शब्दांग आणि अर्थांग या दोन्ही दृष्टींनी हे समीकरण ठीक दिसते. जा -, ये -, - तो, - ईन ही फोड त्यामुळे सहज लक्षात येते, जा - आणि - तो, जा - आणि - ईन, ये - आणि - तो, ये - आणि - ईन या जोड्यांमध्ये क्रियाप्रकृती आणि क्रियाविकारप्रत्यय असा अन्वय आहे. जा - आणि - ये, - तो आणि - ईन या जोड्यांमध्ये मात्र अनुक्रमे क्रियाप्रकृती आणि पर्यायी क्रियाप्रकृती, क्रियाविकारप्रत्यय आणि पर्यायी क्रियाविकारप्रत्यय अशी सजातीयता आहे. तीच स्थिती पुढील वाक्‍यश्रेणीवरच्या समीकरणाची आहे.

मी जाईन : आम्ही जाऊ - मी येईन - आम्ही येऊ, कर्ता आणि क्रियापद यांच्यामधल्या अन्वयाला - ईन आणि - ऊ या क्रियाविकारप्रत्ययांची सुसंवादी निवड कर्त्याला पुष्टी देते. सजातीयता म्हणजे सारखे अन्वय उपलब्ध असणे; अन्वय असतो तो विशिष्ट जातीच्या घटकांमध्ये असतो.

ब्दांग, अर्थांग आणि या दोन्हींना जोडणारे अन्वय व सजातीयता हे विनियोग - संबंध (डिस्ट्रिब्यूशनल रिलेशन्स) या तीन पायांवर व्याकरणाची श्रेणीबद्ध इमारत उभी आहे.

पहा : ध्वनिविचार; भाषा; भाषाशास्त्र; भाषाशिक्षण; वर्णविचार; व्युत्पत्तिशास्त्र; शब्दार्थविद्या.

संदर्भ : 1. Allerton, D. J. Essentials of Grammatical Theory, London, 1979.

2. Lyons, John, Introduction to Theoretical Linguistics, Cambridge, 1968.

3. Napoli, Donna Jo, Syntax : Theory and Problems, New York, 1993.

४. मालशे, मिलिंद स. आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन, मुंबई, १९९५.

- केळकर, अशोक रा.

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate