অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निबंध - ग्रामीण विकासात आधुनिक तंत्रज्ञानाचा सहभाग

विषय : ग्रामीण विकासात आधुनिक तंत्रज्ञानाचा सहभाग

दिनांक २ जानेवारी  ते ४  जानेवारी २०१६ या कालावधीत   अमृतवाहिनी इंजिनिअरींग कॉलेज, संगमनेर यांनी  "अमृतवाहिनी  मेधा २०१६'  कार्यक्रमाचे आयोजन केले होते.   या कार्यक्रमात विकासपिडियाचे  कॅम्पेन करण्यात आले.  याचाच एक भाग म्हणून तेथील सर्व पदवी आणि पदवीत्युतर अभियांत्रिकीच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकासाठी  'ग्रामीण विकासात आधुनिक तंत्रज्ञानाचा सहभाग' या विषयावर  निबंध स्पर्धा घेण्यात आली.

खाली स्पर्धेत आलेले प्रथम, द्वितीय आणि तृतीय  पारितोषिक विजेत्यांचे निबंध दिले आहे.

प्रथम पारितोषिक विजेता निबंध

लेखक -  चंदे कल्याणी उत्तम

काळ्यारात्रीला पार पडून शुभ सकाळ होते. सकाळी शेतकरी रानाकडे जातो. व्यापारी धनाकडे जातो. विद्यार्थी ज्ञानाकडे जातो. थोडक्यात काय तर माणूस आपल्या जगण्याकडे जातो. माणूस जगात असताना सतत नाविन्याचा ध्यास घेत असतो. त्यासाठी विविध तंत्रांचा शोध घेत असतो. अगदी अनादी काळापासून तो नाविन्याचा शोधात आहे. अशा नावीन्यातून नवं तंत्र विकसित होत असतं. अशा तंत्रातून तो आपलं जगणं अधिकाधिक सुकर करत असतो. म्हणजेच तो आपल्या गावाच्या विकासासाठी नवतंत्रज्ञानाच्या उपयोगाविषयी आपण माहिती घेऊयात.

ग्रामगीतेमध्ये तेराव्या अध्यायातील १०३ आणि १०४ व्या ओव्यांत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे.

“ सुंदर असावे वाचनालय! नाना ग्रंथ ज्ञानमय!

करावया सुबुद्धीचा उदय! गाव लोकी!!

काय चालले जगामाजी! कळावे गावी सहजासहजी!

म्हणोनी वृत्तपत्रे असावी ताजी!

आकाशवाणी त्याठायी!!

गावाला जगामध्ये काय चालले आहे याची माहिती व्हावी आणि त्यासाठी आकाशवाणीचा उपयोग करावा असे तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे. म्हणजेच तंत्रज्ञानाचा गावाच्या विकासासाठी उपयोग करण्याचे महत्त्व तुकडोजी महाराजांनी विषद केले आहे.

अलीकडच्या काळात माहिती, तंत्रज्ञान आणि संवादाच्या क्षेत्रात अमुलाग्र क्रांती झाल्याचे आढळून येत आहे. याचाच उपयोग ग्रामीण विकासात करून घेण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विविध उपयोगांकरिता तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातून गावांचा विकास घडून येत आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृषीक्षेत्रात तर दखलपात्र बदल घडून येत आहे. प्रथम कृषीक्षेत्रातील काही नव्या तंत्रांची माहिती घेतली पाहिजे.

अलीकडच्या दशकात शेतीमध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. नॅनो म्हणजे छोटा. ८० च्या दशकात जन्म घेतलेल्या नॅनो तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वनस्पतींमधील सुप्त गुणांवर प्रयोग करून जाती विकसित करण्यामध्ये शास्त्रज्ञांना यश प्राप्त झाले आहे. नॅनो चिप्सच्या सहाय्याने वनस्पतीमध्ये असणारी विविध जनुके चाचणी केली जाते. त्यातून कोणते जनुक वनस्पतीच्या चांगल्या स्थितीत व आजारपणाच्या काळात स्थिरावते किंवा क्रियाशील राहते याची कल्पना येते. या नॅनोतंत्राचा वापर करून पिकांवर पडणाऱ्या किडी आणि रोगाचे नियंत्रण करता येते. नॅनो यंत्र अथवा नॅनो उपकरणे यांच्या माध्यमातून वनस्पतीची सुदृढता करून घेता येते. यात तंत्राच्या सहाय्याने रासायनिक खतांचा मर्यादित ओहोन आरोग्यावर होणारा परिणाम व जमिनीचे प्रदूषण कमी करण्यास मदत होते. तसेच पिकांच्या उत्पादन क्षमतेच्या वाढीसाठीही या तंत्राची मोठी मदत होते. भाजीपाला साठवण व त्यावरील प्रक्रियेसाठी या तंत्राचा उपयोग करण्यात येतो. ज्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत तर होतेच मात्र त्यातून गावातील शेतकऱ्यांचा आणि पर्यायाने गावाचा विकास साधण्यास मदत होते. याशिवाय लेसरचा वापर करून शेताचे सपाटीकरण, शेतात रेन वॉटर, हार्वेस्टिंग, जमिनीचे परीक्षण करण्याची पोर्तेबल कीट वापरणे इत्यादी देखील नळ्या तंत्रज्ञानाचे कृषी क्षेत्रातील उपयोगाची उदाहरणे देता येतील.

शेतीमध्ये नैसर्गिक संसाधनांच्या वापराला देखील नळ्या तंत्रज्ञानाची जोड देता येणे शक्य झाले आहे. सौर उर्जेचा उपयोग पाणी गरम करणे, पदार्थ शिजविणे याबरोबरच रात्रीच्या वेळी प्रकाश निर्माण करण्यासाठी होतो. अलीकडच्या संशोधनाने आता पिके, फलोत्पादन, खुली कोठारे, कृषीभवने इत्यादींचे संरक्षणासाठी सुद्धा सौरउर्जेचा वापर करणे शक्य झाले आहे. “ सौर फोटोव्होटाईक विद्युत कुंपण” या तंत्राद्वारे हे संरक्षण करता येऊ शकते. यामध्ये रक्षित करावयाच्या क्षेत्रात दिलेल्या कुंपणामध्ये सौरऊर्जेद्वारे सौम्य प्रमाणात वीज प्रवाहित केली जाते. ज्याद्वारे रानटी जनावरे, गुरेढोरे इत्यादींनी विद्युत कुंपणाला स्पर्श केल्याबरोबर त्यांना ०.०००३ सेकंद एवढा विद्युत धक्का जाणवतो. शिवाय ज्यातून कुंपणाला कोणत्याही प्रकारची दुखापत होत नाही. मात्र ती जनावरे पुन्हा त्या कुंपणाला स्पर्श करत नाहीत. आणि आपले क्षेत्र त्यांच्यापासून सुरक्षित राहते. या तंत्राला “सौर कुंपण” म्हणूनही संबोधले जाते.

एखाद्या रोगाची लागण कोणत्याही प्रदेशात झाली तरी त्यावर त्या ठिकाणी वेळोवेळी केलेल्या योग्य आणि यशस्वी उपाययोजनेबाबतची माहिती आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून मिळते. ज्यामुळे आपल्याकडे तशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यावर त्या उपाययोजनांची माहिती घेता येऊ शकते. तसेच अधिक प्रयोगशील शेतकऱ्यांना नवे प्रयोग राबविण्यासाठी मोठी मदत होते. याशिवाय दररोजचे हवामान, वेधशाळेचा पावसाचा अंदाज इत्यादी माहितीदेखील आपण इंटरनेटच्या सहाय्याने प्राप्त करून घेऊ शकतो.

संगणक, मोबाईल, आणि टॅबलेट्स इत्यादी साधने म्हणजे तर नव्या तंत्रज्ञानाचा आविष्कारच म्हणावा लागेल. संगणकाने माणसाचं जगणंच समृद्ध झालं आहे. संगणकाच्या सहाय्याने विविध कामे करून गावातील बेरोजगारांना नवा उद्योग मिळू लागला आहे. यातून गावामध्येच व्यवसायाच्या नवीन संधीही निर्माण झाल्या आहेत. तसेच गावात राहत असतानाचा शेती किंवा एखादा जोडधंदा करीत असतानाच शैक्षणिक पात्रता वाढविणे शक्य झाले आहे. असे अभ्यासक्रम पूर्ण करून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरबसल्या शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे. ज्यायोगे गावातील युवकांना उच्च शैक्षणिक पात्रता धारण करणे शक्य झाले आहे. अल्प भांडवलात आपल्यालाच गावामध्ये संगणक प्रशिक्षण केंद्र उभे करता येऊ शकते. ज्यातून नवा व्यवसाय निर्माण होऊ शकतोच आणि गावाला संगणकाने ज्ञान दिल्याचे समाधानही मिळू शकते.

गावातील आठवडी बाजारातही आता तंत्रज्ञानाची जोड देता येणे शक्य होऊ लागले आहे. आपल्या उत्पादनाची माहिती संगणकाच्या सहाय्याने इंटरनेटद्वारे जगासमोर मांडता येते. यामुळे व्यापाऱ्यांना आपल्या शेतातील उत्पादनांची माहिती संगणकाच्या पडद्यावर पाहणे शक्य झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा जन्म मालासारखा अधिक माला लोकांपर्यंत पोहचविता येणे शक्य झाले आहे. तसेच यातून उत्पादित मात्र लवकरच विकला जाण्याची शक्यता वाढली आहे.

गावात काम करणाऱ्या शासन नियुक्त प्रतिनिधींना, ग्रामपंचायतच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठीसुद्धा नव्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे.

संगणकाच्या मदतीने गावामध्येच बसून आता आपण आपल्या रेल्वे प्रवासाचे, बस प्रवासाचे आरक्षणही करू शकतो. ज्यामुळे आपला वेळ आणि श्रम वाचतात. यापलीकडे जाऊन गावाबाहेर असणाऱ्या गावकऱ्यांना गावाच्या विकासात समाविष्ट करून घेण्यासाठी त्यांना गावातील परिस्थिती, हवामान, पीक-पाऊस, गावातील एखादी घटना इत्यादी माहितीच्या देवाणघेवाणीकरिता ई-मेलचा, एस एम एस चा, मोबाईलचा वापर करणे शक्य झाले आहे. ज्याजोगे बाहेरून येणारे किंवा गावाबाहेर असलेल्या व्यक्तींना गावाशी जोडल्याचे समाधान तर मिळतेच. याशिवाय गावासाठी काही मदत, सहकार्य करावयाचे असल्यास त्यांना त्यांच्या कामात उपयोग होऊ शकेल. याशिवाय गावातील संगणक प्रशिक्षित वर्ग मिळून गावाची संपूर्ण अद्ययावत माहिती देणारा ब्लॉग तयार करू शकतो. ज्यातून गावाची वर्ग मिळून सर्व माहिती एकाच ठिकाणी संगणकाच्या पडद्यावर कोणालाही पाहता येऊ शकेल. ज्यातून आपल्या संपर्कात नसलेल्या गावकऱ्यांपर्यंतही आपली माहिती पोहचू शकते. आणि त्यांनाही निरनिराळ्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी हातभार लावता येऊ शकेल.

आता एवढी सारी साधनं आपल्याकडे असतांना केवळ त्यांना सुयोग्य वापर करणं महत्वाचं आहे. चला तर मग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूयात आणि आपल्या गावाचा विकास साधुयात.

धन्यवाद!

द्वितीय पारितोषिक विजेता निबंध

लेखक - चौधरी पियुष नारायण

आजकाल असं म्हटलं जातं, जग छोटं झालंय, जग जवळ आलंय. हे फक्त आधुनिक तंत्रज्ञानाच्या नळावरच म्हटलं जातं. अगदी गरीबांपासून ते श्रीमंतापर्यंत आढळणाऱ्या मोबाईलपासून ते सातासामुद्रापाड प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानापर्यंत या सर्वांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचाच उपयोग करून घेतला हेला आहे. तसेच एक दिवसही उघडून पाहिल्याशिवाय चैन न पडणाऱ्या तरुणांच्या व्हॉट्सअॅप मध्येही तंत्रज्ञानाचाच वापर केला गेला आहे.अशा या आधुनिक तंत्रज्ञानामुळे वेळ व कष्ट या दोघांची बचत होते. त्यामुळे या तंत्रज्ञानामुळे जगणं अतिशय सोपं व सोयीस्कर झालं आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

प्रत्येक देशाचा विकास हा त्या देशातील ग्रामीण जनतेच्या, ग्रामीण भागाच्या विकासावरच अवलंबून असतो. त्यातल्या त्यात भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला तुलनेने जरा जास्तच महत्त्व असल्याचे दिसून येते. अशा या तंत्रज्ञानाचा ग्रामीण विकासात हत्तीचा वाट आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्रामीण विकासाला गती तर आलीच आहे, त्याचबरोबर ग्रामीण, दुर्गम भागातील जनतेचं जीवनमानही उंचावलं आहे.

ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय असणाऱ्या ‘शेती’ त आधुनिक तंत्रज्ञानामुळे बराच विकास होत आहे. आज माती परीक्षणापासून ते पिक येईपर्यंतच्या कामांमध्ये शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेत आहे. यामुळे उत्पन्न पूर्वीपेक्षा कित्येक पतीने वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस आले असून त्यांना त्यांचा विकास साधने सोयीचे झाले आहे. मातीचे योग्य परीक्षण करून योग्य खते वापरल्यामुळे मातीचा कस, पोषकता टिकवून ठेवता येत आहे. आजकाल शेतकरी अगदी नांगरणी, वखरणीपासून तर पिक काढणीपर्यंत यंत्राचे सहाय्य घेत आहे. यामुळे त्याच्या कामास गती आली आहे. शेतात निंदणी न करता शेतात तणनाशकांचा फवारा मारून तण घालवत आहे. त्यामुळे कष्ट व वेळ दोघांची बचत झाली आहे. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना वातावरणाची माहिती तसेच शेतमालाच्या हमीभावाची माहिती घरबसल्या मोबाईलवर मिळते. त्यामुळे त्यांना नियोजन करणे खूपच सोयीचे झाले आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनवलेल्या शितगृहांमध्ये शेतकरी आपला भाजीपाला, फळे तसेच फुले कित्येक दिवस साठवू शकतो. हल्ली तर कृषी सेन्सरवरही संशोधन सुरु आहे. या सेन्सरमुळे शेतकरी पिकांवरील रोग ओळखू शकतील. अशाप्रकारे आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्रामीण शेतकऱ्यांच्या विकासाला गती आली आहे.

दूरध्वनीमुळे तसेच भ्रमणध्वनीमुळे ग्रामीण भागातील लोकसंख्येचा शहराशी संपर्क वाढला आहे. तसेच या जनतेला आपल्या आप्तेष्टांशी संपर्क साधणे शक्य झाले आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे दळणवळणही सोपं झालंय. इंटरनेटच्या वापरामुळे गावातील जनतेला घरबसल्या विविध माहिती मिळते. ग्रामीण विद्यार्थ्यांना बरेच ज्ञान इंटरनेटच्या माध्यमातून मिळते. ग्रामीण भागातील व्यापारी त्यांच्या मालाचे भाव घरबसल्या पाहत आहे. त्यामुळे त्यांचा वेळ वाचत आहे. हे सगळं शक्य झालंय, ते फक्त आधुनिक तंत्रज्ञानामुळेच!

ग्रामीण भागात आजकाल पारंपारिक उर्जेचा वापर बराच वाढला आहे. ग्रामीण भागात जागोजागी सौर दिवे लावले गेले आहेत. त्यामुळे विजेची बचत तर होतच आहे, सोबतच फुकट मिळणाऱ्या सौरउर्जेचा वापरही करून घेतला जातोय. सौरउर्जेचा वापर करून सौरदिव्यासोबतच सौरबंब, सौरचुली आणि सौरकुकरही ग्रामीण भागात हल्ली मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. त्यामुळे एरवी वापरल्या जाणाऱ्या अपारंपरिक उर्जास्त्रोतांना चांगला पर्याय निर्माण झाला आहे. गुराढोरांच्या शेणापासूनही आज बायोगॅसची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे घाण म्हणून कचरा गणल्या जाणाऱ्या शेणापासून ऊर्जानिर्मिती शक्य झाली आहे. पूर्वी गाई, म्हशींचे दुध काढण्यासाठी माणसं लागायची पण आज बाजारात दुध काढायचे यंत्रही उपलब्ध झाले आहे. गावातील कचऱ्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करून त्यावर प्रक्रिया केली जाते व खतनिर्मिती केली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जैविक खत बनवण्याच्या विविध पद्धती शोधून त्यांचा वापर करण्यात येत आहे. या सगळ्यांचे श्रेय आधुनिक तंत्रज्ञानालाच जाते.

ग्रामीण भागातील स्त्रीला आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. पूर्वी बायकांना चुलीवर स्वयंपाक करावा लागत असे, त्यामुळे त्यांचे डोळे बिघडण्याची दाट असते तसेच धुरामुळे श्वसनाचे विकार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पण आजकाल गॅस सौरचुली, शेगडी आल्यामुळे हे आजार होण्याची शक्यता नाही. पूर्वीच्या पाट्या वरवंटयाची जागा आता मिक्सर ने घेतली आहे. अशाचप्रकारे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निर्मित नवनवीन वस्तूंचा वापर ग्रामीण स्त्री आवर्जून करत आहे. त्यामुळे तिला घरकामातून सवड मिळून जगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेळ मिळत आहे.

पूर्वी असं म्हटलं जायचं, स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मुल. ग्रामीण भागात तरी फक्त चूल आणि मुल एवढीच चौकट असणाऱ्या या ग्रामीण स्त्रीच्या कक्षा आता रुंदावल्या आहेत. आज ही स्त्री सक्षम झाली असून स्वतःचे घर सांभाळून बाहेरच्या जगातही आपले अस्तित्व निर्माण करत आहे. या सगळ्यांमध्ये तंत्रज्ञानाचा हत्तीचा वाट आहे. असंच म्हणावं लागेल.

बदलत्या काळाबरोबर आजकालची शिक्षणपद्धती पण बदलत आहे. आणि हा बदल आवश्यकच आहे. या दशकात असाच एक मोठा बदल व्हायचे संकेत लागले आहेत, किंबहुना बऱ्याच शहरात व काही खेड्यांमध्ये या बदलाने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. हा बदल म्हणजे ‘ई-लर्निंग’ म्हणजे इंटरनेटच्या सहाय्याने शिकणे या बदलाच्या बऱ्याच सकारात्मक बाजू हल्ली दिसून येत आहेत. हा बदलही आधुनिक तंत्रज्ञानामुळेच शक्य झाला आहे. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थांच्या कक्षा गावापर्यंतच मर्यादित न राहता जगभरात विस्तारल्या आहेत. या सगळ्यांचा फायदा म्हणजे ग्रामीण विद्यार्थी स्पर्धेत कुठेही शहरी विद्यार्थ्यांच्या मागे राहत नसून त्यांच्याशी स्पर्धा करण्यास सज्ज झाले आहे. हे सगळं आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावरच शक्य झालंय.

आजकाल स्थानिक स्वराज्य संस्था जसे ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि नगरपालिका सुद्धा इंटरनेटद्वारे संगणकामार्फत जोडल्या गेल्या आहेत. गावातील बँका संगणीकृत झाल्या आहेत. त्यामुळे हे सगळं हाताळता येणाऱ्या या प्रकारचे कौशल्य असणाऱ्या कामगार वर्गाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सुशिक्षित जनतेला रोजगार निर्माण झाला आहे. यामुळे त्यांना रोजगारासाठी शहरात वणवण फिरायची गरज भासत नाही.

‘आरोग्य’ हे सर्वात मोठं धन असं म्हटलं जातं. हे जपण्यातही तंत्रज्ञानाचा स्वतःचा सहभाग आहे. पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे तसेच डासांमुळे तापज्वर, मलेरिया, व साथीचे आजार होण्याची दाट शक्यता असते. या प्रकाराच्या आजारांशी आपण योग्य कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, योग्य लसीकरण यांद्वारे दोन हात करू शकतो. तंत्रज्ञानाच्या मदतीने गावातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केल्याने गाव स्वच्छ राहते. यामुळे ग्रामीण जनतेचे आरोग्य बिघडण्याची शक्यता बरीच कमी होते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज अतिशय नाजूक अशा शस्त्रक्रिया अतिशय यशस्वीपणे पार पडतात. यामुळे कोणत्याही दुर्धर आजारावर विजय मिळवणे सहन शक्य झाले आहे. पूर्वी ग्रामीण भागातील मृत्यूदराचे प्रमाण खूपच जास्त होते, ते आज बरेच कमी झाले आहे, आणि हे शक्य झालेय, फक्त आधुनिक तंत्रज्ञानामुळेच!

या तंत्रज्ञानामुळे ग्रामीण जनतेचा हगाशी संबंध जोडला गेला आहे. वृत्तपत्र, न्यूज चॅनेल्स, इंटरनेट यांद्वारे हा संबंध प्रस्थापित केला गेला आहे. त्यामुळे ‘आधुनिक तंत्रज्ञान’ ग्रामीण जनता आणि जग यांच्यातील दुवा आहे असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. अशाप्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचे सकारात्मक बदलच ग्रामीण भागाच्या विकासाला हातभार लावत आहेत.

अशाप्रकारे ग्रामीण भागाचा विकास मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रानावारच अवलंबून आहे. तंत्रज्ञानामुळेच ग्रामीण विकासास गती आली आहे. जुन्या पद्धती व आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर मेळ घालून आज आपल्या भारतातील ग्रामीण भागाचा आणि त्यामुळेच आपल्या भारताचा विकास साध्य होत आहे.

शेवटी या तंत्रज्ञान व ग्रामीण विकास यांना खालील ओळीच समर्पक ठरतील,

करू तंत्रज्ञानाचा उपयोग,

ग्रामीण विकासाचे जुळून येतील योग.

धरू उत्कृष्टतेची आस,

होईल देशाची प्रगती झकास.

 

तृतीय पारितोषिक विजेता निबंध

 

लेखक - पटाईत अंकुर अरुण

कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशातील ग्रामीण भागाच्या विकासावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, ‘भारत’ हा एक कृषिप्रधान देश असून त्याचा विकास हा पूर्णपणे देशातील ग्रामीण भागावर अवलंबून आहे, म्हणजे खेडेगावांवर. जर एखादा देश विकसित करायचा असेल तर त्या देशातील खेडे सुधारायला हवेत म्हणजे काय तर त्या खेड्यांचा विकास करायला पाहिजे आणि हे सर्व काही तेव्हाच होऊ शकते जेव्हा सार्वजन एकत्र येऊन देश विकासाची कामे करतील. “सबका साथ, सबका विकास” ह्या तत्वाच्या तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण करू शकतो.

विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून आपण बरेच शोध लावले आहेत आता त्याचाच वापर करून आपण आपले गावे, शहरे व हळूहळू आपला देश सुधारू शकतो. आपल्याला महान समाजसुधारक अण्णा हजारे माहितच आहेत त्यांनी त्यांच्या गावात विविध तंत्रज्ञानाचा वापर केला गावाचा विकास केला नि गावाला आदर्श गाव असा पुरस्कार मिळवून दिला.

ग्रामीण भागात आधीपासूनच बैलगाडी पाहायला मिळते. हि बैलगाडी आपण बैलाची जोडी वापरून चालवतो पण आता बैलगाडीची जागा ट्रॅक्टरने घेतलेली आहे. त्यामुळे कामाचा वेगही वाढला व बैलाचे काम फार प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येते. शेतीकामासाठी ट्रॅक्टरच्या वापरामुळे होणारा त्रासही फार प्रमाणात कमी झाला आहे. ट्रॅक्टर हे विविध तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले यंत्र आहे.

शेतकरी हा आपला अन्नदाता आहे असे आपण म्हणतो तो सुखात राहिला तरच आपणही सुखात राहू शकू. त्याला सुखात ठेवण्यासाठी आपण त्याच्यावर पडणाऱ्या कामाचा ताण कमी करायला हवा जसे कि शेती करण्यासाठी लागणाऱ्या अवजाराचे आधुनिकीकरण करणे, विविध तंत्रज्ञान वापरून कमीतकमी क्षेत्रफळात जास्तीत जास्त उत्पादन कसे काढणे याचा अभ्यास करणे.

भारतीय संस्कृती नुसार ग्रामीण भागात पूर्वीपासूनच जेवण तयार करण्यासाठी महिला चुलीचा वापर करत असल्याचे दिसून येते. जेव्हा जेव्हा स्वयंपाकासाठी त्या चुलीपुढे बसत त्यामुळे चुलीत निघणाऱ्या धुरामुळे त्यांचे डोळे जळजळत तसेच त्यांना श्वसनाचे आजार होत पण आजकाल विज्ञान व तंत्रज्ञान यांचा वापर करून निर्माण करण्यात आलेल्या गॅस व शेगडीचा वापर वाढत चालेला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धूर निर्माण होत नाही आणि त्यामुळेच डोळ्यांची जळजळ व श्वसनाचा आजार होण्याची शक्यताही नाहीशी झाली आहे. खरंच विज्ञान व तंत्रज्ञान हे देवाने माणसाला दिलेले एक वरदानच आहे.

पूर्वीच्या काळात ग्रामीण भागात संदेशवहनाचा प्रचंड त्रास होई त्यावेळी पत्रे व तर हि प्रमुख ही प्रमुख स्त्रोत होती. संदेशवहनाचा आपण जर एखाद्याला पत्र लिहिलं तर ते त्याला मिळायला ४-५ दिवसांचा कालावधी लागे पण आपल्या विज्ञानाच्या अविष्कारामुळे हे सर्व अगदी सोपं झालं आहे ते साधन (अविष्कार) म्हणजे टेलिफोन किंवा भ्रमणध्वनी जेव्हा आपण हे यंत्र वापरतो तेव्हा आपला वेळी वाचतो व सर्वकाही जवळ असल्यासारखं आहे.

आता आपण ३-४ सेकंदात दुसऱ्या व्यक्तीला फोन करू शकतो आणि त्यामुळे अतिघाईची कामे लवकर होण्यास मदत होते. ह्या एका अविष्कारामुळे व त्यांच्या वापरामुळे आपण आपला निरोप योग्य माणसाला योग्य वेळात पोहचवू शकतो.

विज्ञानाचा अजून एक पण अतिशय महत्त्वाचा अविष्कार म्हणजे संगणक व इंटरनेट याच्या शोधामुळे व ग्रामीण भागात वापरामुळे शालेय दशेतील मुला-मुलींनी smart education  नेमकं कसं असतं ह्याचा अनुभव आला. संगणक व इंटरनेट याच्या वापरामुळे मुला-मुलींच्या अभ्यासासाठी एक स्त्रोत आहेत. असे म्हणण्यास काही हरकत नाही.

शालेय जीवनातील मुले मुली जगात काय चालू आहे, आपण काय केलं पाहिजे, काय करायला नको हे सर्व संगणक व इंटरनेट मुळेच शक्य झालं आहे. “जग हे जवळ येत आहे.” आपण बऱ्याचदा नारे ऐकले असणार.

“मुलगी शिकली तर प्रगती झाली .”

खरच हे सर्व मस्तच आहे इंटरनेटमुळे अभ्यासासाठी लागणारी माहिती ही क्षणार्धात मिळते त्यामुळे मुलामुलींचा अभ्यासातील Interest पण वाढल्याचे दिसून येते. (आवड, रुची).

अजून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गाडी किंवा मोटारसायकल ह्यामुळे खेड्याचा विकासात वेग मिळाला आहे. मोटारसायकल, चारचाकी यामुळे प्रवासाचा ताण कमी होतो. गाडीच्या वापरामुळे प्रवास करणे अगदी सोपे झाले आहे. त्यामुळेही ग्रामीण भागाचा प्रकार व तेथून दुसऱ्या गावी केलेल्या प्रवासावर अवलंबून आहे. विविध प्रकारच्या गाड्या वापरामुळे ग्रामीण भागाचा एक प्रकारे विकासच होत आहे.

गाडीच्या वापरामुळे दळणवळणची पद्धत सोपी झाली आहे हे पाहण्यास मिळते. प्रवास करणं ही एक खरंच मस्त पुस्तकाची कथा असावी अशीच गोष्ट आहे.

आधीच्या काळी कोणत्याही प्रकारचे मनोरंजन होत नसे पण आता घराघरात पोहचलेल्या T.V. मुळे प्रचंड मनोरंजन होते. आणि T.V. हा एक विज्ञान व तंत्रज्ञानाचा एक अविष्कारच आहे.

ह्या मनोरंजनाच्या यंत्रामुळे, माणसाचा कामाचा क्षीण निघून जातो. ह्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे खूप प्रमाणात सर्व कलावंत हळूहळू आपल्याकडे बघून म्हणजे आपल्या परिचयाचे होत आहे. माणसानी हसायला हवं तरच माणसाचं आयुष्य वाढतं.

आधीच्या काळात खेड्यागावातील बायकांची प्रसूती हि घरीच होत पण आता त्यांची प्रसूती हि हॉस्पिटल मध्येच आहे आणि त्यामुळे आई आणि मुल दोघेही सुखरूप राहतात. आणि त्यांच्या आरोग्यासही काही हानी पोहचत नाही. तंत्रज्ञानाच्या मदतीने अवघड कामे सोपी झाली आहेत.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सर्वात जास्त प्रभाव हा शेतीवर झाल्याचे पाहायला मिळते. शेतीतील कोणतेही प्रश्न शेतकरी “किसान कॉल सेंटर” ला फोन करू शकतो. व त्याला योग्य ते मार्गदर्शन केले जाऊ शकते. कोणत्यावेळी कोणती पिके लावावीत त्यावर कोणते औषध फवारावे तसेच त्याची काळजी कशी घ्यावी. असे अनेक प्रश्न व त्याचे अचूक समाधान आपल्याला मिळते. हे सर्व कसे शक्य झाले बरं? फक्त आणि फक्त “ग्रामीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळेच ना...!” अनेक शेतकरी आत्महत्या करतात कारण अपुऱ्या पावसामुळे किंवा अतिवृष्टी मुळे पिकांचे नुकसान होते व त्यामुळे शेतकऱ्याचे जीवन अगदी विस्कळीत होऊन जाते. व त्याच्याकडे आत्महत्या करण्याखेरीज जाहीच उपाय उरत नाही. पण या गोष्टींवर आता अनेक उपाय आहेत जसे कि अनेक तंत्रज्ञान विकसित झाले आहेत. वातावरण व त्याचा अंदाज वर्तवणारी अनेक साधने उपलब्ध आहेत ज्यावर आपण वातावरणाचा अंदाज घेऊन आपल्या शेतीची निगा राखू शकतो. व अवेळी होणाऱ्या बदलामुळे होणारी पिकांची नासाडी रोखू शकतो.

एक नवीन तंत्रज्ञान विकसित झालं आहे. त्याचं नाव आहे, “Artificial Raining” म्हणजे “कृत्रिमरित्या पाऊस” पाडणे. या तंत्रामध्ये आपण पाहिजे त्या वेळी आपल्या शेती परिसरात पाऊस पडू शकतो. ज्यामुळे आपल्या पिकाचे अवेळी होणाऱ्या पावसामुळे होणारे नुकसान आपण थांबवू शकतो. आपल्या शेतीत पाणी देणे हा प्रकार सर्वांनाच माहित असेल त्यासाठी जर आपण ठिबक व तुषार सिंचनाचा वापर जर केला तर आपण पाण्याची होणारी नासाडी टाळू शकतो व हवे तेवढेच पाणी पिकांना देऊ शकतो जेणे करून पिकांचा योग्य प्रमाणात वाढही होऊ शकेल.

“पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी हेच जीवन आहे.” हे आपण करू शकतो जर आपण तंत्रज्ञानाचा वापर केला तर आणि पाणी हि एक प्रकारची राष्ट्रीय संपत्तीच आहे.

अजून एक महत्त्वाचं तंत्रज्ञान म्हणजे “Solar Panels” ते आपण पाणी गरम करायचं असो किंवा अन्न शिजवायचे असो तेव्हा वापरतो. त्यामध्ये आपण सूर्याच्या प्रकाशाचा उपयोग करतो आणि ते सूर्यकिरण एका ठिकाणी एकत्र करून त्यातून निर्माण होणारी उर्जा विविध कामाकरिता वापरतो. ही सूर्यापासून मिळणारी उर्जा मोफत असून फार मोठ्या प्रमाणात आपल्यासाठी उपलब्ध आहे. “शिर्डी” येथे अन्नालय आहे तेथे दररोज हजारो भाविकांसाठी जेवण किंवा महाप्रसाद बनवला जातो तेथेही हेच तंत्रज्ञान वापरतात.

विद्युत हि एक प्रकारची उर्जा असून त्याचा वापर हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हि उर्जा आपण विविध प्रकारे तयार करू शकतो. जसे कि पवन चक्की द्वारे विद्युतशक्तीची निर्मिती ही सोपी पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. Nimbalkar  Agricultural Research Institute (NARI) या संस्थेने अतिशय कार्यक्षमता असलेलं Lantern नावाचे उपकरण रॉकेलवर तयार केलेले आहे ज्याची क्षमता प्रकाश उर्जा तयार करण्याची असून १०० Watt विद्युत दिवा जेवढी उर्जा देतो तेवढीच ते देखील देते.

वरील नमूद केलेल्या गोष्टीवर आपण अंमलात आणल्या तर आपण खरंच ग्रामीण भागाचा विकास करू शकतो.

विविध तंत्रज्ञान जसे की Mobile Computing, Nitrogen Utilization, Herbicide-tolerance traits, Minichromose technology, Drought-resistance traits, RFID technology, soil and crop sensor, High flex tires, hyper precision, Automated grain off loaded.  इत्यादी तंत्रज्ञानामुळे आपण आपल्या शेतीत विविध पिकाचे उत्पादन करू शकतो. तंत्रशेतीमुळे अनेक फायदे होतात, प्रचंड कार्यक्षमता वाढते तसेच वेळही वाचतो. तंत्र शेतीमुळे उत्पादनही वाढते आणि उत्पादन वाढल्यास नफाही वाढतो.

“Technology is working for people rather than people working for it.”

तंत्रज्ञान हा मानवी जीवनातील एक अमुल्य ठेवा आहे.

आपण आतापर्यंत तंत्रज्ञानाचा चमत्कार पहिला पण तंत्रज्ञानाचा काही लोक गैरवापर ही करतात ते कसं? तर आपल्याला माहीतच आहे. गरोदर महिलांना डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेले जाते. काही कमी बुद्धीचे लोक जन्माला येणाऱ्या त्या निष्पाप बालकाचे लिंग तपासून घेतात जर मुलगा असला तर ठीक पण जर मुलगी असेल तर तिचा जीव घेतात त्यालाच आपण भृणहत्या किंवा गर्भपात असेही म्हणतो. अहो मुलगाच वंशाचा दिवा असे म्हणणे एकदम चुकीचे आहे आणि जर मुलीच जन्माला आल्या नाहीत तर हे वंशाचे दिवे कसे जन्माला तेतील याचा विचार करा जरा...

“स्त्री भृणहत्या हे एक मोठं पाप आहे,

ते कृपा करून कशीच करू नका.”

तंत्रज्ञानाचा वापर एखाद्याला वाचवण्यासाठी जीव देण्यासाठी करा पण कोणाचा जीव घेण्यासाठी बिलकुलच करू नका.

“एक लाडकी दो परिवारो को जोडणे का काम करती है,

उसे मारणे का पाप आप मत किजीये!”

तंत्रज्ञानाचा वापर फक्त आणि फक्त मानव हितासाठी व प्रगतीसाठी जावा इतकंच...

अशाप्रकारे तंत्रज्ञानाच्या योग्य वापराने आपण “ग्रामीण भागाचा विकास करू शकतो.” माणूस तंत्रज्ञानासाठी नसून तंत्रज्ञान हे माणसासाठी आहे.

 

 

 

अंतिम सुधारित : 7/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate